सांगली : राज्यभर नागपंचमीचा सण साजरा होt आहे. यामध्ये नागपूजेला विशेष महत्त्व असते. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या गावात जिवंत नागाची पकडून पूजा करण्याची प्रथा होती. ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी अनेक जण या गावात नागपंचमीच्या दिवशी येत असतं. पण, या प्रथेला काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानं त्यावर बंदी घाळण्याता निर्णय न्यायालयानं यापूर्वी घेतला होता. पण, आता २३ वर्षांनंतर ही प्रथा सुरु होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि जनजागृतीच्या उद्देशाने २१ नागराज सापांना पकडण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या कलम १२ च्या (ए) उपकलमांतर्गत ही मंजुरी दिली आहे.
राज्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी मंत्रालयाकडे सांगली जिल्ह्यातील शिराळा वन परिक्षेत्रातून २१ नर नागराज साप पकडण्याची परवानगी मागितली होती. या परवानगीनुसार, २७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतच सापांना पकडता येणार आहे. पकडलेले साप शिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात किंवा पकडलेल्या ठिकाणी सोडले जातील. केंद्राने ही परवानगी अनेक अटी व शर्तींसह दिली आहे, जेणेकरून सापांची सुरक्षितता आणि कल्याणाची खात्री केली जाईल.सापांची निवड आणि ओळख मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. साप पकडणे, सोडणे आणि शिक्षण हे सर्व स्थानिक वन/वन्यजीव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, मुख्य वन्यजीव संरक्षकांनी ठरवल्याप्रमाणे केले पाहिजे.
या संपूर्ण प्रक्रियेची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकांनी योग्यरीत्या नोंद ठेवली पाहिजे. साप पकडण्याचा एकमेव उद्देश स्थानिक तरुण आणि समुदायामध्ये सापांच्या संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारित करणे, तसेच परिसंस्थेतील सापांचे महत्त्व आणि त्यांचे उपयोगाबद्दलची स्थानिक पारंपरिक ज्ञानाची पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरण करणे हा आहे. कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक वापर किंवा मनोरंजन करण्यास परवानगी नाही. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सापांना कोणतीही इजा किंवा हानी होणार नाही याची खात्री मुख्य वन्यजीव संरक्षकांनी करावी. सापांचा मृत्यू होणार नाही याची विशेष काळजी घेतली जावी आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात विहित वेळेत सोडावे.
हा संपूर्ण उपक्रम राज्य वन विभागाच्या (स्टेट फॉरस्ट डिपार्टमेंट) कठोर देखरेखीखाली होईल. यामध्ये प्रशिक्षित सर्पमित्र, पशुवैद्यकीय व्यावसायिक आणि पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याची खात्री मुख्य वन्यजीव संरक्षकांनी करावी, जेणेकरून साप आणि सामान्य नागरिक दोघांचेही कल्याण जपले जाईल. साप पकडण्याच्या आणि सोडण्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य पशुवैद्यकीय काळजी घेतली पाहिजे आणि अत्यंत सावधगिरीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. सापांना पकडल्यानंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य काळजी घ्यावी.सापांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी कोणतीही घटना घडल्यास, मंत्रालय दिलेल्या परवानगीचा आढावा घेण्याचा आणि गरज पडल्यास ती रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते. मुख्य वन्यजीव संरक्षकांनी लागू असलेल्या सर्व कायदे, नियम आणि नियमांनुसार पालन सुनिश्चित करावे.