डोंबिवली - डोंबिवली शहराची नामवंत क्रीडा संस्था असलेल्या वं अनेक वर्ष क्रीडाविषयक विविध उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन, विविध खेळ प्रकारात नामवंत खेळाडु तयार करणाऱ्या डोंबिवली जिमखान्याच्या अध्यक्षपदी राहुल दामले यांची एकमताने निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी अनिल भोईर, सचिवपदी माधव सिंग तर कोषाध्यक्षपदी सुहास आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिमखाना व्यवस्थापनाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अनेक वर्षानंतर प्रथमच डोंबिवली जिमखान्याच्या कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
डोंबिवली जिमखान्याच्या कार्यकारिणी मध्ये अध्यक्षपदी राहुल दामले, उपाध्यक्षपदी अनिल भोईर, सचिव- माधव सिंग, कोषाध्यक्ष ज्येष्ठ सनदी लेखापाल सुहास आंबेकर, सहसचिव- व्यावसायिक श्रीपाद कुळकर्णी, शीतल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष राहुल दामले हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर तथा भाजपचे विध्यमान नगरसेवक आहेत. डोंबिवली जिमखान्याच्या कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्याने शहरातील विविध स्तरातील नागरिक, क्रीडाप्रेमी नागरिक, क्रीडा संस्था यांनी समाधान व्यक्त केले आहे.
डोंबिवली जिमखाना ही शहरातील क्रीडाविषयक उपक्रम राबविणारी नामवंत संस्था आहे. डोंबिवलीचे भूषण म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. यापूर्वी डोंबिवली शहर परिसरातील विद्यार्थ्यांना खेळांच्या विविध प्रकारच्या प्रशिक्षणासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबईत जावे लागत होते. शहरातील उद्योजक मधुकर चक्रदेव, बापूसाहेब मोकाशी आणि इतर मान्यवरांनी एकत्रित येत डोंबिवली जिमखान्याची उभारणी केली. क्रीडाविषयक प्रशिक्षण देणाऱ्या विविध सुविधा जिमखान्यात उपलब्ध करून देण्यात आल्या. अगदी बालवयापासून ते ज्येष्ठांपर्यंतची मंडळी या प्रशिक्षण वर्गात मागील अनेक वर्ष क्रीडाविषयक प्रशिक्षण घेत आहेत.