BREAKING NEWS
latest

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेर पर्यंत खुले होणार – मुख्यमंत्री फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : मेट्रो ४ आणि ४-अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणे आणि मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल. २०२६ च्या ऑक्टोबर पर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मेट्रो मार्ग ४ (वडाळा-कासारवडवली) व ४-अ (कासारवडवली-गायमुख) च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव-घोडबंदर रोड- कासारवडवली-विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो मार्ग ४ आणि ४-अ बद्दल माहिती देताना म्हणाले की, घाटकोपर-मुलुंड-गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून मेट्रो ४ ची ३२ कि.मी. आणि मेट्रो ४-अ ची २.८८ कि.मी आहे. मार्गिकेत एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ४, मेट्रो ४-अ, मेट्रो १० आणि मेट्रो ११ या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्याकरिता भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा असा आहे की, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ही ५८ किमी लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरु झाल्यावर यामध्ये १३ लाखापेक्षा जास्त दैनंदिन प्रवासी प्रवास करतील. या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे टप्प्याटप्प्याने सर्व टप्‍पे प्रवाशांकरिता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये..

बीईएमएल (BEML) चे ६-डब्यांचे ट्रेन-सेट्स, जे मेट्रो मार्ग २ अ व ७ वर चालत आहेत त्याच पध्दतीच्या आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली, अडथळा (Obstacle) शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली (सुमारे ३०% बचत) या सुविधा असतील.

या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व धाव चाचणी करून, एमएमआरडीए ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी मेट्रो मार्ग ४ व ४-अ कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.

समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारे हे सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच या सरकारचे धोरण आहे. कै.अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. या माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट येथे आज स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप तसेच मोठ्या संख्येने माथाडी कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम कै. आमदार अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी संघटनेसाठी एक संघटन उभे केले. आपल्या समाजातील लोकांच्या हितासाठी, माथाडी कामगारांच्या विकासासाठी एखादी व्यवस्था उभारण्यासाठी आपले घर-संसार पणाला लावणारे नेते इतिहासात कमीच आढळतात. त्यापैकी कै.आमदार अण्णासाहेब पाटील हे एक होते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी कै.अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली. या चळवळीला त्यांनी संघटित स्वरूप दिले. अण्णासाहेबांच्या त्यागामुळे आणि प्रयत्नांमुळे माथाडी कामगारांना आवाज मिळाला, सुरक्षा मिळाली आणि पुढील पिढ्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळाला. अण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठीचे योगदान सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेबांनी मोठा लढा दिला. मराठा समाजासाठी बलिदान दिले असेल तर ते अण्णासाहेब पाटील यांनीच दिले. त्यांच्या बलिदानातूनच मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पुराव्याअभावी आरक्षणापासून वंचित असलेला मराठा समाज आता आरक्षणासाठी पात्र ठरला आहे. या माध्यमातून अण्णासाहेबांच्या चळवळीला हातभार लावण्याचे काम या सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.

मराठा समाजाचे प्रश्न केवळ आरक्षणाने सुटणार नाहीत. त्यासाठी मराठा तरुणांसाठी शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना सुरू केली आहे. शिक्षणासाठी शहरात राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भत्ता म्हणून दरवर्षी ६० हजार रुपये देण्यात येतात. मराठा तरुण-तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळावे, त्यांना एमपीएससी, युपीएससी परीक्षा देता याव्यात यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन केली. आतापर्यंत सारथीच्या माध्यमातून ११२ तरुण आयएएस आणि आयपीएस म्हणून नियुक्त झाले आहेत. १ हजार ४८ तरुण-तरुणी महाराष्ट्र शासनात एमपीएससीद्वारे अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. आतापर्यंत सारथीच्या योजनांचा ८ लाख ३८ हजार ४७७ तरुण-तरुणींनी लाभ घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मराठा तरुणांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात आले असून, या महामंडळातून दीड लाख तरुण-तरुणी उद्योजक झाले आहेत. त्यांना कर्जाच्या स्वरूपात १३ हजार ५०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, असे महत्त्वाचे निर्णय आपल्या सरकारने मराठा समाजासाठी घेतले असून, अशाच प्रकारचे विविध निर्णय इतर समाजातील तरुणांसाठीही घेण्यात आले आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण आहे.

माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या चौकटीत राहून जे करणे आवश्यक आहे ते आम्ही निश्चित करू. नियमांनुसार माथाडी कामगारांना जे काही देता येईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जाईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “देवा भाऊ” असा उल्लेख करून मराठा समाज आणि माथाडी कामगारांसाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्यांचे आभार मानले. त्यांनी माथाडी कामगारांच्या निवासासाठी स्वस्त दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून दीड लाख उद्योजक निर्माण करता आले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात माथाडी कामगारांचे सध्याचे प्रश्न मांडले. यावेळी माथाडी भूषण मानकरी श्री. दिनकर कृष्णा काटकर, विश्वास कृष्णराव पिसाळ, जनाबाई नारायण धुमाळ, वामन सिताराम वैद्य, मधुकर साहेबराव कदम, राजेंद्र खाशाबा लंभाते, प्रदीप गजानन भगत, अनिल सुरेश खताळ, दत्तात्रय ज्ञानदेव कवर, लक्ष्मण दिलीप पाटील, दीपक नारायण आहेर, भिमराव दशरथ चव्हाण, शशिकांत विष्णू यादव, शंकर भिकाजी शिंदे, संतोष गोणबा गाढवे, सुभाष बळवंत यादव, गौतम शनिचर भारती यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोनल गुंजाळ, संभाजी शिवाजी बर्गे, सुनील धोंडे, मयूर मगर, अंकुश संकपाळ या लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.

पुन्हा एकदा 'जे एम एफ' संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाचे 'मुक अभिनय' स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ५८ व्या युवा महोत्सवामध्ये वर्चस्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  मुंबई विद्यापीठामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'एकांकिका नाटक स्पर्धा' व 'मूक अभिनय' स्पर्धेमध्ये 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे रौप्य पदक व सुवर्ण पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. दिवेश मोहिते, पराग सुतार, तन्वी गुरव, मंथन पाटील, मितेश पाटील, निधी अमीन त्याच बरोबर सहकारी सिद्धार्थ कटारे, स्नेहा मिश्रा यांनी मूक अभिनय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून प्रथम स्थान निश्चित केले व पुन्हा एकदा 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोचला. नाटकाचे दिग्दर्शन शुभम जाधव यांनी केले सांस्कृतिक समन्वयक मयांक कोठारी यांनी प्रतिनिधित्व केले. मिस मृणाली जाधव यांनी या सर्वांचे नेतृत्व केले 
      
यशाची पायरी चढताना अपयशाच्या पायऱ्यांनाही तेवढेच महत्व असते, म्हणूनच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते. नाटक आणि अभिनय स्पर्धेमध्ये अनुक्रमे रौप्य आणि सुवर्ण पदक मिळवून तुम्ही वंदे मातरम् महाविद्यालयाला सन्मानित केले आहे त्याला तोड नाही, भविष्यात देखील अशीच अनेक यशाची उत्तुंग शिखरे चढत रहा आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करा असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थांना सांगून अभिनंदन करून शुभेछा दिल्या.
      
दर सेकंदाला माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात म्हणजेच रोजच्या वास्तविक जीवनात देखील मनुष्य नकळतपणे मूक अभिनय करतच असतो, नामांकित स्पर्धेमध्ये  औपचारिक रित्या सहभागी होऊन  मूक अभिनय करून  प्रेक्षकांकडून जी तुम्ही दाद मिळवली व सुवर्ण पदक पटकावले त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन असे म्हणून  सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे देखील मुलांच्या आनंदात सहभागी झाल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर,  उप प्राचार्या सौ. वनिता लोखंडे,  मुख्य समन्वयक सौ. मंजुळा धावले तसेच सर्व 'जे एम एफ' परिवार यांनी पदक विजेते विध्यार्थ्यांचे कोटी कोटी अभिनंदन केले.

एसटी मध्ये १७४५० चालक, सहाय्यकांची पदे भरण्याची मेगा भरती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई:  एसटी मध्ये मोठी नोकरभरती जाहीर झाली आहे. आगामी नवीन बसेससाठी कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यकांची भरती करण्यात येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरतीसाठी किमान वेतन ३० हजार रुपये असणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ३ वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल.

डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, यांच्या तर्फे शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्त डोंबिवलीत 'रासरंग - २०२५ उपक्रमाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व कार्यसम्राट डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' हा शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी १० व्या वर्षात पदार्पण करत असून २२ सप्टेंबर २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी डी.एन.सी. रोडवरील शाळेच्या मैदानावर भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २०१७ पासून 'डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन' आणि 'श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली' यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबवणारे हे फाऊंडेशन सर्वसामान्य जनतेसाठी सेवाभावी कार्य करत असून, त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हा रास रंग नवरात्र उत्सव.
सदर नवरात्र उत्सवाची घटस्थापना २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता होणार असून देवीची आरती दररोज सकाळी ११:०० वाजता आणि संध्याकाळी ७:०० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे. या नवरात्र उत्सवाचा उद्घाटन सोहळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार माननीय राजेश मोरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय गोपाळ लांडगे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:०० वाजता नऊ विविधरंगी २१०० फुगे आसमंतात सोडून करण्यात येणार आहे. दररोज रात्री ८:३० वाजता विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता भोंडला सोहळा आणि ३० सप्टेंबर - दुपारी ३:०० वाजता कुमारीका पूजन / कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्रपणे आव्हान महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. लताताई पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज सायं. ७:३० ते रात्री १०:००  प्रसिद्ध तबलावादक व संगीतकार नैतिक नागदा यांच्या ऑर्केस्ट्राद्वारे दांडिया-गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डोंबिवली शहरासह अनेक शहरांतील युवक-युवती मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होण्यासाठी नवरात्र उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. रास रंग २०२५ नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या मान्यवर मंडळी, दुर्गा भक्त व दांडिया प्रेमींच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था डीएनसी रोडवरील श्री स्नेहांकित मित्र मंडळाच्या कमानी शेजारील भूखंड, कलावती आईच्या मठासमोर या ठिकाणी करण्यात आलेली असून दुचाकी, चार चाकीने येणाऱ्यांनी इतर ठिकाणी पार्किंग करून रहदारीस अडथळा न करता या पार्किंग व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये राबविण्यात येणारे आरोग्य सेवा, शिक्षण, क्रीडा प्रोत्साहन, महिला सबलीकरण, सांस्कृतिक जतन आणि धार्मिक एकोपा यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास करून कायापालट घडवून आणणाऱ्या डॉ. शिंदे यांचे योगदान आणि जनतेवरील प्रेम या उत्सवाच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे. या शारदीय नवरात्र उत्सवात जास्तीत जास्त दुर्गाभक्त, युवक-युवती, महिला आणि गरबा-प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्यावतीने शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी डीएनसी शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेसाठी शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार माननीय राजेश मोरे, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख आणि जेष्ठ नगरसेवक रवी मट्या पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ, युवा सेना डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, ज्येष्ठ नगरसेवक नितीन मट्या पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजन मराठे, ज्येष्ठ नगरसेवक रणजीत जोशी, माजी नगरसेवक संजय पावशे, माजी नगरसेविका सारीकाताई चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख विवेक खामकर, शिवसेना कल्याण तालुका सचिव बंडू पाटील, कल्याण ओपन तालुकाप्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन मोतीराम पाटील, युवा सेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, शहर सचिव संतोष चव्हाण, शाखाप्रमुख अमित बनसोडे, व्यापारीं संघटनेचे गजानन व्यापारी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक उज्वलाताई भोसले, महिला आघाडीच्या केतकीताई पोवार, माजी नगरसेवक तथा खासदार कार्यालयाचे प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेना महिला आघाडी युवा सेनेचे अनेक मान्यवर महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'५८ व्या युवा महोत्सव' सांस्कृतिक कार्यक्रमात 'जे एम एफ' संचालित 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावत केले भव्य यश संपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये १२ झोन मधील ३६० महाविद्यालय व त्यातून सुमारे ४५ महाविद्यालयांची अंतिम सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सहभाग दर्शवला होता. डोंबिवली येथील 'जे एम एफ" शिक्षण संस्थेच्या वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाने मराठी नाटक सादर करून ४५ महाविद्यालयांमधून 'रौप्य पदक' प्राप्त करून आपला दुसरा क्रमांक निश्चित केला.
मराठी गट नाटक 'अ' मधून दिवेश मोहिते, साई कुडतुडकर, यश बाडेकर, सानिका तांबोळी, दुर्वा घाडी, तन्वी गुरव या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बाजी मारली तर संगीतकार आयुष सावंत व संस्कार कदम यांनी अवीट गोडीचे संगीत दिले. नाट्य दिग्दर्शक प्रथमेश देवकुळे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. सांस्कृतिक विभागाच्या संयोजक मिस मृणाली यांनी जातीने लक्ष घालून सांस्कृतिक विभागाची धुरा सांभाळली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे अभिनंदन व कौतुक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल तुम्ही सर्वांनी वंदे मातरम् महाविद्यालयाचे नाव उज्वल केले तर मिळालेल्या यशाचे श्रेय हे कोणा एकाचे नसून सर्व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या समुदायाचे असते, तुमच्या मधील दिसणारे प्रयत्न, एकी आणि जिद्द हेच खरे तर चकाकणारे 'रौप्य पदक' आहे असे सांगून सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मराठी नाटकाची अस्मिता जागरूक ठेवून दर्जेदार नाटक लिहून सर्वच  विद्यार्थी कलाकारांनी आणि दिग्दर्शकाने झोकून देऊन रौप्य पदक भूषविले व आपल्या सांस्कृतिक शहर डोंबिवली आणि 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयचे नाव रोशन केले त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.असे संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर, उप प्राचार्या डॉ.वनिता लोखंडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वानी या सर्वांचे अभिनंदन केले.

ठाणे गुन्हे शाखेने २८ वाहने हस्तगत करत वाहन चोरी प्रकरणाच्या २६ गुन्ह्यांचा छडा लावत प्रकरण केले उघडकीस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१२ - ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत सराईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २८ वाहने (दुचाकी व चारचाकी) जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ठाणे शहर, बृहनमुंबई, नवी मुंबई व ठाणे ग्रामीण हद्दीतील २६ गुन्ह्यांचा छडा लावत वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत १७ लाख ८९ हजार ८९९ रुपये इतकी आहे.

अटक केलेले आरोपी

गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण व घटक-२ भिवंडी यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत खालील आरोपींना जेरबंद केले आहे..
१) अतुल सुरेश खंडाळे (वय:२४ वर्षे, राहणार. हडपसर, पुणे)
२) शेखर गोवर्धन पवार (वय:३० वर्षे, राहणार. जळगाव)
३) आकाश मच्छिंद्र नसरगंध (वय:२३ वर्षे, राहणार. चक्की नाका, कल्याण पश्चिम)
४) गाझी लकीर हुसैन (वय:१९ वर्षे, राहणार. आंबिवली, कल्याण)
५) मुश्ताक इस्तीयाक अंसारी (वय:३१ वर्षे, राहणार. भिवंडी)

उघडकीस आलेले गुन्हे

अटक आरोपींकडून भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, अंबरनाथ, वासिंद, तळोजा, नवी मुंबईसह मुंबईतील धारावी, कांदिवली, माहिम, नवघर पोलीस ठाण्यात दाखल असलेले २६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यामध्ये भादंवि कलम ३७९ व भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) ठाणे शहर, व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पथकाची कामगिरी

या तपास मोहिमेत वपोनि. जनार्दन सोनवणे (घटक-२, भिवंडी), वपोनि. अजित शिंदे (घटक-३, कल्याण) यांच्यासह सपोनि. श्रीराज माळी, मिथुन भोईर, सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, तसेच अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता. महिलांसह जवळपास ५० हून अधिक अंमलदारांच्या अथक प्रयत्नांमुळे ह्या मोठ्या चोरी प्रकरणांची मालिकाच उघडकीस आली आहे. ठाणे पोलीसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरी प्रकरणाला दिलासा मिळाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.