डोंबिवली : 'सा कला या विमुक्तये' अर्थात कला ती आहे जी वाईट मार्गातून, बंधनातून मुक्त करते. 'जे एम एफ' संस्था संचलित 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा' आणि विद्यामंदिर येथे दिनांक २६ व २७ जुलै रोजी विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केले गेले. समूह गायन, चित्रकला, वेशभूषा, समूह नृत्य, प्रश्नमंजुषा, नाटक, अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. जवळपास पन्नास च्या वर शाळांमधून एक हजारच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव माननीय डॉ. सौ. प्रेरणा कोल्हे व इतर पदाधिकारी आणि परीक्षक यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीप प्रज्वलन करून झाली.
तुमच्या अंगातील कला गुणांना वाव देण्यासाठी हा 'जे एम एफ' चा मंच कायमच उपलब्ध आहे. जरी आज स्पर्धा असली तरी प्रथमतः आपल्या अंगभूत असलेल्या कलेचा आनंद घ्या, स्पर्धा स्वतःशी करा, स्पर्धेमध्ये केवळ यशाचे क्रमांक असतात परंतु प्रत्येक कलेचा आनंद घेत तुम्ही कला सादर केली तर ती स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या मनाला अलगद भिडते, असे सांगून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना मनाच्या दबावाखाली स्पर्धेत न उतरता मनाला आनंद वाटेल म्हणून स्पर्धेत सहभागी व्हा व आपली कला खुलवा असे सांगितले.
एखाद्या स्पर्धेत जिंकल्यावर आनंद होतोच, परंतु हरल्यावर सुद्धा एक नवीन संधी प्राप्त होते याची जाणीव देखील तुम्हाला असू द्या, यश नाही मिळाले म्हणून खचून न जाता मिळालेल्या संधीचा कसा सदुपयोग करता येईल याकडे लक्ष द्या, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगून विविध स्पर्धेसाठी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.
नृत्य स्पर्धेसाठी आकाश पवार, कार्तिक सर परीक्षक म्हणून लाभले होते तर वेशभूषा साठी मनस्वी मॅडम होत्या. चित्रकला साठी शाळेतील चित्रकला शिक्षक स्नेहा डोळे, व दीपा तांबे या शिक्षकांनी परीक्षण केले, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी सौ.अर्चना शिंगटे, सुरुची पांड्या, मृणाल विरकुट, गोमती बालाजी, संध्या मॅडम यांनी परीक्षण केले. समूह गायनासाठी गायिका आंशिका चोणकर यांनी परीक्षण केले तर नाटकासाठी रोहित राजगुरू आणि सिद्धार्थ आखाडे परीक्षक म्हणून लाभले होते.
प्रत्येक सपर्धेत लहान मोठ्या गटातून प्रत्येकी तीन क्रमांक व एक उत्तेजनार्थ क्रमांक काढून त्यांना मानचिन्ह, सुवर्ण, रौप्य, आणि ब्राँझ पदके आणि प्रशस्ती पत्रक संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रशस्तीपत्रक व शालेय साहित्य ठेवण्यासाठी 'जे एम एफ' शाळेचे नाव छापलेले पाऊच देखील देण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रशस्तीपत्रक व 'जे एम एफ' संस्थेचे नाव कोरलेली फुटपट्टी देण्यात आली. बाहेरील शाळांमधून आलेल्या सर्व शिक्षकांचही गुरुपौर्णिमा निमित्त शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मोठ्या संख्येने सहभागाची नोंद झालेल्या शाळेला भरदार असे चषक देण्यात आले. जवळपास एक हजारा पेक्षाही जास्त विध्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रतिसाद दर्शवला. शाळेतील मुख्याध्यापक डॉ.श्यामला राव, व श्री.आमोद वैद्य, उप-मुख्याध्यपक, समन्वयक, व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जबाबदारी आणि कर्तव्याच्या भावनेने सचोटीने कार्य करून स्पर्धा कार्यक्रम यशस्वी केला. त्याच बरोबर कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, दीपा तांबे, स्नेहा डोळे, कविता गुप्ता, सपना यन्नम यांनी स्पर्धेची आखणी करून व्यवस्थापन केले. सूत्रसंचालन सौ. श्रेया कुलकर्णी आणि कविता गुप्ता यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी भक्ती पुरोहित यांनी सर्वांचे आभार मानले व वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.