LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

'जेएमएफ' शिक्षण संस्थेत संस्कार आणि संस्कृतीचा अनोखा संगम; गुरुनानक जयंती व तुलसी विवाह उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपर : जाह्नविज मल्टी फाउंडेशन (जेएमएफ) संचालित शिक्षण संस्थांमध्ये गुरुनानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुलसी विवाह या दोन धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, धार्मिक सहिष्णुता, सामाजिक एकात्मता, प्रेम, बंधुभाव आणि संस्कारांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम दोन्ही सत्रांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात 'जेएमएफ'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या आगमनाने झाली. मधुबन वातानुकूलित दालनात गुरुनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी डोक्यावर ओढणी, तर विद्यार्थ्यांनी डोक्यावर रुमाल बांधून शीख परंपरेचा आदर व्यक्त केला आणि लंगर कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
लंगर, ध्यानधारणा, विश्वशांतीची प्रार्थना आणि पारंपरिक तुलसी विवाहातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व सामाजिक ऐक्याचे संस्कार

यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना ध्यानधारणा करण्यास सांगून विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थना केली. त्यांनी गुरुनानक जयंतीचे महत्त्व विशद करत एकात्मता, समानता, सेवा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी स्वतः रचित भक्तिमय गीतही सादर केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र बसून पुरी-भाजीच्या प्रसादाचा आस्वाद घेतला.
“शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी मानवतेचा, समानतेचा आणि एकात्मतेचा संदेश दिला. धर्म, जात, पंथ यांच्यापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र बसून भोजन करावे, एकमेकांचा आदर करावा आणि मानवतेची भावना जोपासावी, हाच लंगर आयोजनामागील मुख्य उद्देश आहे,” असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगलमय औचित्याने आयोजित तुलसी विवाह सोहळ्यात शिशुविहार ते इयत्ता दुसरीच्या बालकांनी रंगीबेरंगी पारंपरिक वस्त्रे परिधान करून उत्साहाने सहभाग घेतला. तुलसी विवाहासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. 'वृंदा' अर्थात 'तुळस' ही भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानली जाते. तुळशी आणि शालिग्राम अर्थात भगवान विष्णू यांचा विवाह धार्मिक परंपरेनुसार मंगलमय व शुभ मानला जातो. या परंपरेचे महत्त्व सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी बालकांना सोप्या शब्दांत समजावून सांगितले.
तुलसी विवाह सोहळ्यात डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वतः रचनाबद्ध केलेले ‘जय हो, जय हो, प्रभु तेरा जय जयकार’ हे भक्तिगीत सादर करण्यात आले. त्यानंतर स्वरचित मंगलाष्टकांचे स्वर वातावरणात भक्तिमयता निर्माण करत होते. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पारंपरिक पद्धतीनुसार पाच मंगलाष्टके म्हटली. ‘शुभ मंगल सावधान’ म्हणताच उपस्थित बालकांनी तुलसी आणि बालकृष्णावर अक्षता व फुलांचा वर्षाव केला. या मंगलमय सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा आनंद घेतला.
या दोन्ही कार्यक्रमांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी दोन्ही सत्रांमध्ये सहभाग घेतला. तुलसी विवाह आणि लंगर कार्यक्रमात सुमारे पाचशे विद्यार्थी व शंभर शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सजावट श्री. नरेश पिसाट यांनी केली. सर्व कलात्मक शिक्षकांनी सजावट व आयोजनासाठी उत्स्फूर्त सहकार्य केले.
या कार्यक्रमाला सौ. जाह्नवी, श्री. रोहित राजगुरू, सौ. ज्योती व्यंकटरमण, सुश्री तेजावती, सौ. मयुरी खोब्रागडे, श्री. अभिषेक देसाई, श्री. प्रमोद पगारे, श्री. वैभव गडारी तसेच दोन्ही शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

धार्मिक परंपरांचा आदर, सामूहिक प्रार्थना, ध्यानधारणा, सामूहिक भोजन आणि भारतीय संस्कृतीचे जतन यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक माहितीच नव्हे, तर मानवता, सहिष्णुता, समता, सेवाभाव आणि संस्कारांचे अमूल्य शिक्षण मिळाले. जेएमएफ शिक्षण संस्थेच्या या उपक्रमातून शिक्षणासोबत संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचा संस्थेचा ध्यास अधोरेखित झाला.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...