LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

डोंबिवलीत धम्म प्रभात फेरीला अनुयायांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत 

डोंबिवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था, डोंबिवली यांच्या वतीने सम्राट अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मंगळवार, दि.२० ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्यात अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर ‘बुद्धं शरणं गच्छामि’ या धम्मगीताच्या मंगलमय वातावरणात धम्म प्रभात फेरी काढण्यात आली. शिस्तबद्ध पद्धतीने डोंबिवली शहरातून मार्गक्रमण केलेल्या या फेरीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर सूर्यवंशम हॉल येथे मुख्य कार्यक्रम पार पडला.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पूज्य भिक्खू अभयपुत्र महाथेरो उपस्थित होते. पेंढारकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. धनंजय पगारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. लेखक व सामाजिक कार्यकर्ते शुद्धोदन आहेर हे प्रमुख वक्ते होते, तर डॉ. संजय रामराजे यांनी स्थानिक वक्ते म्हणून विचार मांडले. इंडियन वुमन्स/चिल्ड्रन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्याचा दिवस नसून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि विवेकनिष्ठ जीवनमूल्यांचा स्वीकार करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील अनुयायांसाठी हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि आर्थिक योगदान देणाऱ्या देणगीदारांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रविकिरण मस्के, कार्याध्यक्ष प्रा. धनंजय पगारे, उपाध्यक्ष गौतम सुतार, उपाध्यक्षा सरला खरात, सचिव सुरेंद्र ठोके, खजिनदार दिनेश कांबळे, संघटक बाजीराव माने व अर्जुन केदार यांच्यासह संस्थेचे सदस्य नरेंद्र थोरावडे आणि कार्यकर्त्यांनी सोहळ्याच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...