BREAKING NEWS
latest

यंदाचा आषाढी एकादशीला डिजिटल वारीचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते नवीन उपक्रमाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दि ६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर डिजीटल वारी मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीयावरील व्हॉट्सऍप, फेसबुक, इंन्स्टाग्राम, X (ट्वीटर) व वेबसाईट या सोशल मिडीया चॅनल चे क्युआर कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. या कार्यक्रमास मराठी सिनेअभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरख मोरे आणि सिनेअभिनेत्री अक्षया देवधर हे देखील उपस्थित होते.

'जन गण मन' कॉन्व्हेन्ट शाळा, दावसा येथे दहावी, बारावी नंतर विद्यार्थांना करियर मार्गदर्शन व कौतुक सोहळ्याचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

नागपूर - इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कोणते क्षेत्र निवडावे यासाठी गोंधळून न जाता योग्य मार्गदर्शन लाभण्यासाठी 'जे एम एफ' शिक्षण  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शन शिबिर जन गण मन कॉन्व्हेन्ट, दावसा, ता. नरखेड शाळेमध्ये आयोजित केले होते.
'जान्हवीज मल्टी फाऊंडेशन' शिक्षण संस्थेचे हे वर्ष म्हणजे मुंबई आणि नागपूर (दावसा) येथे कार्यरत असलेल्या संस्थेचे 'रौप्य महोत्सव' म्हणून साजरे होत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, शाळेचे व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, मुख्याध्यापक श्री. भजन सर, तसेच उपस्थित पाहुणे डॉ. कैलाश कडू, प्राचार्य दिलीप फीसके, डॉ. मारोतराव कोल्हे, श्रीमती सुभद्रा रेंगे, श्री. युवराज कोल्हे, सौ. छाया घाटोळे, सौ. कल्पना कळंबे, श्री. राकेश भांगे त्याच बरोबर २०० पेक्षा जास्त दहावी बारावी चे उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन  व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक मुलगा अथवा मुलगी जन्मजातचं वेगवेगळे गुण आत्मसात करून जन्माला आलेला असतो, जसजसे मोठे होऊ लागतो तसतसे  अंगभूत असलेले हे गुण प्रगल्भ होऊ लागतात व आवड निवड ठरवू लागतात, सांगण्याचा उद्देश हाच की , तुमच्या मध्ये असलेले गुण हे आता विखुरले गेले आहेत त्यामुळे दहावी बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून देखील कोणत्या गुणवत्ते आधारे पुढे काय करायचे हा प्रश्न कायमच मनात सलत राहतो, त्यासाठी जसे हिऱ्याला पैलू पाडणारा उत्तम कारागीर मिळाला की त्याची चकाकी जगभर झळकते, तसेच उत्तम मार्गदर्शक लाभला की विद्यार्थ्यांचे भवितव्य चकाकते असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सगळेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील,वैज्ञानिक नाहीत बनू शकत, पण म्हणून खजील न होता त्या पदव्यांसारखे इतर अभ्यासक्रम देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत व ते तुम्ही करू शकता. प्रयत्न करत असताना आपल्या बुद्धिमत्तेला झेपेल असेच क्षेत्र निवडा असेही डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले.
     
एखादी गोष्ट अचूकपणे करायची आहे आणि ती मी करूनच दाखवणार हा ध्यास विद्यार्थी दशेत कायमच असला पाहिजे, परंतु मनावर आणि बुद्धीवर ताण न येऊ देता शांतपणे मार्ग काढत आपल्या योग्य विचारांच्या दिशेने जा, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना सांगून दिलासा दिला तसेच डॉ. कडू यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांनी करियर विषयी मनात रेंगाळत असलेले प्रश्न डॉ. राजकुमार कोल्हे यांना विचारले, व त्यांनी देखील विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन योग्य ती समाधानकारक उत्तरे दिली. मागील १२ वर्षा पासुन अशा प्रकारचा कौतुक सोहळा मुंबई पासून दावसा पर्यंत आयोजन करून 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' शिक्षण संस्था 'रौप्य महोत्सव' साजरा करत आहे. 
त्याच बरोबर इतर शाळेतून देखील सर्वोत्कृष्ट आदर्श शिक्षक व उत्कृष्ट मुख्याध्यापक निवडून त्यांनाही शाल, श्रीफळ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून, वंदे मातरम् म्हणून मार्गदर्शन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तुफान गर्दीत मराठीचा एल्गार करत अखेर ठाकरे बंधू आले एकत्र..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
मुंबई : राज्यातील हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करत सरकारने तो निर्णय मागे घेतल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र विजय मेळावा घेतला. या मेळाव्याचे निमित्ताने तब्बल १९ वर्षांनंतर दोघे एकत्र आले. मुंबईतील वरळीतील डोम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली होती. दोघांनीही विजय मेळाव्यातून सरकारवर घणाघात केला. त्यांनी भविष्यातही एकत्र राहण्याचे संकेत दिल्याने मनसैनिक आणि उबाठा सैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी या मेळाव्यासाठी वरळी डोम सभागृह पूर्ण क्षमतेने भरून गेले होते. जागा नसल्याने अनेक कार्यकर्त्यांना बाहेर थांबावे लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या मराठीप्रेमींनी तसेच चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी सभागृहात हजेरी लावली होती. या मेळाव्याला विविध पक्ष आणि क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, तसेच कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांची उपस्थिती होती. मात्र, या मेळाव्यात काँग्रेसचा एकही आमदार, खासदार किंवा प्रमुख नेते हजर नव्हते.
या मेळाव्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. वरळीतील ब्रास बँड पथकाच्या सादरीकरणातून वातावरण भारावून गेले होते. सन्माननीय उद्धव ठाकरे असा उल्लेख करत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. तिथले संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. पण पावसामुळे जागेची अडचण निर्माण झाली. त्यामुळे हा कार्यक्रम इथे घ्यावा लागला. मी एका मुलाखतीतही स्पष्टपणे सांगितले होते की कोणत्याही भांडणापेक्षा, मतभेदांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनी मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे अनेकांना जमले नाही, जे बाळासाहेबांनाही साधता आले नाही, ते देवेंद्र फडणवीसांना  जमले. त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आले. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता फक्त ‘मराठी’ या अजेंड्यासमोर ठेवून पार पडत आहे. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्या-वाकड्या नजरेने पाहू नये. हिंदीचा मुद्दा नव्हता. पण तो कुठून तरी अचानक आला. लहान मुलांनी हिंदी शिकावी, यासाठी सरकारकडून सक्ती केली जात आहे. कुणालाही विचारले जात नाही, शिक्षणतज्ज्ञांचंचे मत घेतले जात नाही. केवळ बहुमताच्या जोरावर सरकार निर्णय लादते. पण लक्षात ठेवा सत्ता तुमच्याकडे विधान भवनात आहे, रस्त्यावर मात्र आमच्याकडे सत्ता आहे.

उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आमच्यातला (राज आणि उद्धव) आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलो आहोत आणि आता एकत्र राहणार आहोत. हे पाहून अनेक बुवा-महाराज व्यस्त झाले आहेत. कुणी लिंबू कापत आहे, कुणी टाचण्या मारत आहे, तर कुणी अंगारे-धुपारे करत गावाकडे गेला आहे. रेडेही कापत असतील. पण त्यांना सांगतो या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला आणि आज आम्ही त्यांच्या वारसदार म्हणून तुमच्या पुढे उभे आहोत. हिंदी सक्ती तुमच्या सात पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही .आज भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेसाठी आज सर्वांनी वज्रमुठ दाखवली आहे. मुख्यमंत्री म्हणतात मराठीसाठी आंदोलन करणे म्हणजे गुंडगिरी आहे. आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी असेल, तर तुमच्या दरबारात न्याय मिळवण्यासाठी ही गुंडगिरीच करू. कारण, आजपर्यंत तुम्ही आम्हाला वापरून फेकले, पण आता आम्ही तुम्हाला फेकून देणार आहोत.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय वाढवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षकांसाठी प्रथमच झाली शिक्षण परिषद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

कल्याण : महापालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासह विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी प्रथमच शिक्षण परिषदेचे आयोजन कल्याण मधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेला आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवादही साधला.

“महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले महापालिका शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन!”

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निपुण भारत कार्यक्रम राबवला जात आहे, ज्यामध्ये महापालिका शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा पायाभूत बौध्दीक स्तर वाढवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची विनोबा भावे ऍपच्या माध्यमातून मराठी - इंग्रजी आणि गणित विषयाची चाचणी घेण्यात आली आहे. त्याद्वारे महापालिका शाळांतील विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत ते निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील ३ महिन्यांमध्ये महापालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला निपुण करून अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रारंभिक चाचणीमध्ये समोर आलेल्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर शिक्षकांना माहिती करून देणे, आवश्यक ते नियोजन करणे आणि ३ महिन्यात महापालिका शाळांतील हे सर्व विद्यार्थी अंतिम टप्प्यापर्यंत कसे पोहोचतील याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही पहिली शिक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. ज्यामध्ये महापालिका शाळांचे सर्व शिक्षक, सनियंत्रण अधिकारी, मार्गदर्शन करण्यासाठी काही शिक्षण अभ्यासकही सहभागी झाले होते.

महापालिकेकडून आता विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा आणि महापालिका शिक्षकांची शिक्षण परिषद ही दर महिना घेण्यात येणार आहे. जेणेकरून शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासह त्याची परिणामकारकताही समोर येईल आणि महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थी हे पायाभूत चाचणीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकतील. याची दखल न घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच या सर्व उपक्रमांमागील अंतिम ध्येय असल्याचा निर्वाळा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधताना दिला. तसेच ही काही अवघड गोष्ट नसून आपल्या महापालिका शाळांमधील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतात असा विश्वासही आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. या शिक्षण परिषदेला महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उप-आयुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे तसेच विनोबा भावे ऍपचे भैरव गायकवाड उपस्थित होते.

डोंबिवलीतील निळजे येथील कटाई-पलावा पुलाचे उदघाट्न संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, ४ जुलै - अनेक वर्षे कल्याण-शीळ मार्गावरून वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या प्रवाश्यांची वाहतूक कोडीतून काहीशी मुक्ती होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) माध्यमातून औपचारिकरीत्या निळज्यातील काटई-पलावा पुलाचे उदघाटन केले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी फित कापून अधिकृतरित्या पुलाचे उदघाट्न झाल्याचे जाहीर केले. यावेळी शिवसेनेचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निळजे काटई-पलावा पुलाच्या उदघाट्ना प्रसंगी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आम्ही फक्त ट्विट करत नाही तर आम्ही कामही करतो असे सांगत विरोधकांना टोलाही लगावला. गेले दहा वर्षे ज्यांनी काम करायला पाहिजे होते त्यांनी काहीही काम केले नाही. मात्र शिवसेना जे बोलते ते काम करते असेही सांगितले. कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. अनेक वर्षांपासून येथून वाहतूक करणाऱ्यांसाठी हा रस्ता डोकेदुखीचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे या मार्गावरील पलावा जंक्शन पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती.

या पुलाबाबत मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठवला होता. याच पुलाच्या कामावरून ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. तसेच या दोघांनी पलावा पुलाच्या ठिकाणी मोर्चे  काढून आंदोलनही केले होते. परंतु आता हा पुल नागरिकांसाठी शुक्रवारपासून खुला करण्यात आला आहे. आता पलावा एक्सपिरिया मॉल येथे वाहतूक कोंडी होणार नाही. वाहन चालकांना रखडावं लागणार नाही. यापूर्वी पलावा पुलाचं काम कधी पूर्ण होईल? असा प्रश्न विचारला जात होता त्यातून आता सुटका झाली आहे. आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे कामावरून घरी येणारी लोकं वेळेत घरी पोहोचतील. पण सत्ताधारी महायुतीने या पलावा पुलाचे उदघाट्न करताना गोपनीयता का ठेवली असेही विचारले जात आहे. शिवसेना कोणतेही काम गाजावाजा करून करते त्याला यावेळी फाटा देण्यात आला आहे.

निळजे काटई पलावा पुलाच्या उदघाट्ना प्रसंगी, लताताई पाटील, सदानंद थरवळ, राजेश कदम, महेश पाटील, बंडू पाटील, अर्जुन पाटील, दत्ता वझे, संजय पावशे, जनार्दन म्हात्रे, रणजित जोशी, भरत भोईर, सतीश मोडक यांच्यासह असंख्य  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

टिटवाळा : पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणाऱ्या आणि सरकारी माती चोरीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘पुढारी’ दैनिकाचे प्रतिनिधी अजय शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी'च्या तिघा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा कल्याण तालुका पोलीस ठाण्यात  या कायद्यांतर्गत नोंदविण्यात आलेला पहिलाच गुन्हा ठरला आहे. महाराष्ट्रात या कायद्याअंतर्गत साधारणत: ३६ गुन्हे नोंद आहेत.

दि.१८ जून २०२५ रोजी, शेलार यांनी प्रकाशित केलेल्या “सरकारी मातीची खासगी विक्री” या बातमीने प्रशासनात खळबळ माजवली होती. त्यानंतर संदीप नाईक या इसमाने २७ जून रोजी फेसबुक लाईव्ह करून आपल्या सहकार्यांसमवेत शेलार यांना “अजय शेलार पुन्हा आमच्या बातम्या लावशील तर समजून घे,आमच्या बातम्या करशील तर लक्षात ठेव" अशी थेट धमकी दिली, तसेच समाजमाध्यमांवर त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.

या संपूर्ण प्रकारामुळे शेलार यांचे प्राण धोक्यात आले असून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यालाच आव्हान उभे राहिले होते. शेलार यांनी यासंदर्भात टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’चे राज्य संघटक मंत्री संदीप नाईक, राजेंद्र जाधव व अनंता कोल्हे  हे तिघे प्रमुख पदाधिकारी आरोपी आहेत. या प्रकरणाची माहिती गृह राज्यमंत्री, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही देण्यात आली आहे.

या तक्रारीला दिलेल्या गंभीर प्रतिसादामुळे आता इतर पत्रकारांमध्येही एक विश्वास निर्माण झाला आहे की, पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदा आता प्रत्यक्षात उभा राहत आहे. हा गुन्हा केवळ एका पत्रकाराचा लढा नाही, तर ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या हल्ल्याला दिलेली सडेतोड प्रतिक्रिया आहे. प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न केंद्रस्थानी येणार हे निश्चित झाले आहे.

एमजीए फाउंडेशन आयोजित इनडोअर क्रिकेट स्पर्धेत ऑडिट आर्मीसला विजेतेपद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
 
मुंबई : एमजीए फाउंडेशनतर्फे मुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गोरेगाव (पश्चिम) येथे खेळली गेली. आघाडीची सल्लागार संस्था असलेल्या एमजीए ग्रुपतर्फे आयोजित दुसऱ्या टॅक्स प्रीमियर लीग (टीपीएल २.०) स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. कर सल्लागार, वित्त व कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या या अनोख्या क्रिकेट स्पर्धेने खेळासोबतच नेटवर्किंगलाही नवा आयाम दिला. या स्पर्धेत देशभरातील नामांकित कंपन्यांमधील व्यावसायिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मैदानावरील चुरशीच्या लढतींमधून संघभावना, समन्वय व एकोप्याचे उत्तम दर्शन घडले. व्यावसायिक जगतातील सहकार्य आणि सुसंवादाचे महत्त्व या स्पर्धेद्वारे पुन्हा अधोरेखित केले.
 
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात 'ऑडिट आर्मीज' संघाने 'रिटर्न्स मेकर्स'वर ८९-७७ असा १२ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात ऑडिट आर्मीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निणर्य घेतला व त्यांच्या फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवत ८९ धावा करताना विजयाचा पाया मजबूत केला. या वेळी ऑडिट आर्मीजच्या पहिल्या जोडीने (कृष्णा समंत्रा १९ धावा, १ षटकार व स्वप्निल शिंदे ८ धावा) २ षटकांत २७ धावा धावफलकावर लावल्या. तर दुसऱ्या जोडीने (सचिन कुंभार ९ धावा व नवीन सोमणी १५ धावा) २ षटकांत २५ धावा धावफलकावर लावल्या. तिसऱ्या जोडीने (मोहित कुमार १४ धावा केल्या त्यात त्यने एक षटकार सुध्दा खेचला व दिव्यांशु पटोडिया १० धावा केल्या पण ते दोघेही एक-एकदा बाद झाल्याने त्याच्या व संघाच्या धावसंखेतून ५,५ एकूण १० धावा वजा झाल्या) २ षटकांत १४ धावा मिळवण्यात यशस्वी ठरले. तर चौथ्या व शेवटच्या जोडीने (शिवेंद्र द्विवेदी १० धावा व विनय डालमिया (१८ – ५ = १३ धावा)) २३ धावांची भर घालत संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रिटर्न्स मेकर्सच्या पहिल्या जोडीने (गौरव अग्रवाल ११-५ = ६ धावा, १ विकेट व सुरेश नायर १७ धावा, एक षटकार) २३ धावा करून ऑडिट आर्मीजला जोरदार लढत देण्याचा इशारा दिला. दुसऱ्या जोडीने (हितेन रुघाणी ११ धावा व संस्कार शुक्ला ९-१५ = -६ धावा (३ वेळा बाद)) फटकेबाजी करण्याच्या नादात फक्त ५ धावा करण्यात यश मिळवल. तिसऱ्या जोडीने (चिंतन नाईक १७ धावा १ षटकार, २ विकेट व परिमल वाशी १२ धावा) २९ धावा काढत पुन्हा एकदा संघाला सुस्थित आणण्याचा प्रयत्न केला. तर चौथ्या व शेवटच्या जोडीला (गौरव रतन ८-१० = -२ धावा व सुधीर गुप्ता २२ धावा व दोन षटकार) फटकेबाजी करण्याच्या नादात २० धावाच करता आल्या. त्यामुळे रिटर्न्स मेकर्स संघाला १२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 

स्पर्धेचा बक्षीस समारंभ अतिशय भव्य स्वरुपात पार पडला. त्यावेळी एमजीए ग्रुपचे सहसंस्थापक मनीष अग्रवाल व आणि स्नेहा पाटील, क्षितीज वेदक (संस्थापक चेअरमन, महाइनडोअर (महाराष्ट्र) क्रिकेट असोसिएशन), बाळासाहेब तोरसकर (संस्थापक सेक्रेटरी, महाइनडोअर (महाराष्ट्र) क्रिकेट असोसिएशन) उपस्थित    होते. मनीष अग्रवाल आणि स्नेहा पाटील म्हणाले, “टीपीएल २.० ही केवळ क्रिकेट स्पर्धा नव्हती, तर ती होती कौशल्य, संघभावना व अनुपालन समुदायाच्या आत्म्याचा उत्सव. जेव्हा सहकारी मैदानावर एकत्र येतात, तेव्हा ते व्यवसायातही अधिक सशक्त भागीदार होतात. पारंपरिक ऑफिसच्या चौकटीपलीकडे जाऊन अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी अशा व्यासपीठांची गरज आहे.”
या उपक्रमाला महिमा अग्रवाल व ज्योतिका राय यांचा भक्कम पाठिंबा लाभला. त्यांनी संपूर्ण आयोजनात मोलाची भूमिका बजावली.