कोपर, दि. १८ - मध्य रेल्वेवरील कोपर रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना रेल्वे प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या वसई, पनवेल मार्गाने प्रवाशी आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याने रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी केली आहे.
कोपर रेल्वे स्टेशनवर दररोज सकाळी अत्यंत गंभीर आणि धोकादायक परिस्थिती पाहायला मिळत आहे. ऑफिसला जाण्याच्या वेळेत वसई आणि पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, हे पाहण्यासाठी अनेक नागरिक रेल्वे रुळांच्या मध्यभागी तसेच प्लॅटफॉर्मच्या खाली उभे राहत असल्याचे चित्र दिसते. एवढेच नव्हे, तर फुटओव्हर ब्रिजचा वापर न करता अनेक प्रवासी थेट रेल्वे रुळ ओलांडून एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात.
प्रवाशांच्या या जीवघेण्या धोकादायक प्रवासामागे रेल्वे प्रशासनाचे अपुरे नियोजन, प्लॅटफॉर्म बाबत वेळेवर माहिती न मिळणे, उशीरा धावणाऱ्या गाड्या आणि योग्य व्यवस्थेचा अभाव ही कारणे आहेत का, याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे मनसे चे हर्षद पाटील यांनी म्हटले आहे.
मध्य रेल्वे प्रशासन आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), मुंबई विभाग यांनी या समस्येची तातडीने दखल घ्यावी. ट्रेनच्या प्लॅटफॉर्मची माहिती वेळेवर उपलब्ध करून देणे, ट्रेन च्या संख्या वाढवीने व त्या वेळेवर धावणे, प्रवाशांसाठी योग्य व्यवस्था करणे आणि रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
एखादा मोठा अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा, प्रशासनाने वेळीच जागे होणे आवश्यक आहे. प्रवाशांचा जीव अनमोल आहे. अप्पर कोपर रेल्वे स्टेशनवरील ही परिस्थिती तातडीने सुधारावी, ही रेल्वे प्रशासनाकडे अपेक्षा आहे, असे मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद हरिश्चंद्र पाटील म्हणाले. मनसेने या समस्येबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून, लवकरात लवकर ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांच्या कडून देण्यात आला आहे.