BREAKING NEWS
latest

मोबाईल ऍपद्वारे देशात पहिल्यांदाच मतदान प्रणाली ची प्रक्रिया..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
बिहार - भारताने निवडणूक प्रक्रियेत एक ऐतिहासिक पाऊल उचलत पहिल्यांदाच मोबाईल ऍपद्वारे मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. बिहार राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ४२ नगरपालिकांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये या नव्या प्रणालीचा वापर करण्यात आला. या पायलट प्रोजेक्टमध्ये सहा नगरपालिकांमध्ये ई-व्होटिंग ऍपच्या माध्यमातून मतदारांनी आपला हक्क बजावला. या उपक्रमासाठी “ई-वोटिंग SECBHR” नावाचं ऍप C-DAC आणि बिहार राज्य निवडणूक आयोगाने संयुक्तपणे विकसित केलं आहे. या ऍपमध्ये फेस रिकग्निशन, लाईव्ह फेस स्कॅन, ब्लॉकचेन तंत्रज्ञान यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाली आहे. या प्रयोगामुळे भारतात निवडणूक प्रक्रियेच्या डिजिटल परिवर्तनाला चालना मिळाली असून, भविष्यात देशभरात ही प्रणाली लागू करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे, दुबई, कतारसारख्या देशांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित बिहारी नागरिकांनीही या ऍपद्वारे मतदानात सहभाग घेतला. मोतिहारी येथील विभा या देशातील पहिल्या ई-मतदार ठरल्या, ज्यांनी ऍपद्वारे मतदान करून इतिहास रचला. या प्रणालीचा उद्देश म्हणजे मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांना जसे की स्थलांतरित कामगार, दिव्यांग, वृद्ध, गर्भवती महिला आणि गंभीर आजारी व्यक्ती यांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणं. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या ई-मतदानात ८०% पेक्षा जास्त मतदारांनी सहभाग घेतला, तर उर्वरितांनी पारंपरिक पद्धतीने मतदान केले.

उच्च न्यायालयाचे पप्पू कालानी यांच्या 'सीमा हॉली डे होम रिसोर्ट' मधल्या अनधिकृत बांधकामांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : येथील वरप गावातील अनधिकृत 'सीमा रिसॉर्ट' व सेक्रेड हार्ट स्कूलच्या सरकारी जमिनी बाबत जनहित याचिका क्र. ५३/२००५ दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना तेथील जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर ४ आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

टाडा कायद्यातंर्गत अटक केलेले तत्कालीन आमदार पप्पू कलानीचे अनधिकृत सीमा रिसोर्ट त्यावेळेचे जिल्हाधिकारी मधुकर पाटील यांनी २०-११-१९९२ रोजी जमिनदोस्त केले तेव्हा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता तसेच सिमा रिसोर्टच्या जमिनीत कलानी यांनी मातीचा अनधिकृत भराव केल्याच्या कारणावरुन पप्पू कालानी याचेवर महसूल विभागातर्फे रू. १९,९२,३००/- रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्या दंडाचा बोजा संबंधित ७/१२ व ८ अ उताऱ्यावर ठेवण्यात आला होता.

वरप येथील भूमिहीन शेतकरी दौलत उंदऱ्या भोईर, प्रकाश बाबू पावशे व दुंदा बाबू पावशे यांना सीमा रिसॉर्ट परिसरात नवीन शर्थी प्रमाणे शासनाने जमिनींचे वाटप केले होते. परंतु त्यांच्या जमिनीत मातीचा भराव टाकून कलानी यानी जमीन नापीक करून वापराखाली घेतल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सर्वे नंबर ५०/६ व अन्य जमिंनीच्या शर्थींचा भंग झाल्याने त्यांच्या नावाची नापीक शेतजमीन शासन जमा करावी या करिता दि. ०२/९/२००२ रोजी कल्याण तहसीलदार तसेच नंतर जिल्हाधिकारी, ठाणे यांना निवेदन दिले होते. मात्र त्यांनी कलानी यांस झुकते माप देऊन जमीन शासन जमा करणेकामी कोणतीही कारवाई केली नव्हती.

वरप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच भगवान भोईर यांनी काही कालावधी उलटल्या नंतर कलानी यांना बांधकाम परवानगी दिल्याने त्या ठिकाणी हळू हळू पून्हा नव्याने अनधिकृत बांध‌काम उभी राहीली तसेच राजकीय वरदहस्तामुळे पप्पू कलानीवर शासनाने सन १९९२ साली आकारलेल्या दंडाचा रुपये १९,९२,३००/- रुपयांचा बोजा कल्याण तहसीलदार रंगनाथ गरुड यांनी फेरफार क्र. ६३५ अन्वये शासनाच्या आदेशानुसार दिनांक २४-६-२००२ रोजी माफ करून शासनाचे नुकसान केले होते.

त्याच प्रमाणे वरप ग्रामपंचायतीच्या नाहरकती मुळे तसेच संमतीने वरप ग्रामस्थ आणीबाणी तसेच पुर संकटाच्या वेळी वापरीत असलेली सर्वे न. २६अ हिस्सा न १६ ही ५२ गुंठे क्षेत्राची सरकारी जमीन सेक्रेड हार्ट स्कूलच्या आलविन चाको यांस अनधिकृतपणे वापरण्यास दिली होती. 

पप्पू कलानीचा महसूल खात्याने माफ केलेला दंड रुपये १९,९२,३००/- वसूल करावा, वीज मंडळाची रुपये ४ लाख ७१ हजार थकबाकी वसुल करावी, सेक्रेड हार्ट शाळेच्या ताब्यातील ग्रामस्थांची ५२ गुंठे शासकीय जमीन मोकळी करावी या करिता पत्रकार अजित म्हात्रे, संतोष होळकर, समाजसेवक बालसुंदरम आरसन यांनी उच्च न्यायालयात सन २००५ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. 

दरम्यान, अजित म्हात्रे यांच्या निधनानंतर वकील ज्ञानेश्वर देशमुख यांच्या मदतीने संतोष होळकर व ईतर याचिकाकर्ते काम पाहत होते. सदर जनहित याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठा पुढे नुकतीच पार पडली.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रुपये १९,९२,३००/- दंडाची रक्कम व्याजासह वसूल करावी, अनधिकृत बांधकामा बाबत याचिकाकर्ते तसेच इतर सर्व संबंधितांना कळवावे, चौकशीत सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यावे तसेच सीमा रिसॉर्ट मधील जमिनींचा सर्व्हे करावा व अनधिकृत बांधकामा विरुद्ध ४ आठवड्यात पाडण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. ५३/२००५ सुरू असतानाही वरप येथील गावकऱ्यांच्या वापराची ५२ गुंठे सरकारी जमीन शासनाने सेक्रेड हार्ट स्कूलच्या नावे करून आलविन चाको याला देण्यात आली. सदर जमीन ग्रामस्थांना परत मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून वेळ पडल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे याचिकाकर्ते संतोष होळकर तसेच बालसुंदरम आरसन यांची तयारी असल्याचे त्यांनी कळविले आहे.

पंतप्रधान मोदींनी साधला अंतराळवीर सुभांशू शुक्लाशी संवाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) उपस्थित असलेल्या भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी थेट संवाद साधला. व्हिडिओ कॉलद्वारे पार पडलेला हा संवाद देशभरात प्रसारित झाला आणि नागरिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. शुक्ला हे 'अ‍ॅक्सिओम स्पेसच्या एएक्स-४' मोहिमेचे मिशन पायलट आहेत आणि १९८४ नंतर अंतराळात गेलेले पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून ओळखले जातात. त्यांनी फ्लोरिडा मधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेस एक्स च्या ड्रॅगन यानातून उड्डाण घेतलं होतं, ज्याअंतर्गत सात महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग सध्या अंतराळात राबवले जात आहेत.

संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी विचारले की, अंतराळात पोहोचल्यावर त्यांच्या मनात पहिला विचार कोणता आला? त्यावर शुक्ला म्हणाले की, बाहेरून पृथ्वी पाहताना कोणतीही सीमारेषा दिसत नाही, ती एकसंध आणि विलक्षण भासते. “तेव्हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आपल्या संस्कृतीचा खरा अर्थ समजला,” असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी पुढे अंतराळात सुरू असलेल्या प्रयोगांविषयी माहिती दिली, विशेषतः स्टेम सेल्सवरील प्रयोग वृद्धांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असंही ते म्हणाले. या संवादात एक हलकीशी हास्याची लहरही उमटली, जेव्हा शुक्ला यांनी त्यांच्या टीमला अंतराळात गाजराचा हलवा दिल्याचं आनंदाने सांगितलं, त्यावर मोदींनी हसून प्रतिक्रिया दिली – “तुमच्यातला भारतीयपणा तुमच्या अन्नातही दिसतो!”

हा संपूर्ण संवाद केवळ वैज्ञानिक  दृष्टिकोनातून नव्हे, तर भावनिक आणि सांस्कृतिक बंध प्रस्थापित करणारा ठरला. भारताच्या अंतराळ संशोधनाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात असून, पंतप्रधान मोदींनी आपल्या शेवटच्या शब्दांत म्हटलं “तुम्ही अंतराळात असलात, तरी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहात.” हा संवाद आणि शुक्ला यांचे योगदान अनेक भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी एका सराईत गुन्हेगारास दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूसासह केले जेरबंद..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहराच्या नेमणुकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम नामे सचिन शिंदे, राहणार: रोशन किराणा स्टोरच्या बाजुला बंदरपाडा, कल्याण पश्चिम याच्या ताब्यात दोन अग्नीशस्त्र व काडतुस आहेत. सदर मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने दिनांक २५/०६/२०२५ रोजी १६:४५ वा अधिकारी अंमलदार यांच्यासह रोशन किराणा स्टोअर्स च्या बाजुला, मोहने रोड, बंदरपाडा, कल्याण पश्चिम याठिकाणी सापळा कारवाई करून दुखापत व अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेला रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन गोपी उर्फ गोकुळ  शिंदे, (वय: ३० वर्षे), व्यवसाय फळविक्री, राहणार: स्वतःचे घर, रोशन किराणा स्टोअर्सच्या बाजुला, मोहने रोड, बंदरपाडा, कल्याण (पश्चिम) हा कोणतातरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याचे इराद्याने बेकायदेशिर रित्या विनापरवाना दोन गावठी बनावटीचे पीस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण १,००,५००/- (एक लाख पाचशे) रूपये किंमतीचे अग्नीशस्त्रासह मिळून आला. त्यास ताब्यात घेण्यात आले असुन सदर आरोपीच्या विरूद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४७/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ सह महा.पो.का.कलम ३७(१)१३५ अन्वये दिनांक २५/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपी यांची दिनांक ३०/०६/२०२५ रोजी पर्यंत  पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे हे करीत आहे.


अटक आरेापी याच्या विरूध्द यापुर्वी १) खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६/२०२३ भादंवि कलम ३२६, ५०४, ३४ प्रमाणे २) खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४४/२०२५ एनडीपीएस कायदा कलम ८(क) २०(ब) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 


सदरची कारवाई मा. आशुतोश डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, मा. डाॅ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भुषण कापडणीस, पोउपनिरी. सुहास तावडे, सपोउपनिरी. संदीप भोसले, पोहवा. ठाकुर, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, राठोड, कानडे, मपोहवा. पावसकर, पोना. हासे, मधाळे, चापोना. हिवरे, पोशि. वायकर, ढाकणे, पाटील, शेजवळ, मपोशि. भोसले यांनी यशस्वीपणे केली आहे.

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाकडून चर्चासत्राचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - सध्याच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विद्युत कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनीही अधिक दक्षता घेण्याची गरज आजच्या चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आली, राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्यामार्फत आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या महानगरपालिकांचे कार्यकारी अभियंता, विद्युत कर्मचारी, विद्युत कंत्राटदार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

भलेही आज सुरक्षेची अनेक उपकरणे आणि माध्यमे उपलब्ध झाली असली तरी विजेशी संबंधित कोणतेही काम करताना विद्युत कर्मचाऱ्यांनी खबरदारी आणि काळजी घेणे आवश्यकच आहे. कारण लहान लहान गोष्टींमधूनच मोठमोठ्या घटना आणि अपघात घडत असल्याचे या चर्चासत्रात सांगण्यात आले.
आताच्या काळामध्ये घराच्या इंटिरिअरकडे जितके लक्ष दिले जाते तितकेच घरातील वायरिंगकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा यावेळी अधोरेखित करण्यात आला. तर विद्युत वाहिनीचे काम करताना कितीही जुने आणि जाणते कर्मचारी अधिकारी असलात तरीही शॉक हा तुम्हाला सांगून लागत नाही. त्यामुळे काम करताना आपण सतत खबरदारी आणि दक्षता बाळगणे ही अत्यावश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

यासोबतच वीज मीटर फेजिंग आणि मुख्य वायरिंग, घरापासून मीटरपर्यंत येणारी वायर, काम करताना घ्यायची काळजी, पॅनलवर काम करताना घ्यायची काळजी, कोणती उपकरणे वापरावी, शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग, इमारतीमधील फायर फायटर यंत्रणेचे पॅनल, त्याची तपासणी, आरसीसीबी उपकरणाची गरज, एफआरएलएसएच केबलचे महत्त्व, आर्थिंग, अशा अनेक लहान मोठ्या मुद्द्यांवर महाराष्ट्र शासनाचे विद्युत निरीक्षक आर आर यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे, जाधव यांच्यासह इतर तज्ञ व्यक्तींकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच वीज वापर आणि  सुरक्षिततेबाबत भारत सरकारने नव्याने लागू केलेला सेंट्रल इलेक्ट्रिकल ऍक्ट' आणि त्यातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहितीही यावेळी उपस्थितांना देण्यात आली. 
या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे माजी संचालक टी. शंकर नारायण, महाराष्ट्राचे विद्युत निरीक्षक आर आर यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे यांच्यासह यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील वीज दरामध्ये होणार १० टक्के कपात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई - महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमईआरसी (MERC) महागाईने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील कोट्यवधी वीज ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. १ जुलै २०२५ पासून राज्यातील वीज दरामध्ये १० टक्क्यांनी कपात होणार आहे. विशेष म्हणजे, ही फक्त सुरुवात असून, पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण २६ टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होतील. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने एमईआरसी (MERC) महावितरणने दाखल केलेल्या एका विशेष याचिकेवर बुधवारी (२५ जून २०२५) हा निर्णय दिला. या निर्णयामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत याला राज्याच्या इतिहासातील ‘प्रथमच’ घडलेली घटना म्हटले आहे. यापूर्वी वीज दरवाढीच्या याचिका सादर केल्या जात होत्या, मात्र पहिल्यांदाच महावितरणने एमएसईडीसीएल (MSEDCL) वीज दर कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे.

राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे.

कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
कल्याण : कल्याण पश्चिम येथे आज भर दुपारी अडीच वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईसमोरच चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. पण, या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे. या भागात अजहर मणियार या रिक्षाचालकाचं घर आहे. त्याचा अडीच वर्षांचा मुलगा फजल घराच्या बाहेर उभा होता. फजलची आई घरात स्वयंपाक करत होती. तो मुलगा घराच्या दारात उभा होता. तितक्यात एका व्यक्तीने त्या मुलाला जवळ घेतले. आरोपीनं मुलाला जबरदस्तीनं घेतल्यानं मुलगा जोरात रडू लागला. मुलाचे रडणे ऐकून परिसरातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेलं.

मुलाला घेऊन जाणारी व्यक्ती नवीन दिसल्याने लोकांना संशय आला. त्यांनी आरोपीची विचारणा केली. त्याला उत्तर देता आले नाही. लोकांना पाहून तो घाबरला. त्यावेळी आरोपी मुलगा चोरण्यासाठी आल्याचे लोकांच्या लक्षात आलं. काही जणांनी त्याला मारहण केली. त्यानंतर त्याला बाजारपेठ पोलीसांच्या हवाली केले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी बाबासाहेब डुकले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव पूरीमणी आहे. तो सोलापूरमधील शास्त्रीनगर भागात राहतो. त्याच्याकडं सोलापूरचं तिकीट आढळून आलं अशी माहिती मिळत आहे.