डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारावे भागात एक स्त्री जातीचे अर्भक बेवारस टाकले गेले होते. अत्यंत हृदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे. गुन्ह्यातील एका १९ वर्षीय युवकाला खडकपाडा पोलीसांनी अटक केली असून १७ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून गु.र.नं. ६७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४(२),(एम),९३,३(५), बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ४,८,१२ अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासानुसार आरोपी रोहित प्रदीप पांडे (वय: १९ वर्षे) राहणार: बारावे, त्याने अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पीडित मुलीसोबत मागील दोन वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले, त्यात ती गर्भवती राहिली. सदर मुलीने नवजात मुलीला जन्म दिला. अर्भकाचा जन्मानंतर कोणताही पुरावा मागे न ठेवता, ते अर्भक रात्रभरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले, ज्यामुळे बाळाचा जीव धोक्यात आला. कल्याण, आंबिवली व शहाड परिसरात तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्ष तपासणीद्वारे पीडित व आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील तपासा दरम्यान आरोपी रोहित पांडे यांस १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, तसेच खडकपाडा पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, निरीक्षक (गुन्हे) मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, सतीश पाटील, उपनिरीक्षक भूषण देवरे, व तपास पथकाच्या इतर अंमलदारांनी केला. ही घटना केवळ कायद्याचा भंग करणारी नसून सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत चिंताजनक आहे. संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.