BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त महापालिकेच्या चर्चासत्रात ७ कलमी शाश्वत विकास उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे आयोजित चर्चासत्राला डोंबिवलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील रोटरी भवन येथे आयोजित या अनोख्या उपक्रमाला डोंबिवली परिसरातील १५० हून अधिक गृहसंकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
शाश्वत आणि सुरक्षित शहर विकासासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने ७ कलमी मुद्द्यांची मांडणी करण्यात आली आहे. आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि विद्युत-यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या समन्वयातून कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला. ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सांडपाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या सात मुद्द्यांचा समावेश असून त्याबाबत उपस्थित नागरिकांमध्ये तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून झालेल्या उपक्रमाचे डोंबिवलीकरांकडून विशेष कौतुक !

या सात मुद्द्यांवर कल्याण डोंबिवलीतील गृहसंकुलांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज ओळखून कल्याण आणि डोंबिवलीमध्ये हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. येत्या काळात कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक लहान मोठ्या निवासी संकुलापर्यंत हा ७ कलमी कार्यक्रम पोहोचवण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचा मानस आहे. त्यादृष्टीने कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही डोंबिवली रोटरी क्लब ऑफ ईस्टचे माधव चिकोडी यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. दरम्यान यावेळी उपस्थित नागरिकांनी शाश्वत आणि सुरक्षित विकास हा कार्यक्रम सोसायटीनिहाय घेऊन सोसायटीनुसार त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.

संपूर्ण त्वचा व सौंदर्य सेवा एकाच छताखाली देण्यासाठी डोंबिवलीत ‘स्किनराईज एस्थेटिक्स’चा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली – त्वचा, केस व सौंदर्य उपचारांच्या आधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा 'स्किनराईज एस्थेटिक्स' या क्लिनिकचे नुकतेच डोंबिवलीत उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकच्या माध्यमातून डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्वचा व सौंदर्यविषयक उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले असून, याठिकाणी त्वचारोग, सौंदर्य उपचार, स्किन केअर, ऍन्टी-एजिंग, पिंपल्स, डाग, केस गळती, हेअर ट्रीटमेंट्स तसेच लेझर व आधुनिक एस्थेटिक प्रक्रियांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित आणि वैयक्तिक गरजांनुसार उपचार याठिकाणी पुरविले जाणार आहेत.
श्रीमती ईश्वरी शिरोडकर यांनी सुरु केलेले 'स्किनराईज एस्थेटिक्स' नागरिकांना दर्जेदार उपचार प्रदान करते. हे क्लिनिक आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजेनुसार उपचार प्रदान करते. रुग्णांना त्वचेची काळजी घेण्यापासून ते केसांचे उपचार किंवा कॉस्मेटिक उपचारांचा लाभ याठिकाणी घेता येणार आहे. आपले आरोग्य आणि सुरक्षिततेचे भान ठेवत आपले नैसर्गिक सौंदर्य वाढविणे हे या स्किनराईज एस्थेटिक्सचे मुख्य ध्येय आहे.

स्किनराईज एस्थेटिक्समध्ये त्वचारोग तज्ज्ञ, सौंदर्य तज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम उपलब्ध आहे, जी त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांवर उपचार करते. वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त, स्किनराईज ऍन्टी-एजिंग उपचार, लेझर प्रक्रिया, डाग कमी करणे आणि कायाकल्प करणारे फेशियल यांसारख्या सौंदर्य सेवा देखील प्रदान करते. सर्व वयोगटांमध्ये जीवनशैली-संबंधित त्वचा आणि केसांच्या समस्या वाढत असल्याने, हे क्लिनिक प्रत्येक रुग्णासाठी सुरक्षित, प्रामाणिक आणि वैयक्तिक उपचार योजना तयार करते. वैद्यकीय सेवांमध्ये लेझर हेअर रिमूव्हल, केमिकल पील्स, मायक्रोनिडलिंग, एचआयएफयु, मेडिफेशियल्स, इन्फ्युजन फेशियल्स, पीआरपी, केस प्रत्यारोपण, आयव्ही वेलनेस ड्रिप्स, बॉडी कॉन्टूरिंग आणि इंटिमेट वेलनेस उपचारांचा समावेश आहे.

स्किनराईज एस्थेटिक्स केवळ बाह्य रुपावरच नाही, तर अंतर्गत सौंदर्यावरही लक्ष केंद्रित करते. निरोगी पर्यायांचा वापर करुन नैसर्गिक सौंदर्य वाढवणे हे आमचे ध्येय आहे. या क्लिनिकमुळे डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील लोकांना त्वचा आणि केसांच्या उपचारांचा लाभ घेता येईल.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये केडीएमसी च्या शिक्षण विभागातर्फे सकारात्मक शिस्त आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांचे सकारात्मक विचार आणि शिस्त हा महत्वाचा घटक आहे, या संदर्भात जिल्ह्यामध्ये मनपा, तालुका व केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन 'जे एम एफ' मधुबन वातानुकूलित दालनात करण्यात आले होते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व या चर्चासत्राचे वक्ते डॉ.राजकुमार कोल्हे यांनी सकारात्मक शिस्ती बाबतचे व्याख्यान दिले. आयोजित केलेल्या व्याखनाला 'सी आर सी' प्रमुख क्रमांक २१ च्या सौ.राजश्री जतकर, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, कल्याण येथील प्रशासन अधिकारी श्री.भारत बोरनारे तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वागत करून व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. वक्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांनी  विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षक कसा असावा तर शिक्षक हा संयमी, सकारात्मक विचारांचा, वेळ प्रसंगी कठोर पण मृदु देखील असावा असे सांगितले. मस्ती करणे हा विद्यार्थ्यांचा स्वाभाविक गुण आहे, अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन हा कंटाळवाणा विषय वाटत असतो, शिक्षक शिकवत असताना एकमेकांच्या खोड्या काढणे, आपापसात कुजबूज करणे, अशा प्रकारच्या मस्ती करत रहाणे या गोष्टी विद्यार्थी दशेत घडणे हे स्वाभाविक आहे,  त्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा ही दिली जाते परंतु दिलेल्या शिक्षाचा वाईट परिणाम मुलांवर होऊन मुले वैचारिक रित्या कठोर होऊ लागतात, म्हणून शिक्षकांनी मुलांना शिक्षा न करता सकारात्मक विचाराने आणि संयमाने सद्य परिस्थिती हाताळणे आणि  विद्यार्थ्यांना सकारात्मक शिस्त लावणे हे योग्य ठरेल असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. जेव्हा मूल वाचन, संभाषण, आणि अभ्यास अशी बौद्धिक कामे करत असतो, अशा वेळेला त्याला रागावले तर त्याला भीती वाटते. मग बुद्धीचे काम थांबवून भावनांचे काम सुरू होते, आणि अशा वेळी जर अजून मोठी शिक्षा झाली तर विद्यार्थी स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो यासाठी संवाद, सहकार्य व समुपदेशन करण्याचे कार्य आणि कर्तव्य हे शिक्षकाचे आहे म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षा न करता त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थी दशेत अनेक वेळा अपयशी ठरलेले परंतु भविष्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींची उदाहरणे विद्यार्थांना द्यावीत, फेसबुक , व्हॉट्सऍप, अशा अनेक 
संगणकीय उपयोजन विकसित केलेले तद्न्य हे विद्यार्थी दशेत असताना यशस्वी नव्हते ते देखील आजच्या विद्यार्थ्यांसारखेच होते परंतु शिक्षकांच्या सकारात्मक शिस्तीने त्यांच्या मधे बदल घडवून आला आणि ते यशस्वी झाले, म्हणून ध्येय गाठायचा आधी तिथं पर्यंत पोहचण्याचा प्रवासाची तयारी आधी करा असा मोलाचा सल्ला डॉ.राजकुमार कोल्हे यांनी उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना दिला.
अनेक यशस्वी अयशस्वी मोठ्या व्यक्तींची चित्रफित दाखवून यशाची आणि सकारात्मक शिस्ती ची व्याख्या डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितली. या चर्चासत्रात अनेकांनी आपल्या मनातले प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले व समाधान कारक उत्तरे मिळवली. सुमारे २५० ते ३०० शिक्षक या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.

ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कारवाईत एम.डी.(मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या इसमाकडुन १०.८८ लाख रूपये किंमतीचा १०८.८ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक ८/१२/२०२५ रोजी २२.५० वा. कल्याण पूर्वेतील आडवली, ढोकळी, हाजीमंलग रोड, येथील काका ढाबा, येथे असलेल्या श्री. गजानन रेसिडेन्सी, दिनकर विहार को.ऑप हौ.सोसायटी लिमि. रुम नं. ००२, डी-विंग याठिकाणी इसम नामे आकिब इकबाल बागवान (वय: ३३ वर्षे) हा एकुण १०८ ग्रॅम ८ मिलीग्रॅम वजनाचा १०,८८,०००/- रुपये किंमतीचा एम.डी.(मफेड्रोन) हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता जवळ बाळगला असताना व ५०,०००/- रुपये किंमतीची विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल अग्नीशस्त्र बेकायदेशीररित्या जवळ बाळगुन ठेवले असल्याने मिळुन आला म्हणुन आरोपी नामे १) आकिब इकबाल बागवान याच्या विरुध्द मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १५०२/२०२५ एनडीपीएस ऍक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (क), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह म.पो. कायदा कलम ३७ (१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन बाजारपेठ पोलीस स्टेशन, कल्याण गुन्हा रजि नं. ५०५/२०२५ एन.डी.पी.एस कलम ८ (क) २२ (ब) व ५६०/२०२५ एन.डी.पी.एस कलम ८ (क) २२ (क) या दोन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातीलं अटक आरोपी याच्याकडे चौकशी केली असता सदरचे अग्नीशस्त्र त्याने भरत शत्रुध्न यादव याच्याकडुन घेतल्याचे सांगितले.

त्यामुळे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे २) भरत शत्रुध्न यादव याचा तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेवुन त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडती मध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकुण २ आरोपीना अटक करण्यात आलेली असुन त्यांच्याकडुन १०८.८ ग्रॅम वजनाचा एम.डी.(मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व एक अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस असा एकुण ११,४१,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे, नेम - खंडणी विरोधी पथक, ठाणे हे करीत आहे.

सदरची कारवाई श्री.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध - २, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भोसले, कानडे, पोहवा. ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावस्कर, चापोहवा. हिवरे, पोशि. वायकर, पाटील, शेजवळ, मपोशि. भोसले यांनी केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीच्या 'रोटरी डाऊनटाउन क्लब' तर्फे धावण्याची स्पर्धा आयोजित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी, 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाउन'ने शालेय विद्यार्थ्यांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. डोंबिवली शहरातील सुमारे १४० शाळांमधील एकूण २,१०० विद्यार्थ्यांनी या धावण्याच्या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. इतर मान्यवरांमध्ये आमदार श्री. राजेश मोरे, श्रीमती. सुलभा गायकवाड, रोटेरियन श्री. हर्ष मोकल तसेच होली एंजल शाळेचे मुख्याध्यापक श्री. बिजॉय ओमेन यांचा समावेश होता.
वंचित मुलांसाठी बालरोग हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला अनेक संस्थांकडून मोठा पाठिंबा मिळाला. रुस्तमजी ग्रुप, फेडरल बँक, डेकॅथलॉन आणि डोंबिवली शहरातील १५ हून अधिक संस्थांनी आपले मौल्यवान योगदान दिले.
गेल्या वर्षी, 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाउन'ने केलेल्या अशाच निधी संकलनाच्या प्रयत्नांमुळे मुरबाडमध्ये चेक डॅम बांधणे शक्य झाले होते. त्याच भावनेला अनुसरून, या वर्षीच्या स्कूल रनमधून उभारलेला निधी लहान मुलांसाठी जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांसाठी समर्पित केला जाईल असे आयोजक रोटरी क्लब ऑफ डोंबिवली च्या रोटेरियन ऍनी बिजॉय यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

डोंबिवलीत भाजपा-शिवसेनेत तणाव; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांसमोर शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीमधील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. डोंबिवली पश्चिम भागातील कुंभारखाणपाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शनामुळे वातावरण तापले होतं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी आणि घोषणाबाजीने दणानून सोडत परिसरात राजकीय शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समोरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात राजकीय तणाव वाढल्याचं पाहायला मिळाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोप केला की शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्या स्वागताचे बॅनर जाणूनबुजून झाकण्यात आले. त्यामुळे उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपामध्ये वाद झाला. उद्घाटनासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्याचवेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेसमोर घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 

उद्घाटनासारख्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून झालेली बॅनरबाजी, घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळं तणावनाची परिस्थिती निर्माण झाली होती. अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेले विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केलं. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. भाजपा कार्यकर्ते शिवसेनेविरोधत कुरघोडी करणार असल्याच बोललं जात आहे. या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु बैठकीत व्यस्त असल्याचं कारण देत प्रतिक्रिया दिली गेली नाही.

अवैध्य बेकायदेशीररित्या चालणारी गावठी दारूभट्टी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन उध्वस्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे: दिनांक २८/११/२०२५ रोजी पोहवा. आशिष ठाकूर, नेम. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा करवी माहीती मिळाली की "एक इसम नामे जयेश ठोंबरे राहणार: खोणी गाव हा खोणी गाव, नाल्याचे बाजूला झाडीमध्ये डोंबिवली, जि. ठाणे याठिकाणी बेकायदीर अवैध्यरित्या गावठी हातभट्टीची दारू बनविण्याचे काम करीत आहे." त्यानुसार सपोनि. सुनिल तारमळे, पोहवा. ठाकुर, जाधव, चापोहवा. हिवरे, पोशि.  वायकर सर्व नेमणुक खंडणी विरोधी पथक, ठाणे शहर यांनी दोन पंच समक्ष छापा कारवाई करून १) १,५०,०००/- रू किंमतीचा गूळमिश्रीत व नवसागरमिश्रीत वॉश ८ डूम मध्ये १६०० लिटर, २) २००/- रू किंमतीचा नवसागर, ३) २०,०००/- रू किंमतीचे सतेले, ४) १०,०००/- रू किंमतीचे प्लॅस्टीकचे ड्रम, ५) ६०,०००/- रू किंमतीची गावठी हातभट्टीची दारू ३०० लिटर असा एकुण २,४०,२००/- रू किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला. सदर छापा कारवाई बाबत मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १४३७/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. अमरसिंह जाधव साो, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे साो, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्णा गोरे, कापडणिस, पोउपनिरी. तावडे, सहापोउपनिरी. भोसले, कानडे, पोहवा. ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, चापोहवा. हिवरे, पोना. हासे, मधाळे, पोशि. वायकर, शेजवळ, ढाकणे, पाटील, मपोशि. भोसले, यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन एम.डी. (मेफेड्रोन) ह्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे: खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन एम.डी (मेफेड्रोन) ह्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून १,००,९२,०००/- रू किंमतीचा ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व इतर वस्तु जप्त करण्यात आला.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी कापुरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७५६/२०२५ एनडीपीएस ऍक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (ब), २१ (क), २९ या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपीत नामे १) सचिन सुभाष चव्हाण यांस ताब्यात घेवुन त्याच्याकडुन २९.०६ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी नामे २) रवि शामवीर डागुर यांस ताब्यात घेवुन त्याच्या अंगझडती मध्ये ३४ ग्रॅम वजनाचा व घरझडतीमध्ये ९२२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन ) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकुण ६ आरोपीना अटक करण्यात आलेली असुन त्याच्याकडुन ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ व मोबाईल असा एकुण १,००,९२,०००/- रू किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे, नेम खंडणी विरोधी पथक, ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, कापडणिस, पोउपनिरी. तावडे, सपोउपनिरी. भोसले, कानडे, पोहवा. ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, चापोहवा. हिवरे, पोना. हासे, मधाळे, पोशि. वायकर, शेजवळ, ढाकणे, पाटील, मपोशि. भोसले, यांनी केली आहे.

आरोपीस २४ तासाचे आत अटक करत देसाई गावच्या खाडी पुलाचे खालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गुढ उकलले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १२.५५ वा. नियंत्रण कक्ष, ठाणे येथुन प्राप्त झालेल्या संदेशानुसार देसाई गावकडुन कल्याणकडे जाणारे रोडवर देसाई गावचे पुढील खाडी ब्रिजच्या खाली एका बॅगेमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे बिट मार्शल २ वरील अंमलदार यांनी खात्री करुन पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्याप्रमाणे लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यासह पोलीस पथकाने सदर ठिकाणी भेट देवुन पाहणी केली असता तेथे खाडीचे पाण्यातील मातीचे भरावावर एक ट्रॉली बॅग पडलेली दिसुन आली. त्यामध्ये एका २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह पाय गुडघ्यात दुमडुन ट्रॉली बॅगमध्ये भरलेला व अर्धवट बाहेर आल्याचे दिसत होते. मयत महिलेचे अंगात गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर नक्षीदार फुलांची डिझाईन, त्याखाली लाल रंगाची लेगिन्ग्स घातलेली होती. तिचे डावे हाताचे मनगटाजवळ पी.व्ही.एस. असे इंग्रजीमध्ये गोंदलेले होते. तसेच प्रेत फुगलेले व अर्धवट कुजलेले होते. सदर मयत महिलेचे नातेवाईक किंवा परिचीत संपडलेले नाहीत. त्यावरुन दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १३.१५ वा. पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अनोळखी महिलेस अज्ञात कारणावरुन कश्याने तरी जिवे ठार मारून प्रेत ट्रॉली बॅगमध्ये भरुन सदर ठिकाणी प्रेत ट्रॉलीबॅगसह पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने देसाई खाडी ब्रिजखाली फेकुन दिलेले असल्याबाबत शिळ डायघर पोलीस ठाण्यात गु. रजि.नं. ९५५/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१), २३८ प्रमाणे अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी मयताची ओळख पटवून आरोपीचा शोध तपासकामी अधिकारी / अंमलदार यांचे चार तपास पथके तयार करून गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर प्रसारीत केलेल्या बातमीद्वारे एका साक्षीदाराकडून मा. अपर पोलीस आयुक्त श्री. विनायक देशमुख, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांना प्राप्त उपयुक्त माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीताबाबत सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या माध्यमातुन कसोशीने शोध घेवुन सदर गुन्ह्यात आरोपी नामे विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (वय: ५० वर्षे) राहण्याचे .ठिकाण. देसाईगाव, ता. जि: ठाणे, मुळगाव-गोरखपुर, उत्तरप्रदेश यां lस देसाई येथून ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील मयत महिला नामे प्रियांका विश्वकर्मा (वय: २२ वर्षे) ही आरोपीसोबत मागील ०५ वर्षापासुन राहावयास होती. त्याच्यात दिनांक २१/११/२०२५ रोजी रात्रौ आपसात भांडण झाले होते. आरोपी याने मयत महिलेचा गळा दाबुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला ट्रॉली बॅगमध्ये भरुन एक दिवस रुममध्येच ठेवले होते. मयत महिलेच्या प्रेताची दुर्गंधी सुटल्यानंतर दिनांक २२/११/२०२५ रोजी रात्रौ ११.३० ते १२.०० वा. चे दरम्यान प्रेत असलेली ट्रॉलीबॅग रोडने पायी चालत खाडी पुलाकडे घेवुन जावुन सदरची ट्रॉलीबॅग पुलावरुन खाली फेकुन दिली होती. मयत व आरोपीताबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना सोशल मिडीयामध्ये प्रसारीत झालेल्या बातमीच्या आधारे साक्षीदार मिळवून, हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा कसोशीने तपास करुन सदर गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून आरोपीस सदर गुन्ह्यात २४ तासात अटक करुन खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून स्तुत्य अशी कामगिरी केलेली आहे.

सदरची कामगिरी श्री. सुभाषचंद्र बुरसे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ ठाणे, श्री. प्रशांत कदम पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५ वागळे इस्टेट, श्रीमती प्रिया डमाळे सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, श्री. श्रीराम पौळ वपोनि. शिळ-डायघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र राऊत, सपोनि. संतोष चव्हाण, अनिल राजपुत, योगश लामखडे, शहाजी शेळके, अमोल पोवार, पोउपनिरी. माने, बेळगे, तिडके, पोह. श्यामकुमार राठोड, हनुमंत मोरे, भरत जाधव, तेजस परब, विश्वास मोटे, महेंद्र लिंगाळे, सचिन कोळी, अजय साबळे, रमेश पाटील, विक्रांत कांबळे, पोना. मंदार यादव, महेंद्र पाटील, पोशि. संदीप बोरकर, सुशिल पवार, ललीत महाजन, जयेश येळवे, रत्नदिप चौधरी, अक्षय पाडळे, स्वप्निल सोनवलकर, वाहीद तडवी, विजय खाडे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

ठाकुर्ली पुलाच्या बॅनरबाजीच्या राजकीय वादावरून शिवसेना (शिंदे) गट आणि भाजप आमनेसामने..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबीवली, दि.२६ नोव्हेंबर - ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे) गट आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू असून, त्याची ठिणगी आता कल्याण- डोंबिवलीत पडल्याचे चित्र आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेना (शिंदे) गटाने भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवक यांना पक्षप्रवेश करून ‘फोडाफोडी’ची सुरुवात केल्यानंतर, भाजपनेही कल्याण-डोंबिवलीत पक्षप्रवेशाचा धडाका लावत प्रत्युत्तर दिले होते.

याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानंतर आता ठाकुर्ली पुलावरून दोन्ही पक्षांमध्ये नवा वाद उफाळून आला आहे.
ठाकुर्ली पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर शिवसेना (शिंदे) गटाकडून बॅनरबाजी करत खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख “फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देणारा विकासाचा योद्धा” असा करण्यात आला होता. यावर भाजपकडून तात्काळ प्रत्युत्तर देत माजी नगरसेविका रेखा चौधरी, प्रमिला चौधरी, खुशबू चौधरी आणि साई शेलार यांच्या वतीने प्रतिउत्तरात्मक बॅनर लावण्यात आले. या बॅनरमुळे कल्याण-डोंबिवलीत राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

भाजपने थेट सवाल उपस्थित करत विचारले की, “हा पूल व्हावा यासाठी आ. रविंद्र चव्हाण सुरुवातीपासून प्रयत्नशील असताना, शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार आणि पालिकेच्या चाव्या त्यांच्याच हाती असतानाही आजवर प्रशासकीय मान्यता का मिळाली नाही?” इतकेच नव्हे तर “विकासाचा योद्धा” ही उपाधी वास्तवात कल्याण- डोंबिवलीच्या विकासासाठी ‘स्पीडब्रेक’ ठरत नाही ना, अशी बोचरी टीकाही भाजपने केली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) गट पुढील पाऊल कोणत्या दिशेने टाकतो आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात भाजप कसे प्रत्युत्तर देतो, याकडे कल्याण- डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकीय वादाची ही ठिणगी आणखी पेटणार की थंडावणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा 'ही-मॅन वीरू' काळाच्या पडद्याआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा 'ही-मॅन वीरू' काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री पवार, आपल्या शोकसंदेशात म्हणतात, धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. 

'शोले', 'चुपके चुपके', 'अनुपमा', 'सत्यकाम', 'दिल्लगी' अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः 'शोले' मधील त्यांनी साकारलेली 'वीरू'ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळवले होते. त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयामुळे त्यांना 'हिंदी सिनेमा'चा 'ही-मॅन वीरू' म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबिय, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मेंद्र यांना भावनापूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये अभूतपूर्व ‘प्रति अयोध्या श्रीराम मंदिर ध्वजारोहण सोहळा’ आणि क्रीडा दिवस उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

श्री रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे
रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः

डोंबिवली :  दिनांक २५ नोव्हेंबर, मंगळवार - मार्गशीर्ष शुक्ल पक्ष, हा दिवस म्हणजे अयोध्येत उगवत्या सूर्याच्या स्वर्णकिरणांनी श्रीराम मंदिराच्या कळसावर पसरवलेले जणू श्रीरामांना अर्पण केलेले मानचिन्हच! याच पवित्र क्षणाची प्रतिकृती म्हणून 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये देखील ढोल-ताशांच्या निनादात, लेझीमच्या तालात आणि “जय श्रीराम”च्या जयघोषात हा आगळावेगळा ध्वजारोहण सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला.

“दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला… राम जन्मला गं सखी, राम जन्मला..”

                                            
     
रामजन्माच्या त्या मंगलवेळेला दुपारी बारा वाजता अयोध्येत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालक श्री. मोहन भागवत यांच्या हस्ते जसे ध्वजारोहण झाले, त्याच क्षणी 'जे एम एफ'च्या ब्रह्मा रंगतालय च्या प्रांगणात या अद्वितीय सोहळ्याचे आयोजन झाले.

भव्य मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात


संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, आणि खजिनदार जाह्नवी कोल्हे यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, ऋषी-मुनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वेशातील विद्यार्थ्यांसह मिरवणूक काढली. लहान मुलांनी गदा हातात घेत वानरसेनेच्या रूपात “जय श्रीराम”च्या जयघोषात प्रांगणात प्रवेश केला. पालखीत राम-लक्ष्मण-सीता-हनुमान यांच्या मूर्ती ठेऊन लेझीमच्या नादात आणि श्रीराम नामात तल्लीन होऊन मिरवणूक ध्वजारोहण स्थळी पोहोचली.



अंबाभवानी मंदिराचे पुजारी श्री. श्रीधर पुजारी यांनी वेदमंत्रांच्या घोषात सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते कलशपूजन, तर संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या हस्ते राम-लक्ष्मण-सीतेची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पंचवातीच्या समई प्रज्वलित करण्यात आली.

ध्वजारोहणाचा मंगल क्षण


भव्य भगवा ध्वज फुलांनी सजवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ जी यांच्या वेशातील विद्यार्थ्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात ध्वजारोहण पार पडले. या प्रसंगी मान्यवर डॉ. मोझेस, श्रीधर पुजारी, श्री. रोहित राजगुरु, सौ. जाह्नवी राजगुरू कोल्हे, डॉ. नाडर यांनी भगव्या ध्वजाला वंदन केले. हजारो पालक, 'जन गण मन' सीबीएसई व स्टेट बोर्डचे विद्यार्थी, 'वंदे मातरम' महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक यांच्या डोळ्यात भावनांचे अश्रू दाटले आणि सर्वांनी अयोध्या सोहळ्याचा जीवंत अनुभव घेतला. आठ मजली भव्य 'जे एम एफ' शिक्षण संस्थेची इमारत जणू श्रीरामाच्या जयघोषात न्हाऊन निघाली. फुलांच्या वर्षावात, श्रीरामभजनांच्या सुरांमध्ये तप्त्या  उन्हाची तमा न बाळगता उपस्थितांनी हा अभूतपूर्व सोहळा मनसोक्त साजरा केला.

संस्थेचे मार्गदर्शक विचार

संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले, “श्री राम’ हा दोन अक्षरी शब्द जरी असला तरी त्या दोन अक्षरांत संपूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. त्याचे उच्चारण होताच मनात आर्त भावना जागृत होतात. अशा दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होणे ही आजच्या पिढीची भाग्यलक्षणी गोष्ट आहे.” तर सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “भारत ही केवळ भूमी नसून देवभूमी आहे. त्या देवभूमीत जन्म घेणे हीच मोठी प्राप्ती. आमची 'जन गण मन' शाळा ही जणू त्या रामरायाचेच आशीर्वाद घेऊन उभी आहे.”

ध्वजारोहणाची आकर्षक सजावट श्री. नरेश पिसाट व सौ. उषा पिसाट यांनी मनोभावे केली, तर कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, दीपा तांबे, कस्तुरी, श्री. विठ्ठल कोल्हे यांनी भगव्या ध्वजावर कांचनवृक्ष, श्रीरामाचे सूर्यचक्र, तेजोमूर्ती यांची कलाकुसर करून सोहळ्यास दिव्यता प्राप्त करून दिली.

क्रीडा दिवस – २४ व २५ नोव्हेंबर

'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिरचा संयुक्त क्रीडा दिवस दोन दिवस ब्रह्मा रंगतालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. शिशुविहार ते इयत्ता दहावीपर्यंत एकूण सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी धावणे, लंगडी, अडथळा शर्यत, चमचा–लिंबू शर्यत इत्यादी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी ट्रॉफी, प्रशस्तीपत्रके व पदके जिंकून शाळेचे नाव उज्ज्वल केले. उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, क्रीडा शिक्षक रमेश वगे, सौ. वैशाली शिंदे, तसेच प्रमुख पाहुणे विनायक कांबळे यांनी मशाल प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना प्रारंभ केला.


शिशुविहारातील बालकांनी आकर्षक अशी स्वस्तिक, ॐ, 'जे एम एफ' ची प्रात्यक्षिके तसेच नृत्य सादर केले, तर इयत्ता १ आणि २ च्या विद्यार्थ्यांना सर्वांना विजेता घोषित करून हनुमानाची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली. डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले,“जिंकणे-हरणे ही नैसर्गिक बाब असली तरी दुसऱ्याच्या यशात सहभागी होणे म्हणजे अपयशालाही यशाची चव देणे होय.” तर डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “खेळ मन आणि शरीर विकसित करतो. मानसिक-शारीरिक ताण दूर करण्यासाठी नियमित मैदानात उतरले पाहिजे. स्पर्धेपेक्षा खेळाचा आनंद अधिक महत्त्वाचा.”

क्रीडा दिवस यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अलपेश व मयुरी खोब्रागडे, प्राचार्या ज्योति वेंकटरमण, प्राचार्या तेजावती कोटीयन, तसेच सौ. श्रेया कुलकर्णी, अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, दीपा तांबे, दीपाली सोलकर, क्रीडा शिक्षक रमेश वगे, वैशाली शिंदे, आणि सर्व वर्गशिक्षकांनी परिश्रम घेतले.

१५ बारबाला सहित २८ जणांवर गुन्हा दाखल करत परिमंडळ-३ उपायुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाचा 'ताल' बार वर छापा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील बेकायदेशीर आणि अनधिकृतरीत्या चालणाऱ्या लेडीज बारवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ चे अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी धडक कारवाई केली. या मोहिमेअंतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ताल रेस्टॉरंट ऍण्ड बार वर छापा टाकला.
गुप्त माहितीच्या आधारे २३ नोव्हेंबर रोजी 'ताल रेस्टॉरंट ऍण्ड बार' वर छापा टाकण्यात आला असता बारमध्ये नियमबाह्यरीत्या जास्त बारबाला ठेवून अश्लील नृत्य सुरू असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान हॉलमध्ये एकूण १५ बारबाला नाचत असल्याचे समोर आले. तसेच बारमालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, पुरुष वेटर्स आणि काही ग्राहक अशा १३ जणांनी या गैरप्रकारांना प्रोत्साहन दिल्याचेही पोलीसांनी नोंदवले.

या सर्व २८ जणांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११७२/२०२५ अन्वये बीएनएस कलम २९६, २२४(२), ५४, ३(५) तसेच डान्स बार बंदी कायदा २०१६ चे कलम ३, ४, ८(१) (२) (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान 'ताल बार' चे मालक, चालक, मॅनेजर आणि कॅशियर अशा एकूण ६ आरोपींना महात्मा फुले पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाणे करीत आहे. उपायुक्त कार्यालय परिमंडळ-३ च्या विशेष पथकाने बेकायदेशीर व नियमभंग करणाऱ्या लेडीज बारवर सुरू केलेली मोहिम पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरला घुमणार विभागीय खो-खोचा गौरवशाली महासंग्राम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या व धी ऍमॅच्यूअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मान्यतेने आणि 'धी.युनायटेड स्पोर्ट्स क्लब', ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सव २०२५ निमित्त कै. जे.पी.कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन २ ते ४ डिसेंबर २०२५ दरम्यान ठाण्यात करण्यात आले आहे.

युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे माजी खेळाडू कै. जनार्दन पांडुरंग कोळी हे ठाण्यातील पहिले राष्ट्रीय खो-खोपटू होते. विजयवाडा येथील राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी बजावली होती. त्यांची तीन वेळा राज्य संघात निवड होऊन त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले होते.

या विभागीय स्पर्धेसाठी पुरुष व महिलांच्या प्रत्येकी १६ प्रतिष्ठित संघांना सहभागाची परवानगी तसेच शुभेच्छा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिल्या आहेत. तर स्पर्धेचे निरीक्षण राज्य खो-खो असोसिएशनतर्फे बाळासाहेब (बाळ) तोरसकर करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष दत्तात्रय गोपाळ ठाणेकर आणि विश्वस्त आयोजक हेमंत जयवंत कोळी यांनी दिली. या स्पर्धेत ठाणे, मुंबई व मुंबई उपनगरातील दमदार आणि परंपरागत ताकदवान संघांची रंगतदार लढत होणार आहे. 

स्पर्धेत सहभागी पुरुष संघ :
विहंग क्रीडा मंडळ (ऐरोली), ग्रिफीन जिमखाना (कोपरखैरणे), ज्ञानविकास फाउंडेशन (कोपरखैरणे), युवक क्रीडा मंडळ (कल्याण), धी. युनायटेड स्पोर्ट्स क्लब (ठाणे), आनंदभारती समाज (ठाणे), मावळी मंडळ (ठाणे), शिवभक्त क्रीडा मंडळ (बदलापूर), राज क्रीडा मंडळ (बदलापूर), शिर्सेकर्स महात्मा गांधी (मुंबई उपनगर), सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), प्रबोधन क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), श्री समर्थ व्यायाममंदिर (मुंबई), विद्यार्थी क्रीडा केंद्र (मुंबई), सरस्वती स्पोर्ट्स क्लब (मुंबई), ओम समर्थ व्यायाममंदिर (मुंबई).

स्पर्धेत सहभागी महिला संघ :
ज्ञानविकास फाउंडेशन (कोपरखैरणे), रा.फ.नाईक महिला संघ (कोपरखैरणे), शिवभक्त क्रीडा मंडळ (बदलापूर), धी.युनायटेड स्पोर्ट्स क्लब (ठाणे), शाहू स्पोर्ट्स क्लब (रबाळे), आनंदभारती समाज (ठाणे), मावळी मंडळ (ठाणे), राज क्रीडा मंडळ (बदलापूर), न्यू बॉम्बे सेंटर स्पोर्ट्स अकॅडमी (घणसोली), शिर्सेकर्स महात्मा गांधी (मुंबई उपनगर), सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), शिवनेरी (मुंबई), श्री समर्थ व्यायाममंदिर (मुंबई), अमरहिंद (मुंबई), सरस्वती स्पोर्ट्स क्लब (मुंबई), वैभव क्रीडा मंडळ (मुंबई).

ठाण्यातील खो-खोप्रेमींसाठी तीन दिवसीय ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून, कौशल्य, वेग, चातुर्य आणि संघभावनेच्या दुर्मिळ मेळ्याचे दिमाखदार दर्शन घडवणार आहे.

अवयव प्रत्यारोपणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सुप्रीम कोर्ट चे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली, दि. २० : सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (मुख्य न्यायमूर्ती भुषण आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन) महत्त्वपूर्ण आदेश दिला. 'इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन' यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला देशभरात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत राष्ट्रीय धोरण व एकसमान नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. या धोरणामुळे सर्व नागरिकांना समान संधी मिळावी, तसेच लिंग, जात, आर्थिक स्थिती यांमुळे होणारी असमानता दूर व्हावी, असा उद्देश असल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले की, देशभरात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत मोठी असमानता आहे. काही राज्यांनी 'Transplantation of Human Organs Act, 1994' मधील 2011 दुरुस्ती व 2014 नियम अद्याप स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांना अवयव मिळवताना अडचणी येतात. न्यायालयाने केंद्राला अशा राज्यांना लवकरात लवकर हे नियम स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचे आदेश दिले.

*आदेशातील महत्त्वाचे मुद्दे*

राष्ट्रीय धोरण: सर्व राज्यांसाठी लागू होईल असे एकसमान धोरण तयार करणे.

मॉडेल अलोकेशन निकष: अवयव वाटपासाठी पारदर्शक व न्याय्य निकष निश्चित करणे.

लिंग, जात व आर्थिक भेदभाव दूर करणे: सर्व रुग्णांना समान संधी मिळावी यावर भर.

राष्ट्रीय वेब पोर्टल: अवयव प्रत्यारोपणाची माहिती व नोंदणीसाठी एकसमान पोर्टल तयार करणे.

पाच वर्षांची योजना: सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व NOTTO (नॅशनल ऑर्गन ऍण्ड   टीश्यु ट्रान्सप्लांट ऑरगॅनायझेशन) यांना योजना तयार करण्याचे निर्देश.

जिवंत दात्यांचे संरक्षण: अवयव दान करणाऱ्यांच्या हक्कांचे व कल्याणाचे रक्षण करण्यासाठी मजबूत यंत्रणा उभारणे.

आता १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरही लागणार फिटनेस टेस्ट शुल्क..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
नवी दिल्ली, दि. २० : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, आता १० वर्षांहून अधिक काळापासून वापरात असलेली वाहने जास्तीची फी भरतील तर २० वर्षांपेक्षा जुन्या कमर्शियल वाहनांसाठी ही फी तब्बल दहापट वाढवण्यात आली आहे. या बदलामुळे जुनी वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

केंद्र सरकारने जुनी आणि सुरक्षित नसलेली वाहने रस्त्यावरून हटवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वाहन फिटनेस टेस्ट शुल्कात दहापट वाढ करण्यात आली आहे. तसेच आता १५ नाही, तर १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरही हे शुल्क आकारले जाणार आहे. पूर्वी फक्त १५ वर्षांहून अधिक काळापासून वापरात असलेल्या जुन्यावाहनांकडून शुल्क आकरले जात होते. पण आता ह्या वाहनांची ही वयमर्यादा १० वर्षांवर आणली आहे.

केंद्र सरकारने हा बदल तत्काळ लागू करून वाहनांचे वय आणि प्रकारानुसार १० ते १५, १५ ते २० वर्ष, आणि २० वर्षांपेक्षा जास्त अशा तीन प्रकारात विभागले आहे. यानुसार २० वर्षांपेक्षा जुनी - अवजड कमर्शियल वाहन (ट्रक/बस) रुपये २५ हजार (पूर्वी अडीच हजार), मध्यम कमर्शियल वाहन रुपये २० हजार (पूर्वी १ हजार ८००), हलकी वाहने रुपये १५ हजार, ऑटोरिक्षा रुपये ७ हजार, मोटारसायकल रुपये २ हजार (पूर्वी ६००) तर १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या वाहनांसाठीही फी वाढवली आहे. यामध्ये मध्यम/जड कमर्शियल वाहनांसाठी १ हजार रुपये, हलकी वाहने ६०० रुपये आणि मोटरसायकलसाठी ४०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे.

लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने वाद, मराठी विद्यार्थ्याने संपवलं जीवन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
ठाणे, दि. २० : मुंबई-शहर आणि उपनगरात गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी मराठी-अमराठी वादाचे अनेक प्रसंग घडून येत आहेत. आज झालेल्या अशाच एका वादावादीत एका मराठी तरुणाने लोकल ट्रेनमध्ये हिंदीमध्ये बोलल्यामुळे मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीमुळे निराश होऊन आत्महत्त्या केली आहे. कल्याण पूर्व तिसगांव नाका येथे राहणारा अर्णव खैरे मुलुंडच्या 'केळकर कॉलेज' मध्ये सायन्स शाखेत शिकत होता. १८ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. गर्दीच्या डब्यात अर्णवने इतरांना बाजूला होण्यासाठी सहज हिंदीत “थोडा आगे हो..” असे म्हटले. एवढ्यावरून काही अनोळखी प्रवाशांनी त्याला घेरले. “मराठी बोलता येत नाही का ?”, “मराठी बोलण्याची लाज वाटते का ?” अशा उलटसुलट प्रश्नांनंतर त्याला बेदम मारहाण केली.

अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेला अर्णव पुढच्या ठाणे स्टेशनला उतरला, भावनिकदृष्ट्या कोसळलेला तो मागील लोकल पकडून मुलुंडला पोहोचला. त्याने कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पूर्ण केले, पण मनात खोलवर बसलेला अपमान आणि भीती त्याला स्वाभाविक राहू देईना. दुपारी तो घरी परतला आणि वडिलांना फोन करून त्याने संपूर्ण प्रसंग सांगितला.

सायंकाळी ७ वाजता वडील जितेंद्र खैरे घरी पोहोचले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुग्णालयात नेले असता रात्री ०९.०५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडिलांच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कुत्रा चावून मृत्यू झाल्यास कुटुंबाला ५ लाख भरपाई, तर जखमींना ५ हजार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
बंगळुरु, दि. २० : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवर भटक्या कुत्र्यांची उपस्थिती पूर्णतः हटवण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतो. या आदेशानंतर आता राज्य सरकारांनी विशेष कारवाई सुरु केली आहे. देशभरात दरवर्षी २० हजार ते २५ हजार लोक रेबीजमुळे मृत्यू पावतात. ही गंभीर बाब लक्षात घेता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच कर्नाटक सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकार भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला थेट ५ लाख रुपये मदत देणार आहे. जखमी व्यक्तींना ५००० रुपये मदत मिळेल, त्यात ३५०० रुपये थेट पीडिताला तर १५०० रुपये उपचारासाठी 'सुवर्ण आरोग्य ट्रस्ट'ला दिले जातील.

त्वचेत खोल छिद्र पडणे, मोठ्या जखमा, शरीरावर काळेनिळे डाग किंवा एकाच वेळी अनेक चावा घेतल्यास ही भरपाई लागू होईल. ही योजना फक्त भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांसाठी आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांची गंभीरता आणि पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना आणल्याचे कर्नाटक सरकारने म्हटलंय. यामुळे उपचाराचा खर्च भागेल आणि मृताच्या कुटुंबाला दिलासा मिळणार आहे. कर्नाटक सरकारने भरपाई देऊन यासाठी पुढाकार घेतला आहे.

भाजप मधून बाहेर पडून शिंदे सेनेत निघून गेलेल्या नगरसेवकांची पुन्हा घरवापसी..

प्रतिनिधी:अवधुत सावंत

डोंबिवली दि. १८: आगामी महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विरोधी पक्षातील प्रभावशाली नेते आणि पदाधिकाऱ्यांसह एकमेकांच्या पक्षातील बड्या नेत्यांनाही आपल्या गोटात आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या घडामोडीत आज आणखी एक महत्त्वाची भर पडली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील आणि त्यांची बहीण डॉ. सुनीता पाटील यांनी आज परत भाजपमध्ये घरवापसी केली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमूख उपस्थितीत महेश पाटील यांनी हा भाजप प्रवेश केला आहे.

कल्याण-डोंबिवलीत आज सकाळपासूनच भाजपमध्ये इनकमींगचा मोठा धडाका सुरू आहे. आज सकाळी शिवसेनेतीलच युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. त्याला अवघे काही तासंही उलटत नाहीत तोच भाजपने आपल्या महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेला आणखी एक जबर धक्का दिला. कल्याण ग्रामीण भागातील मोठे प्रस्थ आणि पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी महेश पाटील आणि त्यांची बहीण माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी आज परत भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्यासह सदस्य संजय राणे, संजय विचारे, सायली विचारे, माजी परिवहन सदस्य संजय राणे, संजय विचारे 
यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.
मला व माझ्या मुलाला मारण्याची सुपारी देणारा मोक्काचा आरोपी कुणाल पाटील, याला मोक्का मधून क्लीन चिट दिली गेली आहे. आमच्या पक्षातील नेते मंडळी कुणाल पाटील याला सपोर्ट करत असल्याने मी दडपणामध्ये वावरत होतो. श्रीकांत शिंदे यांना सांगितलं होतं की कुणाल पाटील हा फिरतोय आणि त्यांचे काका वंडार पाटील यांनी माझ्या - मुलाला आणि मला मारण्याची धमकी दिली होती. त्यावर पक्षाकडून मला काही समाधानकारक प्रतिसाद मीळाला नाही. मात्र आमच्या पक्षातले लोकचं त्यांना सपोर्ट करत आहेत म्हणून आज नाईलाजाने माझ्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केल्याचे महेश पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितले.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार दहाव्यांदा विराजमान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पाटना,दि. २० : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला मिळालेल्या प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर आज जनता दल (युनायटेड) चे नेते नितीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते या सोहळ्यास उपस्थित होते. हजारो कार्यकर्ते व नागरिकांनी मैदानात हजेरी लावून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात २६ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. नितीश यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सम्राट आणि विजय सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. मंचावर पीएम मोदींशिवाय अमित शाह, जेपी नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते. शपथ ग्रहणाआधी जेडीयू च्या अनेक नेत्यांना मंत्रि‍पदासाठी फोन गेले. ज्या नेत्यांना फोन गेले, त्यात विजय चौधरी, श्रावण कुमार, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मदन सहनी, जमा खान आणि लेशी सिंह हे नेते आहेत.