डोंबिवली दि.३० : कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान नेपाळ चीन सीमेवरील तिमुरे येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर परदेशात अडकलेल्या ४३ यात्रेकरूंना महाराष्ट्रातून मिळालेल्या तत्पर मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला. संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यासह ठाणे जिल्हा प्रशासन, तहसीलदार कार्यालय, कल्याण आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी सातत्याने संपर्क ठेवत यात्रेकरूंची विचारपूस केली. अखेर २९ ऑगस्टला कोदारी सीमामार्गे नेपाळमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर हे यात्रेकरू भारतात सुखरूप परतले.
जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने विचारपूस
कैलास- मानसरोवर यात्रा पूर्ण करून यात्रेकरू सागा येथे पोहोचले असताना तिमुरेतील आपत्तीची तीव्रता स्पष्ट झाली. ज्या तिमुरेतील हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी मुक्काम केला होता, तेथील हॉटेल, वाहने, रस्ते आणि सीमा परिसरातील पायाभूत सुविधा आपत्तीत वाहून गेल्याची माहिती मिळाल्याने यात्रेकरूंना मोठा धक्का बसला. पुढे चीनकडून नेपाळमध्ये जाण्याचा मार्ग बंद झाल्याने परतीच्या प्रवासाबाबत चिंता निर्माण झाली. कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले ४३ यात्रेकरू भारतामध्ये सुखरूप परतले. प्रशासन त्यांच्याशी सतत संपर्कात होते.
यात्रेकरू प्रकाश माने यांनी साधला संपर्क
या काळात आपत्तीत अडकलेले डोंबिवलीकर
यात्रेकरू प्रकाश माने यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय सहकारी अभिजीत दरेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर आणि सरकारच्या विविध यंत्रणांनी यात्रेकरूंशी संपर्क ठेवला. डॉ. माने यांनी वारंवार दूरध्वनीवरून विचारपूस केल्याचे माने यांनी सांगितले.
रविवारी नेपाळ एअरलाईन्सच्या विमानाने त्यांनी मुंबईला प्रयाण केले. तिमुरेतील संकट नैसर्गिक होते. मात्र, संकटाच्या वेळी कोण आपल्या पाठीशी उभे राहते, हे महत्त्वाचे असते. खा. डॉ.श्रीकांत शिंदे, अभिजीत दरेकर आणि प्रशासनाने दिलेला आधार आम्ही विसरणार नाही, अशी भावना प्रकाश माने यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केली.