LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

मुख्यमंत्र्यांची मराठीला डिजिटल युगात ज्ञानभाषा करण्याची ग्वाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१ व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाचा चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा अभिमानाचा क्षण

मराठी भाषा प्राचीन आणि अभिजात आहेच; मात्र तिला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेची अधिकृत मान्यता मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर विशेष अधोरेखित स्थान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संकल्पनेसोबत स्वभाषेलाही महत्त्व दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मराठीच्या प्रशासकीय वापराला नवी दिशा मिळाली, अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी करून दिली.

मराठी शब्दसंपदा वाढविण्याची गरज

जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा १३वा क्रमांक असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी ही जागतिक स्वरूपाची भाषा आहे. विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये ११ ते १३ लाख शब्द असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तुलनेत ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे सहा लाख शब्द, तर मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंचसारख्या भाषांमध्ये साधारण तीन ते साडेतीन लाख शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे तीन लाख शब्द आहेत. त्याच्या पुढील आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा १३ लाख शब्दांपर्यंत नेण्याचे काम करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली.

मराठीच्या समृद्ध शब्दसंपदेचा उल्लेख करताना फडणवीस यांनी मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोशांच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. विविध कोशांमध्ये लाखो मराठी शब्द नोंदविले गेले असून, ही शब्दसंपदा मराठीच्या समृद्ध भाषिक परंपरेचे दर्शन घडवते, असे त्यांनी सांगितले. मराठीचा हा शब्दवैभव केवळ अभिमानाचा विषय न राहता आधुनिक ज्ञाननिर्मितीमध्येही त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील संकल्पना मराठीत उपलब्ध झाल्यास मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मराठी AI’ च्या माध्यमातून नव्या युगाशी नाते

डिजिटल तंत्रज्ञानामुळे संवादाची माध्यमे वेगाने बदलत आहेत. अशा परिस्थितीत मराठीला केवळ पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘मराठी AI’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढविणे, डिजिटल माध्यमांवर मराठीतील माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये मराठीतील ज्ञानसामग्री उपलब्ध झाल्यास नव्या पिढीला मातृभाषेतून आधुनिक ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बोलीभाषांचा गोडवाही जपला पाहिजे

प्रमाण मराठीसोबतच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा हा मराठीचा अमूल्य ठेवा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी-अहिराणी, मालवणी, डांगी, झाडीबोली यांसारख्या बोलीभाषांमध्ये स्थानिक संस्कृती, लोकपरंपरा आणि जीवनानुभव सामावलेले आहेत. त्यामुळे या बोलींचे साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्ये जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरशोधा

मराठी नाट्यसंस्कृतीचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. आधुनिक तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असतानाही अनेक पिढ्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जिवंत ठेवली. कलावंतांनी आपल्या अभिनयातून, लेखनातून आणि प्रयोगशीलतेतून मराठी रंगभूमीला वेगळी ओळख मिळवून दिली. ही नाट्यपरंपरा मराठीच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे वैशिष्ट्य असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

रोजच्या व्यवहारातून मराठीचे संवर्धन

मराठीचे जतन आणि संवर्धन केवळ शासकीय उपक्रमांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या दैनंदिन व्यवहारातून त्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. घर, शिक्षण, प्रशासन, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे अशा सर्व क्षेत्रांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर वाढला पाहिजे. परंपरेचा अभिमान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत मराठीला भविष्यातील सक्षम ज्ञानभाषा बनविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

आपली माय मराठी ही केवळ महाराष्ट्राची ओळख नाही, तर आपला स्वाभिमान आहे. संत ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या समृद्ध परंपरेने नटलेली मराठी आता सातासमुद्रापार पोहोचली असून, जगभरात तिचा डंका वाजत आहे. भविष्यातही मराठीचा जागतिक विस्तार अधिक वेगाने व्हावा, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. डिजिटल जगत, सोशल मीडिया, पॉडकास्ट, गेमिंग आणि कोडिंगसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढवून नव्या पिढीला मराठीशी जोडले पाहिजे. जगातील ५० हून अधिक देशांमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार वाढविण्याचा संकल्प असून, लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र’ उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

लंडनमध्ये ‘मराठी वैश्विक केंद्र’, १०० बोलीभाषांचे कोश

मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक पातळीवर विस्तार करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पुण्यातील डेक्कन युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेसाठी ‘उत्कृष्टता केंद्र’, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ‘मराठी वैश्विक केंद्र’, राज्यातील विविध बोलीभाषांचे १०० कोश आणि नऊ ठिकाणी ‘मराठी कौशल्य विकास केंद्र’ उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. भारतीयसंस्कृती पहा

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत ग्रंथ भेट देऊन करण्यात आले. यावेळी ‘मराठीचे कौतुक भाग-२’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...