डोंबिवली, दि. ३० ऑक्टोबर - कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित संगीत भजनोत्सव-२०२६ हा भक्ती, संगीत, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम ठरला. आनंद बाल भवन (बाल नाट्यगृह), डोंबिवली पूर्व येथे या दोन दिवसीय भजनोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या भजनोत्सवात विविध सत्रांमध्ये महिला व पुरुष भजन मंडळांनी आपल्या सुमधुर स्वरांनी, तालबद्ध सादरीकरणाने आणि भक्तिभावाने उपस्थितांची मने जिंकली.
भजन ही केवळ भक्ती व्यक्त करण्याची कला नसून, ती आपल्या संतपरंपरेची, संस्कृतीची आणि संस्कारांची जपणूक करणारी समृद्ध परंपरा असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. नव्या पिढीला या परंपरेशी जोडण्यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले.
या सोहळ्याच्या सांगता प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
- कोकण भूषण, पद्मश्री पुरस्कार प्राप्त - भिकल्या लाडक्या धिंडा
- साहित्य - उमेश जाधव
- शिक्षण - विजय हटकर
- उद्योग - मंगेश पंडीत
- समाज - सुभाष लाड
- कला - वैभव मांगले
- क्रीडा - रमेश म्हामूणकर
- कृषी - मिथिलेश देसाई
- शौर्य - मुग्धा राणे
- भजन - चंद्रकांत तिरलोटकर
- पत्रकारिता - प्रशांत माने
यावेळी आमदार राजेश मोरे, योगेंद्र भोईर, संजय पावशे, ओम लोके आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसीय भजन सादरीकरण करणाऱ्या भजनी मंडळांना शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण व पुरस्कार देऊन या भक्तिमय उत्सवाची सांगता झाली.