BREAKING NEWS
latest

दुर्गाडी किल्ला मशीद नाही तर मंदिर असल्याचा कल्याण न्यायालयाचा निर्णय, पेढे वाटून हिंदू समाजात जल्लोष..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या माथ्यावर मशीद नसून मंदिर असल्याचा निर्णय कल्याण न्यायालयाने दिल्यानंतर येथील हिंदू जनतेने पेढे वाटून आनंद व्यक्त केल्याचे माजी मंत्री आणि डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. डोंबिवली जिमखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत हिंदु मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख आणि बजरंग दलचे पराग तेली या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
याशिवाय, रवींद्र चव्हाण म्हणाले की, १९७६ पासून शासनाच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल असलेल्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर असल्याचा निर्णय दिला होता, मात्र या निर्णयाविरोधात मुस्लिम समाजाने आंदोलन केले होते. खोटा दावा दाखल केला आणि ही जागा वक्फ बोर्डाची आहे असा अर्ज दाखल केला तेव्हा हे प्रकरण कल्याण न्यायालयात वर्ग करण्यात आले. वक्फ बोर्डाची रिक्त जागांबाबतची याचिका कल्याण न्यायालयाने फेटाळून लावली. गेली ४८ वर्षे येथील हिंदू तसेच दिवंगत आनंद दिघे व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने लढा देऊन न्यायाच्या प्रतिक्षेत होते. त्याबाबत आज कल्याण न्यायालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवत दुर्गाडी किल्ला हे मशीद नसून मंदिर असल्याचा निर्णय दिला आहे. या निकालामुळे येथील हिंदू समाजाने कल्याण न्यायालय आणि सरकारचे आभार मानले असून मलंगगडचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून हिंदू संघटना योग्य पद्धतीने लढा देतील, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
तत्पूर्वी शिवसेना नेते रवी पाटील, अरविंद मोरे, अरविंद पोटे यांच्यासह अनेक नेत्यांनी कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर उपस्थित राहून आनंद व्यक्त केला.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी घेतली आमदारकीची शपथ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीकडून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी विधानसभा सदस्यत्वाची  रविवारी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी आमदारकीची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून राजेश मोरे यांनी ईश्वर साक्ष शपथ घेत असे म्हणून शपथ घेतली. हाती घेत असलेले कार्य कर्तव्य निष्ठापूर्वक पार पडेन असेही शपथ घेतना सांगितले.
फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसाच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी काही विधानसभा सदस्यांना शपथ देण्यात आल्यानंतर उर्वरित विधानसभा सदस्यांना रविवारी सकाळपासून शपथ देण्यात आली. दुपारी १२ वाजता कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे यांनी मी राजेश वाळुबाई गोवर्धन मोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन म्हणत शपथ घेतली. मोरे यांनी शपथ घेण्यापूर्वी छ्त्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आपल्या आई वडिलांना वंदन करताना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि लाडक्या बहिणी यांच्या आशीर्वादामुळे कल्याण ग्रामीण मतदार संघातून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्याचे सांगत त्यांनी शपथविधी पूर्ण केला.

यानंतर पत्रकारांनी मोरे यांना आपण दोन बलाढ्य उमेदवारांचा पराभव करून विधानभवनात आलात आपणांस कसे वाटते अशी विचारणा केली असता मोरे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले, खूप आनंद होत आहे. लोकांनी काम करणाऱ्या त्यांच्या लाडक्या लोकप्रतिनिधीला विधानसभा सभागृहात पाठविले आहे. त्यांच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पूर्वीचा महानगरपालिका सभागृहातील काही अनुभव गाठीशी असला तरी आता आमदार म्हणून मोठी जबाबदारी आली आहे. लोकांची जास्त मागणी नसते पण ज्या खऱ्या गोष्टींची गरज आहे त्या ताबडतोब कशा देता येतील याचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावणार. कल्याण ग्रामीण मध्ये मुख्य प्रश्न पाण्याचा आहे त्यादृष्टीने कामे सुरूही आहेत पण ती लवकरात लवकर कशी होतील याकडे प्रथम लक्ष देणार. विधानसभेत लोकांच्या समस्या मांडताना त्या अभ्यासपूर्ण मांडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पहिल्यापासून कार्यकर्ता असल्याने पुढेही त्याच मार्गाने कामे करतांना आनंद वाटेल. लोकाशीर्वाद पाठीशी असल्याने काम करण्याचा उत्साह वाढेल असे सांगून सर्वांनी मला मदतीचा हात द्यावा असे सांगत त्यांच्यातील सामान्य कार्यकर्ता पुन्हा जागा झाला.

कर्जत-मुंबई दरम्यान सुरु होतोय नवीन रेल्वेमार्ग..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम वेगाने पुढे सरकत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा हिस्सा असलेल्या या प्रकल्पासाठी जवळपास २,७८२ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत ६७ टक्के पूर्ण झाले आहे.

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास निगम (एमआरविसी) कडे सोपवण्यात आले आहे. नवीन कॉरिडोरमुळे पनवेल आणि कर्जतच्या मध्ये फास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीचा कायापालट होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झाले असून वनक्षेत्रातील कामाला सुरुवात होणार आहे.

पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर एकूण ५ स्थानके असणार आहेत. पनवेल, चिखले, मोहापे, चौक आणि कर्जत स्थानकांत वेगाने काम सुरू आहे. प्लॅटफॉर्म, फुट ओव्हर ब्रिज आणि प्रशासकीय कार्यालये सारख्या सुविधांवर काम प्रगतिपथावर सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश हा नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यातील क्षेत्राला कर्जतपर्यंत जोडणे हा असून एमएमआरचा विस्तार करणे हा आहे. यामुळं मुंबई लोकलला एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. तसंच, पनवेल ते कर्जत दरम्यान असलेल्या परिसराचा विकास होण्यासही मदत मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे कर्जतहून थेट सीएसएमटी व्हाया पनवेल मार्गे जाता येणार आहे. कर्जतकडील प्रवाशांना पनवेलवरुन हार्बर मार्गाने मुंबई सीएसएमटी स्थानक गाठता येणार आहे. यामार्गामुळं प्रवाशांची २५ मिनिटांची बचत होणार आहे.

उपायुक्तांच्या परिमंडळ-३ पोलीस पथकाने गुटख्याच्या गोदमावर मारला छापा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत व बंदी असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलीस परिमंडळ-३ उपायुक्तांच्या पथकाने छापा टाकून सात लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन गुटखा माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपायुक्तांच्या पथकाने घटनास्थळावरून जहांगीर शेख नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तर मुनावर खान आणि जीशान खान फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले की, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पथकाला बंदी असलेल्या गुटख्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त पथकाने महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून ६ लाख ६८ हजार ५७० रुपयांचा गुटखा जप्त केला. सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गुटख्यांमध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारच्या गुटख्यांचा समावेश आहे.

पोलीस उपायुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यानंतर कल्याणच्या गुटखा माफियांमध्ये घबराट पसरली आहे. हे गुटखा माफिया भिवंडीतून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणतात, आणि कल्याण स्टेशनसह संपूर्ण शहरात पुरवठा करतात, असे सांगितले जाते. टाकलेल्या या छाप्यानंतर गुटखा माफियांमध्ये घबराट पसरली असून, अटकेच्या भीतीने ते शहरातून पळून गेले आहेत असे वर्तविण्यात येत आहे.

२० साव्या 'अखिल भारतीय आगरी महोत्सव' च्या दिनांक १० ते १७ डिसेंम्बर रोजी आयोजना निमित्त पत्रकार परिषद संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या 'आगरी युथ फोरम' या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन २००४ पासून "अखिल भारतीय आगरी महोत्सव" या समाज सोहळ्याचा आयोजनास सुरुवात केलेली आहे. कल्याण-डोंबिवलीकरच नाही तर ठाणे, रायगड, मुंबईवासिय सुद्धा आगरी महोत्सवची चातकासारखी वाट पाहत असतात. असा २० सावा अखिल भारतीय आगरी महोत्सव दिनांक १० ते १७ डिसेंबर २०२४ या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे.

या महोत्सवाचा उ‌द्घाटन सोहळा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते व समाजाचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर (माजी खासदार), जगन्नाथ पाटील (माजी उत्पादन शुल्क मंत्री), दशरथ पाटील (ज्येष्ठ सामाजिक नेते), कपिल पाटील (केंद्रीय पंचायतराज मंत्री), गणेश नाईक (आमदार व माजी मंत्री),  खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, खासदार संजय दिना पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५.००  वाजता संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव विधानसभा व लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात होत असल्याने सर्व लोकप्रतिनिधी हे महोत्सव कालावधीमध्ये आगरी महोत्सव ला शुभेच्छा भेट देणार आहेत.

अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे "एक आनंदाची पर्वणी" या आनंदाच्या पर्वणी मध्ये मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रचंड जनसागर उसळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महोत्सव मध्ये भेट देणाऱ्या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, खरेदीसाठी येणाऱ्यांना मनपसंत वस्तूच्या खरेदीचा आनंद घेता यावा, संगीत नृत्य प्रेमींना आगरी कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, खवय्यांना स्वादिष्ट आगरी कोळी खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारता यावा, बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पालकांनाही आकाश पाळण्यात बसून आकाशा एवढा आनंद घेता यावा, त्यांच्या आनंदामध्ये बाधा येऊ नये म्हणून महोत्सव समितीने अत्यंत नियोजनबद्ध अशी कार्यक्रमांची आखणी केलेली आहे.

'चूल आणि मूल' या संसार चक्रात अडकलेल्या आमची माताभगिनी आज संसार चक्र भेदून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे अशा महिला वर्गाच्या सन्मानार्थ महोत्सव मध्ये एक दिवस महिलांसाठी राखून ठेवलेला असून त्यादिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे. आगरी कोळी समाजातील लग्नसोहळे हे वैशिष्ट्यपूर्ण असेच असतात. या लग्न सोहळ्यामध्ये 'धवला' गायनाला विशेष महत्त्व असते. एखा‌द्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये पौराहित्य करणाऱ्या गुरुजींच्या वेदमंत्रांना जसं महत्त्व असते तेवढेच महत्त्व या लग्न सोहळ्यामधील धवल्याला असते, समाजामधील महिला या धवला गीतांचे मौखिकरित्या संवर्धन करत असते. अशा लग्न सोहळ्यामधील 'धवला' गाणाऱ्या लाडक्या बहिणीच्या मुलाखतीच्या कार्यक्रम 'धवला आगरी पौराहित्य' या शीर्षकाखाली आयोजीत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वसुधैव कुटुंबकम अध्यात्मक पिठामधील कैवल्यपाद माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुला मध्ये अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या वि‌द्यार्थ्यांचा टाळ मृदंगाच्या गजरात हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या हरिपाठाचे कार्यक्रमांमुळे आगरी महोत्सव परिसरातील वातावरण मंगलमय होणार आहे.

माणूस चाकोरीबद्ध जीवन जगत असताना त्याच्या धकाधकीच्या जीवनातून मनाला विसावा देण्याचे काम लोकगीतातून होत असते. म्हणूनच लोकगीत म्हणजे माणसाच्या मनाचा आरसा समजला जातो आगरी कोळी गीतांमध्ये हा भाव ठळकपणे दिसून येतो आगरी समाजामधे अनेक कवी गीतकार आहेत. त्यामध्ये गीतकार अनंत पाटील यांचं नाव अग्रभागी आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीत आणि स्वराची जोड मिळाल्याने ती अजरामर झालेले आहेत. असे गीतकार स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आगरी समाजातील प्रसिद्ध गायकांचा सहभाग असणाऱ्या आगरी कोळीगीतातील भाव सौंदर्य या मुलाखत पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये समाजातील प्रसिद्ध गायक श्री जगदीश पाटील, बिग बॉस फेम, दादूस संतोष चौधरी, गायक योगेश आग्रावकर, रॉक सिंगर सपना पाटील, बदामचा बादशहा सुजित पाटील यांचा सहभाग असणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत प्रसिद्ध निवेदक प्रतिक कोळी.

मराठी भाषेला अभिषेक दर्जा मिळावा ही गेल्या अनेक दशकापासून मराठी जनतेची मागणी होती. मराठी भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेने सर्व निकष पूर्ण केलेले असल्याने केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अभिजात दर्जा म्हणजे काय, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा कसा विकास घडून येणार आहे या संदर्भात सर्वसामान्य मराठी माणूस अनभिज्ञ आहे. ही सर्वसामान्य जणांची अनभिज्ञता दूर व्हावी, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने मराठी भाषा प्रांतातील साहित्यिकांचा सहभाग असलेल्या परिसंवादाचे आयोजन करण्याचे ठरवलेलं आहे. या परिसंवादामध्ये अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे मा. अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, ९१ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे उपस्थित राहणार असून त्यांच्याशी समन्वय साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र हुंजे.

यावर्षीच्या महोत्सवामध्ये वाचकांसाठी दर्जेदार विविध विषयांवरील लाखो पुस्तकांचा खजिनाच उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत भाषेतील पुस्तकांचा भरणा असणार आहे. या विज्ञान युगामध्ये माणसाचे जीवन अत्यंत धावपळीचे झालेले आहे. सत्ता संपतीच्या मागे धावत असताना त्याचे स्वतःच्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे त्यामुळे त्याला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा आजारांना बळी पडावे लागत आहे. अशा अनेक प्रकारच्या आजारांपासून आपली तब्येत कशी सांभाळावी. याबाबत माधवबाग स्वास्थ्य परिवारातील डॉक्टर प्रवीण घाडीगांवकर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

प्रबोधनात्मक कार्यक्रमांप्रमाणे लोकरंजन करण्यासाठी दररोज नवोदित हौशी कलाकार, शालेय विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पहावयास मिळणार आहेत त्याचप्रमाणे कलर्स मराठी वाहिनीवरील प्रक्षेपित होणारी लोकप्रिय मालिका "लय आवडते तू मला", "अशोक मामा" व "पिंगा ग पोरी पिंगा" या मालिकांमधील तसेच "मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी" या चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार महोत्सवामध्ये सदिच्छा भेट देणार असून प्रेक्षकांना त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधीही मिळणार आहे. त्याचप्रमाणे आगरी महोत्सवमधील "एक आनंदाच्या पर्वणी" मध्ये आपला आनंद ‌द्विगुणीत करण्यासाठी अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकाराची उपस्थिती लाभणार आहे.


सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले बी यु निक उर्फ निक यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ते तरुणांना स्फूर्तीदायी ठरणारे टॉक शो आगरी महोत्सवमध्ये करणार आहेत. महोत्सव साठी जगप्रसिद्ध नेपथ्यकार श्री संजय धबड़े व ओम साई डेकोरेटर्स हे नेपथ्याचे काम करणार आहेत. महोत्सव कालावधीमध्ये लकी ड्रॉ च्या माध्यमातून दररोज दोन लाडक्या बहिणींना पैठणीचा मान मिळणार आहे. तसेच आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी महोत्सव कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार यांची उपस्थिती ही मिळणार आहे त्याची घोषणा महोत्सव मंचावरून एक दिवस अगोदर करण्यात येईल. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमा आणि अग्निशमन याची चोख काळजी घेण्यात आली असल्याचे गुलाब वझे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

उच्च न्यायालयाचे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :  डोंबिवलीत पाच वर्षाच्या कालावधीत बांधकामधारकांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बनावट इमारत बांधकाम परवानगी कागदपत्रांच्या आधारे ६५ बेकायदा इमारती उभारल्या. या बेकायदा इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या इमारती अधिकृत असल्याचे दाखवून या इमारतींमधील सदनिका घर खरेदीदारांना विकल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे या इमारतींची उभारणी करून नागरिकांची फसवणूक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी या सर्व बेकायदा इमारती येत्या तीन महिन्याच्या कालावधीत तोडण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले आहेत.

रहिवासी फसवणूक

या बेकायदा इमारतींमध्ये रहिवास असल्याने या इमारती रहिवासमुक्त करण्यासाठी स्थानिक पोलीसांना आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ६५ बेकायदा इमारतींवर कारवाई करावी म्हणून वास्तुविशारद व याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. पालिका अधिकाऱ्यांकडून या बेकायदा बांधकामांविरुध्द कारवाई होत नसल्याने पाटील यांनी तीन वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या बेकायदा इमारतींची बनावट कागदपत्रे, महारेराचा नोंदणी क्रमांंक मिळवून उभारणी करण्यात आली होती. या बेकायदा इमारती अधिकृत असल्याचे दाखवून घर खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता होती. त्यामुळे या इमारतींंवर कारवाई करावी म्हणून पाटील पालिकेकडे पाठपुरावा करत होते. डोंबिवलीत बेकायदा बांधकामे निर्माणाधीन होत असताना याविषयची वृत्त प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी प्रसिध्द करून पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.

४८ इमारतींमध्ये रहिवास

पालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयात दिलेल्या सत्य प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे, ६५ इमारतींमधील पाच इमारती एमआयडीसी, एमएमआरडीए हद्दीत येतात. दोन बेकायदा इमारतींची व्दिनोंद आहे. उर्वरित ५८ इमारती पालिका हद्दीतील आहेत. त्यामधील ५७ इमारती अनधिकृत घोषित करण्याची कार्यवाही पालिकेने पूर्ण केली आहे. सहा इमारती भुईसपाट केल्या आहेत. चार इमारती अंशता तोडल्या आहेत. ४८ बेकायदा इमारतींमध्ये पूर्ण क्षमतेने रहिवास आहे.

न्यायालयाने स्थानिक पोलीस यंत्रणेला या बेकायदा इमारतींमधील रहिवासी बाहेर काढण्यासाठी पालिकेला पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश दिले आहेत. या बेकायदा इमारतींवर कारवाई होणार असल्याने सुमारे दीड ते दोन हजार कुटुंब बेघर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

६५ बेकायदा इमारतींमधील नऊ इमारतींवर कारवाई केली आहे. ४८ इमारतींमध्ये रहिवास आहे. या इमारतींमधील रहिवाशांना पोलीसांच्या साहाय्याने बाहेर काढून या इमारतींवरील कारवाईचे नियोजन केले जात आहे. यामधील काही नियमित करता येतील का, याचाही विचार करत आहोत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाईचे नियोजन सुरू आहे. – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.

न्यायालयाने डोंबिवलीतील ६५ इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे पालिका पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पाडेल. – ऍड. ए. एस. राव, कडोंमपा सल्लागार वकील.

पालिकेने वेळीच कारवाई केली असती तर ६५ इमारतीमधील रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली नसती. पुन्हा अशी बेकायदा बांधकामे उभी राहून नागरिकांची फसवणूक होऊ नये, त्यामुळे बांधकामधारकांना दणका बसण्यासाठी या बांधकामांवर कारवाई होणे आवश्यक आहे. – संदीप पाटील, याचिकाकर्ता व वास्तुविशारद, डोंबिवली.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, २२ राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील आणि ४० हजार नागरिकांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध ठिकाणी 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' असं लिहिण्यात आलं होतं.
दरम्यान, नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता.
शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असेपर्यंत हा सस्पेन्स कायम होता. मात्र भाजप नेते आणि शिवसेना आमदारांच्या मनधरणीला यश आलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते. तब्बल २२ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
या कार्यक्रमात संत-महंतांनी देखील हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेच उद्योगपती, क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करुन आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली. या नव्या पर्वात देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना, जलयुक्त शिवार योजना अशा महत्त्वाकांक्षी योजनांना नवं वळण देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार कसा मिळेल, राज्यातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईचं संकट कसं दूर होईल, शेतकऱ्यांना हवा तितका हमीभाव देण्यापासून मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणांच्या मुद्यांचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर यंदा असणार आहे.