भितीविना सत्य, पक्षपातविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा...

शिळफाटा- कल्याणफाटा वाहतूक कोंडीवर अखेर नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित; नागरिकांना कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा, दि. २ सप्टेंबर : शिळफाटा आणि कल्याणफाटा परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर अखेर ठोस उपाययोजना करण्यात आली असून, मे. लोढा डेव्हलपर्सच्या सहकार्याने नवीन आधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे परिसरातील वाहतुकीला शिस्त लागून नागरिकांना दररोजच्या वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शिळफाटा परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यानंतर या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून या प्रश्नावर पुढाकार घेण्यात आला. त्याअनुषंगाने लोढा डेव्हलपर्सच्या सहकार्याने शिळफाटा व कल्याणफाटा परिसरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली.
दरम्यान, स्थानिक नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनीही ठाणे महापालिकेच्या महासभेत कल्याणफाटा येथे आधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी उपस्थित केली होती. त्यांच्या पाठपुराव्यालाही यामुळे यश आले आहे.

नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने शिळफाटा- कल्याणफाटा परिसरातील वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. मात्र, ही यंत्रणा सुरळीतपणे आणि सातत्याने कार्यरत राहण्यासाठी वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासनाने आवश्यक देखरेख ठेवण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यावेळी नगरसेविका वेदिका साहिल पाटील, दिवा शीळ युवा मोर्चा अध्यक्ष साहिल पाटील आणि बाळाराम पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, भाजप ठाणे शहर जिल्हा अनुसूचित जाती आघाडीचे सरचिटणीस सतीश केळशीकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, नाजिया तांबोळी, अभिषेक ठाकूर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनापासून पाठपुराव्यापर्यंत आणि पाठपुराव्यातून प्रत्यक्ष कामापर्यंत, नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना दिलासा देण्यासाठी विकासकामांचा हा प्रयत्न पुढेही सुरू राहील, असे यावेळी सांगण्यात आले.
प्रतिनिधी बनण्यासाठी कॉल करा
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...