BREAKING NEWS
latest

आश्वासने पूर्ण होणार, योजना बंद होणार नाहीत.. महाराष्ट्र आता थांबणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर :  राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १ जुलै २०२२ पासून ३ लाख ४८ हजार ७० कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून यामुळे २ लाख १३ हजार २६७ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात १० मोठ्या प्रकल्पांना आपण मंजूरी दिली असून यामध्ये २ लाख ३९ हजार ११७ कोटींची गुंतवणूक तर ७९ हजार ७२० इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विदर्भातील ४७ मोठ्या प्रकल्पात १ लाख २३ हजार ९३१ कोटींची गुंतवणूक होऊन ६१ हजार रोजगार निर्मिती, मराठवाड्यात ३८ प्रकल्पात ७४ हजार ६४६ कोटी गुंतवणूक व ४१ हजार ३२५ रोजगार निर्मिती आणि उर्वरित महाराष्ट्रात १३६ प्रकल्पात १ लाख ४९ हजार ४९३ कोटींची गुंतवणूक होऊन १ लाख १० हजार ५८८ रोजगार निर्मिती होत आहे. यामुळे महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर,जालना या ठिकाणी देखील उद्योगाचे जाळे विकसित होत आहे. राज्यात वसुलीबाजांना थारा दिला नाही तर राज्याच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. अशा वसुलीबाजांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा :

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा संविधानानुसार दिला. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी मिळणार आहे. तसेच विद्वानांना दोन पुरस्कार मिळणार आहेत. प्राचिन ग्रंथांचा अनुवाद करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांसह आपण आपली भाषा रूजविणार आहोत. आता न्यायालयाती निवाडे मराठीत उपलब्ध करण्यास सुरूवात होणार असल्याचेही मुख्यमंत्री  श्री.फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या अडिच वर्षात १६७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे २५.२१ लक्ष हेक्टर जमिन सिंचनाखील येणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे. वैनगंगा-नळगंगा, नारपार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे असे नदी जोडप्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत. यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला आहे. राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहत देण्यात असून यामुळे देखील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मेट्रो प्रकल्प गतीमान :

मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये मेट्रोच्या कामाला अधिक गती देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. मुंबईत मेट्रो टप्पा ३ चे काम अंतिम टप्प्यात असून बीकेसी ते कुलाबा ही नवीन लाईफ लाईन होणार आहे. १७ लाख प्रवाशी प्रवास करणार आहेत. मे २०२५ पर्यंत ही लाईन खुली होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांकडून वीज बील घेणार नाही :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही. ९ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आम्ही देणार असून ३ महिन्यात कनेक्शन देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०३० साली राज्यात ५२ टक्के उर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल असेही त्यांनी सांगितले.

वाढवण बंदर विकासाचे केंद्र : 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पालघर येथे ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर करण्यात येत आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं असून वाढवण बंदरामुळे अनेक फायदे होणार. राज्याच्या देशाच्या विकासात वाढवण बंदरचे मोठे योगदान राहणार  असून यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे आय टी पार्क : 

नाशिक येथे आय टी पार्क विकसित करण्यात असून या कामासाठी वास्तू विषारदाची  नेमणूक झाली आहे. लवकरच येथे अद्ययावतआयटी पार्क  निर्माण केला जाईल. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेने मोठ्या आत्मविश्वासाने जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करून राज्याला विकासात प्रथम क्रमाकांवर कायम ठेवूया.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट करताना सरकारच्या पुढील वाटचालीबाबत मनोदय अशा ओळीतून आपली भूमिकाच मांडली.

या ओळी पुढीलप्रमाणे..

महाराष्ट्र आता थांबणार नाही..

सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही..

उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही..

रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही..

विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही..

जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही..

पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही..

लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही..

असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही..

-- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'जाह्णवीज मल्टी फाउंडेशन'चे वंदे मातरम डिग्री कॉलेजचा १६ वा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली:  'जे एम एफ' शिक्षण संस्थेच्या ब्रह्मा रंगतालय प्रांगणात शनिवार दि.२१/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळात १६ वा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. सौ.प्रेरणा कोल्हे, कोषाध्यक्षा कु. जाह्णवी कोल्हे, संस्थेचे व्यवस्थापक श्री. कुमार दुपटे, प्राचार्य डॉ. आर.एन.नाडार, उपप्राचार्या डॉ. वनिता लोखंडे, मुख्य समन्वयक मंजुला धवले, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मृणाली जाधव, करिष्मा कापडणे, भावेश बोमेरा, धनीषा भांगळे, खुशबू दूबे  बक्षीस वितरण प्रमुख भारती गायकर, लक्ष्मी चव्हाण, आर.विजयालक्ष्मी, फॅशन शो प्रमुख विठ्ठल कोल्हे, राजकुमारी बांडे, ज्युनिअर कॉलेज प्रभारी प्राचार्य श्री. अल्पेश खोब्रागडे, उपप्राचार्य श्री. एकनाथ चौधरी, विद्यामंदिर उपप्राचार्या तेजावती कोटियन व इतर सर्व कर्मचारी वर्ग  उपस्थित होता.
कार्यक्रमाचा आरंभ नटराज आणि सरस्वती पूजनाने झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवलीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रशांत मोरे सो, डोंबिवलीतील नावाजलेले व्यक्तिमत्त्व श्री. दीपेश म्हात्रे,  दीपक पांडे, लाभले होते. दोघेही प्रमुख पाहुण्यांनी कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उत्कृष्ट कलाकार व टीव्ही फेम शान मिश्रा यांनीही उपस्थित राहून आपला बहुमूल्य वेळ दिला. तारुण्याचा उपयोग देश सेवेसाठी करावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आपली संगत कशी आहे व कशी असावी यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असते. आपली संगत जर चांगली असेल तर आपले व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. याकरिता त्यांनी आईन्स्टाईन आणि त्यांचे ड्रायव्हर यांचे उदाहरण सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात जवळजवळ २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यक्रमासाठी हजर होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रंगारंग कार्यक्रम करून विद्यार्थी व शिक्षकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश कांबळे सर व केसर थबे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम' ने झाली.

कुशल नेतृत्व,कर्तृत्व,वक्तृत्व यांचा सुरेख संगम अटलबिहारी वाजपेयी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कवी मनाचे, प्रखर राष्ट्रवादी अशी प्रतिमा असणारे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती. २५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एमए ची पदवी मिळवली. पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करता करता त्यांनी पत्रकारिताही केली. राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि वीर अर्जुन या नियतकालिकांसाठी त्यांनी पत्रकारिता केली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेऊन त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५१ साली जनसंघांची स्थापना केली. जनसंघाच्या स्थापनेत श्यामाप्रसाद मूखर्जी इतकाच अटलबिहारी वाजपेयी यांचाही वाटा आहे. 

१९५७ साली पहिल्यांदा ते जनसंघाच्या तिकिटावर लोकसभेत पोहचले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी लोकसभेत ठसा उमटवला. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आवर्जून लोकसभेत उपस्थित राहत. पंडित जवाहरलाल नेहरु अटलजींच्या वक्तृत्वाने मोहित झाले होते. अटलबिहारी वाजपेयी एकदिवस भारताचे पंतप्रधान बनतील असे भविष्य त्यांनी वर्तवले होते. अटलबिहारी वाजपेयी सलग ९ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. १९६८ साली ते जनसंघाचे अध्यक्ष बनले. पक्षाध्यक्ष या नात्याने जनसंघ घरोघरी पोहचवण्याचे काम त्यांनी केले. त्याचवेळी विरोधी पक्षाची भूमिकाही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे बजावली. १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. या आणीबाणीला त्यांनी प्रखर विरोध केला. आणीबाणीला विरोध केला म्हणून त्यांना दोन वर्षाचा कारावास भोगावा लागला. आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधी यांना पदावरुन हटवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. 

अटलबिहारी वाजपेयी यांनीही आपला जनसंघ हा पक्ष जनता पार्टीमध्ये विलीन केला. पण अवघ्या तीन वर्षात १९८० साली त्यांनी मुंबईत भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांनी इतर देशांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्रमंत्री म्हणून संयुक्त राष्ट्र संघात त्यांनी हिंदीतून भाषण केले. संयुक्त राष्ट्र संघात हिंदीतून भाषण करणारे ते पहिले नेते होते. १९९६ साली ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले पण लोकसभेत बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या तेरा दिवसांतच त्यांचे सरकार पडले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान बनले यावेळी मात्र त्यांचे सरकार तेरा महिने टिकले. पण या तेरा महिन्यात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता त्यांनी अणुस्फोट करून आपले सामाजिक व वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. ते पंतप्रधान असतानाच भारताने कारगिल युद्ध जिंकले होते. जय जवान,  जय किसान, जय विज्ञान ही घोषणा त्यांनी दिली. 

१९९९ साली तिसऱ्यांदा ते पंतप्रधान बनले. यावेळी मात्र त्यांचे सरकार पाच वर्ष टिकले. सलग पाच वर्ष पंतप्रधान राहिलेले ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते. अटलबिहारी वाजपेयी हे उत्कृष्ट कवी होते त्यांच्या सर्व कविता लोकप्रिय झाल्या त्यातील 'आओ फिरसे दिया जलाये'.. ही कविता लोकांना खूप आवडली. त्यांनी सुमारे ४० पुस्तकांचे लेखन केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना अनेकवेळा मिळाला. सरकारने त्यांना पद्मविभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व यांचा सुरेख संगम असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस ७२ तासाचे आत गुजरात येथुन २९,१५,३४०/- रूपये किंमतीच्या मुद्देमालासह केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे :  नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दित दिनांक १७/१२/२०२४ रोजी ०१:५० ते ०४.३० वाजण्याच्या दरम्यान 'मे. वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड' नावाचे ज्वेलर्स दुकान अनोळखी इसमांनी दुकानाचे मुख्य प्रवेशव्दाराचा कडी कोयंडा तोडुन तसेच शटर उचकटुन, वाकवुन त्यावाटे आतमध्ये प्रवेश करून २८,७७,४९०/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणुन नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ११८२/२०२४ भा.न्या.सं.कलम ३३१(२), ३०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.   

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यांचे सुचनेप्रमाणे मा.सहा.पोलीस आयुक्त शोध-१(गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री. शेखर बागडे यांनी विशेष पथके तयार केली होती. खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांचे मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाव्दारे तसेच गुप्तबातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपुर्व आरोपींचा  तपास करून आरोपी १) लिलाराम उर्फ निलेश मालाराम मेघवाल (वय: २९ वर्षे), काम आइस्क्रिम पार्लर, राहणार. छत्रपाल हनुमान मंदीराचे पाठीमागे, टपाल मंडपच्या समोर, गोपी तलाव रोड, नाडीयावाड, संग्रामपुरा, सुरत, मुळ राहणार. मु. पहारपुरा, पो. राणीवाडा, ता. भिनमाल, जि. जालोर, राजस्थान, २) चुन्नीलाल उर्फ सुमत शंकरलाल प्रजापती, (वय: ३५ वर्षे), काम मिस्त्रीकाम, राहणार. छत्रपाल हनुमान मंदीराचे पाठीमागे, टपाल मंडपच्या समोर, गोपी तलाव रोड, नाडीयावाड, संग्रामपुरा, सुरत, मुळ राहणार. मु.धणारी, पो.स्वरूपगंज, ता.पिंडवाडा, जि.सिरोई, राजस्थान, ३) जैसाराम उर्फ जेडी देवाराम कलबी, (वय: ३२ वर्षे), काम प्लंबर/इलेक्ट्रीशन, राहणार. गणेश टाॅवर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई, मुळ राहणार. जुंजाणी जालौर, राजस्थान, ४) दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया, (वय:२४ वर्षे), काम डायमंड मार्केट, राहणार. वराछा रोड, खोडीयारनगर सोसायटी चाळ, सुरत, गुजरात, मुळ राहणार. पहाडपुरा, पो.पावली, ता.जिसमपुरा, जि. जालौर, राजस्थान व ५) नागजीराम प्रतापजी मेघवाल (वय: २९ वर्षे), काम दुकानदार, राहणार. छत्रपाल हनुमान मंदीराचे पाठीमागे, टपाल मंडपच्या समोर, गोपी तलाव रोड, नाडीयावाड, संग्रामपुरा, सुरत, मुळ राहणार. मु. पहारपुरा, पो. राणीवाडा, ता. भिनमाल, जि. जालोर, राजस्थान यांना सुरत गुजरात राज्य येथुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साडे पाच किलो वजनाची चांदीची नाणी, भांडी व दागिने व इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल फोन व इतर वस्तु असा एकुण २९,१५,३४०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांना दि. २१/१२/३०२४ रोजी अटक केली असुन त्यांची दिनांक २६/१२/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे. 
              
आरोपींचा पुर्व इतिहास पाहता, त्यांचेवर १) कपोदरा पो.स्टे सुरत, गुजरात गु.र.नं. ११४/२०१८ भादंवि. कलम ४५४, ३८० प्रमाणे व २) जसवंतपुरा पो.स्टे. राजस्थान येथे गु.र.नं. ५६/२०१९, भादंवि. कलम ४५४, ३८० प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.आशुतोष डुंबरे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त श्री.अमरसिंह जाधव, मा. सहा.पोलीस आयुक्त शोध-२ (गुन्हे) श्री.राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहा.पोलीस आयुक्त शोध-१ (गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री.शेखर बागडे, पोनि. नरेंद्र पवार, संजय शिंदे, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, पोउपनिरी. विजयकुमार राठोड, सुभाष तावडेे, दिपक पाटील, संजय बाबर, संदिप भोसले, पोहवा. दिपक गडगे, राजाराम पाटील, आशिष ठाकुर, दादासाहेब पाटील, संजय राठोड, सचिन शिंपी, योगीराज कानडे, अभिजीत गायकवाड, मपोहवा.शीतल पावसकर, पोना. रविंद्र हासे, सुमित मधाळे, पोशि. तानाजी पाटील, संतोष वायकर, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे, योगेश क्षीरसागर, रोहन म्हात्रे, दत्तात्रय घोडके, मयुर शिरसाठ, चापोना. भगवान हिवरे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित, समतोल, सर्वांगिण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अधिवेशनात विविधांगी चर्चेच्या माध्यमातून १७ विधेयके मंजूर करण्यात आली असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरातील हिरवळीवर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासह शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या अधिवेशनात मांडलेल्या ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजना यापुढेही सुरु ठेवण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपत्ती बाधीत ५५ हजार संत्रा शेतकऱ्यांना १६५ कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. कापसाला बोनस देण्यात आला आहे. सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आली असून १२ जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरु राहणार आहे. बाजारात कापूस आणि तुरीचे खरेदी दर जास्त असल्याने शेतकरी आपला माल बाजारात विकत आहेत. विविध माध्यमांतून पिकांना सहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँकेबरोबर प्रकल्प करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला ०.७२ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी ३५८६ कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. ‘मित्रा’ संस्थेच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील गावांना काँक्रीट रस्त्याने जोडणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण, बांबू अभियान यासारख्या उपक्रमांना देखील आशियाई विकास बँक मदत करणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात सर्वासामान्य माणसांच्या आयुष्यात बदल घडविणारे अनेक निर्णय घेतले आहेत. आता आमची जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्यांच्या-मायभगिनींच्या प्रगतीसाठी, रक्षणासाठी यापुढेही एक टीम म्हणून काम केले जाणार आहे. या अधिवेशनात नागरिकांच्या, राज्याच्या चौफेर विकासाचा संकल्प करण्यात आल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले आहे.

या परिषदेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, संजय राठोड, आशिष जयस्वाल, नितेश राणे आदी उपस्थित होते.

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषींवर कारवाई करावी - आमदार राजेश मोरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण ग्रामीण मतदार संघातील आडीवली परिसरात इमारतीत खेळणाऱ्या एका ९ वर्षाच्या मुलीशी इमारतीत राहणाऱ्या पांडे नावाच्या इसमाने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बोलताना नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मानपाडा पोलीसांना दिल्या आहेत. 
आडीवली परिसरात एका इमारतीत रात्रीच्या सुमारास खेळत असलेल्या ९ वर्षांच्या मुलीला घरात ओढून घेत तिच्याशी लगट करणाऱ्या पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या या चिमुरडीच्या आई वडील आणि आजीला पांडे दांपत्याने शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे. याबाबतच्या सूचना मानपाडा पोलीसांना दिल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

'जेएमएफ' शिक्षण संस्थेचे जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेजचा ८ वा स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - 'जेएमएफ' शिक्षण संस्थेच्या ब्रम्हा रंगतालय मध्ये दिनांक २०.१२.२४  रोजी संध्याकाळी ५.०० वाजता जनगणमन विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज चा आठवा स्नेहसंमेलन कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला. संपूर्ण कार्यक्रम हा रंगारंग होता. या कार्यक्रमात जवळपास १२५  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात गायन, वादन, नाटक, सामूहिक नृत्य, महाराष्ट्राची संस्कृती आणि फॅशन शो अशा भरघोस कार्यक्रमांचा समावेश होता. प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद लाभला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवलीतील  विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.संजय पवार साहेब, रेगे दिक्षित सायन्स ऍकॅडमीचे श्री.शैलेश रेगे सर, स्टडी बझ ऍकॅडमीचे श्री.कैलास चव्हाण सर, मा.श्री.भोजराज सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नटराज व सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने होऊन स्वागत गीत व गणेश वंदन सादर करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे सचिव व प्राचार्या डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे, कोषाध्यक्षा कु.जाह्णवी राजकुमार कोल्हे. प्रभारी प्राचार्य श्री.अल्पेश खोब्रागडे सर उपप्राचार्य श्री. एकनाथ चौधरी सर विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.अमोद वैद्य सर उपमुख्याध्यापिका तेजावती कोटियन मॅडम  आणि संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. 
डॉ.प्रेरणा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये करिअर खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण घेत असतांना आपल्या करिअर कडे लक्ष देणे गरजेचे आहे. डॉ.राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की, आयुष्याचा आनंद घेतांना आपली कर्तव्य लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आकांक्षांची उंची गाठायची असेल तर नेहमी मेहनत करण्याची तयारी पाहिजे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनीही विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले.
विशेष बाब म्हणजे कल्याण डोंबिवली जिल्हा स्तरावर प्रविण्य मिळविणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू मानसी बोन्डे - बुद्धिबळ तृतीय, अथर्व सोनार-धावणे, लांब उडी द्वितीय आणि रिले प्रथम, रोहण नाईक-लांब उडी तृतीय, रिले प्रथम, श्रवण सोहनी रिले प्रथम, यश उपासणी रिले प्रथम, अनमोल मेस्त्री रिले प्रथम, गिरीश पवार कॅरम प्रथम, आयुष घाडी कॅरम सहावा आणि ध्रुव शिरसाठ तलवारबाजी मध्ये द्वितीय यांचा सत्कार करण्यात आला. शुभम, सनिता आणि रुपाली निषाद हे २०२४-२०२५ चे उत्कृष्ट विद्यार्थी म्हणजेच 'मिस्टर' आणि 'मिस' जन गण मन ज्युनिअर कॉलेज आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मित चव्हाण व शिरिया गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले. आभार प्रदर्शन सौ.निहारिका डायस यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.एन्जल उपाध्याय व कु.सान्वी वालणकर या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतल्याचे दिसून आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.