LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

जाह्नविज मल्टी फाउंडेशनतर्फे ‘चांगल्या शिक्षकापासून उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञापर्यंत’ प्रेरणादायी संगोष्ठी संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपर, १८ नोव्हेंबर २०२६ : जाह्नविज मल्टी फाउंडेशन (जेएमएफ) तर्फे बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत  जेएमएफ शिक्षण संस्थेच्या 'मधुबन बँक्वेट' येथे शिक्षकांसाठी एक प्रेरणादायी व जेएमएफ संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले. “एक प्रेरणादायी प्रवास : चांगल्या शिक्षकापासून उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञापर्यंत” हा या संगोष्ठीचा विषय होता.
या संगोष्ठीचे प्रमुख वक्ते 'जाह्नविज मल्टी फाउंडेशन'चे माननीय अध्यक्ष डॉ. राजकुमार एम. कोल्हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकांच्या भूमिका, जबाबदाऱ्या, व्यावसायिक कौशल्ये, विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता तसेच शिक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर प्रकाश टाकला.

‘उत्कृष्टतेला प्रेरणा देणे, बांधिलकी अधिक दृढ करणे आणि शिक्षणाचे परिवर्तन घडवणे’ या मध्यवर्ती विचारातून संगोष्ठीमध्ये शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम शिकविण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात, मूल्यसंस्कारात, विचारशक्तीच्या वृद्धीत आणि जीवनकौशल्यांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देणारे उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ बनण्याचे आवाहन करण्यात आले.
डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या अनुभवपूर्ण व प्रेरणादायी विचारांमधून एक चांगला शिक्षक आणि एक उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ यांच्यातील मूलभूत फरक स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यात जिज्ञासा, आत्मविश्वास, सर्जनशीलता, नैतिक मूल्ये आणि स्वावलंबन निर्माण करणे ही शिक्षकांची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नवीन व प्रभावी अध्यापन पद्धतींचा अवलंब, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, सातत्यपूर्ण आत्ममूल्यांकन, सकारात्मक दृष्टिकोन आणि शिक्षणाप्रती निष्ठा या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण घटकांवरही त्यांनी विशेष भर दिला.
या संगोष्ठीचा मुख्य उद्देश शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमतांचा विकास करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाप्रती त्यांची बांधिलकी अधिक दृढ करणे, आधुनिक व परिणामकारक अध्यापन पद्धती स्वीकारण्यास प्रेरित करणे आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यनिर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ घडविणे हा होता.
संगोष्ठीमध्ये उपस्थित शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाने शिक्षकांना आत्मचिंतन, आत्मविकास आणि शिक्षण क्षेत्रातील आपल्या भूमिकेचा नव्याने विचार करण्याची प्रेरणा दिली. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना शिकण्याची दिशा देतो, तर एक उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतो, हा संदेश या संगोष्ठीतून प्रभावीपणे अधोरेखित झाला.
'जाह्नविज मल्टी फाउंडेशन'च्या या उपक्रमातून शिक्षकांच्या ज्ञान, कौशल्य, मूल्ये आणि समर्पण यांचा समन्वय साधून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा तसेच भावी पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, संवेदनशील आणि प्रेरणादायी शिक्षणतज्ज्ञ घडविण्याचा संकल्प अधिक दृढ झाला. या संगोष्ठी मध्ये २०० च्या वर  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व प्राचार्य, उपप्राचार्य यांनी भाग घेतला होता. संस्थेच्या सचिव प्रेरणा कोल्हे, खजिनदार सौ. जान्हवी राजगुरू कोल्हे, सौ. संगीता चौधरी नागपूर या संगोष्ठी मध्ये आवर्जून उपस्थित होत्या.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...