BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
कल्याण : आज २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि एसकेडीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर कल्याण स्थानकाजवळील कै. दिलीप कपोते वाहनतळाच्या सहाव्या मजल्यावर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, "योग ही एखाद्या दिवसापुरती उत्सवाची गोष्ट नसून, ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असावी. जसे गाड्यांना वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज असते, तसेच आपल्या मनालाही विश्रांती, एकाग्रता व सकारात्मकतेसाठी योगाची गरज असते."
या योग शिबिरात महापालिकेचे महापालिका आयुक्तांसमवेत उपायुक्त रमेश मिसाळ, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे जेष्ठ प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्वसन तंत्र, आसने व मानसिक शांततेसाठी विविध आसन प्रकार शिकवण्यात आले. यावेळी उपस्थितांसाठी स्नॅक्स व जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती.
महापालिका क्षेत्रातील शाळा तसेच महाविद्यालयांमध्येही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने करीत योगाभ्यासाचा लाभ घेतला.

हिंदुत्वाचा विचार जपणं.. हीच खरी बाळासाहेबांना मानवंदना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा पुरुषार्थ होय. बाळासाहेब म्हणजे स्वाभिमानाचं दुसरं नाव. बाळासाहेब म्हणजे मराठी जनमानसाचा बुलंद आवाज. आज बाळासाहेब जरी देहाने आमच्यात नसले, तरी त्यांची परखड व जहाल हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले आहेत. अन् तेच आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळेच हिंदू हृदयातलं त्यांचं अढळ स्थान कुठलीही राजकीय महाशक्ती हलवू शकली नाही व शकणार नाही. मराठी जनमानसावर अधिराज्य गाजविणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची मराठी अस्मितेची सोनेरी झालर असलेली संघटना १९ जून १९६६ रोजी स्थापन केली. आज शिवसेनेचा ५९ वां वर्धापन दिन साजरा होत आहे, याचा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मोठा अभिमान आहे.

महत्वाचे म्हणजे मराठी माणूस अन् त्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेना' या मराठमोळ्या संघटनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या अस्मितेला व स्वाभिमानाला जपण्यासाठी बाळासाहेबांच्या जहाल अन् खंबीर नेतृत्वाखाली उदयास आलेल्या शिवसेनेने ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण करण्याचा संकल्प केला. आजही राज्यातील महायुतीचे सरकार ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण या धोरणाशी एवं हिंदुत्वाच्या भगव्या विचाराशी प्रामाणिक असून महायुती सरकार याला बांधील आहे.

बाळासाहेबांनी तब्बल अर्धशतक एकहाती शिवसेना संघटना आपल्या पद्धतीने चालविणे,
हे देशातील एकमेव उदाहरण असल्याचं सार्वमत आहे. बाळासाहेबांसारखे 'लोकनायक' हे सदैव आपल्या विचाराने जिवंत असतात व ते समाजालाही जिवंत ठेवतात. वास्तवात शिवसैनिकांनी बाळासाहेबांना विश्वास दिला, अन् त्यांनी शिवसैनिकांवर विश्वास ठेवला. शिवसेनेचा विस्तार राज्यभर होण्यासाठी बाळासाहेब हे साऱ्या जीवनात चंदनासारखे झिजले. शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांची कवचकुंडलेच. हिंदूहृदयात अढळ स्थान प्राप्त करणारे बाळासाहेब हे राजकारण, समाजकारण, संगीत, नाट्य, व्यंगचित्रकार, वक्तृत्व, संपादक, लेखक असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्व.प्रबोधनकार ठाकरे यांनी मोठं योगदान दिलं, त्यांचा सामाजिक वारसा पुढे बाळासाहेबांनी समर्थपणे चालवून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असो वा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांचा लढा असो, यासाठी बाळासाहेबांनी प्रखर लढा देऊन शिवसेनेची उपयुक्तता सिद्ध केली.

यास्तव शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वंदनीय बाळासाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा !

मराठी भूमिपुत्रांच्या मुला-मुलींना रोजगाराचे-स्वयंरोजगारचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना रेल्वे, बँका अन् केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्या मिळाव्यात, या उद्देशाने बाळासाहेबांनी स्वतंत्र अशा 'लोकाधिकार समिती' ची निर्मिती केली होती. तिच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार असलेल्या मराठी मुलं-मुलींना त्यांच्या आवडीच्या नोकऱ्या मिळू लागल्या. कधी कधी तर  लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांना न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढावं लागलं. वास्तवात लोकाधिकार समितीच्या लढाऊ बाण्यामुळे हजारों मराठी भूमिपुत्रांच्या मुला-मुलींना गुणवत्तेनुसार नोकऱ्या मिळून त्यांचे संसार थाटले आहेत. खरं तर, लोकाधिकार समितीच्या सामाजिक कार्याला राज्यात तोड नाही असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.

आधी मार्मिक व त्यानंतर सामना ची मुहूर्तमेढ करून मराठी हक्कांच्या प्राप्तीसाठी जहाल संपादकीय लेखन अन् व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृतता निर्माण केली. तर दुसऱ्या बाजूने या द्वय आयुधांनी तत्कालिन सत्ताधारी पक्षाची व त्यांच्या नेत्यांची झोप उडवली. बाळासाहेबांच्या उक्ती व कृतीत एक प्रकारचा करिश्मा होता, असे आजही लोक म्हणतात. त्यांच्या विजयादशमीनिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्यातले जहाल व प्रखर शैलीतील भाषण ऐकण्यासाठी मुंबई, ठाणेसह राज्यातील शिवसेनेचे चाहते दरवर्षी आवर्जून उपस्थित राहत असतात. त्यांच्या नेतृत्व, कर्तुत्व अन् वक्तृत्वाचा जनमानसावर मोठा पगडा होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून बाळकडू घेऊन मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेला मोठं करण्यात बाळासाहेबांना स्व. मीनाताईंची मोलाची साथ लाभली. बाळासाहेबांना सुख-दुःखात मोलाची साथ देत, त्यांनी बाळासाहेबांची सावली बनून त्यांना मानसिक बळ दिलं. मातृतुल्य मीनाताईंनी आपली मुलं अन् शिवसैनिक यात कधीच दूजाभाव केला नाही. खरं तर,
मीनाताई ह्या शिवसैनिकांना आपल्या मुलासारखं वागवत असत. त्यांनाही शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !

महाविकास आघाडी सरकारचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे अडीच वर्षाच्या कार्यकाळात केवळ अडीच दिवसच मंत्रालयात गेले. परिणामी शिवसेनेच्या आमदारांना यांच्या मतदारातील लोकोपयोगी कामांसाठी निधी मिळण्यात अक्षम्य दिरंगाई होत होती. इतकेच नव्हे तर, वर्षा निवासस्थानी देखील तासनतास प्रतिक्षा करूनही शिवसेनेच्या आमदारांना भेटी नाकारल्या जात होत्या. 

मला नगर विकासमंत्री असूनही बुद्धीपुरस्सर भेटीसाठी डावलले जात होते. त्यामुळे लोकोपयोगी योजनांना व अन्य कामांच्या निधीला मंजुरी मिळणे दुरापास्त होऊ लागले होते. त्यामुळे विविध मतदारसंघातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांचा विश्वास डळमळू लागला होता. महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भगव्या विचाराला तिलांजली देऊन उद्धवजी, आदित्य व त्यांचे बोटावर मोजण्याइतके समर्थक आमदार काँग्रेसच्या दावणीला पूर्णतः बांधले गेले होते. अल्पसंख्यांकांची मते मिळविण्याकडे तसेच त्यांच्या आमदारांचा पाठिंबा मिळवून पुढील काळात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही पण एक कुटीर खेळी होती.

इतकेच नव्हे तर, नगरविकास विभागाच्या महत्वपूर्ण कामांसंदर्भात तसेच मुंबई महानगर महापालिका संबंधीच्या काही खास बैठकांमध्ये मला दूर ठेऊन ना.आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एकतर्फी निर्णय घेतले जाऊ लागले होते. वास्तवात आदित्य ठाकरेंचे प्रभुत्व वाढविण्यासाठी ही दुष्ट राजकीय खेळी खेळली जात होती. त्यामुळे माझे समर्थक मंत्री, आमदार, पदाधिकारी व निष्ठावान शिवसैनिक यांच्यात असंतोषाची ठिणगी पडण्याची वेळ जवळ येत असल्याचे प्रतिबिंबित होत होते. आपल्या मतदारसंघातील लोकांना आता कसं तोंड दाखवायचं हा प्रश्नही त्यांच्या मनाला खात होता. या सर्व नकारात्मक गोष्टींची परिणिती म्हणजे शिवसेनेतील आमदार, मंत्री व पदाधिकारी माझ्यापुढे वारंवार आपली व्यथा मांडू लागले होते. असेच वातावरण राहिले तर, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आपलं निवडून येणं अवघड होईल, या विचाराने नाराज आमदार मला काहीतरी कठोर पाऊल उचला, अन्यथा खूप उशीर होईल, असे वारंवार सांगत होते, विनवण्या करत होते.

सारांश, बाळासाहेबांची शिवसेना व त्यांचे हिंदुत्व अबाधित ठेवण्यासाठी  माझ्या नेतृत्वाला होकार देऊन अखेर सर्वानुमते हा *'उठाव'* झाला अन् आज बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार व भगवी पताका हाती घेऊन आम्ही सर्वांनी एकमताने *'बाळासाहेबांची शिवसेना'* स्थापन केली. आज बाळासाहेबांची शिवसेना मोठ्या दिमाखाने व पूर्णक्षमतेने हिंदुत्वाचा भगवा विचार अंगिकारून यशस्वी आगेकूच करत आहे, याचा आम्हा सच्च्या व निष्ठावान शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे.

वास्तविक पहाता, शिवसेनेची उभारणी करणाऱ्या वंदनीय बाळासाहेबांना सत्तेच्या खुर्चीचा कधीच मोह झाला नाही. शिवसेना हा एक विचार आहे, त्यामुळे त्यांच्यात सत्तेची लालसा निर्माण झालीच नाही. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांनी मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला व त्यानंतर काळानुरूप हिंदुत्वाच्या रक्षणासाठी राजकीय वाटचाल करून राजकारणातून समाजकारण करण्यास कटिबद्ध झाले. बाळासाहेबांचा पूर्वापारापासूनच मराठी माणसावर दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मोल होतं. वजन होते. ताकद होती. हे पाहून जुन्या काळातील बीजेपीच्या जाणकार नेत्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांशी जवळीक साधून लोकसभा-विधानसभा निवडणुकांत मोठा विजय संपादन केला अन् त्या पार्श्वभूमीवर बीजेपीने शिवसेनेला कृतज्ञतेच्या भावनेतून मोठ्या भावाचा दर्जा दिला होता. हा जिवाभावाचा *'दर्जा'* अन् *'हिंदुत्व'* बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आजीमाजी मंत्री, खासदार-आमदार, पदाधिकारी, शिवसैनिक अर्थातच आम्ही सर्वजण एकसंध होऊन तनमनधनाने जिवापलिकडे जपू, हे या मंगलमय दिनी मी अभिवचन देतो. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा ! जय महाराष्ट्र!

✍️ लेखक - एकनाथ गंगुबाई संभाजीराव शिंदे
(उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य)

डॉ. सर्वेश सावंत यांच्या कडून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - शिक्षण हीच खरी समृद्धी आहे, हे जाणूनच हा मोफत वह्या वाटपाचा उपक्रम दरवर्षी भारतीय जनता पार्टी ही गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदत करत असते. भाजपाचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. 

डोंबिवली पश्चिमेकडील सखाराम कॉप्लेसजवळील भाजपा जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जनसंपर्क कार्यालयाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नवीन वह्या पाहून लहान मुलांनाही आनंद झाला. यावेळी डॉ. सर्वेश सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणात मागे राहू न देता पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल तसेच गरीब विद्यार्थी जरी असला तरी त्याला आवश्यक शालेय साहित्य मिळावे हा त्यामागील उद्देश आहे.

धक्कादायक! भातन बोगद्यात पोलिसांच्या कैद्यांची गाडी अपघातग्रस्त – ५० जण जखमी, १२ पोलिस गंभीर!

संदिप कसालकर (संपादक)

मुंबई | बुधवार – मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील भातन बोगद्यात आज सकाळी एक मोठा अपघात झाला. बांगलादेशी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या पिंजऱ्याच्या गाडीला अचानक ब्रेक लागल्याने मागून येणाऱ्या ST बसने जोरदार धडक दिली. या अपघातात जवळपास ५० जण जखमी झाले असून त्यात १२ पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने कैद्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.

या गाड्यांमध्ये ९ ते १० पिंजरे होते, म्हणजेच वेगवेगळ्या पोलिसांच्या वाहनांमधून कैदी नेले जात होते. धक्कादायक म्हणजे या अपघातामुळे काही काळ संपूर्ण एक्सप्रेसवेवर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आणि अपघातग्रस्त गाड्यांनी रस्ता अडवल्यामुळे मागे मोठा ट्रॅफिक जाम झाला होता.

अपघातानंतर जखमींना तातडीने पनवेलच्या MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक तातडीने पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

अंदाजानुसार अपघाताचे मुख्य कारण म्हणजे अचानक ब्रेक आणि मागील वाहनाकडून आलेली अतिवेगाची धडक. पण नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही घटना पुन्हा एकदा विचार करायला लावते – कैद्यांच्या सुरक्षेच्या वाहनांची रचना आणि ताफ्याचं व्यवस्थापन नेमकं किती सुरक्षित आहे? याचा गंभीर विचार होणं गरजेचं आहे.

अंधेरीच्या पेपरबॉक्समध्ये रासायनिक कंपनीतून आगीचे लोळ… जीवितहानी नाही हेच सुदैव!

संदिप कसालकर (संपादक)

मुंबई | बुधवार – आज सकाळी अकरा वाजता अंधेरी पूर्वेतील पेपरबॉक्स इंडस्ट्रियल एरियामधील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला. धुराचे लोट आणि उष्णतेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं.

सध्या ८० टक्के आग आटोक्यात आली असून उर्वरित आग विझवण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

  • केमिकलचा साठा असल्याने आग वेगाने पसरली
  • वेळेवर मदत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला
  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू

आग नेमकी कशी लागली आणि कंपनीत सुरक्षा उपाय कितपत होते, याचा तपास आता सुरू आहे.

हा अपघात की दुर्लक्ष? – याचं उत्तर तपासातून मिळेल...

रविंद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा भाजपा प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप, उबाठा माजी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह नाशिक शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश झाले. यावेळी डॉ. राजेंद्र फडके, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष सुनील केदार, बाळासाहेब सानप, विजय साने, प्रशांत जाधव, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बने आदी उपस्थित होते. माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. 

यावेळी बावनकुळे म्हणाले की, भाजपामध्ये प्रत्येक प्रवेश हा विकासाकरिता होत असतो. कोणत्याही अपेक्षा न ठेवता केवळ नाशिकच्या विकासासाठी या सर्वांनी भाजपाला साथ दिली आहे. नाशिक जिल्हा परिवर्तनासाठी हे प्रवेश अत्यंत महत्वाचे आहेत. प्रवेश केलेल्या सर्वांच्या साथीने आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला ५१ टक्क्यांच्यावर मते मिळवून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रवेश केलेल्या प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. उद्या किंवा परवा हा पक्षप्रवेश होणार होता मात्र आजचा मंगळवारचा दिवस शुभ असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी आज हा पक्षप्रवेश ठेवला असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, प्रवेश केलेल्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भाजपाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक परिवाराप्रमाणे काम करायचे आहे. आपला पक्ष मोठा करणे त्याचा प्रसार करणे म्हणजे पक्षाप्रति प्रामाणिक असणे असते. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत अबकी बार १०० पार चे लक्ष्य असणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आणणे आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने भाजपा उमेदवार निवडणून देणे हे उद्दिष्ट असणार आहे असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 
यावेळी बडगुजर म्हणाले की १८ वर्ष काम करूनही उबाठा गटात माझा अनादर झाल्याने मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपला अनादर करणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून देऊ असेही ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवून देऊ असे बबनराव घोलप यांनी सांगितले. भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये नाशिकचे माजी नगरसेवक अशोक सातभाई, माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, वंदना बिरारी, शीतल भामरे, माजी सभागृह नेते दिलीप दातीर तसेच यावल तालुक्यातील (जिल्हा जळगाव) प्रभाकर सोनावणे, विनोदकुमार पाटील, आर.जी.पाटील, अनील पाटील, आरती पाटील, लताबाई पाटील आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या मनसेचे अश्वीन जयस्वाल, छत्रपती संभाजीनगरचे भगवान पवार, उद्योजक मनोज पवार आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

सुविधा नाहीत तर कर नाही - केडिएमसी आयुक्तांना शंखेश्वर प्रेसिडेन्सी, टावरीपाडा परिसरातील नागरीकांचे निवेदन !!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरातील शंखेश्वर प्रेसिडेन्सी, टावरीपाडा परिसरातील नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका विरोधात एल्गार पुकारत नागरीसुविधा नाही तर कर नाही अशी भूमिका घेतली आहे. मागील १५ वर्षांपासून प्रलंबित शंकेश्वर प्रेसिडेन्सी, टावरीपाडा-गोदरेज हिल प्रलंबित डिपी रस्ता, कल्याण स्टेशन येथून‌ रिक्षासाठी धावपळ, आरटिओ ते शंखेश्वर प्रेसिडेन्सी टावरीपाडा नागरीकांना चालत पायपीट करावी लागते, सार्वजनिक वाहतूक सुविधेचा वनवा, खड्डे पडलेले रस्ते, कल्याण स्टेशन परिसरातील‌ ट्राफिकच्या समस्या, अशी दयनीय अवस्था असुन कर वसूल करण्यासाठी बॅनर बाजी करणारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला परिसरातील समस्या दिसत नाही, वारंवार पत्र व्यवहार करून कोणतीही ठोस कार्यवाही नाही व‌ पत्रांना उत्तरही मिळत नाही. 
नागरीकांनी याबाबत तीव्र नाराजगी व्यक्त करत "जोपर्यंत सुविधा मिळत नाही तोपर्यंत  कर न भरणाऱ्याचा" निर्धार केला आहे. असा ठरावच शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन कमीटी ने मंजूर केला असून तसे निवेदन नुकतेच 'स्फूर्ती फाउंडेशन' महिला प्रमुख शिल्पा बजरंग तांगडकर यांनी सर्व  नागरिकांच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अभिनव गोयल यांना पत्र दिले असून यावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उत्तराची प्रतिक्षा नागरीक करत आहे. 
दरम्यान मागील १५ वर्षांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला शंखेश्वर प्रेसिडेन्सी सोसायटीतील ६५० सदनिका असलेल्या सदस्यांनी अंदाजीत ४ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये कर भरला असून याबद्दल्यात काय सुविधा दिली हा प्रश्न नागरीक विचारत आहेत. याबाबत स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रालय कार्यालयात पत्रव्यवहार करत हि समस्या मांडली.