मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी आणि इयत्ता १२वी च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांची अंतिम वेळापत्रके अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रकटनाद्वारे ही माहिती दिली. मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ०६ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
इयत्ता १२वी बोर्ड परीक्षांच्या तारखा
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ०६ फेब्रुवारी २०२७
लेखी परीक्षा: सोमवार, ०८ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, १८ मार्च २०२७
इयत्ता १०वी बोर्ड परीक्षांच्या तारखा
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७
लेखी परीक्षा: सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते सोमवार, १५ मार्च २०२७
संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेले छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाईल. विद्यार्थ्यांनी त्याच छापील वेळापत्रकावरून परीक्षांच्या तारखांची खात्री करून परीक्षेस हजर रहावे. व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर व्हायरल झालेले किंवा इतर कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.