BREAKING NEWS
latest

महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे केले आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि राजेश मोरे यांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेत कल्याण ग्रामीण हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांनी लोकसभा निवडणुकीत विश्वास दाखवला आणि श्रीकांतने त्याचे सोने केले. त्याने आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली आता इथे आमदारही आपलाच हवा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील समर्थ नगर परिसरात मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. 
'जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले त्यांना गरिबांच्या व्यथा काय कळणार. मला तुमचे आयुष्य सोन्यासारखे करायचे आहे. राज्य प्रगती कडे न्यायचे आहे आजवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण मध्ये हजारो कोटीचां निधी आणून गल्ली गल्लीत विकास पोहोचवला आहे. कल्याण ग्रामीणच्या चौफेर विकासासाठी राजेश मोरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या' असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी पुढे बोलताना त्यांनी आपण राजेश मोरे यांच्या रूपाने सर्वांच्या सुख दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला आहे. इथे जरी तिरंगी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात मला फक्त इथे विकासाचा भगवा रंग दिसत आहे आणि हाच रंग निकाला दिवशी दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका मागच्या सारख्या चुका करू नका असा प्रेमात सल्लाही त्यांनी दिला.
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे मिळणारचं, त्यांचा लाडका भाऊ त्यांच्या खात्यात पैसे पाठवणार त्यामध्ये कोणी आला तर त्याची गय केली जाणार नाही. लाडक्या बहिणी योजनेसाठी ३३ कोटीची तरतूद केली आहे कारण हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेलाच दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उमेदवार राजेश मोरे यांच्या कार्य अहवाल आणि वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील ७२ लाख २९ हजार ३३९ मतदार करणार मतदान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होतील.
    
ठाणे जिल्ह्यात १३४-भिवंडी ग्रामीण (अ.ज.), १३५-शहापूर (अ.ज.),१३६-भिवंडी पश्चिम, १३७-भिवंडी पूर्व, १३८-कल्याण पश्चिम, १३९-मुरबाड, १४०-अंबरनाथ (अ.जा.), १४१-उल्हासनगर,१४२-कल्याण पूर्व, १४३-डोंबिवली,१४४-कल्याण ग्रामीण,१४५-मिरा भाईंदर, १४६-ओवळा माजिवाडा, १४७-कोपरी पाचपाखाडी,१४८-ठाणे, १४९-मुंब्रा कळवा, १५०-ऐरोली, १५१-बेलापूर असे १८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

मतदारसंघाचे एकूण मतदार:-
     
ठाणे जिल्ह्यात दि.२९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ७२ लाख २९ हजार ३३९ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार: ३८ लाख ४५ हजार ४२, महिला मतदार: ३३ लाख ८२ हजार ८८२, इतर/तृतीयपंथी मतदार: १ हजार ४१५ आहेत. तसेच यामध्ये सैनिक मतदार: १ हजार ६०३, एनआरआय मतदार: ९७९, दिव्यांग ३८ हजार १४९, १८-१९ वयोगटातील १ लाख ७२ हजार ९८१ मतदार तर ८५ पेक्षा अधिक वयोगटातील ५६ हजार ९७६ मतदार आहेत.
     
तरी,पात्र मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोना काळातील असंतोष यंदाच्या मतपेटीतुन व्यक्त होणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : कोरोना काळात ज्या राजकीय नेत्यांनी आणि  त्याच्या पक्षातील प्रमुखांनी कोरोना काळात जनतेच्या मदतीला धावले नाहीत. त्यावेळी सामान्य जनतेचे हाल झाले होते. मात्र कोणीही त्यावेळी मदतीला पुढे आले नाही. याचा जाब विधानसभा उमेदवारांना मतदार विचारीत आहेत. मतदानाच्या दिवशी मतदानातुन हा रोष आता  बाहेर पडणार आहे.
   
कोरोना काळात काहीजण मुंबई येथुन जनतेचे हाल पाहत होते. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील जनतेच्या अडचणीला धावून आले नाही. स्थानिक पातळीवर अनेक नेते घरात बसुन जनतेच्या बिकट परीस्थितीचे चित्र पाहत बसले होते. त्यांच्या मदतीला धावून आले नाही. मतदार भावी उमेदवाराच्या, लोकप्रतिनिधीच्या दारात  जाऊन अडचणी सोडवण्यासाठी विनंती करत होते. या विनंतीला पायदळी तुडवत जनतेला दारातुन हाकलुन लावीत होते. मतदानाला पैसा दिला, मी फुकट मतदान घेतले नाही असे म्हणून मतदारावर  रागावण्याचे काम अनेकांनी केले. तेच उमेदवार मतदाराच्या दारापुढे जाऊन आता मतदान करण्याची विनंती करत आहेत. 

मतदार कोरोना काळात काय केले असा प्रश्न विचारून त्या उमेदवाराला झिडकारत असल्याचे चित्र गंगाखेड विधानसभा मतदार संघात पाहायला मिळत आहे. कोरोना काळात उपचारा अभावी अनेकांचा मृत्यू झाल्याने त्यांची घरे उध्वस्त झाली. अशा लोकांना राजकीय नेत्यांनी त्या काळात पायदळी तुडवत मदत केली नाही. मुंबई येथुन कोरोना काळात आणी दुष्काळात जनतेच्या हालअपेष्टा काहीजण पाहत बसले होते. काहीतरी मदत मिळेल म्हणून नेत्यांना मोबाईलवर फोन करत होते. मोबाईल केलेल्या व्यक्तीला शिव्या घालण्याची मजल काही उमेदवारांनी केली होती. याचा वचपा काढण्यासाठी मतदार मतदानातुन आपला रोष व्यक्त करणार असल्याचे येथे दिसुन येत आहे. ग्रामीण भागातील मतदार त्या उमेदवाराला फटकारत असल्याचे समोर येत आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रात मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास मनाई - अशोक शिनगारे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ६ हजार ९५५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतदान केंद्रात छायाचित्र ओळखपत्राशिवाय मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करु नये, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. 

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना त्यांचा मतदान करण्याचा हक्क अधिक प्रभावीपणे बजावता यावा यासाठी सर्व मतदारांनी त्यांचे मतदान करण्यापूर्वी, मतदान केंद्रामध्ये ओळख पटविण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणे अपेक्षित आहे. ज्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणे शक्य होणार नाही, ते त्यांची ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे आधारकार्ड, मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड), बँक टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रममंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक लायसन्स, स्थानी खाते क्रमांक (पॅनकार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), केंद्र सरकार/ राज्यशासन / सार्वजनिक क्षेत्र उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य यांनी  दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (यूडीआयडी), सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आदी दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत सर्व नागरिकांनी मतदान करुन आपला राष्ट्रीय हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नागरिकांना केले आहे.

कल्याण ग्रामीण मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करत राजेश मोरे यांना पाठिंबा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली येथील मॉडेल इंग्लिश स्कूल मधील महायुतीच्या मेळाव्यात पार पडलेल्या कल्याण ग्रामीण मधील मनसे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने राजेश मोरे यांना पाठिंबा जाहीर केला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.

कल्याण ग्रामीण मधील मनसेचे कल्याण लोकसभा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव प्रितेश पाटील, मनसे विद्यार्थी सेनेचे आजदे शाखाअध्यक्ष दीप सोनावणे, दिवा मनसेचे शाखाध्यक्ष अनिकेत चंदनशिवे, डॉक्टर नीयती देवळेकर, शुभम शिंदे, अभिषेक जोशी, संदेश घोडविंदे, गौरव आंजर्लेकर, मनसे आजदे महिला सेना शाखाध्यक्ष सुशिला शेलार, लता पाटील, उपशाखा अध्यक्ष आजदे महिला सेना विजया जाधव, साहिल लाहोरी, साहिल छजलानी, श्रेयस जाधव, पवन कसबे, अभिषेक चोरगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राजेश मोरे यांना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला.

महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा जाहीरनामा सादर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  महाविकास आघाडीचे अधिकृत विधानसभा उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी आज डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा बहुप्रतिक्षित वचनबद्ध जाहीरनामा सादर केला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 'दिपेश म्हात्रे घेऊन आला ठाकरेंची सेना' या जोशपूर्ण गाण्याचे अनावरण देखील या कार्यक्रमात करण्यात आले. डोंबिवलीतील विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी तयार करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे - 

स्व. रामभाऊ कापसे प्रशासकीय भवन
डोंबिवली पूर्वेतील धोकादायक स्थितीत असलेल्या कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या इमारतीच्या पुनर्विकासाद्वारे, सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली आणण्यासाठी हे एकात्मिक प्रशासकीय भवन उभारण्याचा संकल्प आहे. हा प्रकल्प स्व. रामभाऊ कापसे यांच्या नावाने ओळखला जाईल आणि राज्यातील एक आदर्श असा प्रकल्प ठरेल.

१ लाख नव्या रोजगार संधी वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस सेंटर
डोंबिवलीतील स्थानिक रोजगाराच्या वाढत्या गरजेचा विचार करुन, बिझनेस सेंटरद्वारे एक लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये आयटी आणि विविध उद्योगांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे जागेचा पुनर्विकास
पॉवर हाऊस परिसरातील ३५० एकर रेल्वे जागेचा व्यावसायिक विकास करून आयटी हब, बँकिंग क्षेत्र, आणि मोठ्या व्यवसाय उद्योगांना येथे आणण्याचा संकल्प आहे. यामुळे डोंबिवलीत आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील.

डोंबिवलीची ठणठणीत आरोग्य व्यवस्था
डोंबिवलीत उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी एक सुसज्ज सरकारी रुग्णालय उभारले जाईल. येथे अतिदक्षता विभाग, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी, कर्करोग उपचार केंद्र तसेच आपत्कालीन कार्डिएक ऍम्बुलन्स सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाहतूक, रस्ते आणि पार्किंग समस्या
डोंबिवलीत रस्त्यांवरील खड्डे आणि अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हे सर्व रस्ते खड्डेमुक्त करून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुंद करण्यात येणार आहेत, तसेच पार्किंगच्या समस्येवर विशेष वाहनतळ (पार्किंग प्लाझा) उभारण्यात येतील.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी योजना
रिंग रूट ते दुर्गेवाडी आणि मोठगाव मार्गावर जल शुद्धीकरण केंद्र आणि ८०० मिमी मापाच्या जलवाहिनीद्वारे डोंबिवली पूर्वेतील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

वेद पाठशाळा, वयोवृद्ध देखभाल केंद्र आणि २४७ मदतवाहिनी
 हिंदू संस्कृतीतील वेदांच्या महत्त्वामुळे डोंबिवलीत वेद शाळा सुरु करण्याची योजना आहे. तसेच, वयोवृद्ध नागरिकांसाठी विशेष देखभाल केंद्र आणि २४७ मदतवाहिनी सुरू केली जाईल. 

रेल्वे व्यवस्थापन सुधारणा
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येईल. ५ नंबर प्लॅटफॉर्मवर शेड, महिलांसाठी शौचालये, विशेष महिला गाड्या, आणि अधिक गाड्या चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

कल्याण जिल्हा, डोंबिवली तालुका
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण हा स्वतंत्र जिल्हा करुन त्यात डोंबिवली तालुक्याचा समावेश करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. यामुळे प्रशासनाला नागरिकांना वेळेत सेवा देणे सुलभ होईल. या जाहीरनाम्यातील सर्व मुद्यांद्वारे, डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असून ठोस योजना तयार केल्याची ग्वाही दिपेश म्हात्रे यांनी दिली. या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी या विचारांना जोरदार प्रतिसाद दिला.

डोंबिवलीकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित किलबिल फेस्टिवल मध्ये बच्चे कंपनीची उत्साहात धमाल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  बाल दोस्तांच्या आवडीचा 'किलबिल फेस्टिवल' आज १० नोव्हेंबरला बालगोपाळांच्या धमाल मजा मस्तीत डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावर प्रचंड उत्साहात साजरा झाला. डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित या किलबिल फेस्टिवलचे यंदाचे १२ वे वर्ष होते. हजारो मुला मुलींनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात मुक्ताईची मुख्य भूमिका करणाऱ्या इश्मिता जोशी आणि ज्ञानेश्वरांची भूमिका करणाऱ्या मानस बेडेकर या वेध अकॅडेमीच्या डोंबिवलीकर बालकलाकारांच्या हस्ते फेस्टिवलचे उदघाटन झाले.
डोंबिवलीत वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते पण बालगोपाळांसाठी डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल म्हणजे बाळगोपाळांसाठी हक्काचा खराखुरा बालदिन. मुलांना  खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेच्या माध्यमातून हा मौज मजा धमाल मस्तीचा अविस्मरणीय उत्सव सुरु झाला. त्यात मुलं चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर करतात,  कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी घडवतात, वायरची खेळणी कशी बनवतात ते शिकतात. याच बरोबर  बोलक्या बाहुल्या, जम्पिंग मून वॉक,  बालनाट्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रमही पाहायला मुलांबरोबर आई बाबा आजी आजोबांचे मनही बालक होऊन जातं अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेक डोंबिवलीकर पालकांनी दिली. मुलं आणि पालक इतके हरवून गेलेले की उत्सव प्रवेशद्वारापासून ते आत मध्ये प्रत्येक बहुरूपी व्यक्तिमत्वांबरोबर छायाचित्र काढण्याची चढाओढ लागली होती.  

यंदा तर 'थाऊसंड हँड डान्स ग्रुप' आणि 'झिरो डिग्री डान्स', हा भन्नाट डान्स आकर्षणाचा विषय ठरला.  याच बरोबर जायंट पांडा, टेडी बेअर, हेडलेस मॅन, अल्लाउद्दीनचा जिन अशा विविध बहुरूप्यांसोबत   सेल्फी काढण्याची बालदोस्तांची स्पर्धा लागली होती. 
साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग या थरारक प्रकारांनी यावर्षीही मुलांची गर्दी खेचली तर तांदुळावर नाव कोरणे, मेहंदी, लाखेच्या बांगड्या हे लाडक्या छोट्या बहिणीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. डोंबिवलीकर किलबिल महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व खेळ आणि सुविधा डोंबिवलीकर बाळ गोपाळांसाठी मोफत असतात त्यामुळे डोंबिवलीच्या कानाकोपऱ्यातून किलबिल फेस्टिवलला कुटुंब आवर्जून हजेरी लावतात असे आयोजकांनी सांगितले.