डोंबिवली - डोंबिवलीच्या सार्वजनिक जीवनात चार दशकांहून अधिक काळ सक्रिय असलेले लोकनेते हरिश्चंद्र कचरू पाटील यांच्या स्मृती आणि विचारांचा वारसा जपण्यासाठी हरिश्चंद्र पाटील फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचे सुपुत्र माजी नगरसेवक हर्षद पाटील यांनी गुरूवारी त्यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त ही घोषणा केली.
हरिश्चंद्र पाटील यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५३ रोजी झाला. १९७४ मध्ये डोंबिवली नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरूवात केली. शेतकरी कामगार पक्षातून सुरू झालेला त्यांचा प्रवास जनसंघ, भाजपा आणि नंतर मनसे असा राहिला. १९९५ सालात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि सभागृहातील पहिले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले.
पुढे सभागृह नेते, २००३ ते २००५ दरम्यान महापौर आणि २००४ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी लक्षवेधी कामगिरी बजावली होती. महापौर आणि आमदार ही दोन्ही पदे एकाच काळात भूषविण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या कार्यकाळात कल्याण-शिळ महामार्गाचे रूंदीकरण, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पायाभरणी, क्रीडा संकुल, ज्येष्ठ नागरिक भवन, टिटवाळा गणेश मंदिर तलाव सुशोभीकरण, गोविंदवाडी बायपास, डोंबिवलीत वाहतूक नियंत्रण कार्यालय, मोहिली पाणीपुरवठा योजना, उद्याने, मोठागाव-माणकोली खाडी पूल, एस. व्ही. जोशी शाळेजवळील पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाण पूल, अशा अनेक विकासकामांचा त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर ही कामे मार्गी लागली आहेत.
डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याची दूरदृष्टी त्यांनी मांडली होती, जो आजही शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. १ मे २०१६ रोजी वयाच्या ६२ व्या वर्षी लोकनेते हरिश्चंद्र पाटील यांचा स्वर्गवास झाला. त्यांच्या स्मृती कायम रहाव्यात, आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची महती कळावी, त्यांनी आयुष्यभर जनतेसाठी केलेल्या विधायक कार्याची जोड देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या फाऊंडेशनच्या माध्यमातून स्मृतीतून प्रेरणा, प्रेरणेतून सेवा, सेवेतून विकास या विचाराने शिक्षण, आरोग्य, क्रीडा, युवक विकास, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांचे सुपुत्र माजी नगरसेवक हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.