LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

मतदारसंघाचा विकास करताना स्वतःचाही विकास घडवणारे युवा नेतृत्व - खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघात विकासाची नवी पर्वणी उभी करताना, त्याच वेळी स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा सातत्याने रुंदावणारे नेतृत्व म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाहता येते. राजकारणात सक्रिय असताना अनेक नेते आपल्या अनुभवावर विसंबून राहतात; मात्र नवीन शिकण्याची जिज्ञासा कायम ठेवत स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवत राहणे, ही वेगळी वाट आहे. संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ही वाट निवडताना दिसतात.

यापूर्वी अमेरिकेतील हारवर्ड युनिव्हर्सिटी येथे सर्वसमावेशक विकासासाठीच्या धोरणांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. विकासाकडे केवळ एका प्रकल्पाच्या किंवा एका क्षेत्राच्या दृष्टीने न पाहता, सर्वसमावेशक आणि नागरिककेंद्री विकासाची व्यापक दृष्टी समजून घेण्याचा तो प्रयत्न होता. आता त्याच ज्ञानप्रवासाची पुढची पायरी लंडनमध्ये सुरू झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मधून डॉक्टरेट झाले, त्याच संस्थेत ट्रायम ग्लोबल एमबीए या अभ्यासक्रमातून उच्च शिक्षण घेण्याची संधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळाली आहे.
ही केवळ आणखी एक पदवी नाही. कारण एका बाजूला कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, वाहतूक आणि विविध पायाभूत सुविधांची कामे पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत; तर दुसऱ्या बाजूला ही कामे अधिक व्यापक विकासदृष्टीने कशी करता येतील, नागरिकांचे जीवनमान आणखी कसे उंचावता येईल आणि भविष्यातील गरजांचा विचार करून विकासाची दिशा कशी ठरवता येईल, यासाठी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मतदारसंघाचा विकास करण्यासाठी केवळ प्रकल्पांची यादी पुरेशी नसते; त्यामागे व्यापक विचार, बदलत्या जगाचे आकलन आणि भविष्याचा वेध घेणारी दृष्टीही आवश्यक असते. म्हणूनच स्वतः शिकत राहणे आणि त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या कार्यक्षेत्रात करणे, हा या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे.
वैद्यकीय शिक्षणातून एम.एस. ऑर्थोपेडिक ही पदव्युत्तर पदवी मिळवलेला एक डॉक्टर पुढे सार्वजनिक जीवनात येतो. त्यानंतर हावर्ड मध्ये सर्वसमावेशक विकासाच्या धोरणांचा अभ्यास करतो आणि आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थकारण, व्यवस्थापन आणि धोरणांच्या व्यापक आकलनासाठी पुन्हा विद्यार्थी बनतो.

पद मिळाल्यानंतर शिकणे थांबवायचे नसते, उलट जबाबदारी वाढली की शिकण्याची गरज अधिक वाढते, हा संदेश या प्रवासातून समोर येतो. आजच्या तरुणांसाठीही यात एक महत्त्वाचा धडा आहे.शिक्षणाला शेवट नसतो. पदवी मिळाली म्हणून शिकणे संपत नाही; अनुभव वाढला म्हणून जिज्ञासा संपत नाही.

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा वेग वाढवताना, स्वतःच्या ज्ञानाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठीही सातत्याने प्रयत्न करणारे हे नेतृत्व त्यामुळे अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरते. विकासासाठी रस्ते आणि पूल उभे करणारे नेतृत्व अनेकदा दिसते; पण त्या विकासामागची दृष्टी अधिक सक्षम करण्यासाठी स्वतःच्या ज्ञानाची उंची वाढवणारे नेतृत्व ही वेगळी गोष्ट आहे.

कल्याणच्या विकासाचा प्रवास सुरू आहेच…
आणि त्याचबरोबर त्या विकासाची दृष्टी अधिक व्यापक करण्यासाठी एका तरुण नेतृत्वाचा शिक्षणप्रवासही सुरू आहे. मतदारसंघाचा विकास… आणि त्याचवेळी स्वतःचा विकास..हीच पुढच्या काळातील नेतृत्वाची नवी ओळख ठरू शकते.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...