दिवा, दि. २१ मार्च : दिव्यातील साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ (मेरिडियन बोर्ड) यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा