BREAKING NEWS
latest

ऐतिहासिक कॉइन्स व स्टॅम्प पेपर, आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धा; एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षीसे..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान आणि इतिहास विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.
४५ शाळा, २५,००० विद्यार्थ्यांचा सहभाग

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण-डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी बेलग्रेव स्टेडियम, रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत पार पडले. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते. तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर्षी ऐतिहासिक कॉइन्स आणि स्टॅम्प पेपर चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले असून या वर्षी ४५ शाळा सहभागी झाल्या होत्या तर ८० प्रोजेक्ट मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक, अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले. ५ ते ७ आणि ८ ते १० अशा २ गटामध्ये स्पर्धा झाली आणि १.५० लाखाची बक्षीस विजेत्यांना मिळवली.
विज्ञान प्रदर्शनासाठी एआय आधारित स्मार्ट सुरक्षा, सोलार ट्रेकिंग सिस्टम, स्मार्ट कचरा वर्गीकरण, हायड्रोजन फ्युएल सेल, स्वयंचलित रोप पाणीपुरवठा, प्लास्टिक ते इंधन संकल्पना, पायजोइलेक्ट्रिक फूड स्टेप पावर जनरेटर आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी हवामान बदल, एआय व रोबोटिक्स, चंद्रयान-३ मोहीम, पाणी वाचवा जीवन जगवा, प्लास्टिक प्रदूषण जनजागृती, मानवी मेंदू, हेल्दी फूड विरुद्ध जंक फूड, विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, सौरमंडळ असे विविध विषय देण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनात ५ ते ७ वी गटात 'ओमकार इंग्लिश स्कूल' आणि 'डॉन बॉस्को स्कूल' प्रथम क्रमांक विभागून तर 'ॐकार केंब्रिज स्कूल' यांना द्वितीय आणि 'गणेश विद्यालय' यांना तृतीय तसेच ८ ते १० वी गटात प्रथम क्रमांक 'रतनबुवा पाटील विद्यालय' यांना देण्यात आला. तर द्वितीय 'शंकरा विद्यालय' आणि 'श्री चैतन्य टेक्नो स्कूल' विभागून आणि तृतीय 'सेंट जॉन स्कूल' यांना देण्यात आला. पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे ५ ते ७ वी गटात 'गणेश विद्या मंदिर', 'शंकरा विद्यालय', 'न्यू श्री वाणी विद्यालय' यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि ८ ते १० वी गटात 'ॐकार इंटरनॅशनल स्कूल', 'बी टी गायकवाड इंग्लिश स्कूल', 'सेंट जॉन स्कूल' यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून 'गणेश विद्यालय'चा अनुज काटले आणि नूतन ज्ञान मंदिरची काव्या तुपे यांना पुरस्कार मिळाला.
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत