चेन्नई, दि.१९ : दक्षिण रेल्वेने रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा सहप्रवाशांना त्रास होईल अशा पद्धतीने फोनवर बोलणे अशा प्रकारांना लगाम घालण्यासाठी आपल्या रेल्वे विभागांना निर्देश दिले असून, रेल्वे कायद्याच्या कलम १४५ अंतर्गत दोषी आढळणाऱ्या प्रवाशांना १ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. रेल्वे कर्मचाऱ्याने सूचना देऊनही प्रवाशाने त्रासदायक वर्तन सुरू ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा, ५ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये घोषणांद्वारे तसेच सूचना फलकांच्या माध्यमातून प्रवाशांना याबाबत जागरूक केले जाणार आहे.
दक्षिण रेल्वेच्या मुख्यालयातील वाणिज्य शाखेने १६ ऑक्टोबर रोजी पत्र जारी करून सर्व विभागांना या संदर्भात निर्देश दिले आहेत. रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रवाशांना जागरूक करण्यासाठी प्रादेशिक भाषा, हिंदी आणि इंग्रजीतून ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना नियमांची माहिती देणारे सूचना फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दक्षिण रेल्वेच्या पत्रात रेल्वे कायद्याच्या कलम १४५ (२) चा संदर्भ देण्यात आला आहे. जनविश्वास (तरतुदींमधील सुधारणा) अधिनियम, २०२६ अंतर्गत सुधारित तरतुदीनुसार, रेल्वे डब्यात किंवा रेल्वे परिसरात उपद्रव निर्माण करणे, असभ्य वर्तन करणे, अपमानास्पद किंवा अश्लील भाषा वापरणे, तसेच प्रवाशांच्या आरामदायी प्रवासावर परिणाम होईल अशा प्रकारे रेल्वेच्या सुविधांमध्ये जाणीवपूर्वक हस्तक्षेप करणे यावर कारवाई होऊ शकते.
दक्षिण रेल्वेच्या पत्रानुसार, तिकीट तपासनीसाच्या पदापेक्षा कनिष्ठ नसलेल्या सक्षम वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांच्या मंजुरीने हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. पत्राची प्रत रेल्वे बोर्डाच्या प्रवासी विपणन संचालकांनाही पाठवण्यात आली आहे.
या जनजागृती मोहिमेच्या अंमलबजावणीचा अहवाल २० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्यास विभागांना सांगण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मोबाईलवर गाणी किंवा व्हिडिओ स्पीकरवर लावणे आणि मोठ्या आवाजात संभाषण करणे टाळावे, असे आवाहन या घोषणांमधून केले जाणार आहे.