BREAKING NEWS
latest

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांत अधिक पाऊस झाला असून, हवामान खात्याने १७ ते २१ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, सद्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागातील ८०० गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोला, चांदूर रेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार २ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत १७० मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील १० ते १२ तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस अलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावे, दरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी, तसेच निवारा केंद्रात भोजन, शुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई दि. १८ :  मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर रेड अलर्ट देण्यात आलेल्या मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड , नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांना आज, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याकडून मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई सह या सगळ्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरसह या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने सुट्टी जारी करण्यात आली आहे. या शिवाय स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून संबंधित जिल्हाधिकारी, शाळा मुख्याध्यापक यांना शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली:  भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला आणि भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क आणि अधिकार मिळाले त्याच मातृभूमीसाठी आणि आपल्या शूरवीर शाहिद जवानांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. योगायोग हाच की गोकुळ अष्टमी देखील याच दिवशी असल्याकारणाने मोठ्या जल्लोषात उत्सवचं साजरा करण्यात आला.
'जे एम एफ' संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय व वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या प्रांगणात झेंडा वंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, प्रमुख पाहुणे डॉ. गुजराथी तसेच इतर पदाधिकारी व सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली त्यावेळी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगान व झेंडावंदन गीत गाऊन सलामी दिली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेची व श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याच बरोबर नृत्य शिक्षक अभिषेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर नृत्य तर शिक्षिका कविता गुप्ता व नितेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर नाटक सादर केले. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील भाषण व नृत्य सादर केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि भारतीय एकात्मता हीच भारताचा अमूल्य ठेवा म्हणून भारत देशाची ओळख निर्माण झाली, "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत." ही वचनबद्ध प्रतिज्ञा प्रत्येक भारतीयांच्या मनात, हृदयात कृतज्ञता पूर्वक एकात्मतेचे प्रतीक बनून राहिली आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर देशाच्या सीमेवर जाऊन लढले म्हणजेच देशसेवा केली असे नाही तर कुठेही कचरा न टाकता स्वच्छ भारत, सुंदर भारत करणे ही सुद्धा देशाचीच सेवा आहे असे संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. यावेळी १९४७ सालापासून ते २०२५ पर्यंतच्या काळात देशात कोणकोणत्या अलौकिक घटना घडल्या त्या घटना क्रमांकाची चित्रफित दाखवण्यात आली. पुस्तकी इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच त्या काळी घडत असलेल्या घटना विद्यार्थ्यांना बघून समजावा असा इतिहास दाखवण्यात आला, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी प्रत्येक घटनेचे सविस्तर वर्णन करून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रसार माध्यमाचे मुख्य संपादक रोहित राजगुरु, अखिल नायडू व त्यांच्या चमू ने चित्रफित तयार केली.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच बाळगोपाल्यांच्या आवडीचा कृष्ण जन्माष्टमी सोहळा व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णाचे सुंदर गीत गाऊन भक्तीमय वातावरण तयार केले तर नाट्य शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राधा कृष्ण नाटक सादर केले व इतर विद्यार्थ्यांनी रासलीला नृत्य सादर केले. "लाख असतील कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला.." सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सुंदर अशा पंक्ती म्हणून आपल्या कृष्ण कथेला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिन आणि कृष्ण जन्म हा एकाच दिवशी आला हा योगायोग आहेच खरे, पण या दोन्ही गोष्टीत एकच साम्य आहे ते म्हणजे, दोन्हीकडे असणारे 'तुरुंग ' बराच काही इतिहास सांगून जातो, ज्यादिवशी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशासाठी तुरुंगात असलेले वीर बाहेर पडले व स्वतंत्र झाले तर श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला आणि तोही कंसाच्या तावडीतून वाचण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडला.. असा इतिहास म्हणजे कर्मासाठी आणि धर्मासाठी असलेला दैवी दुवा आहे असेही डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी नमूद केले. कृष्ण कोण होता आणि त्याच्या लीला कशा होत्या याची माहिती त्यांनी आपल्या चित्रफिती मध्ये दाखवली.
मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये मोठी दहीहंडी बांधून बाळकृष्ण बनून आलेल्या छोट्या मुलांचे थरावर थर तयार करून जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली. प्रसाद वाटप होऊन सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक श्री. योगेश शिरसाट व विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी मीरा यांनी केले.

नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पुणे, दि.०१– आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ चे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रोहित टिळक, सुशील कुमार शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

१९८३ साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली. सर्व प्रथम एस.एम.जोशी यांना टिळक पुरस्कार पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे हे ४३ वे वर्ष आहे. दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता मागील वर्षी हा पुरस्कार सुधा मूर्ती यांना देण्यात आला.

लोकमान्य टिळक हे आमच्यासाठी प्रेरणा स्थान आहे. त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार मला मिळाला मी भाग्यवान आहे, टिळक हे राष्ट्रीय निर्माते होते. सत्ता कारणाचे रूपांतर हे समाज कार्यात झाले पाहिजे. स्वातंत्र्य हे राष्ट्रपुरुषांच्या बलिदानाने मिळाले आहे. अविचारी माणसे धाडसी निर्णय घेतात असे नितीन गडकरी आपल्या सत्काराच्या उत्तरात म्हणाले.

५० हजार कोटींची पुणे शहरात काम होणार आहेत. मुंबई-बंगलोरचे काम लवकरच होणार आहे. स्वराज्य आणि समाज सुधारणा देखील पाहिजे. महाराष्ट्र सर्वात जास्त रेव्हेन्यू देत आहे. भारत आता ३ नंबर ची अर्थव्यवस्था आहे. आत्मनिर्भर भारत चे स्वप्न आपले पूर्ण होणार आहे. आटोमोबाईल मध्ये भारत येणाऱ्या काळात सर्वात मोठा देश होणार आहे. लोकमान्यांचे स्वराज्याचे सुराज्य बनवण्याचे काम आपण केले पाहिजे, असे ही गडकरी म्हणाले. टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आपण केले पाहिजे असे नितीन गडकरी म्हणाले.

कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत स्वामित्व महामंडळाकडेच..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. ०१ :– कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र-कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास 'जीआय टॅग' प्राप्त आहे. या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत 'स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' (एलआयडीसीओएम) आणि 'डॉ. बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' (एलआयडीकेएआर) या दोन महामंडळाकडेच असल्याचे दोन्ही महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले आहे.

जून २०२५ मध्ये, इटलीच्या प्रसिद्ध ‘प्राडा’ ब्रँडने पुरुषांसाठी आपले ‘स्प्रिंग/समर’ कलेक्शन सादर केले. या फॅशन शोमध्ये मॉडेलने परिधान केलेल्या लेदर सँडल्सचे डिझाइन महाराष्ट्रातील पारंपरिक आणि जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलप्रमाणे अत्यंत साम्य दर्शवणारे असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर सामाज माध्यमांवर व पारंपरिक कारागीर समूहांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर वकिलांच्या एका गटाने भौगोलिक संकेतचिन्ह (जिआयगी टॅग) ने संरक्षित असलेल्या कोल्हापुरी चपलेसारखं डिझाइन वापरून कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल प्राडाला आव्हान देणारी एक जनहित याचिका (पिआयएल) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. १६ जुलै २०२५ रोजी खंडपीठाने ही जनहित याचिका फेटाळून लावतांना असा निर्णय दिला की, अशा बाबींसाठी फक्त कोल्हापुरी चपलेच्या भौगोलिक संकेतचिन्हाचे नोंदणीकृत धारक म्हणजेच 'महाराष्ट्र आणि कर्नाटक चर्मोद्योग विकास महामंडळे' ही यातील प्रत्यक्ष भागधारक असल्याने, त्यांनाच अशा प्रकारची दिवाणी कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

या पार्श्वभूमीवर, लिडकॉम आणि लिडकर या महामंडळाने कोल्हापुरी ग्लोबल जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत मालक असून त्यांनी संयुक्तपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, प्राडा किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थांशी कोणत्याही प्रकारचे संवाद, चर्चा किंवा प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला नाही.

कोल्हापुरी चप्पलांचा इतिहास हा १२ व्या शतकातील संत परंपरेपासून ते २० व्या शतकातील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगतिकारक धोरणांशी निगडित आहे. 'लिडकॉम' आणि 'लिडकर' यांचा एकत्रित उद्देश केवळ भौगोलिक संकेताचे संरक्षण करणे नसून, हजारो स्थानिक चर्मकार कारागीरांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि या परंपरेचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठामपणे ठसा उमटवणे आहे, असे व्यवस्थापकीय संचालक लिडकॉम प्रेरणा देशभ्रतार व व्यवस्थापकीय संचालक लिडकर के.एम. वसुंधरा यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

गोकुळाष्टमी निमित्त राज्यातील १.५० लाख गोविंदांना राज्य सरकार तर्फे विमा संरक्षण कवच..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. ०१:– गोकुळाष्टमी अर्थात दहिहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारात युवक-युवती “गोविंदा” म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षांत सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून, अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो.
गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावे म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा राज्यातील सुमारे १.५० लाख गोविंदांना “गोविंदा समन्वय समिती (महाराष्ट्र)” या नियोजन समितीच्या माध्यमातून “ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी” चे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गोविंदांसाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीने मंजूर करून दिल्याबद्दल राज्यभरातील लाखो गोविंदांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

गेल्या वर्षी १.२५ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून १.५० लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचवले जाणार आहे.

दहीहंडी २०२५ मध्ये गोविंदांसाठी विमा संरक्षण – शासन निर्णय निर्गमित

यावर्षी राज्यभरातील अंदाजे १,५०,००० गोविंदांना विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत “दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई” या कंपनीचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे.

महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन, अंधेरी (पूर्व), मुंबई यांच्यामार्फत आवश्यक कागदपत्रे सादर करून विमा रकमेचा खर्च शासनाकडून अदा केला जाणार आहे. क्रिडा व युवक सेवा विभाग, मुंबई यांना यासंदर्भात सुसंवाद आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एकूण रु. १,१२,५०,०००/- (एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये) इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार
उप सचिव (सुनील पांढरे) यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या शासन आदेशानुसार संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना तत्काळ राबवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

लाल परी आता करणार रिटेल (किरकोळ) इंधन विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई दि. ०१ :  उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना दिली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे सोईस्कर नाही. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ 'इंडियन ऑइल' आणि 'भारत पेट्रोलियम' या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून या द्वारे केवळ एसटीच्या बसेस साठी डिझेल इंधनाचे वितरण होते. अर्थात, पेट्रोल पंप चालवणे आणि त्याचे देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एसटी महामंडळाच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यात केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम असलेल्या 'इंडियन ऑइल', 'भारत पेट्रोलियम' आणि 'हिंदुस्तान पेट्रोलियम' या ऑइल विक्री करणाऱ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करून सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल व तत्सम इंधन विक्री करणारे पंप उभा करणे प्रस्तावित आहे.

असे पेट्रोल पंप हे रस्त्यालगत व व्यावसायीक दृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा आहेत, त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा २५ बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल! यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक भागिदारी तुन चांगला महसूल देखील मिळू शकतो.

मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या केंद सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांशी राज्य शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेले एसटी महामंडळाशी व्यावसायिक भागीदारीचा करार करण्यात येईल! अर्थात, हा करार एका अर्थाने केंद्र आणि राज्य शासनाच्या दरम्यान होत असल्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वितरणामध्ये पारदर्शकता राहील.

यासाठी संबंधित कंपन्यांनी राज्यभरात एस टी महामंडळाच्या सर्व जागांचे व्यावसायिक सर्वेक्षण करून २५१ ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाचे एसटी महामंडळाच्या स्वतःच्या नव्या व्यवसायिक दृष्ट्या मोक्याच्या २५ बाय ३० मीटर जागेवर स्थलांतर केले जाईल, जिथे एसटी महामंडळाला स्वतःच्या बसेससाठी इंधन भरण्याची सोय असेल याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकाला देखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल. अशा पद्धतीचे "पेट्रो-मोटेल हब” उभा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.