LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला मनसेचा जाहीर पाठिंबा; सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी !

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा, दि. ३० ऑक्टोबर : दिवा शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केल्याच्या रागातून दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाच्या कारवाईला जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेच्या दिवा शहरातील पदाधिकाऱ्यांनी आज प्रभाग क्षेत्र अधिकारी यांची भेट घेऊन सहाय्यक आयुक्तांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करणारे पत्र प्रशासनाला सादर केले.

दिवा शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र, या कारवाईच्या रागातून त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आल्यानंतर प्रशासनाच्या सुरक्षेचा आणि अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहिमेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाची भेट घेत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेली कारवाई कोणत्याही दबावाला बळी न पडता यापुढेही सुरू ठेवावी, अशी ठाम भूमिका मांडली. कायद्याचे उल्लंघन करून सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचेही मनसेने स्पष्ट केले.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई करताना प्रशासनाला मनसेच्या सहकार्याची आवश्यकता भासल्यास पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

दिवा शहरातील नागरिकांना रस्ते आणि पदपथांवरून सुरक्षितपणे ये-जा करता आली पाहिजे. सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने निर्भयपणे आणि कोणत्याही राजकीय अथवा अन्य दबावाला बळी न पडता कारवाई करावी, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

मनसेच्या या जाहीर पाठिंब्यामुळे दिवा शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला बळ मिळण्याची शक्यता आहे. आता पालिका प्रशासन ही मोहीम किती प्रभावीपणे पुढे सुरू ठेवते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे दिवा वासियांचे लक्ष लागले आहे.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...