दादर - शाडूच्या मातीचा बाप्पा, पुरातन समईचा उजेड आणि ९४ वर्षांची अखंड परंपरा.. दादरच्या पोपटलाल चाळीतील लवेकर-खेडेकर कुटुंबाचा घरगुती गणपती सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
काय आहे खासियत ?
श्री. केदार आत्माराम लवेकर यांच्या कुटुंबाने १९३० पासून ही परंपरा अखंड जपली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेला हा उत्सव आज चौथ्या पिढीकडून तितक्याच भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदा पर्यावरणाचा संदेश देत बाप्पाची मूर्ती पूर्णपणे शाडूच्या मातीपासून साकारण्यात आली आहे.
पारंपारिकतेचा साज
घरातच साकारलेला सुंदर देखावा, आजीच्या काळापासून जपून ठेवलेल्या पुरातन समई, आणि बाप्पाचे आकर्षक अलंकार यामुळे संपूर्ण घराला एक प्रसन्न आणि पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले आहे. ९० हून अधिक वर्षांची परंपरा, भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा हा सुंदर संगम पाहण्यासाठी चाळीतील अनेक रहिवासी आवर्जून गर्दी करत आहेत.
"आमच्या आजोबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे. डीजे, मोठा गाजावाजा नाही, फक्त भक्ती आणि पर्यावरण जपणे हाच आमचा उद्देश आहे," असे केदार लवेकर यांनी माध्यमांना सांगितले.