डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या 'एन्ड थॅलेसेमिया नाऊ' (ETN) या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत आणि के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी थॅलेसेमिया जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात सुमारे १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट चेअर (ETN) पी पी डॉ. माधव बैतुले यांनी थॅलेसेमिया या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. थॅलेसेमिया मायनरची तपासणी करणे किती गरजेचे आहे आणि रक्तदान करून विद्यार्थी समाजप्रबोधनात कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, यावर त्यांनी विशेष भर दिला.
तसेच, वैद्यकीय प्रकल्प प्रमुख रोटेरियन डॉ. भक्ती लोटे आणि रोटेरियन डॉ. त्रिप्ती कोठारी यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि थॅलेसेमिया रुग्णांना मदत करण्यासाठी तरुणांचे योगदान यावर मोलाचे मार्गदर्शन केले. या माहितीपूर्ण सत्रानंतर, महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत सुमारे १२५ विद्यार्थ्यांची मोफत थॅलेसेमिया तपासणी करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष रोटेरियन अथर्व जोशी यांनी विद्यार्थ्यांना 'एन्ड थॅलेसेमिया नाऊ' (ETN) अंतर्गत रोटरी क्लबतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला क्लब सेक्रेटरी रोटेरियन सुबोध पटवर्धन, रोटेरियन दिलीप यावलकर, राकेश मेहता, मेघना धुल्ला आणि हर्षदा कोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी पेंढारकर महाविद्यालयाचे सीईओ आणि रोटरीचे नवनियुक्त सदस्य रोटेरियन हर्षल लवंगारे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कैलाश जोगदेव, झुओलाॅजी विभाग प्रमुख व उपप्राचार्य श्री. महाजन सर यांचे विशेष सहकार्य लाभले, त्याबद्दल रोटरी क्लबतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. “आजची जागरूकता, उद्याचे निरोगी भविष्य!” (अवेअरनेस टुडे, हेल्थी टूमॉरो !) हा महत्त्वाचा संदेश या सत्रातून यशस्वीरीत्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे संचालक मंडळ सदस्य रोटेरिअन मानस पिंगळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.