LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

'फलज्योतिष आणि बुवाबाजी' विरोधात २७ सप्टेंबरला डोंबिवलीत एल्गार !

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : फलज्योतिष, बुवाबाजी, चमत्कारांच्या नावाखाली होणारे शोषण आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून जनतेची होणारी आर्थिक, मानसिक, लैंगिक व सामाजिक फसवणूक याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्ह्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी, डोंबिवली पश्चिम, रेल्वे स्थानका जवळील, जोंधळे विद्यासमूहाच्या सभागृहात 'फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद' आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही परिषद होणार आहे.

नाशिक येथील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात बुवाबाजीविरोधात निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर अशा संघर्ष परिषदा घेण्याचा निर्णय महा-अंनिसने घेतला. अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणाचेही शोषण होऊ नये आणि संकटाच्या काळात नागरिकांनी भोंदूंच्या भूलथापांऐवजी विज्ञान, वैद्यकीय उपचार आणि संविधानिक मूल्यांचा आधार घ्यावा, हा परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे महा-अंनिसने स्पष्ट केले आहे.

परिषदेचे उद्घाटक
साथी अभिजीत देशपांडे पुरोगामी विचारांचे प्रथितयश लेखक


प्रमुख सत्रे :

१) फलज्योतिष : एक थोतांड
 - वक्ते : साथी उत्तम जोगदंड कार्यकारी संपादक, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका, महा-अंनिस

२) बुवाबाजीचे वाढते प्रकार
 - वक्त्या : साथी ऍड. रंजना पगार-गवांदे, मेंटॉर, बुवाबाजी संघर्ष विभाग, महा-अंनिस

३) चमत्कारांचे प्रात्यक्षिके आणि त्याचा खुलासा 
 - वक्ते : प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, राज्य कार्यवाह, प्रकाशन विभाग, महा-अनिस

बुवाबाजीला श्रद्धेचे कवच नको !

अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत महा-अंनिसने आरोप केला आहे की, जादूटोणा, दैवी शक्ती, अंकशास्त्र आदींच्या नावाखाली अनेकांची फसवणूक आणि शोषण करण्यात आले. विशेषतः महिलांच्या शोषणाचे प्रकार गंभीर असल्याचे महा-अंनिसचे म्हणणे आहे. १८ मार्च रोजी अशोक खरातला अटक झाल्यानंतर राज्यातील विविध भागांत भोंदू बाबा-बुवांविरोधात १०० हून अधिक गुन्हे नोंद होऊन अटक झाल्याची नोंद महा-अंनिसकडे आहे. या प्रकरणांची यादी समितीकडे उपलब्ध 
असल्याचेही महा-अंनिसने सांगितले आहे. फलज्योतिष आणि बुवाबाजीच्या नावाखाली महिलांना मानसिकदृष्ट्या घाबरवणे, कौटुंबिक समस्या, आरोग्यविषयक अडचणी किंवा वैयक्तिक संकटांचे 'दैवी' कारण सांगून त्यांच्याकडून पैसे उकळणे, तसेच कथित उपचारांच्या नावाखाली शोषण करणे, अशा प्रकारांविरोधात जनजागृती करण्याची गरज परिषदेत अधोरेखित केली जाणार आहे. 'श्रद्धा वैयक्तिक असू शकते; मात्र श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि शोषण मान्य करता येणार नाही,' अशी भूमिका घेत महा-अंनिसने, नागरिकांनी अशा प्रकारांविरोधात सजग राहण्याचे आवाहन केले आहे. परिषदेतून 'भोंदू बाबा-बुवांचे थोतांड' उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संघर्ष परिषदेत; फलज्योतिष, बुवाबाजी आणि तथाकथित चमत्कार यांचे विविध पैलू उपस्थितांसमोर उघड केले जाणार आहेत.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...