BREAKING NEWS
latest

श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.०२ : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व 'द अमॅच्युअर खो-खो असोसिएशन ठाणे' यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मावळी मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या क्रीडांगणात प्रथमच विभागीय (राज्यस्तरीय) पुरुष आणि महिलांचे भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महिला गटात 'ज्ञानविकास फॉउंडेशन' संघ (ठाणे) व पुरुष गटात 'विहंग क्रीडा केंद्र' (ठाणे) यांनी अंतिम विजेतेपद पटकावले. महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या 'ज्ञानविकास फॉउंडेशन' संघाने ठाण्याच्या 'रा.फ.नाईक' संघावर  १०-०८ असा १:१० मिनिटे राखून २ गुणांनी विजय मिळविला. ज्ञानविकास फॉउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून संरक्षण घेतले.  मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाकडे  ०५-०५ असे समसमान गुण होते. ज्ञानविकास फॉउंडेशन संघाच्या धनश्री कंक (२:४०, ३:२० मि. संरक्षण व २ गुण), दिव्या गायकवाड (२:२० मि. व ३ गुण) व रोशनी जुनघरे (१:४०, २:२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पराभूत रा.फ.नाईक संघाकडून श्वेता जाधव (१:१० मि. संरक्षण व ३ गुण), रुपाली बडे (२:४०, १:४० मि. संरक्षण) व गीतांजली नरसाळे (१:३०, ०३:५० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करीत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला पण त्या यशस्वी ठरल्या नाहीत.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या विहंग क्रीडा केंद्रने मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघावर १५-१० असा ०५ गुणांनी विजय मिळविला. विहंगने नाणेफेक जिंकून संरक्षणाची निवड केली. मध्यंतरापर्यंत विहंगने आक्रमक खेळ करीत ०८-०४ अशी ०४ गुणांची आघाडी घेतली. विहंगच्या आशिष गौतम (१:५०, १:५० मि. संरक्षण व ३ गुण), आकाश तोगरे (२:४०, २:३० मि. संरक्षण), लक्ष्मण गवस (२:०० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर, शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स ऍकॅडेमीच्या रामचंद्र झोरे (२, २ मि. संरक्षण व १ गुण), धीरज भावे (१, १.४० मि. संरक्षण व २ गुण) व प्रतीक देवरे (१:१०, १:५० मि. संरक्षण)  यांनी पराभवात सुध्दा जोरदार खेळ केला.   

स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरणाचा समारंभ प्रमुख पाहुणे मा. उमेश साळवी (सेवानिवृत्त न्यायाधीश - मुंबई उच्च न्यायालय) यांच्या शुभहस्ते झाला. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, चिटणीस रमण गोरे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील, खजिनदार रिक्सन फर्नांडीस, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विश्वस्त रवींद्र आंग्रे, विशवस्त केशव मुकणे हे उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सहकार्यवाह व स्पर्धा निरीक्षक बाळासाहेब (बाळ) तोरसकर, 'द अमचुयर खो-खो असोसिएशन ऑफ ठाणे'चे कमलाकर कोळी (उपाध्यक्ष), मंदार कोळी (चिटणीस), नरेंद्र कुंदर (चिटणीस-उपनगर) संदेश आंब्रे इ. उपस्थित होते.      

स्पर्धेतील पारितोषिके :
महिला गट / पुरुष गट

अंतिम विजेता : 
ज्ञानविकास फॉउंडेशन संघ (ठाणे),
विहंग क्रीडा केंद्र (ठाणे)

अंतिम उपविजेता :
रा.फ.नाईक संघ (ठाणे), 
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो.ऍकॅडेमी (उपनगर)

तृतीय क्रमांक :
 शिवभक्त स्पोर्ट्स क्लब (ठाणे),
सरस्वती क्रीडा केंद्र (मुंबई शहर)

चतुर्थ क्रमांक :
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. ऍकॅडेमी (उपनगर)
ग्रिफिन जिमखाना (ठाणे)  

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
महिला गट / पुरुष गट

उत्कृष्ट संरक्षक :
दिव्या गायकवाड (ज्ञानविकास),
रामचंद्र झोरे (शिर्सेकर्स महात्मा गांधी)

उत्कृष्ट आक्रमक :
श्वेता जाधव (रा.फ.नाईक)
आशिष गौतम (विहंग)

अष्टपैलू खेळाडू :
धनश्री कंक (ज्ञानविकास)
आकाश तोगरे (विहंग)

कल्याण-डोंबिवली महापालिकेची रु. २५,०००/- दंड आकारत १२० किलो प्रतिबंधित प्लास्टिक साठ्यावर धडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : आज महापालिकेच्या अधिकाऱी वर्गानी ३/क प्रभाग परिसरातील दुकानांची पाहणी केली असता, या पाहणी दरम्यान 'किरण स्टोअर' या होलसेल दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साठा आढळून आला. दुकानात सुमारे १२० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याने संबंधित दुकानदारावर रुपये २५,०००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेने यापूर्वीही अशी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे.

सदर कारवाई महापालिका परिमंडळ-१ चे उपआयुक्त प्रसाद बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली ३/क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात, अधिक्षक उमेश यमगर, स्वच्छता निरीक्षक जगन्नाथ वड्डे यांच्या पथकाने केली.

महापालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने उपाययोजना राबविण्यात येत असून, अनधिकृतरित्या प्लास्टिक साठवणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

भारतीय अंतराळवीर अवकाशात करणार योगाभ्यास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : ईसरो यावर्षी पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीर पाठविणार आहे. या अवकाश मोहिमेतील स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाचे सारथ्य करणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर योगाभ्यास करणार आहेत. तसेच अवकाश तळावर ते आपल्या सहकाऱ्यांना भारतीय पद्धतीचे भोजनही देणार आहेत. या मोहिमेवर कॅप्टन शुक्ला यांच्यासह पोलंडचे स्लावोस्झ उझनान्स्की-व्हिस्नीव्हस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे अंतराळवीर असणार आहेत. मोहिमेचे नेतृत्व पेगी व्हिटसन करणार आहेत.

एक्सियम - ४ नावाची ही मोहीम ईसरोची अंतराळात मानवाला पाठविणारी पहिलीच मोहीम आहे. यावर्षी हिवाळ्यानंतर ही मोहीम ईसरो हाती घेणार आहे. अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन यानाच्या साह्याने या मोहिमेवर कॅप्टन शुक्ला आणि त्यांचे सहकारी यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर पाठविले जाणार आहेत. 

या अवकाश सफरीबद्दल बोलताना कॅप्टन शुक्ला म्हणाले की, या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार आहे. अवकाश तळावर मी योगाभ्यास करणार आहे. तसेच सहकाऱ्यांना भारतीय पध्दतीचे जेवणही देणार आहे. मी जरी एकटा अंतराळात जात असलो तरी दीड अब्ज भारतीयांची ही सफर आहे. अवकाशातून माझ्या डोळ्यांनी मी जे पाहीन ते कॅमेऱ्यात कैद करून तमाम देशवासियांशी शेअर करणार आहे. विंग कमांडर राकेश शर्मा यांनी १९८४ साली अवकाशाची सफर केली होती. ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले. आता त्यांच्यानंतर ही दुर्मिळ संधी कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना मिळणार आहे.

सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आनंदाचा वर्षाव!

संदिप कसालकर (वार्ताहर)

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025 – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेतील अधिवेशनात 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश वेगवान आर्थिक विकास, सर्वसमावेशक प्रगती आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना अधिक बळकट करणे आहे.

या अर्थसंकल्पात कृषी, एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग), गुंतवणूक आणि निर्यात हे चार प्रमुख क्षेत्र "विकासाचे चार इंजिन" म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

प्रमुख ठळक बाबी:

1. कृषी क्षेत्रातील सुधारणा:

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना: कमी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी सुरू करण्यात येणार.

दलहन आत्मनिर्भरता मिशन: तूर, उडद आणि मसूर उत्पादन वाढीसाठी 6 वर्षांची योजना.

मखाना मंडळ (बिहारमध्ये): मखाना उत्पादन, प्रक्रिया आणि विपणनाला चालना देण्यासाठी स्थापन.

किसान क्रेडिट कार्ड (KCC): कर्ज मर्यादा ₹3 लाख वरून ₹5 लाख पर्यंत वाढवली.

2. एमएसएमई क्षेत्राला चालना:

एमएसएमईसाठी गुंतवणूक आणि वार्षिक उलाढाल मर्यादा दुप्पट करण्यात आली.

क्रेडिट गॅरंटी योजना: ₹10 कोटींपर्यंतच्या कर्जांसाठी गॅरंटी कवर वाढवले.

महिला व अनुसूचित जाती-जमातींच्या उद्योजकांसाठी नवीन योजना: 5 लाख नव्या उद्योजकांसाठी ₹2 कोटींच्या टर्म लोनची तरतूद.

3. गुंतवणूक व नवोपक्रमावर भर:

सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0: 8 कोटी मुलांना आणि 1 कोटी गर्भवती महिलांना पोषणाची मदत.

अटल टिंकरिंग लॅब्स: 50,000 सरकारी शाळांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रयोगशाळा.

कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र (AI): शिक्षण क्षेत्रातील सुधारांसाठी 500 कोटींचा निधी.

4. निर्यात वृद्धीसाठी महत्त्वाचे उपाय:

निर्यात प्रोत्साहन मिशन: निर्यात वाढीसाठी विविध मंत्रालयांच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार.

भारत ट्रेडनेट: आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डिजिटल पायाभूत सुविधा.


करसुधारणा (Tax Reforms):

व्यक्तिगत उत्पन्न कर सवलत: ₹12 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्ती, तर नोकरदारांसाठी ही मर्यादा ₹12.75 लाख.

नवीन कर स्लॅब:

₹0-4 लाख: करमुक्त

₹4-8 लाख: 5%

₹8-12 लाख: 10%

₹12-16 लाख: 15%

₹16-20 लाख: 20%

₹20 लाख व त्याहून अधिक: 30%


इतर महत्त्वाच्या घोषणा:

जल जीवन मिशन: 2028 पर्यंत 100% ग्रामीण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट.

परमाणू ऊर्जा मिशन: 2047 पर्यंत 100 गीगावॅट परमाणू ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य.

शहरी विकासासाठी चॅलेंज फंड: ₹1 लाख कोटींच्या निधीसह शहरी सुधारणा.

अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक: उपग्रह प्रक्षेपण आणि संशोधनासाठी विशेष प्रोत्साहन.


निष्कर्ष:

वित्तमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प "विकसित भारत" या दीर्घकालीन दृष्टिकोनावर आधारित असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, शेतकरी, महिला आणि युवा वर्गासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पामुळे आर्थिक स्थिरता, गुंतवणूक वाढ, आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

आमदार राजेश मोरे यांच्या प्रयत्नांनी अखेर रुणवाल-माय सिटी वसाहतीसाठी पालिकेची परिवाहन सेवा सुरु..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात मोठंमोठी संकुले उभी राहत आहेत. विस्तीर्ण अशा संकुलात शाळा, क्रीडांगण, मनोरंजन याबरोबरच हॉस्पिटल व मंदिरे अशा सामाजिक व्यवस्था विकासक देत आहेत. परिणामी अशा संकुलात लोकसंख्या वाढत आहे. असे असले तरी त्यामानाने परिवहन सेवा समस्या त्रासदायक ठरत आहे. खाजगी परिवहन सेवा महागडी होत आहे. याचविषयी संबंधित लोकांनी कल्याणडोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा मिळावी अशी मागणी केली होती. मात्र गेले दोन-तीन वर्षांपासून येथील लोक अशा सेवेसाठी वाट पाहत होते. अखेर  कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी या विषयाची आश्वासनपूर्ती केल्याने अखेर रुणवाल-माय सिटी वसाहतीसाठी पालिकेची परिवहन सेवा अखेरसुरू झाली.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील रुणवाल गार्डन, माय सीटी येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवा अंतर्गत बस सेवा सुरू करा अशी मागणी रुणवाल गार्डन वसाहतीतील नागरिकांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याकडे केली होती. याविषयी आमदार मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा विषय लावून धरला. त्याचबरोबर पालिका आयुक्तांना याविषयी पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळेच हा विषय मार्गी लागून या विभागात पालिका परिवहन उपक्रमाची बस सेवा शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी पासून रुणवाल गार्डन व माय सीटी ते डोंबिवली अशी बस सेवा सुरू करण्यात आली.

कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, दत्ता वझे, दिनेश शिवलकर, विकी हिंगे, बांधकाम कामगारांसाठी झटणारे लक्ष्मण मिसाळ, अवनी शर्मा, परिवहन उपक्रमाचे मार्ग तपासणीस शालिक टावरे, राजेंद्र पातकर आदींनी श्रीफळ वाढवून बस सेवेवा शुभारंभ केला. सध्या डोंबिवलीतील या विभागात जाण्यासाठी एका माणसाला रिक्षातून प्रवास करतांना एक वेळेला कमीतकमी ४० रुपये भाडे मोजावे लागत असूनही रिक्षा मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे ही समस्या जेष्ठ नागरिक, महिलावर्गाला अतिशय त्रासदायक ठरत आहे. यामुळेच पालिका परिवहन उपक्रमाची बस सेवा सुरू करावी अशी मागणी सतत तेथील लोक करीत होते.

'डावखर फाउंडेशन' आयोजित १९३ देशांच्या ग्लोबल करन्सी नोट्स, पोस्टल स्टॅम्प, आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धेत ५३ शाळेतील ३० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग..

                       
प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३० : डोंबिवलीतील डावखर फाउंडेशन आयोजित आंतरशालेय 'विज्ञान प्रदर्शन व पोस्टर स्पर्धेत' विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील अंगीकृत कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण-डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन २९ व ३० जानेवारी २०२५ रोजी रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत पार पडले. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते. तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर्षी १९३ देशांच्या करन्सी नोट्स आणि पोस्टल स्टॅम्प चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले असून या वर्षी ५३ शाळा सहभागी झाल्या होत्या तर ९८ प्रोजेक्ट मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक, अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले. 
इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा २ गटामध्ये स्पर्धा झाली आणि रुपये १.५० लाखाची रोख बक्षीस विजेत्यांना देण्यात आली. विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पुनर्वापर, आधुनिक भौतिक व रसायन शास्त्र, आधुनिक जीवनशैली व त्याचे फायदे तोटे, आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडल्स, पवन ऊर्जा व त्याचा वापर आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी श्री रतनजी टाटा व त्यांचा तेजस्वी जीवन प्रवास, पॅरालिम्पिक मधील भारताचा प्रवास, सामाजिक न्याय, भारताची सांस्कृतिक विविधता असे विविध विषय देण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात ५ वी ते ७ वी गटात 'ओमकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी' आणि 'टिळक नगर विद्यामंदिर' प्रथम क्रमांक विभागून तर 'नूतन ज्ञान मंदिर' आणि 'चंद्रकांत पाटकर विद्यालय'' यांना द्वितीय विभागून आणि 'डॉन बॉस्को' यांना तृतीय तर उत्तेजनार्थ 'सेंट जॉन हायस्कूल' तसेच ८ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक विभागून 'कोतकर विद्यालय' आणि 'साई इंग्लिश स्कूल' यांना देण्यात आला. तर द्वितीय 'मंजुनाथ विद्यालय' आणि 'श्री चैतन्य टेक्नो स्कूल' विभागून आणि तृतीय 'सिस्टर निवेदिता स्कूल' तर उत्तेजनार्थ 'मातोश्री विद्यालय' व 'गायत्री विद्यालय' यांना देण्यात आला. पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे ५ वी ते ७ वी गटात 'अचीवर हायस्कूल', 'सेंट जॉन हायस्कूल', 'बी.आर मडवी स्कूल' यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि ८ वी ते १० वी गटात 'साई इंग्लिश स्कूल', 'बी.टी गायकवाड स्कूल', 'सिस्टर निवेदिता स्कूल' यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून ५ वी  ते ७ वी गटात टीळक नगर शाळेची राधिका वैद्य, शंकरा विद्यालय ची स्वरा तर्वे तर ८ वी ते १० वी गटात प्राची झा, श्री चैतन्य स्कूल आणि कृष्णा जाधव, सेंट जॉन स्कूल यांना पुरस्कार मिळाला आहे.
या प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरले इंडोनेशिया देशाच्या नोटेवर गणपतीची प्रतिमा आणि कंबोडिया देशाच्या नोटेवर गौतम बुद्ध यांची प्रतिमा तर दीडशे देशांच्या पोस्टल स्टॅम्पवर महात्मा गांधी यांची प्रतिमा होती असे डावखर फाउंडेशन चे आयोजक श्री.संतोष डावखर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले ‘विश्व मराठी संमेलन २०२५’

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ चे उद्घाटन आज फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध स्टॉल्सवर भेट दिली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानासाठी ‘साहित्य भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय लिपींवर आधारित ‘अक्षरभारती’ पुस्तकाचे प्रकाशन तसेच, अभिजात पाठपुरावा समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण या सोहळ्यात करण्यात आले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले विश्व मराठी संमेलन असून, “अभिजात मराठी” हीच या संमेलनाची संकल्पना आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे या कवी संमेलनात बेळगाव-निपाणी येथील कवी आपल्या काव्यपाठाने रंगत आणणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुढे ते म्हणाले की, भाषा ही केवळ संपर्काचे साधन नाही, तर अभिव्यक्तीच्या माध्यमातून सृजन निर्मितीचे देखील साधन आहे. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा राजमान्यता प्राप्त आहे. परंतु, मराठीला राजमान्यता देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मराठी भाषा प्रत्येक किलोमीटरवर बदलत असली तरी तिची गोडी अवीट आहे. मराठीतील बोलीभाषा आणि तिच्यातील साहित्य, काव्यप्रकार हे अतिशय वेगळे आणि मनाला भावणारे आहेत.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे, ज्याचा अत्यंत आनंद आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, “संतांच्या साहित्यात्मक रचनेतून सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार आणि वैश्विक विचार देण्याचे कार्य मराठी भाषेने नेहमीच केले आहे. मराठी भाषेची ही गौरवमयी परंपरा पुढे नेण्यासाठी ‘विश्व मराठी साहित्य संमेलना’च्या माध्यमातून आम्ही जगभरातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करीत आहोत.” मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी मराठी विभागाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून पुढील पिढ्यांसाठी अभिजात साहित्य कसे उपलब्ध करता येईल, याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर येत्या ५ वर्षांत कोणत्याही एका देशात मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाईल, लंडनमधील मराठी मंडळाला जागेसंदर्भात मदत केली जाईल आणि दिल्लीतील मराठी शाळा अव्याहत चालण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. श्रीरंग आप्पा बारणे, आ.भिमराव तापकीर, अप्पर मुख्य सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.