डोंबिवली - डोंबिवलीतील विविध महाविद्यालयांच्या परिसरात मादक पदार्थांची विक्री सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली असून तो तब्बल १२ तास बेशुद्ध होता. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचा जीव वाचल्याची माहिती आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी डोंबिवली पोलिसांकडे तोंडी तक्रार केल्याचे सांगण्यात येते.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मादक पदार्थ उपलब्ध करून त्यांना व्यसनाच्या आहारी नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आल्यानंतर या कथित ड्रग्ज रॅकेटबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरातील महाविद्यालयांमध्ये ड्रग्जचा प्रकार सुरू असल्याचा मुद्दा मनसे नेते अमित ठाकरे यांनी डोंबिवली दौऱ्यात उपस्थित केला होता. आता विद्यार्थ्याच्या प्रकृती बिघडण्याच्या घटनेनंतर मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी चिंता व्यक्त केली असून, डोंबिवलीतील मादक पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.