संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)
"हिंदू धर्म विचारून गोळीबार? आमचं हिंदू राष्ट्र डगमगावं, हे कधीच सहन होणार नाही!" — खासदार रविंद्र वायकर यांचा संतप्त आवाज पहलगाम प्रकरणावरून दणका
पहलगाममधील गोळीबारानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या अमानवी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे खासदार रविंद्र वायकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध करत हिंदू राष्ट्रावर झालेला घाला म्हणून या हल्ल्याचे वर्णन केले आहे.
"अतिरेकी लोकांनी धर्म विचारून गोळीबार केला, ही अत्यंत निंदनीय व भीषण गोष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रावर घाला घातला गेला आहे. अशा प्रकारांची मुळापासून चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
वायकर यांनी भारतातील सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण मागणी देखील पुढे केली आहे. त्यांनी म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आहे. पण आता वेळ आहे कठोर निर्णय घेण्याची. देशातील ३६ राज्यांमध्ये राहणारे बांगलादेशी घुसखोर आणि संशयास्पद लोकांची सखोल तपासणी झाली पाहिजे. त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई झाली पाहिजे."
याच पार्श्वभूमीवर त्यांनी संसदेमध्ये या मुद्द्यावर उघडपणे आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. "मी काही दिवसांतच संसदेत ही मागणी मांडणार आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसोबत कुठलाही तडजोड स्वीकारणार नाही," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पहलगाममध्ये धार्मिक द्वेषातून हल्ला — देशाच्या अस्मितेला आव्हान?
या घटनेमुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, 'धर्म विचारून हत्या' ही संकल्पना देशाच्या संविधानिक मूल्यांवरच आघात करत आहे.
- या मुद्द्यावरून आता देशभरात चळवळ होणार का?
- बांगलादेशी घुसखोरांविरोधात आता देशव्यापी मोहिम राबवली जाणार का?
- वायकर यांचा आवाज संसदेत किती बुलंद होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा