कोपर - देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, पंढरपूर मध्ये लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले असतानाच 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी,पालक उपस्थित राहून विठ्ठलाच्या नामघोषात दंग झाले.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांचे 'जे एम एफ' मंडपम मधे आगमन झाले, त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व बाल वारकरी विद्यार्थी एकत्र आले. मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आरती करण्यात आली. बाल वारकऱ्यांनी तुळशीचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपानदेव, अशा अनेक संतांच्या वेशभूषा करून आलेले विद्यार्थी म्हणजे साक्षात संतांची मांदियाळीच अवतरली आहे असे भासत होते.
ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या हृदयात भक्ताचा वास आहे त्याच प्रमाणे आपल्या हृदयात देखील विठ्ठलाचा वास आहे पण त्यापेक्षाही माणुसकीचा ठेवा असणे अधिक गरजेचे आहे, आज लाखो वारकरी अनवाणी पायाने पंढरपूरला चालत जात आहेत त्यांची सेवा करणे किंवा "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.." असे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, त्याच भक्तीभावाने सेवा केली तर त्यांच्याच रूपाने विठ्ठल तुम्हाला तिथेच भेटणार आहे असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले तर अप्रतीम वेशभूषा करून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू देखील दिल्या.
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या स्वतःलाच विसरून जात आहोत, म्हणून स्वतःला शोधण्यासाठी अध्यात्माचा मार्ग हा सुलभ आहे, ज्याप्रमाणे भक्त पुंडलिकाने स्वतःला स्वतःमध्ये शोधून त्याच्या भक्तीने पांडुरंगाला प्रसन्न करून घेतले तसे तुम्ही देखील अंतर्मनात असलेल्या प्रश्नांना अध्यात्माच्या आधारे सोडवून त्या परमात्म्याला जवळ करा आणि आनंदी रहा असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आणि देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी दशेत असलेले बालरूप हे निरागस रूप असते, म्हणुनच आज विठ्ठल रुक्मीणी, साधू संतांच्या वेशभूषा मधे आलेले हे विद्यार्थी म्हणजे साक्षात पांडुरंग रुक्मिणचे अंशच दिसत आहेत असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी आपल्या भाषणात म्हटले.
संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी व विद्यार्थ्यांच्या तबल्याच्या साथीने सर्व विद्यार्थ्यांनी अभंग सादर केला तर सर्व शिक्षकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पावले थिरकली. दिंडी सोहळ्यामध्ये माऊलींची पालखी हे मोठे आकर्षण होते सर्वच जण उत्साहात ब्रह्मनादात सहभागी झाले होते. शिशु विहारच्या बालकांनी पांडुरंगाची गाणी गाऊन रिंगण सोहळा केला. " याची देही याची डोळा पाहिला माऊलींचा सोहळा ".. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भक्ती भावाने सेवा करून आषाढी एकादशीचा सोहळा पार पाडला तर नितेश मेस्त्री यांनी पांडुरंगाचे चित्र रेखाटन केले व नरेश पिसाट यांनी सजावट केली. अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, सौ.मयुरी खोब्रागडे, यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाचे फोटो व्हिडीओ काढण्याची ची जबाबदारी अखिल नायडू, जय लखारा, निखील शिंदे, तांडुलकर, त्यांच्या चमूने पार पाडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा