BREAKING NEWS
latest

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार दहाव्यांदा विराजमान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पाटना,दि. २० : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला मिळालेल्या प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर आज जनता दल (युनायटेड) चे नेते नितीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते या सोहळ्यास उपस्थित होते. हजारो कार्यकर्ते व नागरिकांनी मैदानात हजेरी लावून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात २६ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. नितीश यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सम्राट आणि विजय सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. मंचावर पीएम मोदींशिवाय अमित शाह, जेपी नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते. शपथ ग्रहणाआधी जेडीयू च्या अनेक नेत्यांना मंत्रि‍पदासाठी फोन गेले. ज्या नेत्यांना फोन गेले, त्यात विजय चौधरी, श्रावण कुमार, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मदन सहनी, जमा खान आणि लेशी सिंह हे नेते आहेत.

भाजपचे ५ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील पाच ज्येष्ठ नगरसेवकांनी थेट भाजपला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतप्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळेच आम्ही पक्ष सोडला, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगर भाजप मध्ये असंतोष उफाळला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उल्हासनगर महापालिकेतील
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरसवानी, प्रकाश मखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी आणि मीना सोंडे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

सलग पाच वेळा निवडून आलेले जमनू पुरसवानी हे भाजपचे १९८४ पासूनचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सलग १७ वर्ष उल्हासनगर महापालिकेत गटनेता असलेले पुरसवानी सिंधी समाजातले २५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. पुरसवानी यांनी यापूर्वी भाजपचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कंटाळून उल्हासनगरातील भाजपच्या नगरसेवकांनी भाजपची साथ सोडल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे ३० कोटींचा आमदार निधी वापराविना पडून राहिला, तसेच पक्षाच्या वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. बाहेरून आलेल्या नेत्यांना पद सन्मान, पण जुन्या कार्यकर्त्यांना सन्मान नाही अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावरच भाजपमध्ये फुट पडल्याने महायुतीतच उघड संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर युतीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. दरम्यान इतर पक्षांचा पर्याय होता मात्र हिंदुत्व आणि एनडीए मध्ये राहण्यासाठी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराचा ज्या प्रकारे विकास केला तसा विकास उल्हासनगराचा करावा, या विचाराने पाचही ज्येष्ठ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

देशात पहिल्यांदाच खेळवण्यात येणार इंडियन पिकलबॉल लीग..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली: देशात पहिल्यांदाच इंडियन पिकलबॉल लीग (आयपीबीएल) आयोजित केली जाणार आहे. या शहर-आधारित लीगमध्ये पाच संघ सहभागी होतील. ही लीग १ ते ७ डिसेंबर दरम्यान दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळवली जाईल. काल लीगच्या पहिल्या हंगामासाठी पाच फ्रँचायझी संघांची घोषणा करण्यात आली. चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात संघांची नावे आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. भारतातील आघाडीचे पिकलबॉल खेळाडू मिहिका यादव आणि अमन पटेल हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता टाईम्स ग्रुपने सुरू केलेली आयपीबीएल ही भारतातील एकमेव पिकलबॉल लीग आहे जिला क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ही लीग इंडियन पिकलबॉल असोसिएशन (आयपीए) द्वारे मान्यताप्राप्त आहे.

शहरातील संघ पहिल्यांदाच पिकलबॉलमध्ये

पिकलबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच, भारतात शहर-आधारित संघ मैदानात उतरले आहेत.

५ संघांची नावे जाहीर

गुरुग्राम कॅपिटल वॉरियर्स
मुंबई स्मॅशर्स
बंगळुरू ब्लास्टर्स
चेन्नई सुपर वॉरियर्स
हैदराबाद रॉयल्स

या लीगमध्ये भारत आणि परदेशातील सर्वोत्तम पिकलबॉल खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळतील. गुरुग्राम पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा लीगमध्ये संघ खेळवत आहे. एम३एम इंडियाचे संचालक पंकज बन्सल म्हणाले, “गुरुग्रामला वेगवान, सामाजिक आणि उत्साही खेळ आवडतात. शहराचा पहिला प्रमुख संघ असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

अदानी ग्रुप ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ म्हणून या लीगमध्ये सामील झाला आहे. अदानी स्पोर्ट्सलाइनचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय अदेसरा म्हणाले, “पिकबॉल हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या खेळांपैकी एक आहे. ही भागीदारी उदयोन्मुख प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था तयार करण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते.”

बीडमध्ये राज्य खो-खो च्या राष्ट्रीय संघ निवडीसाठी १८ ते २१ डिसेंबरला महासंग्राम रंगणार - डॉ. चंद्रजित जाधव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई, १८ नोव्हे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड ऍमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान बीडमध्ये रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस व नवनिर्वाचित महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहयोगी उपाध्यक्ष डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली.

राज्यातील सर्वोत्तम खेळाडूंचा खो-खो कौशल्यदंगल श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बीड येथे पार पडणार आहे. बीड येथे होणाऱ्या या महत्त्वाच्या राज्य स्पर्धेतून ५८ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे. निवडलेला संघ हैद्राबाद, तेलंगणा येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.  

खो-खो महासंघाकडे नोंदणी केलेले खेळाडूच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज नमुना व गणवेश क्रमांकानुसार यादीचे नमुने १ डिसेंबर २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. राज्य संघटनेकडून देण्यात आलेल्या निर्धारित फॉर्ममध्ये माहिती भरून १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत <maharashtrakhokhoassociation@gmail.com> या मेलवर पाठवणे बंधनकारक आहे. हाताने लिहिलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

प्रा. जे. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष - ऋषिकेश शेळके, सचिव - विजय जाहेर यांच्यासह वर्षा कच्छवा, योगेश सोळसे, मनोज जोगदंड, रमेश शिंदे, कैलाश गवते प्रफुल्ल हाटवटे आदी कार्यकर्ते हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत. या स्पर्धेमुळे बीडच्या क्रीडा संस्कृतीला नवा जोश आणि वेग मिळणार असून, राज्यभरातील अव्वल खेळाडूंमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळणार असल्याचे सरचिटणीस डॉ. जाधव यांनी सांगितले.

'डावखर फिल्म्स' निर्मित व दिग्दर्षित महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा 'गोंधळ' चित्रपट प्रदर्शित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : दिग्दर्शक संतोष डावखर यांनी आपल्या दिग्दर्शनातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला आधुनिक रुप देत ती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'गोंधळ' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून 'डावखर फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. 
मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन कथा आणि कलात्मक आणि दर्जेदार सादरीकरणासाठी ओळख निर्माण करणारा 'गोंधळ' हा सिनेमा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा सूक्ष्म वेध घेणारा हा चित्रपट भारतीय सरकारतर्फे आयोजित केलेल्या गोव्यातील ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शन' मध्ये निवडला गेला आहे. चित्रपटाच्या घोषणे पासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
या चित्रपटाबाबत लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतल्या अत्यंत पारंपरिक, धार्मिक आणि कलात्मक घटक असलेल्या 'गोंधळ' या परंपरेवर आधारित सिनेमाची कहाणी आहे. या परंपरेचा सन्मान राखत, चित्रपटगृहाबाहेर पारंपरिक गोंधळी मंडळींनी खास विधीपूर्वक अभिषेक करून चित्रपटाचा शुभारंभ केला. गोंधळातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवांच्या नावाचा जयघोष करत या मंडळींनी 'गोंधळ' चित्रपटाचा आनंद घेतला.
'गोंधळ' या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली लोककला, श्रद्धा, आणि संस्कृती यांचा समृद्ध आविष्कार आहे. 'गोंधळ' या चित्रपटाची कथा पारंपरिक गोंधळ विधीच्या पार्श्वभूमीवर उलगडते. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी होणारा गोंधळ हा धार्मिक विधी असला, तरी चित्रपटातून मानवी भावना, श्रद्धा आणि समाजातील बदलत्या विचारसरणींचा वेध घेतला आहे.
हा चित्रपट पाहतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात आल्या. आजवर मराठी सिनेमात अभावानेच दिसणारी गोष्ट म्हणजे कलात्मकतेसोबतच तांत्रिक बाबींमध्येही जणू नवा मापदंड निर्माण केला आहे. कॅमेऱ्याचे अप्रतिम दृष्यबंध, उत्कृष्ट छायाचित्रण, परिपूर्ण संपादन आणि जागतिक दर्जाच्या ध्वनीमिश्रणामुळे 'गोंधळ' हा चित्रपट पाहाताना एक दृश्य-सांस्कृतिक मेजवानी ठरला आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, "प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम अवर्णनीय आहे. आम्ही 'गोंधळ' हा चित्रपट पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने केला आणि आज प्रेक्षकांच्या प्रतिसादातून ते प्रेम परत मिळत आहे, यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रेक्षकांना 'गोंधळ' आवडत आहे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे." गोंधळ' म्हणजे आपल्या मातीतली आणि संस्कृतीतली कहाणी आहे. आत्मा, लोककलेचा वारसा आणि आधुनिकतेचा संगम यात प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, परंपरा आणि विधींना आम्ही एका नव्या दृश्यात्मक रूपात मांडण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटामागे एक समर्पित आणि कल्पक टीम कार्यरत आहे. प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक सूर हा आपल्या संस्कृतीचा स्पंदन अनुभवायला लावेल. 'गोंधळ' प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही, तर एक भावनिक आणि भव्य अनुभव देईल, जो मनात बराच काळ रुंजी घालेल, याची मला खात्री आहे."
नुकतेच प्रदर्शित झालेले 'कांतारा' आणि 'दशावतार' यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच 'गोंधळ'ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात 'कांतारा' मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात 'दशावतार' ला मोठे स्थान आहे. मात्र 'गोंधळ' ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे. 'कांतारा' आणि 'दशावतार' च्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. 'गोंधळ' ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे.
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, माधवी जुवेकर, सुरेश विश्वकर्मा असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत, संतोष डावखर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, दीक्षा डावखर सहनिर्माती आहेत. 
बऱ्याच कालावधीनंतर एक छान आणि चांगला, हटके विषय घेऊन हा चित्रपट आपल्या भेटीस आलेला आहे .'गोंधळ' च्या इंडियन पॅनोरमामध्ये झालेल्या निवडीमुळे मराठी सिनेमाला नवी ओळख मिळाली आहे. चाहत्यांची उत्सुकता पाहता अंधश्रद्धेचा सूक्ष्म वेध घेणारा हा सिनेमा  मराठी चित्रपटसृष्टीत नवीन मापदंड प्रस्तापित करू शकेल यात काही शंका नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.त्यातून आपल्या कुळाचाराबद्दल आणि परंपरेबद्दल नक्कीच आदर निर्माण होऊ शकतो.

डोंबिवलीला ‘ब्लाईन्ड-फ्री सिटी’ करण्याचा संकल्प करत ‘नेत्र रक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक’ ला सुमारे १५०० नागरिकांचा सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.१६ : 'अनिल आय हॉस्पिटल', 'महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी' (MOS), 'इंडियन मेडिकल अससोसिएशन' (IMA) डोंबिवली आणि 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेत्र रक्षा - ए वॉक फॉर डायबेटीस आय अवेअरनेस' या भव्य रॅलीला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे १५०० नागरिकांनी या वॉक मध्ये आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार माननीय श्री. रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष (भाजपा) यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना आवाहन केले की, “नियमित डोळ्यांची तपासणी  करून डोंबिवलीला अंधमुक्त 'ब्लाईन्ड-फ्री' शहर बनवण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा.” तसेच त्यांनी 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी' (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे या जनजागृती उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे डोंबिवली आरोग्यदृष्ट्या सक्षम होत असल्याचे सांगितले.
'अनिल आय हॉस्पिटल' च्या संचालिका व महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) चे अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी सांगितले की, “प्रत्येक डायबेटीक रुग्णाने दर वर्षी किमान एकदा तरी डायबेटीक रेटिनोपॅथीची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. उशिरा निदान झाल्यास दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो.” तसेच त्यांनी नागरिकांना डोळ्यांच्या आजाराबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) तर्फे राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘बाल नेत्र रक्षा अभियान’ जाहीर करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विस्तृत नेत्र तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
या रॅलीमध्ये डोंबिवलीतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, डोंबिवली क्लस्टर कॉलेज ३४, रोटरी व रोटरॅक्ट क्लब्स, ज्येष्ठ डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर, तसेच 'इंडियन मेडिकल अससोसिएशन (IMA), सामाजिक संस्था आणि शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात आय एम ए प्रेसिडेंट (IMA) डोंबिवली चे डॉक्टर विजय चिंचोले, श्री. किशोर मानकामे, डॉ. सुशीला विजयकुमार, श्री. प्रभू कापसे, श्री. भाई पानवडीकर  यांचीही उपस्थिती लाभली.
नागरिकांच्या या मोठ्या प्रतिसादामुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, हा उपक्रम डोंबिवलीला अंधमुक्त शहर (ब्लाईन्ड-फ्री सिटी) करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले. आगामी काळातही अशा जनजागृतीद्वारे नागरिकांचे डोळे आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे 'अनिल आय हॉस्पिटल' च्या संचालिका व महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांच्या तर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

किरकोळ धक्का लागण्याच्या वादातून तरुणाची हत्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  डोंबिवली पूर्व येथील एम.आय.डी.सी. परिसरात 'मालवण किनारा' हॉटेल जवळ घडलेल्या या घटनेत आकाश सिंग या तरुणाची हत्या झाली होती. डोंबिवली पूर्वेतील स्थित मालवण किनारा हॉटेलसमोर शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधून बाहेर पडताना किरकोळ धक्का लागला. त्यानंतर दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेने डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आकाश सिंग असे आहे. तो नवी मुंबई येथे कॉल सेंटरमध्ये काम करत होता. हॉटेलमधून बाहेर पडताना त्याचा एका दुसऱ्या तरुणाला किरकोळ धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून वाद वाढला होता आणि अनुचित प्रकार घडला होता. या प्रकरणात हत्येनंतर नाशिक, मालेगाव, चाळीसगाव येथे लपून बसलेल्या अमर महाजन, अक्षयकुमार वागळे, अतुल कांबळे, निलेश ठोसर, प्रतिकसिंग चौहान, लोकेश चौधरी अशी अटक आरोपींची नावे असून मानपाडा पोलीसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या  आवळून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.