ठाणे, दि. ०१ नोव्हेंबर - ठाण्यात 'लोकतंत्र बचाव' पदयात्रेला महायुतीमधील सगळे नेते सहभागी झाले. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गणेश नाईक एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. या पदयात्रेला लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीत भाषणादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, काही लोक म्हणतात की, मोदी आज जाणार, उद्या जाणार पण हा काय तुमच्या बाबाचा माल आहे का? तुम्ही देशासाठी काय केले, २०१४ पूर्वीची परिस्थिती बघा म्हणत एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या आंदोलनावरही त्यांनी जोरदार टीका केली. २०१४ अगोदर पाकिस्तानला 'लव्ह लेटर' पाठवले जायचे. विरोधकांनी कोर्टावर मोर्चा काढला. न्यायालयावरील आंदोलन हा 'काळा दिवस' होता. लोकशाहीची अपमान विरोधकांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांनी निवडून दिले. जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली. मोदींना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. विरोधक मोदीसह लष्करावर टीका करतात. पुढचे ५० वर्ष विरोधकांची सत्ता येणार नसल्याचे मोठे विधान एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
तुम्ही पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करतात. देशातील जनता मोदींच्या मागे खंबीरपणे उभी आहे. मोदींनी देशासाठी काय केले हे सांगण्याची गरज नाही. भारताची अर्थव्यवस्था जगात थेट चार नंबरला गेली. मोर्दीकडून गरीबाचे काम केले जात आहे. एकही भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्यावर नाही. मोर्दीवर तुम्ही आरोप करत आहात, पण ते तुमच्यावर लक्ष देत नाहीत. तुम्ही त्यांचा बाप काढता, त्यांना शिव्या देता? अरे कुठे फेडणार आहात हे पाप. अरे तुम्हाला माहिती टाकण्यासही माणूस उरणार नाही. ज्यांनी आपल्या आईचे निधन झाल्यानंतरही पुन्हा कामाला लागले. शोधूनही असा पंतप्रधान तुम्हाला मिळणार नाही, असे शिंदे म्हणाले.