BREAKING NEWS
latest

ठाणे पोलीसांकडून राष्ट्रीय एकता दिवस निमित्त एकता दौडचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती निमित्त ठाणे शहरात दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजता एकता दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष दिवशी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी संपुर्ण देशभरात 'एकता दौड' आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर एकता दौड मध्ये ठाण्यातील सर्व नागरिकांनी, ठाणे पोलीस व त्यांचे कुटुंबीय तसेच पत्रकार बंधु भगिनी यांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून करण्यात येत आहे. तरी इच्छुक नागरिकांनी सदर कार्यक्रमासाठी दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ६.४५ वाजे पर्यत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तलावपाळी, ठाणे येथे उपस्थित रहावे.

"एकता दौड मार्गीका खालील प्रमाणे आहे."

छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथुन सुरू होवुन मुस चौक उजवी बाजु - साईकृपा हॉटेल, गडकरी रंगायतन सर्कल उजवी बाजु परफेक्ट ड्रायव्हिंग स्कुल सेंटजॉन हायस्कुल - चिंतामणी ज्वेलर्स चौक छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथे समाप्त होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत पोलीसांच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीमेत ३५० हून अधिक समाजकंटकांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात भुरट्या चोर्‍या, घरफोड्या, वाटमार्‍या, रात्रीच्या सुमारास सार्वजनिक चालणारे अवैध धंदे, दारू, तसेच अंमली पदार्थांची सेवनाचे अड्डे सुरू झाले होते. रेल्वे स्टेशन परिसरात चोरी-छुपे गैरधंद्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४३ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कल्याण-डोंबिवलीत पोलीस राज असल्याचे दाखवून दिले. रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत पोलीसांच्या वेगवेगळ्या पथकांनी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात अचानक धरपकडीसह धाडसत्र मोहीम राबवून ३५३ बदमाशांवर कारवाई केली.

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात यापूर्वीही अशाच प्रकारची धरपकड मोहीम सलग दोन ते तीन महिने राबविण्यात आली होती. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिवसाच नव्हे तर रात्रीच्या सुमारास चालणारे अवैध धंद्यांचे अड्डे शोधून उद्धवस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून गुंडांना तुरूंगात धाडण्यात आले, तर अनेकांना कोर्टाच्या फेर्‍या मारण्यास भाग पाडण्यात आले. कल्याण-डोंबिवलीला नशामुक्त करण्याचा विडा उचललेल्या पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या या मोहिमेमुळे रहिवासी, व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 कारवायांनी उसंत घेतल्याने बदमाश मंडळींनी पुन्हा डोके वर काढले होते. रात्रीच्या सुमारास गैरधंदे करणार्‍यांसह सार्वजनिक ठिकाणी अड्डे सुरू झाले असल्याची चाहूल लागताच उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना शनिवारी रात्री अचानक संदेश देऊन धरपकड आणि धाडसत्र राबविण्याचे आदेश दिले. या मोहिमेत उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे सहभागी झाले होते. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील इमारती, रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांच्या आडोशाने लपलेले भुरटे चोर, मद्यपी आणि गर्दुल्ल्यांची धरपकड सुरू केली. विविध भागात झाडा-झुडपांचा आधार घेऊन मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी बसलेल्या समाजकंटकांच्या झुंडी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. काहींनी पोलीसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापी अशांना पोलीसांनी पकडून त्यांची शहरात धिंड काढली. मद्यपान करून वाहने चालविणार्‍या चालकांकडून ४५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत ६ खतरनाक गुंडांना कोठडीचा रस्ता दाखविण्यात आला. २७ तडीपार गुंडाची तपासणी केली.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

 कल्याण-डोंबिवलीचे शहर आणि ग्रामीण भागात केलेल्या कारवाईसाठी १७ पोलिस निरीक्षक ४० सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, २३६ पुरूष कर्मचारी आणि १८ महिला कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. २७ तडीपार, दारू पिऊन वाहन चालवणारे ६, जुगार खेळणारे ३, घातक शस्त्र बाळगणारे ३, तर नाकाबंदी दरम्यान हाती लागलेल्या ४५ जणांकडून ४१ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकांनी २० लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग, २० हॉटेल्स आणि १२ बार तपासले. त्यामुळे 'ऑपरेशन ऑल आऊट'ची ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

मोहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार

 कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक पोलीसांकडून धरपकड आणि छापा मोहीम सुरू झाल्याने मोकळ्या मैदानांमध्ये ओल्या पार्ट्या झोडण्यासाठी बसलेल्या टोळक्यांची पळापळ झाली. धरपकड केलेल्या मद्यपींमध्ये सुस्थितीत घरातील काही जण हाती लागले. या सगळ्यांची कान पकडून उठाबशा काढल्या. त्यानंतर या सर्वांची ते राहत असलेल्या परिसरात वरात काढण्यात आली. शिवाय पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री आठ वाजल्यापासून सुरू केलेली ही धरपकड मोहीम पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. ही मोहीम यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. ३५० हून अधिक गुंड, समाजकंटक, मद्यपी, गर्दुल्ले, गैरधंदे करणार्‍यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून न्यायालयामार्फत कारवाई केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ते पहाटेपर्यंत धरपकड आणि छापा मोहीम राबवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, शांततेचा भंग करणारे, परिसरात गैरधंदे करणार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

डोंबिवलीच्या डॉ. अनघा हेरूर यांची महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि अनिल आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. अनघा हेरूर यांची नुकतीच महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (एमओएस) या भारतातील सर्वात मोठी नेत्रतज्ज्ञांची संघटनेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील नेत्ररोग क्षेत्राची नवी उंची गाठली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
३५ वर्षांची अखंड रुग्णसेवा आणि नेतृत्व

डॉ. अनघा हेरूर या गेली ३५ वर्षे नेत्ररोग क्षेत्रात रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली 'अनिल आय हॉस्पिटल'ने डोंबिवली, ठाणे, कल्याण, पलावा आणि बदलापूर येथे सात सुपरस्पेशालिटी नेत्ररुग्णालयांचा विस्तार साधला असून, संस्था यावर्षी ५३ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे.

त्यांनी आजवर लाखो रुग्णांना नेत्रारोग्य सेवा दिली असून मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिनाचे आजार, लेसिक शस्त्रक्रिया व इतर नेत्रशस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे. त्यांच्या कुशल हातून असंख्य रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभली आहे.

पुरस्कार व गौरव!

नेत्ररोग क्षेत्रातील उत्कृष्टता, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम डॉ. अनघा हेरूर यांच्या कार्यात दिसून येतो. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.
🏅 प्रमुख पुरस्कार आणि सन्मान:

Bhishagvarya Award – The Best Doctor
Doctor of the Year Award – IMA
Ishwarchandra Award – MOSCON
Hargobind Mishra IIRSI Gold Medal – Gwalior
Albal Oration Award – Solapur, 2025
RJK Singh Community Ophthalmology Award
Tejaswini Award
Dombivli Bhushan Puraskar
Adarsh Dombivilikar Award
Navdurga Puraskar
Stree Sanman Puraskar (मार्च 2023)
Woman Ophthalmologist of the Year – Hyderabad, 2023
Business Leader Award
Role Model of the Year – Noida
Best Surgical Video Award – Rajasthan Ophthalmological Conference, 2018
Best Surgical Skills Award – Women’s Ophthalmological Society, 2018
Best Scientific Team Presentation – WOS, Bengaluru, 2019
Winner – Best Surgical Video (Challenging Cases) – ROSCON, 2019
Gold Medal – IBeach Film Festival

हे पुरस्कार केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचे नव्हे, तर त्यांचा दृष्टीकोन, समर्पण आणि नेतृत्वगुणांचेही प्रतीक आहेत.

महिला सक्षमीकरण व समाजसेवा

डॉ. अनघा हेरूर यांना महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर प्रगाढ विश्वास आहे. त्या अनेक आरोग्य जनजागृती उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहेत आणि अनेक महिला डॉक्टर्स व तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.

अध्यक्षा म्हणून दृष्टीकोन – “Unite, Illuminate, Innovate”

MOS च्या अध्यक्ष म्हणून डॉ. अनघा हेरूर यांनी या वर्षासाठी थीम जाहीर केली आहे —
“Unite, Illuminate, Innovate”*
त्यांचा दृष्टीकोन — *“One Vision, One Mission, One MOS.”

त्या महाराष्ट्रातील सर्व नेत्रतज्ज्ञांना एकत्र आणून अभ्यास, संशोधन, आणि उत्कृष्ट रुग्णसेवा यांचे केंद्र तयार करण्याचा संकल्प बाळगतात.

नवीन उपक्रम – रुग्ण व डॉक्टरांसाठी

अध्यक्षा म्हणून डॉ. अनघा हेरूर यांनी काही महत्त्वाचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत —

👁️🗨️ डायबेटिक आय अवेअरनेस वॉक – डोंबिवली
१६ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा 'डायबेटिक आय अवेअरनेस वॉक' आयोजित केला जात आहे.
या उपक्रमाचा उद्देश आहे — “डायबेटिसमुळे होणारे अंधत्व टाळूया.”

👶 Bright Eyes – बाल सृष्टी अभियान
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी आणि दृष्टिजागर कार्यक्रमाचे आयोजन.
“आपल्या पुढच्या पिढीची दृष्टी सुरक्षित ठेवूया.” हा यामागील हेतू आहे.

🎓 तरुण नेत्रतज्ज्ञांसाठी ऍकॅडमिक प्रोग्राम्स..
MOS च्या माध्यमातून तरुण डॉक्टर्ससाठी अत्याधुनिक शैक्षणिक आणि संशोधन संधी निर्माण केल्या जातील, ज्यामुळे महाराष्ट्रातील नेत्रवैद्यक क्षेत्र जागतिक दर्जावर पोहोचेल.

महाराष्ट्रात नेत्रसेवा उच्च दर्जावर

डॉ. अनघा हेरूर यांचे ध्येय आहे की राज्यातील प्रत्येक नागरिकाला आधुनिक, सुलभ आणि दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध व्हावी. त्यांच्या मते, “नेत्रसेवा ही केवळ वैद्यकीय जबाबदारी नाही, ती मानवी सेवेचे सर्वोच्च रूप आहे.”

अंतिम संदेश

“असेल दृष्टी, तर पाहू सृष्टी!”
या विश्वासाने प्रेरित होत,
डॉ. अनघा हेरूर MOS च्या माध्यमातून महाराष्ट्रात नेत्रस्वास्थ्याचे नवे युग सुरू करत आहेत. जिथे प्रत्येक नेत्रतज्ज्ञ एकत्र, प्रत्येक रुग्ण सुरक्षित, आणि प्रत्येक दृष्टी उजळलेली असेल.

लाचलूचपत विभागाने खडकपाडा पोलीस ठाण्यातील एपीआय व हवालदार यांना लाच घेताना रंगेहात पकडले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका पोलीस हवालदाराला लाच घेताना लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडण्यात आले आहे. ऐन दिवाळीत सणासुदीच्या दिवशी ही घटना उघड झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कुशल सापळा रचून ही कारवाई केली, या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक टी.जोशी आणि पोलीस हवालदार व्ही.काळे यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध पुढील चौकशी सुरू आहे. 

ज्याच्या हाती जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तेच भ्रष्टाचारात अडकले, याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. "सर्वसामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचा ?" असा सवाल सामान्य लोकातून विचारला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे कल्याण परिमंडळ-३ च्या पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

सफाई कर्मचाऱ्याने कचऱ्यामध्ये चुकून आलेला सोन्याचा हार महिलेला केला परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :  एकीकडे सोन्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असून दिवसागणिक नवनविन उच्चांक गाठत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून सोन्याचा हारही टाकून दिल्याचा प्रकार कल्याण पूर्वेत समोर आला आहे. मात्र सफाई कर्मचाऱ्याने या सोन्याच्या महागड्या हाराबाबत कोणताही मोह न ठेवता संबंधित महिलेला हा हार परत मिळवून दिला आहे. केडीएमसी आणि सुमित कंपनीच्या सफाई कामगारांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून मोठे कौतुक होत आहे. 

केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्याकडून नेहमीप्रमाणे आज सकाळीही कल्याण पूर्वेच्या विविध भागातून कचरा संकलनाचे काम सुरू होते. कल्याण पूर्वेतील इमारती आणि चाळीच्या परिसरातून गोळा झालेला हा सर्व कचरा कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर पाठवण्यात येत होता. त्याचदरम्यान सकाळी कचरा घेण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्याला कचरा देताना त्यामध्ये नजरचुकीने एका महिलेकडून सोन्याचा हारही टाकला गेल्याची तक्रार सुमित कंपनीचे '४-जे' प्रभागाचे अधिकारी समीर खाडे यांना केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांच्याकडून प्राप्त झाली. त्यावरून ही तक्रार आलेल्या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी गेलेल्या संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना समीर खाडे यांनी या सोन्याच्या हाराबाबत माहिती दिली. आणि त्यांनी लगेचच कचरा संकलन केलेली ही गाडी कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर नेण्याच्या सूचना गाडीचालकाला केली. 

तसेच हार गहाळ झालेल्या महिलेलाही या इंटरकटिंग पॉइंटवर बोलवण्यात आले. त्यावेळी या गाडीमध्ये गोळा करण्यात आलेला कचरा संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांच्या आणि सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष वेगळा करण्यात आला आणि त्यामध्ये या महिलेकडून चुकून आलेल्या सोन्याच्या हाराचा यशस्वीपणे शोध घेऊन तो हार पुन्हा त्या महिलेच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सुमित कंपनीच्या समीर खाडे यांनी दिली. 

केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे या महिलेसह सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे.  तर आपला महागडा सोन्याचा हार सुखरूप परत मिळाल्याबद्दल या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.

वयाच्या ८४ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२० : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त असलेल्या असरानींवर गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. असरानींच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दीपावलीच्या आनंदाच्या दिवशी ही दुःखद बातमी समोर आली आहे. याबाबत माहिती देताना त्यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी सांगितलं की, "दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यातच आज त्यांचं निधन झालं."

असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं. १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे जन्मलेल्या असरानी यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये 'हरे कांच की चुडियां' या चित्रपटातून असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी, 'शोले' चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची स्मरणात राहणारी आहे. या चित्रपटातील त्यांचा संवाद, "हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं.”, खूप गाजलं वं प्रसिद्ध झालं आणि अनेक दशकांनंतरही लोक अजूनही त्या संवादाने असरानींना ओळखतात. 'कोशिश' (१९७३), 'बावर्ची' (१९७२), 'चुपके चुपके' (१९७५), 'छोटी सी बात' (१९७५), आणि 'शोले' (१९७५) हे त्यांचे अविस्मरणीय असे चित्रपट आहेत.

गुटक्याची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणच्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: गुजरात राज्यातुन आयशर टेम्पोमधुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीरित्या वाहतुक करून विक्री केली जात असल्याबाबत गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या पथकाने दिनांक १७/१०/२०२५ रोजी ०५:३० वाजता गांधारी ब्रिज चौक, कल्याण पश्चिम, जि. ठाणे या ठिकाणी सापळा रचला असता आरोपी नामे धनराज रामगोपाल स्वामी, राहणार: वार्ड नंबर १३ मु.पो. लालासी ता. लक्ष्मणगढ, जि. शिकर, राज्य: राजस्थान हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमधुन प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतुक करताना मिळुन आला व त्याच्याकडुन एकुन ८७,३७,४७२/- रू. किंमतीचा अवैध गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक-३च्या पोलीस पथकास यश आले आहे.
सदर बाबत आरोपी नामे धनराज रामगोपाल स्वामी याचे व चौकशीत निष्पन्न पाहिजे आरोपी यांच्या विरोधात खडकपाडा पो.स्टे. गु.र.नं. ७३८/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६ (२)) (1), कलम २७(१) सह वाचन ३(१) (ZZ) (IV), शिक्षा कलम ५९(३) तसेच २६ (२) (IV), २७ (३) (d),२७ (३) (e) सह वाचन कलम ३०(२), (a), व मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची अधिसुचना क्रमांक अ.सु.मा.अ./अधिसुचना-४११/२०२५/०७, दि. १६/०७/२०२५ ची अवज्ञा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पाटील, पोलीस उप निरीक्षक नेम गुन्हे शाखा, युनिट-३, कल्याण हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व मा. श्री. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सहा.पो निरी. सर्जेराव पाटील, पोउपनिरी विनोद पाटील, किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, पोहवा बोरकर, सुधीर कदम, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, सचिन भालेराव, गोरक्षनाथ पोटे, विलास कडु, आदिक जाधव, पांडुरंग भांगरे, उल्हास खंदारे, सचिन कदम, पोना प्रविण किनरे, दिपक महाजन, पोशि मिथुन राठोड, सतिश सोनवणे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे.