BREAKING NEWS
latest
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डोंबिवलीतील शिवप्रतिमा मित्र मंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२७ : डोंबिवली एमआयडीसीमधील शिव प्रतिमा मित्र मंडळ व डोंबिवलीचे सुप्रसिद्ध 'अनिल आय हॉस्पिटल' यांच्या सांघिक माध्यमातून आज मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम एम.आय.डी.सी निवासी विभागातील 'शिव प्रतिमा मित्र मंडळ' सभागृहात रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकूण ९० लोकांनी या शिबिराला हजेरी लावली त्यात पुरुष, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.  
यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे डोळयांवर होणारे दुष्परिणाम त्यावर उपाय योजना तसेच डोळ्यांचे इतर आजार आणि त्यांची काळजी कशी घ्यावी यावर काउन्सलर यांचा सल्ला आणि मार्गदर्शन नेत्रतज्ज्ञांच्या उपस्थित राहून तपासणी करण्यात आल्याचे शिबिराचे आयोजक राजू नलावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. याप्रसंगी शिवप्रतिमा मित्र मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष रामदास मेंगडे, सरचिटणीस जयसिंग आयरे, सहचिटनिस सागर पाटील आणि खजिनदार विजय कुलकर्णी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात मान्सूनपूर्व तयारी संदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध प्रभागांमध्ये येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांबाबत सखोल चर्चा झाली. या बैठकीत आयुक्तांनी लवकरात लवकर नाले सफाई पूर्ण करून त्यामध्ये वाढलेला गाळ प्राथमिक टप्प्यातच उचलण्याचे निर्देश दिले. तसेच मोठ्या, मध्यम नाल्यांबरोबरच लहान गटारांच्या जवळील GVP ठिकाणी दैनंदिन स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले.

पावसाच्या पाणी ज्या भागांमध्ये साचते असे भाग लक्षात घेऊन, त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रभाग पातळीवर विशेष टीम तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यामुळे पावसाळ्यात महापालिका क्षेत्रात पाणी साचण्याच्या समस्या कमी होतील, असे आयुक्तांनी सूचित केले. महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी या सूचनांची अंमलबजावणी तत्काळ सुरू करावी, असे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एल्फिन्स्टन पूल रविवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : परळ आणि प्रभादेवी परिसरास जोडणारा ऐतिहासिक ब्रिटीशकालीन एल्फिस्टन पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल रविवार (२७ एप्रिल) रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे- वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी येथे जोडण्यात येणार असून, त्यासाठी हा पूल पाडून 'एमएमआरडीए'च्या वतीने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी या पुलावरील वाहतूक रवीवारी रात्री ९ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी हा पूल बंद करण्यात येणार आहे.

दरम्यान, एल्फिस्टन सारखा महत्त्वाचा पूल बंद राहणार असल्याने वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.

असे असणार पर्यायी मार्ग..

दादर पूर्वेकडून पश्चिमकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रीजचा वापर करता येईल. तर, परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणारी वाहने करी रोड ब्रीजचा वापर करतील.

परळ, भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी-लिंकच्या दिशेने जाणारी वाहने ही चिंचपोकळी ब्रीजचा वापर करतील.

प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के.ई.एम रुग्णालयकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी ३ ते रात्री ११ या काळात करी रोड ब्रीजचा वापर करता येईल.

करी रोड रेल्वे ब्रिजवरून..

कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडून (भारत माता जंक्शन) शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक ही सकाळी ७ ते दुपारी ३ या काळात एकेरी असणार आहे. तर शिंगटे मास्तर चौकाकडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारत माता जंक्शन) वाहतूक दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत एक मार्गी असणार आहे.

इथे नो पार्किंग..

सेनापती बापट मार्ग : संत रोहिदास चौक (एलफिन्स्टन जंक्शन) ते ऑडियो जंक्शन

ना. म. जोशी मार्ग : कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) ते धनमिल नाका

भवानी शंकर मार्ग : हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ चौक

महादेव पालव मार्ग : कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौक

साने गुरुजी मार्ग : संत जगनाडे चौक ते कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका)

रावबहादूर एस. के. बोले मार्ग : हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चर्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग

पहलगाम हल्ल्याबाबत पार पडली सर्वपक्षीय बैठक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली, दि. २४ : मंगळवारी (दि. २२) रोजी काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काल दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. काल सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनतर संध्याकाळी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर आज संध्याकाळी हल्ल्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही खासदार उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवलीतील तिघांना श्रद्धांजली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी रात्री डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला. अतिरेक्यांच्या या पूर्वनियोजित आणि घृणास्पद हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मात्र जनतेत दहशतवादाविरुद्ध तीव्र असंतोष आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. नागरिकांनी एकापाठोपाठ एक येत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्याने वातावरणात कमालीची शांतता आणि दुःख पसरले होते.
 मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि सर्व पाकिस्तानी उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. अनेकजण भावुक होऊन फडणवीस यांना म्हणाले, "फक्त तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता." रात्री ९:०० च्या सुमारास फुलांनी सजलेल्या वाहनांमधून या तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यापूर्वी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली. "भावपूर्ण श्रद्धांजली" असे मोठे बॅनर वाहनावर लावण्यात आले होते, ज्यावर मृतांची नावे आणि छायाचित्रे होती. ही अंत्ययात्रा डोंबिवलीतील  डॉमिनोज पिझ्झा, एम. जी. रोड, डोंबिवली स्टेशन (पश्चिम), कोपर रोड, कोपर ब्रिज, टंडन रोड, आर.पी. रोड या प्रमुख मार्गांवरून गेली आणि शेवटी शिव मंदिर रोडवरील स्मशानभूमीत या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक यावेळी आपल्या भावनांना आवरू शकले नाहीत.
अंत्यसंस्कारापूर्वी भगशाला मैदानात स्मशान शांतता पसरली होती, कारण शोकाकुल नागरिक शांतपणे शवपेट्यांजवळून जात होते. अनेकजण स्तब्ध उभे होते, तर काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या घटनेमुळे समुदायाला बसलेला मोठा मानसिक आघात वातावरणात स्पष्टपणे जाणवत होता. यापूर्वी, जेव्हा पार्थिव विमानतळावर पोहोचले, तेव्हा अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी राज्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 
दरम्यान, ठाणे जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, जिल्ह्यातील १५६ पर्यटक अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले आहेत. विशेष विमाने आणि गाड्यांच्या माध्यमातून त्यांची घरवापसीची व्यवस्था केली जात आहे आणि ती उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनी समस्त देशवासियांना न्याय देण्याची तसेच दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.