BREAKING NEWS
latest

पावसाळ्यातील पूरजन्य परिस्थितीसाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : यावर्षीच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा जलद गतीने राबविण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन यंत्रणांशी निगडित अधिकारी /कर्मचारी वर्गास आचार्य अत्रे रंगमंदिर येथे प्रशिक्षण देखील देण्यात आले असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली आहे.

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या  सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार  हापालिकेच्या दहा प्रभागात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सहा. आयुक्त यांचे अधिनस्त सर्व संबंधित विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागातील आपत्कालीन परिस्थितीवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून प्रभाग निहाय उपायुक्त वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे.

महापालिका मुख्यालयातही (आपत्कालीन) मुख्य नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून हा कक्ष ३० ऑक्टोबर पर्यंत कार्यरत राहणार आहे. सदर मुख्य नियंत्रण कक्ष सकाळी ६ ते २ दुपारी २ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ या तीन सत्रात सुरू राहणार असून या मुख्य नियंत्रण कक्षावर रात्रीचे सत्रात पर्यवेक्षण करण्यासाठी वर्ग एक व वर्ग दोन च्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षात 18002337383 आणि 18002334392 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत.

सर्व पक्षीय युवा मोर्चाचे नुकसानग्रस्तांना त्वरित मोबदला मिळण्यासाठी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरीता जाहीर बैठक संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिबली दि.२३ : डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील "अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड" या रासायनिक कारखान्यात गेल्या वर्षी दि. २३ मे २०२४ रोजी रिएक्टरमध्ये तापमान व दाब वाढल्यामुळे या रिएक्टरचा भीषण स्फोट झाला. या अपघातात १३ कामगारांचा मृत्यू झाला व ६७ व्यक्ती जखमी झाल्या. शिवाय या कारखान्याच्या दोन तीन किलोमीटरच्या परिसरातील राहत्या घरांचे व औद्योगिक आस्थापनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची कधीही भरून न निघणारी हानी झाली. राज्य शासनामार्फत मृतांच्या वारसांना 'मुख्यमंत्री सहायता निधी' मधून प्रत्येकी रु. ५ लाख अदा करण्याची तरतूद करण्यात आली.
या भीषण स्फोटामध्ये मौजे सोनारपाडा व सागांव येथील भूमिपुत्रांच्या राहत्या घरांचे व व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान झाले. हे भूमिपुत्र कोण ? तर १९६० च्या दशकामध्ये राज्याच्या विकासाकरिता व उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी याकरिता डोंबिवली शहरालगतच्या मौजे माणगाव, संदप, सागांव, सोनारपाडा, गोळवली, खंबाळपाडा, पाथर्ली, आजदे, सांगर्ली इत्यादी गावांच्या सुपीक शेत जमिनी राज्य शासनाने तुटपुंजा मोबदला देऊन संपादित केल्या. या डोंबिवली एमआयडीसी विभागामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्याला आपला स्वतःचा पीऍपी प्लॉट मिळवताना सुद्धा अनेक अडचणी येत आहेत. या डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रामधून अनेक कारखान्यांचे स्थलांतर झालेले आहे. तसेच अशा भीषण स्फोटांच्या मालिकांमुळे धोकादायक, अती-धोकादायक कंपन्यांचे स्थलांतर होण्याची कार्यवाही सुद्धा सुरू आहे. या स्थलांतरित झालेल्या कंपन्यांच्या जागांमध्ये येथील बाधित भूमिपुत्रांना ज्याप्रमाणे लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांनी नवी मुंबईतील सिडको प्रशासना विरोधात जे आंदोलन केले त्या आंदोलनामुळे तेथील सिडको बाधितांना १२.५०% टक्के पुन्हा नव्याने भूखंड मिळाले. त्याचप्रमाणे येथील बाधितांना सुद्धा नव्याने भूखंड वितरित करावेत अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
अमुदान कंपनीच्या चुकीमुळे गेल्या वर्षी झालेल्या या भीषण स्फोटाने येथील राहती घरे व व्यावसायिक मालमत्तांचे अतोनात नुकसान झाले होते. याबाबत राज्य शासनाने सूचना केल्याप्रमाणे कल्याण तहसील कार्यालयामार्फत एकूण ९८० नुकसानग्रस्तांची राहती घरे व व्यावसायिक मालमत्तांचे पंचनामे करून १३ कोटी, ९० लाख, ७३ हजार, ४१८ रु. इतकी नुकसान भरपाईची रक्कम कळविण्यात आली होती. या कार्यवाहीला एक वर्ष होत आले तरी सुद्धा नुकसानग्रस्त मालमत्ता धारकांना अजूनही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. या नुकसानग्रस्त मालमत्ता धारकांना ही नुकसान भरपाई मिळावी याकरिता संविधानिक मार्गाने राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सोनारपाडा येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जाहीर बैठकीत सर्व नुकसानग्रस्तांनी सहभाग घेऊन राज्य शासनाविरुद्ध आक्रोश आंदोलन केले.

या सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या जाहीर बैठकीला काँग्रेसचे श्री. संतोष केणे, गजानन पाटील, ऍड. शिवराम गायकर, राम पाटील, महेश संते, कर्सन पाटील, ऍड. राजेश जाधव, सुनील पाटील, शशी पाटील, दत्ता वझे, रतन पाटील, बालाराम ठाकूर, मधुकर माळी, शिवाजी माळी, सुमित वझे आदी उपस्थित होते.

जनतेच्या खिशावर लूट करत असणाऱ्या कडोंमपा च्या 'चेन्नई पॅटर्न' विरोधात दीपेश म्हात्रे यांची पत्रकार परिषद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिबली दि.२३: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात एल्गार करत जनतेच्या खिशावर लूट करणाऱ्या “चेन्नई पॅटर्न”च्या विरोधात पत्रकार परिषद घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या  वतीने कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नवीन “चेन्नई पॅटर्न” कचरा संकलन प्रक्रिया विषयी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पक्षाने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आणि महानगरपालिकेच्या सर्व भोंगळ कारभारावर गंभीर आरोप केले. नवीन कर पद्धतीनुसार सर्वसामान्य नागरिकांवर ५०% पर्यंत कर वाढ लादण्यात आली आहे. ६०० रुपये वार्षिक कर असलेला आता वर्षाला ९०० रुपयांचा कर सर्व नागरिकांना भरावा लागणार असून, घराचे क्षेत्रफळ लहान असो वा मोठे, सर्वांना समान कर लावण्यात आला आहे. ही सरळसरळ जनतेची लूट असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. 
या योजनेअंतर्गत कचऱ्याचे केवळ संकलन केले जाणार असून त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही. सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये दररोज सुमारे ८५० टन कचरा तयार होतो. मात्र, उंबर्डे, बारावे आणि डोंबिवलीतील लवकरच सुरू होणाऱ्या प्लांटची एकत्रित प्रक्रिया क्षमता जवळपास ६५० टन एवढीच आहे. अजून मागील बऱ्याच वर्षापासून पडलेला कचरा दुर्गाडी किल्ल्यासमोर असलेल्या डोंगरांवर आहे. मागील अनेक वर्षांपासून तिथे १०,००० मेट्रिक टन कचरा साचलेला असून कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेतील ठेकेदार बदलले जातात पण काम करणारी माणसे मात्र तीच राहतात. ऍंथोनी, आरबीएल, आणि आता सुमित ही नावे बदलली, पण कामाच्या दर्जात कोणताही फरक पडलेला नाही. शिवसेनेने आरोप केला की सत्ताधारी पक्ष नागरिकांना दिशाभूल करत आहे आणि लपवाछपवी करून जनतेवर आर्थिक बोजा टाकत आहे. शहरातील ड्रेनेज आणि रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. काँक्रीट रस्त्यांची कामे रखडली आहेत, मलवाहिन्या चोकअप झालेल्या आहेत आणि नवीन ठेकेदार नेमलेले ही नाहीत. येणाऱ्या पावसाळ्यात शहरात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असूनही प्रशासन गंभीर नाही. 
शिवसेना पक्षाच्या वतीने आयुक्तांना या पत्रकार परिषदे मधून विनंती करण्यात आली की जर या सर्व बाबींवर प्रशासनाकडून योग्य नियंत्रण नसेल, अंकुश नसेल तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल. या सर्व बाबींवर अंकुश ठेवण्यास समर्थ असेल. सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी वाढीव कराचा विरोध करावा आणि आपला हक्क मागावा. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा सचिव सुधीर पाटील, कल्याण उप तालुकाप्रमुख भालचंद्र म्हात्रे, कल्याण ग्रामीण डोंबिवली विधानसभा समन्वयक ओमनाथ नाटेकर, डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, उपशहर प्रमुख शाम चौगुले, चेतन म्हात्रे , कुणाल ढापरे, संजय पाटील, राहुल चौधरी, युवासेनाचे आदित्य पाटील, शिवसेना महिला आघाडी सुप्रियाताई चव्हाण, विधानसभा संघटिका सौ. अक्षरा मनोज पटेल, शहर संघटिका डोंबिवली पूर्व सौ. प्रियंका विचारे, शहर संघटिका डोंबिवली पश्चिम रिचा कामतेकर, युवती शहर अधिकारी डोंबिवली पश्चिम प्रियांका पाटील, शाखा संघटिका कोपरगाव स्मिता पाटिल, ऊपशहर प्रमुख डोंबिवली पूर्व दीपाली राऊळ, उपविभाग संघटिका आयरे रोड छाया सावंत, शाखा संघटिका प्रिया विजय दांडगे, शाखा संघटिका डोंबिवली पश्चिम स्वप्नाली बांधणे तसेच शिवसैनिक, युवासैनिक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

कल्याण चिकणीपाडा येथे इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना रवींद्र चव्हाण यांच्या कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागला. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असून इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरता निवारा देण्यासाठी  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
                                 
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तश्रृंगी या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पृष्ठभागाचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला. तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या माळ्यावरील स्लॅब पाठोपाठ कोसळत गेले. यात सहा जणांचा मृत्यू झाला. यात एका बालकाचा यामध्ये समावेश आहे. चार जखमींवर पालिका आणि खासगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत अशी माहिती चव्हाण यांनी दिली. 
                                 
                                 
दुर्घटना झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याचा आणि इमारत परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः झोपड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत प्रशासनाला सांगितले. दाटीवाटीच्या वस्ती आणि त्यातच संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असताना कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना दिलासा दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 कल्याण, दि.१८ - नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे. चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे. ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमध्ये आपण जे काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. कल्याण शहरातील नविनतम आणि अद्ययावत सुखसोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, कुमार आयलानी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस कल्याण-डोंबिवलीच्या इतिहासातला सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे. एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आरटीओ विभाग राज्याला महसूल देणारा एक महत्त्वाचा विभाग आहे. म्हणूनच प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली, एक परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळाले. या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत व परिवहन सेवेचे एसटी ड्रायव्हर, कंडक्टर किंबहुना आरटीओ विभागाचे अधिकारी-कर्मचारी आहेत त्यांना देखील सुविधा देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि म्हणून जे जे काय आपल्याला सहकार्य लागणार आहे ते पूर्णपणे सहकार्य राज्य सरकारकडून मिळेल. ते पुढे म्हणाले की, आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चांगलं काम करताय आणि मला आठवतंय की, गेल्या अडीच वर्षांमध्ये आपल्या महायुती सरकारने एवढे जलद निर्णय घेतले आणि त्या टीममध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ही आमची एक टीम आहे आणि आमची ही टीम पूर्वीच्या गती पेक्षा अधिक वेगवान गतीने पुढचाही कारभार करणार आहे. नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे. चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे. ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमध्ये आपण जे काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल. 
आपण आता सगळं स्मार्ट पद्धतीने करताय, नवीन टेक्नॉलॉजी आहे, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतोय आणि या माध्यमातून देखील मग आता परवाना देण्याचं काम देखील पूर्वीसारखं नसून तुम्ही आता परवाना देताना त्यामध्ये देखील नवीन टेक्नॉलॉजी आणताय. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज होणारे अपघात टळतील, असे सांगून ते पुढे म्हणाले की, नाशिक मध्ये एका अपघातात २५ लोक मृत्युमुखी पडले होते आणि तेव्हा राज्यातले सगळे ब्लॅक स्पॉट काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यावर देखील तुमच्या विभागाने खूप चांगलं काम केले आहे आणि त्यामुळे अपघातांमध्ये देखील आपली संख्या आता कमी झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आपली संस्था जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने 'इज ऑफ बिजनेस' आणि 'इज ऑफ लिविंग' ही आपल्या राज्याची प्रमुख भूमिका आहे आणि आपल्या माध्यमातून देखील याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा मिळेल. एसटीला आपण लाईफ-लाईन म्हणतो. पहलगाम मध्ये जेव्हा आपल्या निरपराध लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं, त्यांच्या नातेवाईकांना आपण विमानाने इकडे आणलं आणि पुढं परिवहनच्या बसेसने आपण त्यांना त्यांच्या गावी सोडलं हे देखील परिवहन सेवेने त्यावेळेस केलेले काम खऱ्या अर्थाने जनसेवेचे आणि लोकभावनेचे आहे.
 आपल्याला आता आपला वेग वाढवायचा आहे, आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने परिवहन विभाग आणि आरटीओ विभाग हे दोघांचे एकमेकांशी एवढी सांगड आहे की, एकमेकांना परिपूर्ण असा हा विभाग आहे असे सांगून ते म्हणाले की, आपण नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा दिल्या पाहिजे. यामध्ये ई-गव्हर्नन्सचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतला, आता दीडशे दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून भूमिका सरकारची एवढीच आहे की 'इज ऑफ लिविंग' म्हणजे सगळ्यांचे जीवन सुलभ झाले पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांना मंत्रालयापर्यंत चकरा माराव्या लागू नयेत व त्यांचं काम जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर झालं पाहिजे. ते पुढे म्हणाले की, आपण जे नवनवीन उपक्रम हाती घेतोय त्याच्या मागचा उद्देश शेवटच्या माणसाला आपली चांगली सेवा देणे हा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लायसन्स, परमिट, रिन्यूअल अशा गोष्टी ज्या आहेत त्या तत्परतेने झाल्या पाहिजेत. लोकांना त्यासाठी विलंब लागता कामा नये, त्याचा निपटारा लवकरात लवकर झाला पाहिजे आणि प्रलंबित कामे शून्यावर आणली पाहिजे, यासाठी आपण वेगाने काम करा त्यासाठी सिस्टीमही आपल्याकडे आहे. मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या भव्य दिव्य अशा इमारतीमधून तुमच्याकडून जास्तीत जास्त कार्यक्षम काम होईल, पारदर्शकता येईल आणि नागरिकांना चांगली सेवा मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.
 यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, योगायोग बघा आज या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि सर्वसामान्य प्रवाशांना चांगली सुविधा देणाऱ्या पाच रिक्षा चालकांचा सत्कार झाला. आज त्यांचा सत्कार करताना मला आठवतंय की, साधारण ८० ते ९० च्या दशकात मी सुद्धा डोंबिवलीमध्ये रिक्षा चालक म्हणून काम करत असताना ह्याच कल्याणच्या परिवहन कार्यालयाने रिक्षा चालकाचा पहिला परवाना मला दिला होता. आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये या इमारतीचे उद्घाटन होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज या कार्यालयाचा शुभारंभ होतोय. गेल्या अडीच वर्षांमध्ये आपण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम झाले आहे. आरटीओची अनेक कार्यालये आपण निर्माण केलीत. विभागाच्या अनेक मोक्याच्या जागा ज्या झोपडपट्ट्यांनी सगळ्या जागा व्याप्त झालेल्या आहेत त्या शिंदे साहेबांना विनंती केली आहे की ज्या आमच्या ५४ विविध ठिकाणी चांगल्या जागा ज्या आहेत, त्या परत कोणी घेऊ नये यासाठी आम्ही सुद्धा पीपीपी तत्त्वावरच त्या जागा विकसित करू जेणेकरून आमच्या विभागाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ते पुढे म्हणाले की, पूर्वी आपण लायसन्स देत होतो ते मॅन्यूअली देत होतो आणि आपण आता ते ट्रॅकच्या माध्यमातून जे लायसन्स देणार आहोत, त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम परिवहन सेवेमध्ये करता येईल. एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते की गेली ८५ वर्षे परिवहन विभाग या राज्यातील जनतेला अविरत सेवा देत आहे. महिन्याभरापूर्वीच वरळीला अतिशय चांगल्या प्रकारच्या परिवहन कार्यालयाचे सुद्धा भूमिपूजन केले आहे. ती इमारतही दोन ते अडीच वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे 'एआय टेक्नॉलॉजी' वर आधारित आपण चांगला विकास करतोय, चांगले निर्णय घेतोय आणि परिवहन सेवेला कशी बळकटी देता येईल आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना कशा सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आजही सगळे लोकं हे सांगतात की, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे परिवहन सेवा असताना त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या चांगल्या विकासकामांना त्यांनी चालना दिली होती ते आज पर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं, तेवढं एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळात घडले आहे. या निमित्ताने मी ग्वाही देतो की, पुढल्या काही वर्षांमध्ये अजून चांगली सेवा या राज्याला देण्यासाठी परिवहन सेवा कटिबद्ध आहे.
 या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षा या विषयावरील पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे हेमंगिनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी केले.

कल्याण-डोंबिवलीचे रूप आता स्वच्छतेच्या माध्यमातून बदलेल ! - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि. १८ - आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावं, असं कल्याण-डोंबिवलीकरांचे स्वप्न आहे आणि स्वच्छतेच्या या  आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे कल्याण-डोंबिवलीचे रूप, स्वच्छतेच्या माध्यमातून निश्चित बदलेल,असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात विविध उपक्रमांचे लोकार्पण व भूमीपूजन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, परिमंडळ-३ पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, इतर पदाधिकारी, माजी पालिका सदस्य महापालिका अधिकारी, मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले, मीही मुख्यमंत्री असताना 'डीप क्लीन ड्राईव्ह' उपक्रम सुरू केला, "स्वच्छता असे जिथे-आरोग्य वसे तिथे" हे वाक्य उधृत करून त्यांनी या स्वच्छता उपक्रमास शुभेच्छा दिल्या.आज लोकार्पण झालेले सगळे प्रकल्प लोकाभिमुख आहेत, अशा शब्दात आयुक्तांची प्रशंसा करीत विकासाला पैसे कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
वेगवेगळ्या प्रकल्पांचे विशेषतः स्वच्छता उपक्रमाचे आज लोकार्पण  होत आहे. शहरातील नागरिकांनी देखील स्वच्छतेचे पालन करावे, असे आवाहन आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले. कल्याण-डोंबिवलीच्या वाढत्या लोकसंख्येला सक्षम प्रणालीची गरज होती. त्यामुळे घनकचऱ्याचा हा नवीन उपक्रम उभा राहत आहे, या उपक्रमांमध्ये महापालिकेतील कामगारांना देखील समाविष्ट करून त्यांना रोजगार द्यावा, अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. कल्याण परिक्षेत्रात मोठे प्रकल्प उभे राहण्यासाठी शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. सावळाराम क्रीडा संकुलात देखील आता एलिवेटेड स्टेडियम होईल, अशी माहिती खासदार डॉ.शिंदे यांनी दिली.
आज लोकार्पण होणाऱ्या उपक्रमांची माहिती नेटक्या शब्दात विशद करून कल्याण-डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून आपल्या सर्व नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच मोलाचे आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले. आजच्या कार्यक्रमात कचरा संकलन, वाहतूक आणि रस्ते स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ, परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप, रिंग रोड मधील बाधित लाभार्थ्यांना पुनर्वसन धोरणानुसार सदनिकांचे वितरण, एमयुटीपी प्रकल्पातील बाधितांना चाव्यांचे वितरण, टिटवाळा (पूर्व) येथील जागेवर उभारलेल्या सौर ऊर्जेवर आधारित उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण, खंबालपाडा क्रीडा संकुलाचे ऑनलाईन भूमीपूजन, परिमंडळ तीन मधील दामिनी पथकासाठी वाहनांचे हस्तांतरण ई कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता उपक्रमाच्या वाहनांना ध्वजांकन केले.

डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी विजय भोईर यांची निवड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ निवडणूक २०२५-३० च्या निवडणुकीत एकता पॅनल विजयी झाले. तब्बल ५८ वर्षानी ही निवडणूक पार पडली. डोंबिवली पूर्वेकडील हभप सावळाराम क्रीडा संकुलामधील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात झालेल्या निवडणुकीत एकता पॅनल दमदारपणे निवडून आले होते. गुरुवारी एकता पॅनलने सर्वानुमते विजय भोईर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पश्चिमेकडील डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढीच्या कार्यालयात अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी पतपेढीतील पदाधिकाऱ्यांनी विजय भोईर यांचे पुष्पगुच्छ देवून व पेढे भरवून अभिनंदन केले. पुढील पाच वर्षाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष - विजय भोईर, उपाध्यक्ष - शरद पांढरे, कोषाध्यक्ष - अनघा पवार, सचिव - गणेश गोल्हे कामकाज पाहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.