BREAKING NEWS
latest

मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना आणि बीड  येथील आसपासच्या गावातील बऱ्याचशा भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाल्याकारणाने शिवसेनेच्या माध्यमातून एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार, संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे ह्यांच्या नेतृत्वात मराठवाडा येथील जालना, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात एकूण ४५०० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंची मदत पोहचविली जात आहे. आज बीड जिल्हा तालुका बीड येथील कुर्ला गाव येथे सकाळी १० वाजता सिंदपाना नदी किनाऱ्यावरील एकूण १४ गावांच्या आपतग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गरजेच्या वस्तू असलेल्या किट चे वाटप करण्यात आले.
शिवसेना कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे ह्यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक राजन मराठे, डोंबिवली युवासेना अध्यक्ष सागर जेधे, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, युवासेना विधानसभा अध्यक्ष सूरज मराठे, संजय निकते हे पदाधिकारी उपस्थित होते. बीड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुलुक, स्वप्नील गलधर आणि श्याम सुंदर पडुले कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती  ह्यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून हा वाटप कार्यक्रम पार पडला.

पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा स्वबळाचा नारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पॅनल निहाय संघटनात्मक बैठका तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन भारतीय जनता पार्टी स्वबळावर महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या बरोबर माजी आमदार नरेंद्र पवार, माजी शहर अध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पॅनल निहाय सभांचा धडाका सुरू आहे.

या बैठकीत भाजपचे सर्व जेष्ठ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी देखील एक सुराने स्वबळावर निवडणूक लढण्यास उत्सुकता दर्शविली. कल्याण-डोंबिवली मध्ये भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारा मोठा वर्ग राहत असून पूर्वी पासून भाजप चा गड मानला जातो म्हणून या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे मत जिल्हा अध्यक्ष नंदु परब यांनी व्यक्त केले.

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला बेशुद्ध करून बलात्कार केला आणि व्हिडीओ काढल्याने एकच खळबळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : दिल्लीत एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील आदर्श नगर भागातील एका हॉटेलमध्ये १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीने २० वर्षीय तरुणावर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी घडली, असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी तिच्या कॉलेजमध्ये शिकत असून मित्र आहे. त्याने मैत्रीच्या बहाण्याने तिला 'हॉटेल ऍपल' मध्ये नेले. पोहोचताच त्याने तिला अंमली पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीने त्याच्यावर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याचा आरोपही केला आहे. गुन्हा करत असताना त्याने फोटो, व्हिडीओ काढले असा तिचा दावा आहे. 

पीडित तरुणी हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहे. ती दिल्लीच्या रोहिणी येथील 'बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज'च्या वसतिगृहात राहत आहे. पोलीसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. 

या महिन्याच्या सुरुवातीला, उत्तर प्रदेशात आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका शाळेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, दक्षिण दिल्लीच्या सीआर पार्क परिसरात एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या शिकवणी शिक्षकाने तीन वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालची रहिवासी असलेल्या शिक्षकानेही मुलीला धमकावले आणि ब्लॅकमेल केले, असे पोलीसांनी सांगितले.

बलात्काराची तक्रार कशी दाखल करावी ?
पोलीस स्टेशनमध्ये किंवा ऑनलाइन (१०० किंवा महिला हेल्पलाइन १८१) तक्रार नोंदवा. CrPC कलम १६४A अंतर्गत रुग्णालयात तक्रार नोंदवता येते. पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये कायद्याने मदत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, ज्यात महिला पोलीस किंवा वकीलाची उपस्थिती असते. तक्रार नोंदवण्यासाठी वय किंवा इतर कोणतीही अट नाही.

बलात्कार प्रकरणात कायद्याची तरतूद काय आहे ?
भारतीय न्याय संहिता (२०२३) अंतर्गत बलात्कारासाठी किमान १० वर्षांची तुरुंगवास आणि कमाल मृत्युदंडाची शिक्षा आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कारासाठी कठोर शिक्षा, ज्यात २० वर्षांपर्यंत किंवा मृत्युदंड. नवीन कायद्यात पीडितांच्या संरक्षणासाठी झीरो टॉलरन्स धोरण आहे, ज्यात तपासासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे आहेत. वैवाहिक बलात्कार अद्याप गुन्हा मानला जात नाही, परंतु यावर चर्चा सुरू आहे.

बलात्कार पीडितांसाठी मदत आणि संरक्षण काय उपलब्ध आहे ?
पीडितांना वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत मिळते. राष्ट्रीय महिला आयोग (NCW) किंवा UNFPA सारख्या संस्था समुपदेशन देतात. POCSO कायद्याखाली अल्पवयीनांसाठी विशेष संरक्षण. पोलिस तपासादरम्यान पीडितेची ओळख गोपनीय ठेवली जाते आणि तिला सुरक्षित निवासाची व्यवस्था केली जाते. 

हेल्पलाइन क्रमांक:
 १०९८ (बालिका) किंवा १८१ (महिला).

सरकारच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला कफ सिरप देण्यास बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली : मध्य प्रदेशात कफ सिरप दिल्यानंतर लहानमुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने दोन वर्षांहून कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानात कफ सिरप दिल्याने लहान मुले दगावल्याने अनेक राज्य सरकारनी या औषधांवर बंदी घातली असताना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर छत्तीसगड राज्य सरकारने दोन वर्षांच्या पेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी-पडसे यासाठी कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. हा निर्णय लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी घेतला आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालयाने उच्चस्तरिय व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन जिल्हा स्तरिय अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत. औषधांचा वापर केवळ वैद्यकीय सल्ल्याने करावा आणि याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आदेश आरोग्य कर्मचारी आणि संबंधितांना दिले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये सामान्यत: सर्दी आणि पडसे आपोआपच बरा होत असतो. यासाठी औषधे देणे अनावश्यक असते.

सर्वसामान्य जनतेनेही मनाने डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय औषधे घेऊ नयेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील तपासणी सुरु केली आहे. औषध निर्मिती कारखाने आणि उत्पादनांचे रिस्क बेस्ड इन्स्पेक्शन (Risk-Based Inspection) करण्यासाठी औषध निरीक्षकांची पथके नेमली आहेत.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये नवकन्या आणि मातृ पितृ पूजन व दसरा उत्साहात साजरा..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) :  दर वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील 'जे एम एफ' मंडपम मध्ये नव कन्या पूजन करण्यात आले. "या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेंनं संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः" पार्वती मातेची नऊ रूपे ओळखल्या जाणाऱ्या नवदुर्गा तसेच सरस्वती, लक्ष्मी, पद्मावती, या शिशु विहार मधील छोट्या बालिका नव दुर्गेच्या रूपात नटून थटून आल्या होत्या. त्याच बरोबर व्यंकटेश, भृगूऋषी, गणपती बाप्पाच्या रूपात छोटी बालके आली होती. जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये स्वर्गच अवतरला होता असे जाणवत होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शाळेच्या प्रवेश दारापासून सर्व देवी देवतांचे  पाय प्रक्षाळून व त्यांचे औक्षण करून सर्वांना सन्मानाने वाजत गाजत मंडपम मध्ये आणून त्यांच्या स्थानावर विराजमान केले. नऊ देवी देवतांची शास्त्रशुद्ध पूजा करून आरती केली व सर्व देवींची साडी खण नारळाने ओटी भरली. शिशु रूपातील नव दुर्गेच्या तेजानी जणू सारा जे एम एफ मंडपम तेजोमय  झाला होता. सर्व पालकांनी देखील कन्या पूजन केले. देवीच्या नवरात्र बरोबरच ही नवरात्र गिरी बालाजी म्हणजेच व्यंकटेशाची देखील आहे म्हणूनच शेष शय्येवर साक्षात बालाजी व त्यांच्या द्विपत्नी लक्ष्मी आणि पद्मावती देखील आपल्या रूपात विराजमान झाल्या होत्या. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी भृगूऋषी आणि लक्ष्मी रागाने का निघून गेली याची कथा सांगितली. शिशु विहारच्या उप मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांनी बालकांना उत्तम सहकार्य करून शिशु रूपातील देवतांनी नाटिका रंगवली.
     
"मातृ देवो भव, पितृ देवो भव गुरू देवो भव, आचार्य देवो भव"
ब्रह्मांडामध्ये देवांपेक्षाही सर्व श्रेष्ठ कोण असेल तर "माता पिता" म्हणूनच गणपती बाप्पाने देखील आपल्या आईवडिलांचे पूजन करून त्यांनाच तीन प्रदक्षिणा घातल्या, हेच संस्कार आपल्या पाल्यामध्ये असणे गरजेचे आहे म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांच्या भोवती परिक्रमा केली.
अनेक वेळा भगवतीने नऊ पेक्षा अधिक रूपात प्रकट होऊन वाईट शक्तींचा संहार केला आहे, आज ही निरागस दिसणारी शिशु देवींची रुपे म्हणजे आपल्या मधील षडरिपुंवर मात करून ब्रह्मचारिणी देवी  संसारात राहून सुद्धा विरक्त जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवते, असे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगुन नऊ रूपमधील देवींची माहिती सांगितली तसेच वैकुंठपती व्यंकटेशाला देखील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी भगवतीला पाचारण करावे लागले असेही सांगितले. त्यानंतर सर्वांना नवरात्री व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
विजयादशमी म्हणजेच दसरा, रामाने रावणाचा वध करून विजयी पताका फडकवत ठेवली म्हणून आजही आपण नऊ शक्तींची पूजा करून विजया दशमीला वाईट गोष्टी नष्ट करून एकमेकांना आपट्याची पाने 'सोने' म्हणून pदेवाणघेवाण करत आलिंगन देतो, संस्कृती आणि संस्कार हे आपल्या चांगल्या विचारांवर टिकले आहेत म्हणूनच ही संस्कृती आपल्या पुढच्या पिढीनेही टिकवून ठेवावी हीच शिकवण शाळेच्या माध्यमातून देत आहोत असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले व सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी देखील देवी झालेल्या सर्व बालिकांचे कौतुक केले, तर इतर वेळी एका ठिकाणीही शांत न बसणारे हे विद्यार्थी खरोखरच संयमाने बसले आहेत तर साक्षात देवीच स्वर्गातून खाली उतरून बसल्या आहेत असा भास होत असल्याचा त्या म्हणाल्या. शिशु विहारच्या सर्व शिक्षिकांनी, पालकांनी देखील मनापासून मुलींना वेशभूषा करून सहकार्य केले. या नंतर सर्व पालक, शिक्षकांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम करून गरबा दांडिया चा खेळ रंगला.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले शाश्वत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी : लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत केले आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरण कृती समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावाबाबत पदाधिकाऱ्यांना शाश्वत केले, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी  दिली.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वन मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. तसेच या विमानतळाला आदरणीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या भूमिपुत्रांच्या तीव्र भावनांची माहिती दिली. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात काही अडचणी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढावा. तसेच आदरणीय दिबांचे नाव विमानतळाला देण्याबाबत शाश्वत करावे, अशी आग्रही मागणी कपिल पाटील यांनी केली. 
लोकसभेत २०१६ मध्ये सर्वप्रथम कपिल पाटील यांच्याकडून दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर झाला. तो नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर तो गृह मंत्रालयात मंजुरीसाठी गेला. गृह मंत्रालयाच्या मान्यतेनंतर संबंधित प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला, अशी माहिती कपिल पाटील यांनी या बैठकीत दिली. तसेच संबंधित प्रस्तावात अडचणी आहेत का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार असल्याचे शाश्वत केले.

मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर व इतर लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा समावेश होता.

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम' महाविद्यालयाचे '५८ व्या युथ फेस्टिवल मुंबई' विद्यापीठामध्ये नावलौकिक व पालकांसह कौतुक सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) : डोंबिवली स्थित 'जेएमएफ' शिक्षण संस्था संचालित 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले. '५८ व्या युथ फेस्टिवल' मध्ये मुंबई विद्यापीठातील ३०० च्या वर १२ झोन मधुन २७ कॉलेजमध्ये 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माईम ऍक्ट मध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच मराठी नाटक 'माझी शाळा' यामध्ये ३५० च्या वर १२ झोन मध्ये ४७ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता आणि यात रौप्य पदक पटकविणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक व गुणगौरव सोहळा 'वंदे मातरम' महाविद्यालयाच्या मधुबन वातानुकुलीत बँक्वेट हॉलमध्ये आज दिनांक २७/०९/२०२५ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या नियोजनाखाली पार पडला. 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चीफ एडिटर 'सी न्यूज भारत' चैनल दिल्ली चे श्री. पवन शर्मा हे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा आणि सन्मान करण्याचे सांगितले. संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत किती महत्त्वाची आहे जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आमच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकतात आणि इथेच परिवाराचा एक हिस्सा म्हणून नोकरीही करतात. 
सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना आपल्या पाल्याचे कौतुक बघुन अतिशय आनंद झाला होता व डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एन.नाडार  यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. असेच यश संपादन करत रहा असेही मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीज चे डॉ . कुमार सर, उपप्राचार्य डॉ. वनिता लोखंडे, प्रमुख समन्वयक मंजूला ढवळे हेही उपस्थित होते. या कौतुक सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रति आपले मनोगत व्यक्त केले आणि आपले अनुभव सांगितले. नाटकाचे दिग्दर्शक प्रथमेश देवकोळे आणि शुभम जाधव यांच्या मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच प्राध्यापिका मृणाली जाधव यांनी मुलांच्या तयारीला मोलाचे सहकार्य केले.  कार्यक्रमाला संपूर्ण महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

माइम ऍक्ट सहभागी..
पराग सुतार, तन्वी गुरव, दिवेश मोहिते, निधी अमीन, मितेश पाटील, मंथन पाटील
साथीदार
 मयंक कोठारी, स्नेहा मिश्रा

माझी शाळा स्किट सहभागी..
दिवेश मोहिते, तन्वी गुरव, यश बडेकर, साई कुड्तुडकर, दुर्वा घाडी, सानिका तांबोळी
साथीदार
आयुष सावंत, संस्कार कदम
या कार्यक्रमाचे टिळक देऊन स्वागत सौ. खुशबू दुबे तसेच सूत्रसंचालन प्रा. एकनाथ चौधरी आणि प्रा. सुनिता पाटील यांनी केले.