BREAKING NEWS
latest

'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' कडून दोन हजाराच्या नोटा बदलण्यास मुदतवाढ..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

केंद्र सरकारने नोटाबंदी नंतर मोठ्या उत्साहाने चलनात आणलेल्या २ हजाराच्या नवीन नोटा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. या नोटा बदलून घेण्याची मुदत आता रिझर्व बँकेने ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी ७ तारखेपर्यंत रु. २००० च्या नोटा बदलून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ८ तारखेपासून 'आरबीआय' च्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये नोटा जमा करता येणार आहेत.

'आरबीआय' ने १९ मे रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजारांची नोट बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत दिली होती. त्यामुळे आता वाढलेल्या ७ दिवसांच्या मुदतीत ज्यांच्याकडे रु २००० च्या नोटा असतील त्यांनी त्या बँकांमध्ये किंवा 'आरबीआय'च्या प्रादेशिक केंद्रात जमा कराव्यात.

आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार १९ मे २०२३ रोजी भारतातील चलनात २ हजार रुपयांच्या ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या, त्यापैकी २९ सप्टेंबरपर्यंत ३.४२ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा झालेल्या आहेत. आता फक्त ०.१४ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा व्हायच्या बाकी आहेत. एकूण आकडेवारी पाहिली असता १९ मे नंतर २९ सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या ९६ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.

८ ऑक्टोबरपासून 'आरबीआय'च्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये एखादा व्यक्ती २ हजार रुपयांच्या २० हजार रुपये रकमेच्या नोटा बदलून घेऊ शकतो. भारतीय पोस्टाद्वारे आरबीआयच्या १९ कार्यालयांकडे या नोटा पाठवता येतील. त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मात्र यासाठी संबंधित व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या ओळखपत्रांचे पुरावे द्यावे लागतील.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत