डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी : ज्युपिटर हॉस्पिटल तर्फे डोंबिवली येथे ५०० बेड्सचे अत्याधुनिक बहुविशेषज्ञ रुग्णालय रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज झाले असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील प्रगत आरोग्यसेवा सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (केडीएमसी), उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरांमध्ये दर्जेदार आरोग्यसेवेची दीर्घकाळापासून गरज भासू लागली होती. या भागातील रुग्णांना गंभीर उपचारांसाठी ठाणे किंवा मुंबई येथे जावे लागत असल्याची अडचण लक्षात घेऊन 'ज्युपिटर हॉस्पिटल'ने डोंबिवली येथे ५०० बेड्सचे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे रुग्णालय सर्वसमावेशक आरोग्यसेवा देणारे पूर्ण-सुविधायुक्त केंद्र असेल. नवजात शिशूंच्या जन्मापासून ते अवयव प्रत्यारोपण आणि कर्करोग उपचारांपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध असतील. समाजातील सर्व घटकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्याचा यामागील उद्देश आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या रुग्णालयात आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, अतिदक्षता विभाग (क्रिटिकल केअर) आणि प्रगत डायग्नॉस्टिक सुविधा उपलब्ध असतील. तसेच हे रुग्णालय (आय जी बी सी) च्या सर्वोच्च पर्यावरणीय मानकांनुसार डिझाईन करण्यात आले आहे.
डॉ. अजय ठक्कर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ज्युपिटर हॉस्पिटल, म्हणाले, “मोठ्या भारतीय शहरांमध्ये उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी कोणालाही ४५ मिनिटांपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये. आमची दृष्टी नेहमीच सर्वसमावेशक आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा रुग्णांच्या जवळ उपलब्ध करून देण्याची राहिली आहे. डोंबिवलीतील ५०० बेड्सच्या रुग्णालयाचे उद्घाटन हे वाढत्या समुदायांसाठी प्रगत आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा विस्तारण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.”
डॉ. अंकित ठक्कर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्युपिटर हॉस्पिटल, यांनी सांगितले,“भारतीय संस्कृतीत रुग्णाच्या कुटुंबाची भूमिका त्याच्या उपचार प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असते, याची आम्हाला जाणीव आहे. आमची रुग्णालये केवळ रुग्णांच्या नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीय आणि काळजीवाहूंच्याही गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आली आहेत. रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच उत्तम आरोग्यसेवेचा अनुभव मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा