मुंबई, दि. १७ : यावर्षी ऑगस्टच्या मध्यापासूनच वरुणराजाचा महाराष्ट्रावर जणू कोपच झाला आहे. भर पावसाळी ऋतूत तब्बल दिड महिन्याहून अधिक काळ पाऊस नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम हातचा गेला असून आता रब्बीच्या पेरण्यांचा कालावधीही पावसाविनाच उलटून चालला आहे. त्यातच आता आयएमडी (IMD) ने एक दिलासादायक बातमी दिली आहे. येत्या आठवड्यात वरुणराजा पुन्हा बरसणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळं पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. तसंच, तामिळनाडू आणि आंध्र पद्रेशच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह १७ ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता वर्तवली आहे. एकीकडे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या वर आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढून दमट हवामानाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळं या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर एकीकडे संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.