BREAKING NEWS
latest

'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' चा 'रौप्य महोत्सवी वर्ष २०२५-२०२६' सोहळा उल्हासात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली कोपर येथील 'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' ची शैक्षणिक भरारी आकाश झेप घेत आहे. गेली २५ वर्षे सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेचा रौप्य महोत्सव वर्ष सोहळा दिनांक २३ जून रोजी साजरा करण्यात आला. 'जे एम एफ' संस्थेचा रजत महोत्सव, जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचा अठरावा स्थापना दिवस तसेच जन गण मन विद्यामंदिर शाळेचा दहावा स्थापना दिवस व वंदे मातरम महाविद्यालयाचा सत्रावा उत्सव मोठ्या उत्साहात मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये साजरा करण्यात आला. रांगोळ्या, फुलांनी दिव्यांनी शाळा सजवली होती.
 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, व इतर पदाधिकारी यांनी सरस्वती पूजन  व स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे अष्टप्रधान मंडळ व संस्थापित सहकारी यांनी आपल्या भाषणात संस्थेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. गेली पंधरा ते पंचवीस वर्षे संस्थेशी जुळलेली नाळ ही खऱ्या अर्थाने कौटुंबिक सुखाची झालर आहे आणि हेच सर्वांचे भावनिक नाते आहे, असे सर्वांनीच आपल्या भाषणात नमूद केले.
रौप्य महोत्सव दिना निमित्त संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते सर्वांना चांदीच्या गणपतीची प्रतिमा भेट देण्यात आली. सर्वस्व आणि सत्ता याचा मोह सर्वांनाच असतो. परंतु नशीबा बरोबरच प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती सत्ता उभी करणे म्हणजेच मिळालेल्या यशाची फळे चाखण्यासारखे आहे. २५ वर्षाचा प्रवास सोपा नव्हता, अथक परिश्रम, जिद्द, नकारात्मकतेला सकारात्मक रित्या बदलून केलेला प्रवास म्हणजेच आकाशाकडे झेपावणारी ही 'जे एम एफ' संस्था होय, आणि त्या अंतर्गत सक्रिय असलेल्या शाळा आणि महाविद्यालये नागपूर (दावसा) मधील इंग्रजी शाळा म्हणजेच ही यशाची पोच पावती आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये असताना, दोन हजार साली केलेली कल्पना म्हणजे एक छोटसं लावलेलं शिक्षणाचं रोपटेच म्हणावे लागेल, आणि ती कल्पना साकार होत असताना  त्याची वेल हळूहळू पसरत मुंबई सारख्या राजधानीत पसरला व त्याचा महाकाय असा गुरु शिष्याचं नाते निर्माण करणारा वटवृक्ष तयार झाला. सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचा विसर पडता येणार नाही पण त्यामुळेच अभिमानाने आणि गर्वाने आम्ही तुम्ही सांगू शकतो की, होय ही आमचीच 'जे एम एफ' संस्था आहे. असे उद्गार सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले.
संस्थापकानी लिहिलेल्या जन गण मन शाळेचे गाणे हजारो मुलांनी गाऊन संस्थेला, शाळेला मानवंदना दिली, त्याच बरोबर नाटक, नृत्य, प्रदर्शित करून सर्वांनाच आनंद दिला. पंचवीस वर्षाच्या प्रवासाची चित्रफित दाखवण्यात आली. शाळेच्या प्रांगणात लावण्यासाठी रोपटे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लिरा आणि श्रुतिका यांनी केले तर स्वागतपर भाषण अद्वैत या विद्यार्थ्याने केले. केक कापून संस्थेचा रजत महोत्सव साजरा केला तर सर्व मुलांना आवडीच्या जेम्स गोळ्या चे पाकिट देण्यात आली. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमांची सांगता केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी ‘आठवले’ घराण्याचा कवी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबईत रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात सात रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लिहिलेल्या कवितेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. “तुम्हाला खरं सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र यांनी कविता सादर केली.

फडणवीसांनी सादर केलेली कविता

तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो
नसे ना का अर्थ, अनर्थ तर नसतो
अरे तुम्ही काय कविता कराल
पण, आणि, किंवा, परंतु,
अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे,
कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे,
हृदयाला भेदून गेली पाहिजे,
आणि डोक्याच्या वरुन गेली पाहिजे.

मुंबईतील नामांकित शाळेत वाटण्यात आली पंजाबी भाषेची पुस्तके..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : केंद्र सरकारकडून राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या भूमिकेबाबत राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आज मुंबईतील एका नामांकित शाळेत पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली आहेत. यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. पुस्तके परत घेण्याची मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती तर मुळीच खपवून घेतली जाणार अशी ठाम भूमिका मनसे आहे. मुंबईच्या भांडुप परिसरात असलेल्या गुरुनानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली शाळेला धडक. अखेर शाळा प्रशासनाकडून वाटण्यात आलेली पंजाबी पुस्तके परत घेण्यात येणार याचे आश्वासन देण्यात आले. शाळेच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी राज्यातील मराठी शाळांममध्ये हिंदीची सक्ती नको असं रोखठोक मत व्यक्त केले. जर हिंदी सक्ती केल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला. राज ठाकरेंनी भूमिका घेतल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. भांडुपमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुस्तक विक्री करणा-या दुकानात जाऊन पहिली ते चौथीपर्यंतचे हिंदीचे पुस्तकं विक्रीसाठी आल्यास त्याची विक्री करू नका असा इशारा दिलाय. त्यानंतरही हिंदींच्या पुस्तकाची विक्री झाल्यास ती सर्व पुस्तक जाळून टाकण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.

ठाकरे गटाचे डोंबिवलीत वाढीव कराची बिले जाळून आंदोलन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न राबविण्याकरिता घर करामध्ये ३०० रुपयाची मोठी वाढ केली आहे. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेकडील शिवसेना शाखा येथे आज सोमवारी आंदोलन करण्यात आले.

महानगरपालिका प्रशासनाने वाढवलेली कर बिलं थेट नागरिकांच्या दारात पोहोचवली आहेत. या अन्यायकारक निर्णयाचा निषेध म्हणून कर बिल जाळण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्यासह जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे, महिला विधानसभा संघटिका सुप्रिया चव्हाण, महिला शहर संघटिका अक्षरा पाटेल प्रियंका विचारे, उपशहर प्रमुख संजय पाटील, शाम चौगुले, विभाग प्रमुख प्रमोद कांबळे, उपविभाग प्रमुख भावेश पवार, शाखाप्रमुख सचिन जोशी, आकाश पाटील, राजेश पाटील, मंगेश सरमाळकर, सुरज पवार इत्यादी पदाधिकारी सोबत महिला आघाडी आणि युवासैनिक तसेच अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जर ही करवाढ मागे घेतली नाही, तर आम्ही शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी म्हात्रे यांनी दिला.

पासपोर्टसाठी महिलांना पतीच्या सहीची गरज नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता घटस्फोटित किंवा वैवाहिक वाद असलेल्या महिलांना पासपोर्ट मिळवणे सोपे होणार आहे. पासपोर्ट अर्जासाठी महिलेला पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नसल्याचा महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आतापर्यंत महिलांना पासपोर्टसाठी अर्ज करताना कागदपत्रांवर पतीच्या सहीची आवश्यकता असे. मात्र, आता मद्रास उच्च न्यायालयाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय देताना जाहीर केले आहे की, पासपोर्ट अर्जासाठी महिलेला पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे यामुळे घटस्फोटित किंवा वैवाहिक वाद असलेल्या महिलांना पासपोर्ट मिळवणे सोपे होणार आहे.

रेवती नावाच्या एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. रेवती यांचे २०२३ मध्ये लग्न झाले होते, परंतु त्यांचा घटस्फोटाचा खटला प्रलंबित आहे. त्यांनी एप्रिल २०२५ मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला, परंतु प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (आरपीओ) फॉर्म-जे मध्ये पतीच्या स्वाक्षरीची आवश्यकता असल्याचे कारण देत अर्जावर प्रक्रिया करण्यास नकार दिला. याविरोधात रेवती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी सुनावणीदरम्यान तीव्र टिप्पणी करताना म्हटले की, पती-पत्नीमधील संबंध बिघडले असताना पतीची स्वाक्षरी घेण्यास भाग पाडणे म्हणजे महिलेला अशक्य गोष्ट करण्यास सांगण्यासारखे आहे. “पासपोर्टसाठी पतीच्या परवानगीचा आग्रह धरणे हे स्त्रीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या समाजाला शोभत नाही. ही प्रथा पुरुष वर्चस्ववादाशिवाय दुसरे काही नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. आरपीओचा हा आग्रह विवाहित महिलांना पतीची मालमत्ता मानणाऱ्या मानसिकतेचे द्योतक आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. न्यायमूर्तींनी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला रेवती यांच्या अर्जावर प्रक्रिया करण्याचे आणि इतर अटी पूर्ण झाल्यास चार आठवड्यांत पासपोर्ट जारी करण्याचे निर्देश दिले.

'DGCA' ने एअर इंडियाच्या ३ अधिकाऱ्यांना केले निलंबीत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाचे विमान एआय-१७१ च्या भीषण अपघातानंतर विविध स्तरांवर याबाबत चौकशी सुरु आहे. याबाबत DGCA ने आज एअर इंडियाला ३ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीजीसीएने पायलटला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिका आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यास सांगितले आहे. काढून टाकण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनाशी संबंधित पायल अरोरा यांचा समावेश आहे.

काल जारी केलेल्या आदेशात DGCA एअर इंडियाला तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ टेकऑफ नंतर लगेचच कोसळले. विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलला धडकले, ज्यामध्ये प्रवाशांसह एकूण २७० लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी डीजीसीएचा आदेश स्वीकारला आहे आणि त्याची अंमलबजावणी केली आहे.

निलंबीत अधिकाऱ्यांविरुद्ध ३ आरोप

नियमांविरुद्ध क्रू पेअरिंग केल्याबद्दल ३ आरोप आहेत
अनिवार्य उड्डाण अनुभव आणि परवाना नियमांचे उल्लंघन..

वेळापत्रक प्रोटोकॉलचे पालन न करणे..

एअर इंडियाने या अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून तात्काळ काढून टाकावे. या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ आंतर-शिस्तबद्ध कारवाई सुरू करावी. १० दिवसांच्या आत डीजीसीएला कळवावे.

दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांची नॉन-ऑपरेशनल पोस्टवर बदली करावी आणि त्यांना कोणत्याही उड्डाण सुरक्षा किंवा क्रू अनुपालनाशी संबंधित पदांवर काम करण्याची परवानगी देऊ नये. भविष्यात क्रू शेड्युलिंग, परवाना किंवा उड्डाण वेळेशी संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. ज्यामध्ये दंड, परवाना निलंबन किंवा ऑपरेटर परवानगी रद्द करणे समाविष्ट असू शकते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : संगीत आणि योग दोन्ही एकमेकांशी संलग्न आहेत. आणि योगायोग हाच की दोन्ही जागतिक दिवस हे एकाच दिवशी म्हणजेच २१ जून रोजीच साजरे केले जातात. 'जे एम एफ' शिक्षण संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय, वंदे मातरम् पदवी महाविद्यालय मध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात शिशु विहार ते पदवी पर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांनी जागतिक योग दिवस साजरा केला. 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, इतर पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे डॉ.निखिल शासने, डॉ.दिलीप मनोत, योग संचालक श्रीपाल मेहता, रंजना निकम यांनी सरस्वती व योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून योग प्रदर्शनास सुरुवात केली. नियमित योग करणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, आपले शरीर हे परमेश्वराने आपल्याला दिलेली संपत्ती आहे, ही संपत्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक योगा करणे आवश्यक आहे, केवळ आजच्या एका दिवशीच योगा करून स्वास्थ टिकणार नाही तर रोजच वेळ काढून योगा करणे हे फायद्याचे आहे, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. उपस्थित योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्व सांगून सर्व विद्यार्थी, शिक्षकांना योगाचे धडे दिले.
जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गायन, वादन सादर केले. भावनिक, शारीरिक, आणि मानसिक आरोग्यासाठी "संगीतोपचार"  पद्धत किती महत्वपूर्ण ठरते, तर संगीतामधले सात सूर घेऊन आपले आयुष्य संगीतमय होऊन जाते आणि हाच जगण्याचा निखळ आनंद म्हणजेच सप्तसुरांची गुंफण होय, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर डॉ.निखिल शासने यांनी संगीतोपचार पद्धतीने योगा कसा केला जातो याचे प्रात्यक्षिक  संगीताच्या तालावर  दाखवले व सर्व विद्यार्थी शिक्षकांनी देखील नृत्य करून आनंद घेतला. शारीरिक प्रशिक्षक श्री.रमेश वागे, सौ.वैशाली शिंदे यांनी देखील योगा प्रात्यक्षिके करून दाखवली. मनावरचा आणि शारीरिक ताण हलका करण्यासाठी रोज योगा करणे आणि संगीत ऐकणे, गुणगुणने या सारखे शक्तिवर्धक औषध कुठेच नाही असे प्रमुख पाहुण्यांनी आपल्या उपचार पद्धतीमध्ये नमूद केले. मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये उत्साहात योगा आणि संगीत दिवस पार पडला.