BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे १६ नोव्हेंबर रोजी सर्वात मोठ्या 'व्हिजन वॉक' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल', 'महाराष्ट्र ऑपथेलमोलॉजिस्ट सोसायटी' (MOS), 'डोंबिवलीकर ग्रुप', आणि 'इंडियन मेडिकल असोसिएशन' (IMA)  डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने “नेत्ररक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक” ही भव्य जनजागृती मोहीम रविवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या नेत्र जनजागृती मोहिमेत डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नेत्रजागृतीसाठी एक मोठी मोहीम राबवली जात असून, या माध्यमातून नागरिकांना मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांबद्दल आणि अंधत्व टाळण्यासाठी वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देण्याचा हेतू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय आमदार श्री. रवींद्र चव्हाण, (अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) असतील. सुमारे २,००० पेक्षा अधिक नागरिक या जनजागृती वॉकमध्ये सहभागी होणार असून. यात कॉलेज विद्यार्थी, रोटरी व रोटरॅक्ट क्लबस्, विविध सामाजिक व धार्मिक संस्था, डायबेटॉलॉजिस्ट, डॉक्टर तसेच डोंबिवलीतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऑपथेलमोलॉजिस्ट सोसायटी' (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. 
रॅलीची सुरुवात सकाळी ७.०० वाजता गणेश मंदिर रोड येथून होणार असून, सकाळी ९.०० वाजता त्याच ठिकाणी समारोप करण्यात येईल. समारोपानंतर माननीय श्री. रवींद्र चव्हाण आणि डॉ. अनघा हेरूर संचालक 'अनिल आय हॉस्पिटल' तसेच अध्यक्षा (MOS) यांचे विशेष मार्गदर्शन होईल.

या निमित्ताने डॉ. अनघा हेरूर यांनी नागरिकांना आवाहन केले की, “मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार वेळेवर तपासणी केल्यास टाळता येऊ शकतात. चला, आपण सगळे मिळून डोंबिवलीला डायबेटीसजन्य अंधत्वमुक्त बनवूया.”

'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे सर्व नागरिक, सामाजिक संस्था, वरिष्ठ नागरिक, कॉर्पोरेट्स आणि युवकांना या मोहिमेत सहभागी होऊन “वेळीच नेत्रतपासणी करा आणि दृष्टी सुरक्षित ठेवा” हा संदेश समाजात पोहोचवण्याचे आवाहन डॉ. अनघा हेरूर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

* श्री. भूषण फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) 'अनिल आय हॉस्पिटल'
संपर्क मोबाईल: ९८२१८८७७१६

* श्री. जय चौधरी, मार्केटिंग मॅनेजर  'अनिल आय हॉस्पिटल'
संपर्क मोबाईल: ८१०८८८१५५५

भाजप चे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे शिंदे सेनेत दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे - मालवणकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनहितकारी, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामकाजामुळे जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडले जात आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे आज सर्वच स्तरातून शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भिवंडी उबाठा संपर्क प्रमुख साईनाथ तरे, डोंबिवली भोपरगाव उबाठा विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षदा भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे, प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, रवींद्र लोट, मधू करंजे, स्वप्नील सोलिम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, महेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे कट्टर शिंदे गटाचे समर्थक दीपेश म्हात्रे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) सचिव संतोष केणे यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : एकेकाळचे कट्टर शिंदे समर्थक आणि आताचे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, तसेच काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत डोंबिवली जिमखाना येथे भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. हे पक्ष प्रवेश उद्धवसेना आणि काँग्रेसला धक्का देणारे असले, तरी उद्धवसेनेत येण्यापूर्वी शिंदेसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या दीपेश म्हात्रेना आपल्या गळाला लावून एकप्रकारे भाजपने केडीएमसी निवडणुकीआधी शिंदेसेनेलाही शह दिल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
डोंबिवलीतील जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. सुलभा गायकवाड, आ. नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब, राहुल दामले, मंदार हळबे, शशिकांत कांबळे, पूर्वमंडल अध्यक्ष मितेश पेणकर, पश्चिम मंडलाचे माजी अध्यक्ष समीर चिटणीस यांसह भाजपमधील अन्य मान्यवर तसेच महिला कार्यकर्त्या मनीषा राणे, वर्षा परमार, पूनम पाटील व असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
             
भाजपात पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये उद्धवसेनेचे माजी नगरसेवक व सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे बंधू जयेश म्हात्रे, मातोश्री रत्नप्रभा म्हात्रे, काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे, संतोष तरे, अनंता गायकवाड, रामभाऊ ओव्हळ, देवानंद गायकवाड, प्रधान पाटील, माजी नगरसेविका वैशाली केणे, अनिता कर्पे, पूजा म्हात्रे, उद्योगपती संजय गायकवाड यांनी प्रवेश केला.


केडीएमसी पालिकेला भाजपच महापौर देणार : रवींद्र चव्हाण

भाजपावर विश्वास दाखवून ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपच महापौर देईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाच्या दिशेने नेणारे पारदर्शक सरकार कोणी देऊ शकत असेल तर ते भाजप आहे. केडीएमसीतील आणखी काही नगरसेवक येत्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहितीदेखील चव्हाण यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

'जे एम एफ' चा नागपूर ग्रामीण भागात लेकीच्या विवाह मंडपात सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि कौतुकास्पद विवाह सोहळा धूमधडाक्यात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दावसा गावातील 'जन गण मन' कॉन्व्हेंट शाळेच्या प्रांगणात, संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार एम. कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे यांची सुपुत्री जाह्नवी हिच्या विवाहानिमित्त, दिनांक ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचा उत्सवमय सोहळा पार पडला. या दरम्यान शाळेचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा, 'जे. एम. एफ. ग्रामज्योत पुरस्कार' वितरण, आरोग्य शिबिर, आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.

पहिल्या दिवशी, ढोल–ताशांच्या गजरात, ग्रामीण भागातील सर्वांना लग्नासाठी मानाच्या अक्षता व भेटवस्तू देऊन आमंत्रित करण्यात आले. स्वतः डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सहकाऱ्यांसह घरोघरी जाऊन सर्वांना विवाह आणि आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संस्थेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त, पाहुण्यांचा रजत स्मरणिका आणि लक्ष्मी-गणपती मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण जनतेसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा ठरला.

१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक श्री. भूपेंद्र भजन, व्यवस्थापक श्री. महेश कळंबे, श्री. युवराज कोल्हे, श्री. विजय भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि स्वागत गीताने झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य आणि अभिनयातून अप्रतिम सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी डॉ. कोल्हे म्हणाले, “लग्न आधी कोंडाण्याचे आणि मग रायबाचे, हाच शिवछत्रपतींचा संस्कार आहे,” असे म्हणत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पाच वर्षांतून एकदा दिल्या जाणारा मानाचा ‘जे.एम.एफ. ग्रामज्योत पुरस्कार’ यावेळी श्री. पवन बोंद्रे (सरपंच), श्री. योगेश नासरे, श्री. सागर दुधाने, आणि श्री. हितेशदादा बनसोड या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या या विभूतिंचा सन्मान करताना डॉ. कोल्हे म्हणाले, “स्वार्थापेक्षा परमार्थाचे कार्य करणाऱ्यांचा समाज नेहमी ऋणी असतो.”

आरोग्य शिबिर हे दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मश्री डॉ. महात्मे हॉस्पिटल व परमपूज्य श्री. नायर गुरुजी यांच्या चेतना परिवार, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. हजारो ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. २ डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी जाह्नवी आणि रोहित यांच्या साखरपुड्याचा, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम दिमाखात साजरा झाला. संपूर्ण दावसा गावासोबत रशिया आणि बेंगळुरू येथील पाहुण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
रशियाहून आलेल्या मिस रशिया आणि मिस ग्लोबल मिसेस वेल्लेरी, श्री. व सौ. इरिना आंद्रे डॅनिलोव, तसेच इम्पीरियल कॉलेज, बेंगळुरूचे चेअरमन डॉ. हरिकृष्ण मारम हे विशेष पाहुणे उपस्थित होते. परदेशी पाहुण्यांनी भारतीय परंपरेप्रमाणे साडी आणि पारंपरिक पोशाख घालून कार्यक्रमात सहभाग घेतला आणि नृत्याविष्कार सादर करून सर्वांचे मन जिंकली. याच दिवशी तुळशी विवाह देखील पार पडला. मुंबईहून आलेल्या कलाकारांमध्ये चिन्मयी साळवी (वागळे की दुनिया फेम), आयुष्य संजीव, पियुष पांडे, बलजीत पांडे, आदित्य काळे, सिद्धार्थ अखाडे, आणि सिधांत खाडे आदींचा सहभाग विशेष ठरला.
३ नोव्हेंबर रोजी सर्वांच्या प्रतीक्षेचा क्षण उजाडला. मुंबई स्थित जाह्नवी कोल्हे आणि रोहित राजगुरू यांचा विवाह सोहळा भव्य थाटात संपन्न झाला. सर्वांचे लक्ष वेधणारा क्षण म्हणजे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वतः लिहिलेला मंगलाष्टक, ज्याला रोहित राजगुरू यांनी संगीतबद्ध केले. या मंगलाष्टकाच्या सुरात संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
m"ईश्वराच्या दैव हाती, तोच जुळवितो नातीगोती.."

वराची मिरवणूक बैलजोड गाडीतून काढण्यात आली, आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पाच सुवासिनींसह औक्षण आणि पदप्रक्षालन करून स्वागत केले. सुमारे ३,००० हून अधिक लोक आणि ५० गावांचे प्रतिनिधी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. वधू-वराने एकमेकांना हार घालून पवित्र बंधनात अडकले. आई-वडील म्हणून डॉ. कोल्हे दांपत्यांनी भावनिक क्षणी आपल्या लाडक्या लेकीचा कन्यादानाचा संस्कार पूर्ण केला. भारतीय परंपरेनुसार परदेशी पाहुण्यांनी भारतीय पोशाख परिधान करून आपल्या संस्कृतीबद्दल आदर व्यक्त केला. तीन दिवसांच्या या सोहळ्यात संपूर्ण दावसा गाव रोषणाईने उजळून निघाले.

वधूचे आजी-आजोबा डॉ. मारोतराव कोल्हे व सौ. शकुंतला कोल्हे, तसेच श्री. परशुरामजी भांगे व सौ. पुष्पा भांगे यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. महेश कळंबे, श्री. विठ्ठल कोल्हे, श्री. अल्पेश खोब्रागडे,  श्री. सोमेश भांगे, श्री. देवीदास सावरकर, श्री. आकाश नेहारे, सतीश कुशराम, श्री. बाबू सावरकर, श्री. नरेश पिसाट, आणि श्री. अवधूत देसाई, अनिल गुहेर, सोनू यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. श्री योगेश भाऊ भोसे यांनी जे बी. फार्म वर पाहुण्याचं मनसोक्त स्वागत केले,  तसेच श्री सती अनुसया माता भक्त निवास पारडसिंगा येथे शेकडो पाहुण्यांचे निवास सोय झाली. या सर्वांचे स्वागत आहे. 

शेवटी, वधूच्या पाठवणीचा क्षण सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. आई डॉ. प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, “सोनपावलांनी आमच्या आयुष्यात आलेली आमची जाह्नवी म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे. आता हीच लक्ष्मी सासरी जाऊन ते घर मंगलमय करणार यात शंकाच नाही.” वडील डॉ. राजकुमार कोल्हे यांनीही निशब्दपणे लेकीला आलिंगन देऊन भावूक निरोप दिला. नवरदेव श्री. रोहित राजगुरू यांनी हातात हात घेऊन आयुष्यभर विश्वास आणि प्रेम टिकवण्याचे वचन दिले.

"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी जा, लाडके सुखाने..."

या गीताच्या सुरात कोल्हे परिवाराने आपल्या लेकीला सासरी पाठवले. दुसऱ्या दिवशी हळद उतरविण्याचा कार्यक्रम आणि विविध खेळांचा आनंदोत्सव साजरा झाला, ज्यात सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.

चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका सुलक्षणा पंडित यांचे ७१ व्या वर्षी निधन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाऊ संगीतकार ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात बहीण अभिनेत्री विजया पंडित, संगीतकार भाऊ जतीन-ललित असा परिवार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका आणि अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या सुलक्षणा यांचा जन्म १२ जुलै १९५४ मध्ये हरियाणातील फतेहपूरमध्ये झाला. गायनाचा वारसा त्यांचे वडील प्रतापनारायण पंडित यांच्याकडूनच लाभला होता. दिवंगत गायक पं. जसराज हे त्यांचे काका होते. सुलक्षणा पंडित यांनी आपल्या वडिलांकडेच गायनाचे धडे गिरवले. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना चित्रपटात गायनाची संधी मिळाली. अर्थात, तो चित्रपट 'तकदीर' होता. या चित्रपटात त्यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरसची साथ दिली होती. या चित्रपटानंतर त्यांनी १९७१ मध्ये 'दूर का राही' या चित्रपटात गायक किशोरकुमार यांनी 'बेकरार दिल तू गाये जा' या गीतासाठी गायनाची संधी दिली. दिग्दर्शक रघुनाथ झालानी यांनी १९७५ मध्ये त्यांना 'उलझन' चित्रपटाची नायिका म्हणून घेतले. नायिका म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता.

प्रवासी महिलेची सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवुन पसार झालेल्या रिक्षा चालकांस गुन्हे शाखा घटक-३ पोलीसांनी केले २४ तासात जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दि. ३०/१०/२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस (वय: ५६ वर्षे) धंदा: गृहीणी, मुळ गाव: मुळ झरे बांबर, पोष्ट: दोडा मार्ग, जिल्हा- सिंधुदुर्ग या दिपावली सणानिमित्त टाटा पॉवर, कल्याण (पुर्व) व स्टार कॉलनी, डोंबिवली (पूर्व) येथे राहणाऱ्या आपल्या दोन्ही मुलींकडे फराळाचे सामान घेवुन भेटण्याकरीता आल्या होत्या.

सदर प्रवासी महिला या स्टार कॉलनी डोंबिवली (पूर्व) येथील मुलीस भेटुन दि. ३१/१०/२०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजण्याच्या  सुमारास त्या त्यांच्या टाटा पॉवर कल्याण (पुर्व) येथे राहणाऱ्या दुसऱ्या मुलीस भेटण्याकरीता स्टार कॉलनी, डोंबिवली (पूर्व) येथुन प्रवासी रिक्षा पकडुन जात असताना त्यांनी रिक्षात बसल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र त्यांच्याकडील बॅगेत ठेवले होते. त्यांनतर त्या पिसवली येथील पिंगारा बारच्या समोर पोहचल्या असता रिक्षातुन खाली उतरून रिक्षा चालकाचे भाडे दिल्यानंतर त्या आपल्या मुलीची वाट पाहत उभ्या असताना रिक्षा चालक बॅगसह निघुन गेला. त्यानंतर काही वेळाने प्रवासी महिलेच्या लक्षात आले की, सोबत घेवुन आलेल्या व रिक्षामध्ये ठेवल्या दोन बॅगा त्यापैकी काळया रंगाच्या बॅगेत ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र असलेली बॅग सहीत दुसरी बॅग अशा ०२ बॅगा ह्या रिक्षावाला घेवुन गेला असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनतर काही वेळात प्रवासी महिलेची मुलगी त्यांना घेण्याकरीता आली तेव्हा त्यांनी सदरची हकिगत आपल्या मुलीस सांगितली. त्यांनतर प्रवासी महिला व तिच्या मुलीने रिक्षाचा शोध घेतला पंरतु सदर रिक्षा आढळुन आली नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्या रिक्षामध्ये गळ्यातुन काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवलेले ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र तसेच कपड्याच्या दोन बॅगा ह्या रिक्षात ठेवलेले असल्याचे रिक्षा चालक यांस माहिती असताना सदरच्या बॅगा ह्या रिक्षा चालक पळवून घेवुन गेला आहे.

त्यांनतर सदर प्रवासी महिला व तीचा जावई योगेश सावंत यांनी सदरबाबत गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना माहिती दिली असता पोलीसांनी सी.सी टि.व्ही फुटेजची पाहणी केली असता सदर रिक्षाचा नंबर MH05/CP-3343 असा असल्याचे समजले त्यानंतर पोलीसांनी सदर रिक्षा व रिक्षा चालकाचा शोध घेतला असता तो पोलीसांना सापडल्याने सदर प्रवासी महिलेस गुन्हे शाखा घटक-०३ कल्याण येथे बोलाविण्यात आले. त्याप्रमाणे त्या हजर झाल्या असता सदर प्रवासी महिलेस रिक्षाचालक नामे जयेश वसंत गौतम (वय: ३२ वर्षे) धंदा: रिक्षा चालक राहणार: पटवा चाळ, रूम नंबर ०२, गणेशवाडी, टिटावाळा मांडा रोड, टिटवाळा, ता. कल्याण यांस बॅगेत ठेवलेले ०३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र दाखविले असता सदरचे दागिने व रिक्षा चालक तोच असल्याचे पोलीसांना ओळखुन सागितले.

तरी गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस या प्रवासी महिलेचे चोरीस गेलेले ३,६०,०००/- रूपये ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र व आरोपी रिक्षा चालक तसेच त्याचे ताब्यातील रिक्षा असा एकूण ५,२१,५५०/- रू किंमतीचा मुदद्देमाल हस्तगत करून रिक्षा चालकांस २४ तासात जेरबंद करून त्याच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. श्री. शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सपोनि. सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोउपनि. किरण भिसे, विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अदिक जाधव, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, विजय जिरे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंदारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांचे पथकाने यशस्वीपणे केलेली आहे.

डोंबिवलीत अवैध ऑनलाईन लॉटरीचा धंदा पोलीसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जोमात सुरु..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्यात ऑनलाईन लॉटरीवर कायदेशीर बंदी असतानाही, डोंबिवलीतील राम नगर, टिळक नगर, विष्णू नगर, मानपाडा, कल्याण परिमंडळ-३ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉटरी सेंटर गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झाले असूनही राम नगर पोलीसांना याची काहीच माहिती नाही असे होऊ शकत नाही. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र चालू आहे. अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असून त्यांची कुटुंबे हलाकी आणि हालपेष्टाचे दिवस काढत आहेत. हे अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर आहुजा, भानुशाली नावाच्या व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.


राम नगर पोलीसांच्या नाकावर टिच्चून हा अवैध व्यवसाय सुरू आहे. रामनगर डोंबिवली पोलीसांच्या हद्दीत हा प्रकार घडत असूनही, पोलीसांना याची साधी कल्पना हि नाही हे होऊच शकत नाही असा डोंबिवलीकर नागरिकांचा समाज आहे. या अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर बाबत राम नगर पोलीसांना विचारणा केली असता ते माहिती घेऊन कळवतो असे उत्तर थातूरमातूर देत आहेत. तसेच ठाणे, कल्याण पोलीस कंट्रोल कडून माहिती घेतली असता त्यांनाही या लॉटरीबाबत काहीही माहिती नाही असे सांगण्यात आले.

टिळक नगर, विष्णू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दिवसरात्र सुरु आहेत. एकीकडे शासन ऑनलाईन लॉटरी आणि जुगारावर बंदी घालून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीतील स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या लॉटरीच्या नादात अनेक तरुण, नोकरदार, बिगारी काम करणारे, नशेच्या आहारी गेलेली लोकं कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई या जुगारात गमावत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि स्थानिक वरिष्ठ पोलीसांनी तातडीने लक्ष घालून, या अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या चालक मालकांवरती ताबडतोब कठोर कारवाई करावी तसेच यामागे वरदहस्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डोंबिवलीकर नागरिकांकडून जोर धरत आहे.