BREAKING NEWS
latest

नवनिर्वाचित आमदारासह माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत डोंबिवलीच्या प्रसिद्ध गणपती मंदिर सभागृहात झाला पत्रकार दिन साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०८:  प्रेस असोसिएशन कल्याण-डोंबिवली (रजि) आणि जेष्ठ पत्रकार बापू वैद्य यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत डोंबिवली येथील प्रसिद्ध फडके गणपती मंदिराच्या  विनायक सभागृहात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुमे म्हणून १४४ ग्रामीण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे उपस्थित होते.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, डोंबिवली 'ब' प्रभाग क्षेत्र अधिकारी हेमा मुंबारकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील यांच्यासह कल्याण प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णू कुमार चौधरी, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार अवधुत सावंत, इंडिया टिव्ही न्यूज कल्याण चे संपादक महादेव पंजाबी, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, प्रशांत जोशी, महावीर बडाला, शरद शहाणे, डोंबिवली पत्रकार संघाच्या खजिनदार सोनल पवार यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
४० वर्षाहून प्रदिर्घकाळ बापू वैद्य पत्रकारिता करत असून कल्याण-डोंबिवली येथील पत्रकारांना शासकीय कोट्यातीन हक्काचे घर मिळावे, या करिता त्यांचा संघर्ष मोठा असल्याचे सांगत शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी बापू वैद्य यांचे कौतुक केले. पत्रकारांच्या घराच्या मागणीसाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू असे आश्वासन मोरे यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक महेश पाटील यांनी सांगितले की पत्रकार हे समाजाला दिशा देण्याचे काम नेहमीच करत असतात. पत्रकारांच्या घराच्या विषयाबाबत आपण नेहमी महापालिकेशी पाठपुरावा करू असे सांगितले.
यावेळी उपस्थित पत्रकारांना पेन व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव किशोर पगारे (जय महाराष्ट्र न्यूज) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रेस असोसिएशन कल्याण-डोंबिबली (रजि) च्या सचिव सारिका शिंदे (संपादिका आपला भगवा/राजमुद्रा) यांनी विशेष मेहनत घेतली.

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे अंतर्गत परिमंडळ-३, कल्याण मध्ये मुददेमाल हस्तांतरण व 'सीएमआयएस' ऍप चे अनावरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण  दि.०८:  महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापनेचे औचित्य साधुन दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२५ दरम्यान 'पोलीस रेझिंग डे सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक ०८/०१/२०२५ रोजी १६.०० ते १९.०० वाजेच्या दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील साई नंदन हॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती, वल्लीपीर रोड, कल्याण पश्चिम येथे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने परिमंडळ-३, कल्याण अंतर्गत "मुददेमाल हस्तांतरण व सीएमआयएस ऍप चे अनावरण" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाची सुरुवात श्री.अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३, कल्याण यांच्या प्रास्ताविक भाषणाने होऊन त्यांनी उपस्थित असलेल्यांना 'रेझिंग डे' कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश समजावून सांगितला. तदनंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर  व श्री. संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी नागरिकांनी चोरी करणाऱ्यांपासून आपण कशी सावधगिरी बाळगली पाहिजे याबाबत उत्तम मार्गदर्शन केले.
कल्याण पोलीस परिमंडळ-३ क्षेत्रात येणाऱ्या महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळशेवाडी, खडकपाडा, डोंबिवली, विष्णूनगर, मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीला गेलेला एकूण १६२ लोकांना रुपये १,४३,३७,८१०/- असा सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. त्यात रुपये ६४,९५,८१०/- सोन्याचांदीचे दागिने, रुपये ४९,७१,०००/- वाहने, रुपये १५,९३,०००/- मोबाईल, रुपये १२,७८,०००/- रोख रक्कम असा तपशील असून नागरिकांकडून पोलीसांचे आभार व्यक्त केले जात आहे. तसेच पत्रकारांकडून देखील पोलीसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रसार माध्यमाद्वारे बातमी प्रसारित करण्यात येतात म्हणून उपस्थित पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम शांततेत पार पडला असून कार्यक्रमाचे ठिकाणी ५०० ते ५३० जनसमुदाय उपस्थित होता.

उल्हासनगरच्या परिवर्तनाचा नायक विकास ढाकने यांची डीसीएम ऑफिसमध्ये उपसचिव म्हणून नियुक्ती!

मुंबई: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उल्हासनगरसारख्या शहरांच्या पायाभूत विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि 'एक्शन मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयएएस अधिकारी विकास ढाकने यांना महाराष्ट्र सरकारने मोठी जबाबदारी देत उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या या नेमणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

२००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स केलेल्या ढाकने यांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासन क्षेत्रात मोठा ठसा उमटवला आहे. उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी शहराच्या विकासासाठी 'मिशन ५०' सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला, ज्याचा उद्देश शहराचा पायाभूत विकास वेगाने पुढे नेणे हा होता.

उल्हासनगरच्या आधी ढाकने यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथेही आपल्या प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. ते जिथे जातात तिथे परिवर्तन घडवणारे प्रशासक म्हणून ओळखले जातात. उल्हासनगरमध्ये त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना फक्त स्थानिक पातळीवर नव्हे, तर राज्यभर प्रशंसा मिळाली.

राज्य सरकारने ढाकने यांना डीसीएम कार्यालयात आणण्याचा निर्णय घेतला, जो महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि नवोन्मेषी दृष्टिकोनाचा उपयोग करून सरकार राज्यातील मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

विकास ढाकने यांच्या नियुक्तीने राज्यातील पायाभूत विकासाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडेल का? उल्हासनगरपासून पुण्यापर्यंत त्यांनी घडवलेले बदल आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसतील का? त्यांच्या नव्या भूमिकेबाबतची ही चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीमुळे त्यांच्याकडून अपेक्षा मोठ्या आहेत, आणि त्यांच्या नेत्यत्त्वाखाली राज्यात नवे बदल घडवण्याची संधी निर्माण झाली आहे.


दिल्ली विधानसभेवर झेंडा कोणाचा ?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : दिल्लीच्या शेजारी असलेल्या राज्यांप्रमाणेच दिल्लीतही आता कमळ फुलेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. भाजपाच केवळ दिल्लीला सर्वश्रेष्ठ राजधानीचा दर्जा देऊ शकते, दिल्लीला सुरक्षा, आरोग्य व विकास योजनांसाठी केंद्र सरकारने ७५ हजार कोटी रुपये दिले याची पंतप्रधानांनीच आठवण करून दिली आहे. दिल्ली हे शहरी विकासाचे जगातील आदर्श मॉडेल ठरले पाहिजे हा भाजपाचा प्रयत्न राहील. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असेल, तर दिल्लीच्या विकासाला डबल इंजिनचा लाभ मिळू शकतो.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांच्या लगत असलेल्या राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. यावेळी विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार, आम आदमी पक्षाचा, भाजपाचा की काँग्रेसचा या प्रश्नाने सर्वांचीच मती गुंग केली. दिल्ली विधानसभेसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. दि. ६ जानेवारीला दिल्ली विधानसभा क्षेत्रातील मतदारांची यादी प्रकाशित झाली तेव्हाच निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार हे स्पष्ट झाले. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीपर्यंत आहे. पण त्या अगोदर १८ फेब्रुवारीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार सेवानिवृत्त
होत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासूनच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली. विधानसभेच्या ७० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आप, भाजपा व काँग्रेस हे तीनही पक्ष सज्ज झालेत. या तीनही पक्षांनी आपल्या बहुसंख्य उमेदवारांच्या नावाचीही घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तीनही पक्षात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहिणी क्षेत्रातील जापानी पार्कमध्ये झालेल्या भाजपाच्या परिवर्तन मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर आम आदमी पक्षात चिंता वाढली आहे. पंतप्रधानांची एन्ट्रीच धमाकेदार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपाचा हुकुमी एक्का आहे. मोदींच्या करिष्म्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरियाणात चमत्कार घडवला. म्हणूनच दिल्लीतही हाच चमत्कार यंदाच्या निवडणुकीत आपचे वर्चस्व संपुष्टात आणणार का हा कळीचा मुद्दा आहे. आम आदमी पक्षाचा उल्लेख मोदींनी ‘आप’दा असा केल्याने आपच्या नेत्यांना फारच झोंबले आहे. मोदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजपाच्या परिवर्तन मेळाव्याला मिळालेला अफाट प्रतिसाद व लोकांचा जबर उत्साह बघता यंदा दिल्लीत जनतेला परिवर्तन हवे आहे हाच संदेश सर्वत्र गेला.

दिल्लीचा विकास केवळ भाजपाच करू शकेल, भारताला जगात तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्याच्या गौरवशाली यात्रेत दिल्लीकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. गेल्या दहा वर्षांतील दिल्लीतील आप सरकारचा कारभार घोटाळे व भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. हाच भाजपाचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. आप सरकार आप-दाहून कमी नाही अशी खिल्ली स्वत: पंतप्रधानांनीच उडवली आहे. शीशमहल या दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानावर सुशोभीकरणासाठी ३३ कोटी खर्च झाले, दिल्लीकरांच्या पैशाचीही उधळपट्टी आहे असा भाजपाने प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. दिल्लीच्या शेजारी असलेल्या राज्यांप्रमाणेच दिल्लीतही आता कमळ फुलेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. भाजपाच केवळ दिल्लीला सर्वश्रेष्ठ राजधानीचा दर्जा देऊ शकते. दिल्लीला सुरक्षा, आरोग्य व विकास योजनांसाठी केंद्र सरकारने ७५ हजार कोटी रुपये दिले याची पंतप्रधानांनीच आठवण करून दिली आहे. दिल्ली हे शहरी विकासाचे जगातील आदर्श मॉडेल ठरले पाहिजे हा भाजपाचा प्रयत्न राहील. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असेल तर दिल्लीच्या विकासाला डबल इंजिनचा लाभ मिळू शकतो.

दिल्ली मेट्रो ही दिल्लीच्या कानाकोपऱ्यांत भाजपानेच पोहोचवली आहे. नमो ट्रेन सेवा, राज मार्ग, फ्लायओव्हर, हे सर्व केंद्रानेच केले आहे. गरिबांसाठी पंतप्रधान निवारा योजना हे तर दिल्लीतील जनतेला वरदान ठरले आहे. रेवड्या वाटपाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही हे सर्व राजकीय पक्षांना ठाऊक झाले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा या तिन्ही राज्यांत भाजपाने रेवड्या वाटून सत्ता काबीज केली. यापासून सर्वच राजकीय पक्षांनी त्याचे अनुकरण सुरू केले. आम आदमी पक्षाचे संयोजक व संस्थापक अरविंद केजरीवाल व मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारची लाडकी बहीण योजना आपने अगोदरच ढापली व जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना पत्रकार परिषदेत रडू आवरले नाही. त्या म्हणाल्या-भाजपाचे नेता रमेश बिधुडी हे माझ्या ८० वर्षांच्या पित्याला अपशब्द बोलून अवमान करीत आहेत. राजकारण इतक्या गलिच्छ थराला जाईल याची मी कल्पनाही करू शकले नव्हते. माझे वडील आजारी आहेत, ते चालूही शकत नाहीत, ते शिक्षक होते. त्यांना अपशब्द बोलून रमेश बिधुडी मते मागत आहेत. विशेष म्हणजे बिधुडी हेच कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. बिधुडी हे त्यांच्या दोन वादग्रस्त वक्तव्यांनी घेरले गेले आहेत. एकदा ते म्हणाले, ‘मतदारसंघातील रस्ते आम्ही सत्तेवर आल्यावर प्रियांकाच्या गालासारखे बनवू’. दुसऱ्या वेळी ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री आतिशी यांनी आपले वडील बदलले का? त्या (आडनाव बदलून) मार्लेनाच्या सिंह झाल्या आहेत.

बिधुडी एका सभेत म्हणाले, लालूप्रसाद यादव यांनी आश्वासन दिले होते की, बिहारमधील रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे बनवू, पण ते करू शकले नाहीत. पण मी आश्वासन देतो की, कालकाजीमधील सारे रस्ते प्रियंकाच्या गालासारखे आम्ही बनवू….

आम आदमी पक्षातून भाजपामध्ये आलेल्या अनेकांना भाजपाने उमेदवारी दिली आहे, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून, मुख्यमंत्री आतिशी कालकाजीतून, सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाशमधून, तर सत्येंद्र जैन शकूर बस्तीमधून निवडणूक लढवत आहेत.

दिल्लीतील आप सरकारमधील तीन मोठ्या घटना म्हणजे १) केजरीवाल यांची १५६ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली. मद्य धोरणात घोटाळा झाल्याच्या आरोपावरून केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्याविरोधात ईडी व सीबीआय दोन्ही यंत्रणांनी कोर्टात केस केली होती. ईडी व सीबीआय दोन्ही चौकशांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. २) जेलमधून बाहेर आल्यावर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून आतिशी मुख्यमंत्री झाल्या. मुख्यमंत्री बदलला म्हणून आपवरील डाग पुसला जाणार नाही, अशी टीका भाजपाने केली. ३) आतिशी या दिल्लीच्या ९ व्या मुख्यमंत्री झाल्या. शपथ घेतल्यानंतर त्यांनी केजरीवाल यांना चरणस्पर्श केला. ४३ वर्षांच्या आतिशी या दिल्लीच्या सर्वात युवा मुख्यमंत्री बनल्या. केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते ४५ वर्षांचे होते. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आता आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत.

पाच वर्षांपूर्वी म्हणजे सन २०२० मध्ये दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले व ११ फेब्रुवारीला निकाल घोषित झाले होते. या निवडणुकीत आपला ५३.५७ टक्के मते मिळाली व आपचे ६२ आमदार निवडून आले होते. भाजपाला ३८.५१ टक्के मते मिळाली व ८ आमदार विजयी झाले. काँग्रेसला केवळ ४.२६ टक्के मते पडली, पण काँग्रेसला साधे खातेही खोलता आले नाही. सन २०१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नव्हता. आम आदमी पक्षाला आता चौथ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज करणे यंदा महाकठीण आहे. आपला २०१३ मध्ये पहिल्यांदा सत्ता मिळाली. पण सरकार दीड वर्षांतच कोसळले. काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित व त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून २०१५ मध्ये आपने दिल्लीवर पुन्हा सत्ता मिळवली. गेली दहा वर्षे सलग दिल्लीत आपचे सरकार आहे. २०१३ मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून केजरीवाल यांचे नेतृत्व पुढे आले. स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. आता भाजपाने केजरीवाल यांना भ्रष्टाचाराने बरबटलेला नेता म्हणून खलनायक ठरवले. मद्यविक्री घोटाळ्यावरून अरविंद केजरीवाल, संजय सिंह व मनीष सिसोदिया हे सर्व आपचे दिग्गज नेते जेल रिटर्न आहेत. भ्रष्ट कारभारावरून भाजपाने आपची कोंडी केली आहे. यंदा दिल्ली विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार याची देशभर उत्सुकता आहे.

तर, नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही - अपर पोलीस आयुक्त संजय जाधव

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभांवर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला आहे. प्रशासन आणि पत्रकारांनी हातात हात घालून काम केल्यास नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी येथे केले.
कल्याण पश्चिमेकडील स्वामी नारायण सभागृह येथे प्रेस क्लब, कल्याण च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार हा बातमीमध्ये विविध विश्लेषण वापरण्या बरोबरच त्याबाबतचे संदर्भ आणि अन्य माहिती गोळा करून मांडत असतो. अशा प्रकारची पत्रकारिता करणे सोपे काम नाही. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या स्पर्धेत प्रिंट मिडियाने आपले वेगळेपण जपले आहे. स्पर्धेच्या या युगात पत्रकारांनी आपले काम करताना आपल्या तब्येतीची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पत्रकारांनी सुशासन तयार करणे आवश्यक आहे ते करत असताना आपल्यावरचा ताण कमी कसा होईल आणि आपले आरोग्य सुरक्षित कसे राहील याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचा सल्ला यावेळी जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना दिला.
पत्रकारांच्या बातमी मागे असलेल्या कष्टाचा कोणी विचार करत नाही. पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्यादेखील वाचक म्हणून आपण जाणल्या पाहिजेत, पत्रकारांच्या समस्यांबाबत कोणी आवाज उठवत नाही. ते देखील आपल्यासाखीच माणसेच आहेत, आपणही त्यांच्याकडे त्या भावनेने बघणे आवश्यक असल्याचे मत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी व्यक्त केले.
मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रम प्रेस क्लब राबवत आहे त्यामागची त्यांची भावना महत्वाची असल्याचे मत लोकमतचे मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सध्याच्या पत्रकारितेमध्ये अनेक नवीन नवीन आव्हानांना पत्रकारांना सामोरे जावे लागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये सध्या वाढ होत आहे. या माध्यमातून चांगल्या बातम्या मिळायला लागल्या तर पत्रकारांची गरज भासणार नाही. त्यामुळे आपल्याला आपली गरज निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपली लिखाणशैली विकसित करण्यावर भर देणे ही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या बातम्यांमधून आपण वेगळे काय देणार हे महत्वाचे असण्याबरोबरच आपली एक तरी बातमी इतरांपेक्षा वेगळी असावी यासाठी प्रयत्न करायला हवा.
यावेळी, केडीएमसीच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, प्रेस क्लबचे सचिव अतुल फडके यांच्यासह प्रेस क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विविध वृत्तपत्र , वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना विष्णुकुमार चौधरी, यांनी सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले तर प्रदीप जगताप यांनी आभार मानले.

कोकण महोत्सवाचा समारोप आणि अविनाश भागवत यांचा वाढदिवस – सोनेरी नथ आणि पैठणी जिंकण्याची संधी!

संदिप कसालकर

मुंबई, अंधेरी पूर्व: कोकणी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आणि हजारो नागरिकांच्या मनाला आनंद देणाऱ्या कोकण महोत्सवाचा भव्य समारोप आणि वॉर्ड 81 अध्यक्ष अविनाश भागवत यांचा वाढदिवस येत्या 7 जानेवारी 2024 रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शेरे पंजाब बीएमसी मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

कोकण महोत्सवाची वैशिष्ट्ये:

कोकण महोत्सवाने अंधेरी पूर्व परिसरातील नागरिकांना कोकणी खाद्यसंस्कृती, पारंपरिक गाणी, वेशभूषा आणि विविध कला सादरीकरणांचा अनुभव दिला आहे. या महोत्सवाचा समारोपही तितक्याच थाटामाटात होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायं 7 वाजता होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मुरजी पटेल (काका) उपस्थित राहणार आहेत.

अविनाश भागवत यांचा वाढदिवस साजरा:

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात, वॉर्ड 81 चे अध्यक्ष अविनाश भागवत यांचा वाढदिवस विशेष समारंभाने साजरा करण्यात येणार आहे. सायं 8 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. भागवत यांनी वॉर्ड 81 च्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा कार्यक्रम त्यांना सन्मानपूर्वक अर्पण केला जाणार आहे.

महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा:

कोकण महोत्सवाच्या समारोपाचा विशेष भाग म्हणजे महिलांसाठी आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा. या स्पर्धेत महिलांना विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

आकर्षक पारितोषिके:

  • विजेत्या तीन महिलांना पैठणी साडी देण्यात येणार आहे.
  • 1 विशेष विजेत्या महिलेसाठी सोन्याची नथ असेल.

पुरुषांसाठी लकी ड्रॉ:

  • पुरुषांसाठीदेखील एक विशेष लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये 3 भाग्यवान विजेत्यांना ‘नेता’ खादी शर्ट प्रदान करण्यात येईल.

कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा कार्यक्रम:

या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे कोकण महोत्सवाने यशस्वी भरारी घेतली आहे, आणि या समारोप सोहळ्याला त्यांचा मोठा पाठिंबा अपेक्षित आहे.

आयोजक मंडळ:

  • या भव्य सोहळ्याचे आयोजन पुढील प्रमुखांनी केले आहे:
  • शेखर तावडे: अंधेरी पूर्व विधानसभा महामंत्री
  • अमित मातोंडकर: शाखाप्रमुख 79
  • अविनाश भागवत: वॉर्ड अध्यक्ष 81
  • महेश शिंदे: शाखाप्रमुख 81

स्थळ आणि वेळ:

  • स्थळ: बीएमसी मैदान, शेरे पंजाब, अंधेरी पूर्व
  • वेळ: कोकण महोत्सव समारोप – सायं 7 वाजता
  • अविनाश भागवत यांचा वाढदिवस समारंभ – सायं 8 वाजता

कोकणची संस्कृती, परंपरा आणि एकतेचा आनंद साजरा करणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभागी होण्यासाठी सर्व नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपूर्ण कुटुंबासाठी हा एक संस्मरणीय सोहळा ठरणार आहे!


कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चा उद्घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : २ जानेवारी २०२५ रोजी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण (आरटीओ) च्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लूकर यांनी भूषवले. तर रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अपघातग्रस्तांना दोन मिनिटे स्तब्ध होऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मोटार वाहन निरीक्षक अनिल धात्रक यांनी प्रास्ताविक भाषण केले आणि नागरिकांना रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश कल्लूकर यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अंतर्गत होणाऱ्या अपघातांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी अपघात होण्याची कारणे आणि त्यावर योग्य उपाययोजना काय आहेत, यावर चर्चा केली. सदर रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या माध्यमातून जनजागृती करत, अपघातमुक्त रस्ते आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मोटार वाहन निरीक्षक इंद्रजीत आमते यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गावडे, मोटार वाहन निरीक्षक सचिन आयरेकर,अनिल धात्रक, आणि इंद्रजीत आमते, कल्याण वाहतूक विभागाचे एएसआय आकाश चव्हाण, मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालक-मालक आणि कर्मचारी, डीलरचे प्रतिनिधी, एनजीओ सदस्य व नागरिक उपस्थित होते.