दुबई,दि.२२ : येमेनच्या हौथी गटाकडून होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाची तेल कंपनी Aramco ने पूर्व सौदी अरेबियातील धाहरान येथील आपले मुख्यालय तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले असून, उर्वरित सर्व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत, असे वृत्त एएफपीने आज दिले. मंगळवारी रात्री उशिरा सौदी अरेबियाच्या ‘सौदी अरामको’ कंपनीच्या प्रशासकीय परिसरात बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला झाला. सुरक्षेच्या कारणास्तव नाव न सांगण्याच्या अटीवर, या प्रकरणाशी संबंधित तीन सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात कंपनीच्या मुख्यालयावर हल्ला झाल्यापासून बहुतेक कर्मचारी आधीच घरून काम करत होते. प्रादेशिक संघर्ष आणि विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून ही मोठी पाऊले उचलण्यात आली आहेत. सौदी अरामकोच्या इतिहासात मुख्यालय रिकामे करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सौदी अरामको कंपनीवर मिसाइल हल्ला हा भारतासह सगळ्या जगाची चिंता वाढवणारा विषय आहे. कारण सौदी अरामको जगातील एक प्रमुख तेल पुरवठादार कंपनी आहे. यामुळे कच्चा तेलाचा तुटवडा निर्माण होऊन जगभरात तेलाच्या किंमती वाढू शकतात. भारतीय शेअर बाजारावरही या हल्ल्याचे पडसाद उमटू शकतात.
‘सौदी अरामको’ ही जगातली सर्वात मोठी तेल कंपनी आहे. सौदीच्या पूर्वेकडील शहर धहरानमध्ये ‘सौदी अरामको’ कंपनी स्थित आहे. या हल्ल्यानंतर इमारतीला आग लागली असं सौदी अरेबियाची सरकारी वृत्तसंस्था एसपीएने बुधवारी म्हटलं आहे. पण यात जिवीतहानी झालेली नाही. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार मिसाइल हल्ल्यात कंपनीच्या वरच्या तीन मजल्याचं नुकसान झालं आहे. इमारतीत आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. अरामकोचं हे ऑफिस मुख्य संचालन केंद्र आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेली सौदी अरामको हा सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. सौदी मधील तेल विहिरी, पाइपलाइन, रिफायनरी आणि निर्यात टर्मिनल या कंपनीच्या अधिकार क्षेत्रात येतात.