BREAKING NEWS
latest

कल्याण ग्रामीण महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी केले सहकुटुंब मतदान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी सकाळीच बालाजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सह कुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मराठी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर राजेश मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आज आपण अतिशय भावूक आणि आनंदी असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या विधानसभेतून आपल्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला संधी देत आपला सन्मान केला याचा आनंद आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून चाललेले हे महायुतीचे सरकार पुन्हा यावे आणि त्यांनी पुन्हा एकदा जनसेवा करावीअशी सर्व नागरिकांची भावना आहे. म्हणूनच सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने नागरिकांना दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे आणि हा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे. 'मी संपूर्ण कुटुंबासह मतदान केले तुम्हीही करा' असे या निमित्ताने सर्व मतदारांना त्यांनी आवाहन केले.

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेत वार्षिक खेळ स्पर्धा दिवस संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील दिनांक १६ नोव्हेंबर रोजी वार्षिक खेळ स्पर्धा 'जे एम एफ' संस्थेच्या 'ब्रह्मा रंगतालय ' मैदानावर आयोजित करण्यात आली होती. इयत्ता शिशु विहार ते दहावी पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला होता. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच प्रमुख पाहुण्या पॉवर लिफ्टींग मधे सुवर्ण पदक विजेत्या व राष्ट्रीय पातळीच्या खेळाडू कु. प्रतिभा लोणे तसेच इतर पदाधिकारी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व प्रमुख पाहुणे यांनी क्रीडा मशाल पेटवून खेळ स्पर्धेला हिरवा कंदील दर्शवला. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली, तर कु. प्रतिभा लोणे यांनी शपथ विधी ग्रहण केला. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण स्पर्धा खेळामध्ये धावणे बरोबरच  बुध्दी व शरीराला चालना देणारे वेगवेगळ्या खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मैदानी खेळ तसेच बैठे खेळामध्ये देखील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. "हिप हिप हुर्रे" च्या नादात सर्व विद्यार्थी मित्र आपापल्या मित्राला, संघाला प्रोत्साहित करत होते. शिशु विहारच्या सर्व मुलांना विजेते घोषित करून त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बॅट-बॉल बक्षीस देण्यात आले तर इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना सापशिडी बक्षीस देण्यात आली. सकाळी आठ ते अकराच्या सत्रात जल्लोषात 'ऍन्युअल स्पोर्ट्स डे' साजरा करण्यात आला. सर्व जिंकलेल्या मुलांना अनुक्रमे सुवर्ण,चंदेरी व ताम्र प्रशस्तीपत्रक व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले. जिंकणे किंवा हारणे हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणे म्हणजे स्वप्नपूर्ती होय. आज ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही त्यांनी नाराज न होता, आपल्या मित्राच्या जिंकण्यांमधे उस्फूर्तपणे तुम्ही जल्लोष करून जी दाद दिलीत तिथेच तुम्हीही जिंकलात, असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. मनाचा, बुद्धीचा आणि शरीराचा विकास होण्यासाठी खेळ खेळणे हे निरोगीपणाचे लक्षण आहे, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले, योगा, धावणे, ध्यानधारणा, तसेच मैदानी खेळ हे आपल्या शरीराला चालना देण्याचे काम करतात, यामधे हार किंवा जीत हा मुद्दाच येत नाही त्यामुळे दीर्घायुषी राहण्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळाकडे ही  लक्ष द्या असे सांगून सर्व मुलांचे अभिनंदन केले.
प्रमुख पाहुणे प्रतिभा लोणे यांनी देखील स्वतःचे अनुभव सांगून मुलांना प्रोत्साहित केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी व दहावी मधील रिवा चौरसिया व इव्हा शॉ यांनी केले, तर निषाद रानडे यांनी आभारप्रदर्शन करून, संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी १५ अवैध अग्निशस्त्रे व २८ जिवंत राऊंड जप्त करत १८ अवैध गावठी दारुच्या हातभटट्‌या केल्या नेस्तनाबुत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिनांक २० रोजी होणाऱ्या आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने मा. आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा अबाधित राहून कोणताही प्रश्न निर्माण होवु नये यासाठी अवैध शस्त्रे बाळगणारे व विक्री करणारे यांचा शोध घेवुन त्यांच्यावर कारवाई करणे तसेच अवैध गावठी दारु निर्मिती व विक्री करणारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सुचना गुन्हे शाखेचे अधिकारी यांना दिल्या होत्या.

मा.आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या  सुचनांप्रमाणे विधानसभा निवडणुक-सन २०२४ च्या  अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विशेष मोहिम राबवुन, त्यांनी अहोरात्र मेहनत केली व  त्यांच्या मेहनतीस यश प्राप्त झाले असुन, अवैध अग्निशस्त्रांच्या संबंधात खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे.

१) घटक-१, ठाणे, गुन्हे शाखा यांनी राबोडी पो.स्टे. व शिळ-डायपर पो.स्टे.च्या हद्दीत केलेल्या कारवाई मध्ये आरोपी नामे शिवमकुमार रामकिशन व कपिलकु‌मार सोहन लाल दोन्ही रा. लखीनपुर, उत्तरप्रदेश तसेच राहुल उर्फ काळया उर्फ मोहमद गुलजार पिर मोहमद खान रा. शिळ-डायघर, ठाणे यांच्या ताब्यातुन ०५ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा रुपये १,८५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

२) घटक-२, भिवंडी, गुन्हे शाखा यांनी भिवंडी शहर पो.स्टे. व शांतीनगर पो.स्टे.च्या हद्दीत केलेल्या कारवाई मध्ये आरोपी नामे श्रीकांत दत्ता वाघमारे रा. नवी वस्ती, भिवंडी व नुर मोहमद हनिफ अन्सारी, रा. डोंगरपाडा, भिवंडी यांच्या  ताब्यातुन ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत राऊंड असा रुपये १,७०,६००/-  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

३) घटक-५, वागळे इस्टेट, गुन्हे शाखा यांनी वागळे इस्टेट पो.स्टे. च्या ह‌द्दीत केलेल्या कारवाई मध्ये आरोपी नामे सुमित चंद्रकांत पवार रा. वागळे इस्टेट, ठाणे याच्या ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०७ जिवंत राऊंड असा रुपये १,१२,१२०/-  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

४) घटक-३, कल्याण, गुन्हे शाखा यांनी मानपाडा पो.स्टे.च्या हद्दीत केलेल्या कारवाई मध्ये आरोपी नामे दिपक भिमाप्पा कोळी रा. पिसवली, डोंबिवली पूर्व याच्या ताब्यातुन ०३ गावठी बनावटीचे पिस्टल व ०७ जिवंत राऊंड असा रुपये ७५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

५) घटक-४, उल्हासनगर, गुन्हे शाखा यांनी शिवाजीनगर पो.स्टे. व हिललाईन पो.स्टे.च्या ह‌द्दीत केलेल्या कारवाई मध्ये आरोपी नामे गणेश सुरेश लोंढे, रा. ज्योती कॉलनी, उल्हासनगर व भगवान संभाजी यादव रा. कात्रपपाडा, बदलापुर यांच्या ताब्यातुन ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा रुपये ५१,५००/-  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

६) खंडणी विरोधी पथकाने  राबोडी पो.स्टे.च्या हद्दीत केलेल्या कारवाई मध्ये आरोपी नामे अब्दुल कलाम सलाम खान, रा. कुर्ला, मुंबई याच्या ताब्यातुन ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत राऊंड असा रुपये ५०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

७) मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने कळवा पो.स्टे. ह‌द्दीत केलेल्या कारवाई मध्ये आरोपी नामे अमरसिंग भगवान सिंग रा. खारेगांव, कळवा याच्या ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा रुपये ६०,९००/-  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर कारवाईमध्ये एकुण १५ गावठी बनावटीचे पिस्टल व २८ जिवंत राऊंड असा एकुण रुपये ७,०५,१२०/- किंमतीचा मुद्दे‌माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
तसेच अवैध गावठी दारु निर्मिती व विक्रीच्या संदर्भात गुन्हे शाखेच्या सर्व घटकांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण १८ हातभटट्‌या उध्वस्त करुन त्यात एकुण ४९,७८८ लिटर वॉश व गावठी दारु असा एकुण रुपये २५,३०,१५०/- किंमतीचा माल नष्ट केला आहे. तसेच गावठी हातभट्टी दारु तसेच अवैधरित्या विदेशी दारु विक्री करण्याबाबत १३१ कारवाया करुन त्यांच्याकडुन एकुण रुपये ९,००,५९३/- किंमतीची ५३५२ लीटर दारु पकडण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर, मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे, ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१. गुन्हे, ठाणे, मा. धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रतिबंध, गुन्हे, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सर्व घटक कक्षाचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : सर्वधर्म समभाव ही भावना उपजतच आपल्या भारतीयांमध्ये आहे. याच अनुषंगाने 'जे एम एफ' संस्था अंतर्गत जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर मधे गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या मोठ्या संख्येने साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी 'लंगर' या कार्यक्रमाचे आयोजन करून आपली उपस्थिती दाखवली. शीख धर्मियांचे गुरू व संस्थापक वाहे गुरु, गुरुनानक जी यांची  आज ५५५ वी जयंती. संस्थापक व सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी गुरुनानक जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रार्थना केली.
लंगर म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन जमिनीवर बसून एकत्रितपणे भोजन करणे. एकमेकांच्या पदार्थांची देवाण घेवाण करून तृप्त मनाने त्या भोजनाचा आस्वाद घेणे असून गरजू व भुकेलेल्या व्यक्तींना अन्नदान करणे हे महत्वाचे कार्य आहे. सर्व विद्यार्थी शिक्षकांनी घरातून पुरी भाजीचे डबे आणून प्रार्थना झाल्यावर एकत्रितपणे बसून भोजनास सुरुवात केली. 'अन्नदान हे श्रेष्ठ दान' आहे म्हणून सर्व मुलांनी स्वतः खाण्यापूर्वी आपल्या डब्यातील अन्नाचा काही भाग हा गोरगरिबांना वाटण्यासाठी काढून ठेवला. 
'अन्न हे पूर्णब्रह्म' आहे असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून अन्न वाया जाऊ न देता ते कुणाच्या मुखात गेले तर आपल्याला त्या आत्म्याचे आशीर्वादच मिळतात असे वक्तव्य केले व स्वतः सर्व मुलांना फळे वाटून लंगर चा आनंद घेतला. गुरुनानक यांची गोष्ट सांगून एका प्रकाश पर्वाचा उदय कसा झाला त्याचे कथन केले. भोजनापूर्वी सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी श्लोक वदन केला.

कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा, महादेवाने त्रिपुरारी राक्षसाचा आजच्या दिवशी वध केला म्हणून आपल्या हिंदू धर्मात त्रिपुरारी पौर्णिमेला खूप महत्व आहे असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगून संपूर्ण भारतभर मंदिरामध्ये संध्याकाळी शुद्ध तुपाचे दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवाने दाही दिशा उजळून निघतात असे सांगितले. सर्व मुलांनी डोक्यावर रुमाल बांधून व मुलींनी ओढणी घेऊन प्रार्थना करून गुरुनानक जयंती सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात धार्मिकतेने आणि उत्साहाने साजरी केली गेली.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि दिव्यांची आरास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पुणे :  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजविण्यात आले. मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाच्या तब्बल ५२१ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्या सोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५२१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ चौक सभांना जनादर वाढत मिळतोय प्रचंड प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : विधानसभा  निवडणूक मतदान तारीख जवळ येत असतानाच रवींद्र चव्हाण यांचा त्यांच्या मतदारसंघात जनादर वाढतोय. डोंबिवली शहर भाजप महायुती राष्ट्रहिताच्या विचारांनी जोडले गेले आहेत. त्यामुळेच भाजप - महायुतीला डोंबिवलीकरांचा उदंड आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
डोंबिवली पश्चिम येथील सम्राट चौक येथे भाजप - महायुतीचे उमेदवार मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ चौक सभा पार पडली. त्या चौक सभेला देखील डोंबिवलीकरांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. "डोंबिवलीत कमळचं फुलणार" असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. येथील मतदार आपली संस्कृती, परंपरा कायम ठेवून इतिहास रचतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मतदानाचाही तारिख जसजशी जवळ येतेय तसा चव्हाण यांचा जनादर वाढत चालला आहे. अनेक संस्थांनी त्यांच्या समर्थनार्थ स्वतःहून पाठिंबा जाहीर केले आहेत.
भाजप भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव मिहिर देसाई, मितेश पेणकर, सिद्धार्थ शिरोडकर, भाजपा उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव ऍड. बिंदू दुबे, युवा सेना शहर पदाधिकारी राहुल म्हात्रे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनिल फळदेसाई, आरपीआय शहर अध्यक्ष किशोर मगरे, आरपीआय शहर सचिव समाधान तायडे, युवा सेना सचिव कौस्तुभ फडके, ओमकार खेर, शिवसेनेच्या रश्मीताई गव्हाणे आदी वक्त्यांनी यावेळी आपली मतं मांडली.

या चौक सभेला भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, उपाध्यक्ष हरीश जावकर, नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, पवन पाटील, समीर सुर्वे, कृष्णा पाटील, कृष्णा परुळेकर, मनीषा राणे, राहुल सकपाळ, शैलेश देशपांडे, स्वानंद भणगे, सीताराम कदम आदी भाजपा कार्यकर्ते तसेच संजय पावशे, राहुल म्हात्रे, सागर जेधे, कौस्तुभ फडके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

महाविकास आघाडी शिवसेना उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्या निवडणूक कार्यालयाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली - १४३ विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन दिनांक ११ सोमवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. डोंबिवलीतील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, स्थानिक विकास साधण्यासाठी, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात समाजसेवेचा एक नवा अध्याय सुरू करण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

शुभरंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपेश म्हात्रे यांचे वडील माजी महापौर श्री. पुंडलिक बाळू म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, जिल्हा संपर्क संघटिका मृणालताई ग्योश्वर, वैशाली राणे-दरेकर, राजु शिंदे, प्रकाश वाणी, कल्पना किरतकर, प्रकाश तेलगोटे, शहर प्रमुख अभिजित सावंत, आणि शहर संघटिका मंगलाताई सुळे यांसह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी दिपेश म्हात्रे यांच्या कार्याची प्रशंसा केली. दिपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील विकासाची आणि जनतेच्या समस्या सोडवण्याची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. त्यांच्या या मोहिमेला महाविकास आघाडीतील सर्व सदस्यांनी भरभरून पाठिंबा दर्शवला आहे.

उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख मुद्दे :-

स्थानिक समस्या सोडवणेः डोंबिवलीतील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, आणि सार्वजनिक सेवा यासारख्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाईल.

युवकांसाठी रोजगार संधीः स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व मार्गदर्शन करणे हे प्राथमिक उद्धिष्ट असेल.

सामाजिक उपक्रमः जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणे.

डोंबिवलीच्या विकासासाठी बांधिलकी: डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी ही शाखा सतत कार्यरत राहील.

महाविकास आघाडीचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी सांगितले, "या निवडणूक कार्यालयाद्वारे आम्ही डोंबिवलीकरांच्या सेवेसाठी वचनबद्ध आणि कटिबद्ध राहून नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांच्या विकासाला गती देणे हे आमचे मुख्य उद्धिष्ट आहे. सर्व डोंबिवलीकरांनी या कार्यालयाला भेट देऊन आपल्या अपेक्षा आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मी विनंती करतो." डोंबिवलीच्या विकासाची आणि जनतेच्या सेवेसाठी झोकून देण्याची ही नवी सुरुवात असून, या कार्यालयाच्या माध्यमातून सर्व स्तरांवरील जनतेला त्वरित सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.