BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' चा नागपूर ग्रामीण भागात लेकीच्या विवाह मंडपात सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि कौतुकास्पद विवाह सोहळा धूमधडाक्यात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दावसा गावातील 'जन गण मन' कॉन्व्हेंट शाळेच्या प्रांगणात, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार एम. कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे यांची सुपुत्री जाह्नवी हिच्या विवाहानिमित्त, दिनांक ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचा उत्सवमय सोहळा पार पडला. या दरम्यान शाळेचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा, 'जे. एम. एफ. ग्रामज्योत पुरस्कार' वितरण, आरोग्य शिबिर, आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.

पहिल्या दिवशी, ढोल–ताशांच्या गजरात, ग्रामीण भागातील सर्वांना लग्नासाठी मानाच्या अक्षता व भेटवस्तू देऊन आमंत्रित करण्यात आले. स्वतः डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सहकाऱ्यांसह घरोघरी जाऊन सर्वांना विवाह आणि आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संस्थेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त, पाहुण्यांचा रजत स्मरणिका आणि लक्ष्मी-गणपती मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण जनतेसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा ठरला.

१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक श्री. भूपेंद्र भजन, व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, श्री. युवराज कोल्हे, श्री. विजय भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि स्वागत गीताने झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य आणि अभिनयातून अप्रतिम सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी डॉ. कोल्हे म्हणाले, “लग्न आधी कोंडाण्याचे आणि मग रायबाचे, हाच शिवछत्रपतींचा संस्कार आहे,” असे म्हणत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पाच वर्षांतून एकदा दिल्या जाणारा मानाचा ‘जे.एम.एफ. ग्रामज्योत पुरस्कार’ यावेळी श्री. पवन बोंद्रे (सरपंच), श्री. योगेश नासरे, श्री. सागर दुधाने, आणि श्री. हितेशदादा बनसोड या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या या विभूतिंचा सन्मान करताना डॉ. कोल्हे म्हणाले, “स्वार्थापेक्षा परमार्थाचे कार्य करणाऱ्यांचा समाज नेहमी ऋणी असतो.”

आरोग्य शिबिर हे दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मश्री डॉ. महात्मे हॉस्पिटल व परमपूज्य श्री. नायर गुरुजी यांच्या चेतना परिवार, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. हजारो ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. २ डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी जाह्नवी आणि रोहित यांच्या साखरपुड्याचा, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम दिमाखात साजरा झाला. संपूर्ण दावसा गावासोबत रशिया आणि बेंगळुरू येथील पाहुण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
रशियाहून आलेल्या मिस रशिया आणि मिस ग्लोबल मिसेस वेल्लेरी, श्री. व सौ. इरिना आंद्रे डॅनिलोव, तसेच इम्पीरियल कॉलेज, बेंगळुरूचे चेअरमन डॉ. हरिकृष्ण मारम हे विशेष पाहुणे उपस्थित होते. परदेशी पाहुण्यांनी भारतीय परंपरेप्रमाणे साडी आणि पारंपरिक पोशाख घालून कार्यक्रमात सहभाग घेतला आणि नृत्याविष्कार सादर करून सर्वांचे मन जिंकली. याच दिवशी तुळशी विवाह देखील पार पडला. मुंबईहून आलेल्या कलाकारांमध्ये चिन्मयी साळवी (वागळे की दुनिया फेम), आयुष्य संजीव, पियुष पांडे, बलजीत पांडे, आदित्य काळे, सिद्धार्थ अखाडे, आणि सिधांत खाडे आदींचा सहभाग विशेष ठरला.
३ नोव्हेंबर रोजी सर्वांच्या प्रतीक्षेचा क्षण उजाडला. मुंबई स्थित जाह्नवी कोल्हे आणि रोहित राजगुरू यांचा विवाह सोहळा भव्य थाटात संपन्न झाला. सर्वांचे लक्ष वेधणारा क्षण म्हणजे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वतः लिहिलेला मंगलाष्टक, ज्याला रोहित राजगुरू यांनी संगीतबद्ध केले. या मंगलाष्टकाच्या सुरात संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
m"ईश्वराच्या दैव हाती, तोच जुळवितो नातीगोती.."

वराची मिरवणूक बैलजोड गाडीतून काढण्यात आली, आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पाच सुवासिनींसह औक्षण आणि पदप्रक्षालन करून स्वागत केले. सुमारे ३,००० हून अधिक लोक आणि ५० गावांचे प्रतिनिधी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. वधू-वराने एकमेकांना हार घालून पवित्र बंधनात अडकले. आई-वडील म्हणून डॉ. कोल्हे दांपत्यांनी भावनिक क्षणी आपल्या लाडक्या लेकीचा कन्यादानाचा संस्कार पूर्ण केला. भारतीय परंपरेनुसार परदेशी पाहुण्यांनी भारतीय पोशाख परिधान करून आपल्या संस्कृतीबद्दल आदर व्यक्त केला. तीन दिवसांच्या या सोहळ्यात संपूर्ण दावसा गाव रोषणाईने उजळून निघाले.

वधूचे आजी-आजोबा डॉ. मारोतराव कोल्हे व सौ. शकुंतला कोल्हे, तसेच श्री. परशुरामजी भांगे व सौ. पुष्पा भांगे यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. महेश कळंबे, श्री. विठ्ठल कोल्हे, श्री. अल्पेश खोब्रागडे,  श्री. सोमेश भांगे, श्री. देवीदास सावरकर, श्री. आकाश नेहारे, सतीश कुशराम, श्री. बाबू सावरकर, श्री. नरेश पिसाट, आणि श्री. अवधूत देसाई, अनिल गुहेर, सोनू यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. श्री योगेश भाऊ भोसे यांनी जे बी. फार्म वर पाहुण्याचं मनसोक्त स्वागत केले,  तसेच श्री सती अनुसया माता भक्त निवास पारडसिंगा येथे शेकडो पाहुण्यांचे निवास सोय झाली. या सर्वांचे स्वागत आहे. 

शेवटी, वधूच्या पाठवणीचा क्षण सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. आई डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “सोनपावलांनी आमच्या आयुष्यात आलेली आमची जाह्नवी म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे. आता हीच लक्ष्मी सासरी जाऊन ते घर मंगलमय करणार यात शंकाच नाही.” वडील डॉ. राजकुमार कोल्हे यांनीही निशब्दपणे लेकीला आलिंगन देऊन भावूक निरोप दिला. नवरदेव श्री. रोहित राजगुरू यांनी हातात हात घेऊन आयुष्यभर विश्वास आणि प्रेम टिकवण्याचे वचन दिले.

"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी जा, लाडके सुखाने..."

या गीताच्या सुरात कोल्हे परिवाराने आपल्या लेकीला सासरी पाठवले. दुसऱ्या दिवशी हळद उतरविण्याचा कार्यक्रम आणि विविध खेळांचा आनंदोत्सव साजरा झाला, ज्यात सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.

चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका सुलक्षणा पंडित यांचे ७१ व्या वर्षी निधन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाऊ संगीतकार ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात बहीण अभिनेत्री विजया पंडित, संगीतकार भाऊ जतीन-ललित असा परिवार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका आणि अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या सुलक्षणा यांचा जन्म १२ जुलै १९५४ मध्ये हरियाणातील फतेहपूरमध्ये झाला. गायनाचा वारसा त्यांचे वडील प्रतापनारायण पंडित यांच्याकडूनच लाभला होता. दिवंगत गायक पं. जसराज हे त्यांचे काका होते. सुलक्षणा पंडित यांनी आपल्या वडिलांकडेच गायनाचे धडे गिरवले. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना चित्रपटात गायनाची संधी मिळाली. अर्थात, तो चित्रपट 'तकदीर' होता. या चित्रपटात त्यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरसची साथ दिली होती. या चित्रपटानंतर त्यांनी १९७१ मध्ये 'दूर का राही' या चित्रपटात गायक किशोरकुमार यांनी 'बेकरार दिल तू गाये जा' या गीतासाठी गायनाची संधी दिली. दिग्दर्शक रघुनाथ झालानी यांनी १९७५ मध्ये त्यांना 'उलझन' चित्रपटाची नायिका म्हणून घेतले. नायिका म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता.

प्रवासी महिलेची सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवुन पसार झालेल्या रिक्षा चालकांस गुन्हे शाखा घटक-३ पोलीसांनी केले २४ तासात जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दि. ३०/१०/२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस (वय: ५६ वर्षे) धंदा: गृहीणी, मुळ गाव: मुळ झरे बांबर, पोष्ट: दोडा मार्ग, जिल्हा- सिंधुदुर्ग या दिपावली सणानिमित्त टाटा पॉवर, कल्याण (पुर्व) व स्टार कॉलनी, डोंबिवली (पूर्व) येथे राहणाऱ्या आपल्या दोन्ही मुलींकडे फराळाचे सामान घेवुन भेटण्याकरीता आल्या होत्या.

सदर प्रवासी महिला या स्टार कॉलनी डोंबिवली (पूर्व) येथील मुलीस भेटुन दि. ३१/१०/२०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजण्याच्या  सुमारास त्या त्यांच्या टाटा पॉवर कल्याण (पुर्व) येथे राहणाऱ्या दुसऱ्या मुलीस भेटण्याकरीता स्टार कॉलनी, डोंबिवली (पूर्व) येथुन प्रवासी रिक्षा पकडुन जात असताना त्यांनी रिक्षात बसल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र त्यांच्याकडील बॅगेत ठेवले होते. त्यांनतर त्या पिसवली येथील पिंगारा बारच्या समोर पोहचल्या असता रिक्षातुन खाली उतरून रिक्षा चालकाचे भाडे दिल्यानंतर त्या आपल्या मुलीची वाट पाहत उभ्या असताना रिक्षा चालक बॅगसह निघुन गेला. त्यानंतर काही वेळाने प्रवासी महिलेच्या लक्षात आले की, सोबत घेवुन आलेल्या व रिक्षामध्ये ठेवल्या दोन बॅगा त्यापैकी काळया रंगाच्या बॅगेत ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र असलेली बॅग सहीत दुसरी बॅग अशा ०२ बॅगा ह्या रिक्षावाला घेवुन गेला असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनतर काही वेळात प्रवासी महिलेची मुलगी त्यांना घेण्याकरीता आली तेव्हा त्यांनी सदरची हकिगत आपल्या मुलीस सांगितली. त्यांनतर प्रवासी महिला व तिच्या मुलीने रिक्षाचा शोध घेतला पंरतु सदर रिक्षा आढळुन आली नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्या रिक्षामध्ये गळ्यातुन काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवलेले ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र तसेच कपड्याच्या दोन बॅगा ह्या रिक्षात ठेवलेले असल्याचे रिक्षा चालक यांस माहिती असताना सदरच्या बॅगा ह्या रिक्षा चालक पळवून घेवुन गेला आहे.

त्यांनतर सदर प्रवासी महिला व तीचा जावई योगेश सावंत यांनी सदरबाबत गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना माहिती दिली असता पोलीसांनी सी.सी टि.व्ही फुटेजची पाहणी केली असता सदर रिक्षाचा नंबर MH05/CP-3343 असा असल्याचे समजले त्यानंतर पोलीसांनी सदर रिक्षा व रिक्षा चालकाचा शोध घेतला असता तो पोलीसांना सापडल्याने सदर प्रवासी महिलेस गुन्हे शाखा घटक-०३ कल्याण येथे बोलाविण्यात आले. त्याप्रमाणे त्या हजर झाल्या असता सदर प्रवासी महिलेस रिक्षाचालक नामे जयेश वसंत गौतम (वय: ३२ वर्षे) धंदा: रिक्षा चालक राहणार: पटवा चाळ, रूम नंबर ०२, गणेशवाडी, टिटावाळा मांडा रोड, टिटवाळा, ता. कल्याण यांस बॅगेत ठेवलेले ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र दाखविले असता सदरचे दागिने व रिक्षा चालक तोच असल्याचे पोलीसांना ओळखुन सागितले.

तरी गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस या प्रवासी महिलेचे चोरीस गेलेले ३,६०,०००/- रूपये ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र व आरोपी रिक्षा चालक तसेच त्याचे ताब्यातील रिक्षा असा एकूण ५,२१,५५०/- रू किंमतीचा मुदद्देमाल हस्तगत करून रिक्षा चालकांस २४ तासात जेरबंद करून त्याच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. श्री. शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सपोनि. सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोउपनि. किरण भिसे, विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अदिक जाधव, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, विजय जिरे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंदारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांचे पथकाने यशस्वीपणे केलेली आहे.

डोंबिवलीत अवैध ऑनलाईन लॉटरीचा धंदा पोलीसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जोमात सुरु..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्यात ऑनलाईन लॉटरीवर कायदेशीर बंदी असतानाही, डोंबिवलीतील राम नगर, टिळक नगर, विष्णू नगर, मानपाडा, कल्याण परिमंडळ-३ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉटरी सेंटर गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झाले असूनही राम नगर पोलीसांना याची काहीच माहिती नाही असे होऊ शकत नाही. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र चालू आहे. अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून त्यांची कुटुंबे हलाकी आणि हालपेष्टाचे दिवस काढत आहेत. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर आहुजा, भानुशाली नावाच्या व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.


राम नगर पोलीसांच्या नाकावर टिच्चून हा अवैध व्यवसाय सुरू आहे. रामनगर डोंबिवली पोलीसांच्या हद्दीत हा प्रकार घडत असूनही, पोलीसांना याची साधी कल्पना हि नाही हे होऊच शकत नाही असा डोंबिवलीकर नागरिकांचा समाज आहे. या अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर बाबत राम नगर पोलीसांना विचारणा केली असता ते माहिती घेऊन कळवतो असे उत्तर थातूरमातूर देत आहेत. तसेच ठाणे, कल्याण पोलीस कंट्रोल कडून माहिती घेतली असता त्यांनाही या लॉटरीबाबत काहीही माहिती नाही असे सांगण्यात आले.

टिळक नगर, विष्णू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र सुरु आहेत. एकीकडे शासन ऑनलाईन लॉटरी आणि जुगारावर बंदी घालून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीतील स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या लॉटरीच्या नादात अनेक तरुण, नोकरदार, बिगारी काम करणारे, नशेच्या आहारी गेलेली लोकं कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई या जुगारात गमावत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि स्थानिक वरिष्ठ पोलीसांनी तातडीने लक्ष घालून, या अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या चालक मालकांवरती ताबडतोब कठोर कारवाई करावी तसेच यामागे वरदहस्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डोंबिवलीकर नागरिकांकडून जोर धरत आहे.

दिव्यात ‘जय जय रवळनाथ’ नाट्यप्रयोगाला चाकरमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. २ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टी दिवा- शीळ मंडळाच्या वतीने आयोजित ‘जय जय रवळनाथ’ या चालचित्रयुक्त नाट्यप्रयोगाचा भव्य कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी दिव्यातील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
हा चलचित्रीत दशावतार नाट्यप्रयोग दशावतार नाट्य मंडळ नेरुर कुडाळ या मंडळाने तर मंडळाचे संचालन सिध्देश सुधीर कलिंगण यांनी केले. या वर्षीच्या दिग्गज नावलौकीक उत्कृष्ट कलाकारांच्या दमदार संचासहित, महान पौराणिक भव्यदिव्य, संघर्षमय, चलचित्रीत नाट्य कलाकृती काल चाकरमान्यांसमोर सादर झाली. तसेच कार्यक्रमाचे समालोचन विवेक पोरजी आणि करुना ढेगे यांनी सादर केले. कार्यक्रमाआधी थोडासा पाऊस पडला असला तरी चाकरमान्यांच्या उत्साहात किंचितही फरक पडला नाही. एक वर्षांच्या बाळापासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील दिव्यातील नागरिकांनी उपस्थित राहून ‘जय जय रवळनाथ’ दशावतारी नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला.
महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन, चित्रविचित्र किड्यावर मांत्रिक ध्यानस्त, चलचित्रीत मंदिराचा देखावा, बुरुजातून दिव्य शक्ती प्रगट, रुद्र तेजोमय त्रिशूळ रवळनाथाच्या हाती येणे, घोड्यावर बसून रवळनाथाचे आगमन, अचाट शक्तीची निमिर्ती, ज्योतीबा दर्शन आणि महाकाय रेडा संग्राम, त्रिशूळ तेजोमय होणे, त्रिसूळातून अधांतरी चितविचित्र पिशाच्छ निमिर्ती, त्रिशूळाच्या सहाय्याने रेड्याचे शीर मारणे, त्रिशूळाने मांत्रिकाचा संहार होणे हे सर्व नाट्य प्रयोग हलत्या चलचित्रातून चाकरमान्यांनी पाहिले. दिव्याच्या संस्कृतीत भर घालणारा हा नाट्यप्रयोग सर्वांच्या मनात घर करून गेला.
त्यावेळी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदु परब, माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे, ठाणे जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर, विजय भोईर, अशोक पाटिल, गणेश भगत, दिलीप भोईर, अंकुश मढवी, रोशन भगत, रेश्मा पवार, सीमा भगत, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, चेतन  पाटिल, समीर चव्हाण, सतीश केळशीकर, साहिल पाटिल, अशोक गुप्ता, गौरीशंकर पटवा, अवधराज राजभर, जिलाजीत तिवारी, पूनम सिंग, रीना सिंग, नीलम मिश्रा आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या दशावतारी नाट्य प्रयोगासाठी विशेष मेहनत नितिश कोरगांवकर, रवी मुननकर, विठ्ठल गावडे, किरण कोरगांवकर, अनंत पडेलकर, स्वप्नील धुमाळ आणि अनिल गावकर यांनी घेतली होती.
कलाकार सिध्देश कलिंगण, काका कलिंगण, निळकंठ सावंत, रोहित नाईक, राधाकृष्ण नाईक, सुनील खोरजूवेकर, पप्पू घाडीगावकर, संजय लाड, परशुराम मोरजकर, तर लोकराजा ट्रीकसीन ग्रुप नेरुर कौस्तुभ कलिंगण, प्रतिक कलिंगण, संजय नेवगी, तुषार परब, रोहित नारकर, श्रीकृष्ण सावंत, प्रथमेश परब, सिध्देश तारवे, कुणाल पेंडुरकर, मयूर माने, मनीष नेरुरकर, तर संगित साथ हार्मोनिअम आशिष तवटे, मृदुंगमणी चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण यांनी संगतील दिले आहे.

निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. १ : सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष ऍड. अभय छाजेड, आमदार भाई जगताप, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे डॉ. अजित नवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देशातील निवडणुकीत मतचोरी झालेली आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड करून दाखवले पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर थातूर मातूर उत्तर दिले. निवडणूक आयोगाचे उत्तर हे इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी न करता त्यांनी उत्तर दिले.

विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारयाद्या वापरण्यात आल्या, त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष व मविआतील सर्व घटक पक्षांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली व या बोगस मतदार याद्या वापरू नका असे सांगितले पण विधान सभेच्या बोगस याद्यांवर व त्यांवर घेतलेल्या हरकरतीवर कोणताही निर्णय घेतला नाही आणि आता तीच बोगस यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरली जात आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष त्या बोगस मतदार याद्यांच्या विरोधात आहोत आणि लोकशाही माननाऱ्यांनी त्याला विरोध करून मतदारयाद्या दुरुस्त करण्याचा आग्रह धरला आहे पण राज्य निवडणूक आयोग समाधान कारक उत्तर देऊ शकले नाही.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माझ्या संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात साडे नऊ हजार बोगस मतदार आहेत, आम्ही त्यावर हरकत घेऊन त्या दुरुस्त करण्यास सांगितले पण तहसीलदार म्हणतात, दुरुस्ती करण्याचा आम्हाला काहाही अधिकार नाही म्हणजे तीच बोगस मतदार यादी आता महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीला वापणार, म्हणून ती यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण निवडणूक आयोग ऐकूणच घेत नाही.

सत्ताधारी भाजपाने काढलेल्या मूक मोर्चावर टीका करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपला सत्याचा मोर्चा निघत असताना सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला आहे. या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे का ? अशी शंका येते.. ज्येठ नेते शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही मोर्चाला संबोधित करून भाजपा महायुती सरकार व निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.

डोंबिवलीकरांचा 'रन फॉर युनिटी' एकता दौड ला एकतेचा संदेश देत उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३१ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी डोंबिवली येथे ठाणे पोलीस कमिशनरेट यांच्या माध्यमातून "रन फॉर युनिटी" या एकता दौड चे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ ते ८ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमांस डोंबिवलीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठाणे पोलीस कमिशनरेट आयोजित 'एकता दौड' आप्पा दातार चौक येथून सुरू होऊन गणेश मंदिर संस्थान - नेहरू रोड - भाजी मार्केट - फडके रोड  - मदन ठाकरे चौक या मार्गे परत आप्पा दातार चौक येथे समाप्त झाली. कार्यक्रमादरम्यान डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे नागरिकांसाठी शस्त्रास्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी या प्रदर्शनास विशेष उत्साहाने भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात रामनगर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग) सुहास हेमाडे, डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड, सोनी मराठी वरील क्राईम पॅट्रोल मधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता तथा निवेदक सतीश नायकोडी, डोंबिवलीतील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस मित्र, शांतता कमिटी सदस्य, तसेच शाळा-कॉलेजमधील एनएसएस व एनसीसी विद्यार्थी आणि स्पोर्ट्स ऍकॅडमी चे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सुमारे २५० ते ३०० नागरिक "रन फॉर युनिटी" या एकता दौड कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. या प्रसंगी डोंबिवली पोलीसांकडून योग्य ती दक्षता घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीसांकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.